१४ सप्टेंबरच्या चतुरंग पुरवणीतील कृ. ज. दिवेकर लिखित ‘सांत्वन-एक उपचार?’ हा लेख खूपच आवडला. बऱ्याचशा गोष्टी अलीकडे केवळ उपचार या प्रकारातच मोडाव्यात असेच वर्तन अनेकांकडून घडत असते. लेखात वर्णिलेल्या सोमणबाई नोकरी करणाऱ्या होत्या म्हणून तुलनेने त्यांना मर्यादित समूहाला सामोरे जाण्याची वेळ आली. पण बहुजन समाजात याहून गंभीर वातावरण आहे.
अजून महाराष्ट्राच्या विविध ज्ञातिसमूहांमध्ये याबाबत पुरेसे प्रबोधन न झाल्याने ज्याच्या घरी दु:खद प्रसंग घडलाय त्याच्या घरावर सांत्वनाला येणाऱ्यांचे लोंढेच्या लोंढे आदळत असल्याचे पाहायला मिळते. यात त्या घरातील पुरुषवर्गाला कामधाम सोडून मृताच्या तसबिरीसमोर १३ दिवस मांडी घालून बसण्याची जणू अप्रत्यक्ष सामाजिक सक्तीच होते; या साऱ्यात त्या घरातील महिलावर्ग पार भरडून निघतो. त्यांचा शोक, देहधर्म, विश्रांती, जेवणखाण, मन:स्वास्थ्य याचा कसलाही विचार त्यांना वेळोवेळी ‘भेटायला’ येणारे करताना दिसून येत नाहीत. यात शिकलेल्या सुना, मुली, सासूरवाशिणी भरडून निघतात. त्यांना स्वत:ची ‘अक्कल पाजळून’ जमत नाही. वाईट याचे वाटते की, अशा वेळी घरातील पुरुषवर्गही महिलांची बाजू खंबीरपणे घ्यायला पुढे येत नाही. विवाहित पुरुषाच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी त्याच्या पत्नीचे मंगळसूत्र तोडणे, बांगडय़ा फोडणे, जोडवी काढणे, कुंकू पुसणे प्रकार अशा कालबाह्य़ रूढींच्या उच्चाटनासाठी २१ व्या शतकातही ना सोकॉल्ड प्रगतीशील पुरुषांच्या संघटना पुढाकार घेत, ना नारी अत्याचार विरोधात बॅनरबाजी करणाऱ्या, मेणबत्त्या लावणाऱ्या महिलांच्या एनजीओ रोखठोकपणे समोर येत! जाणारा जीव निघून जातो, पण त्याचा शोक वाहणाऱ्याला काय काय दिव्यातून जावे लागते याची सहवेदना आपल्या समाजाला जाणवेल व त्यानुसार त्यांच्या वर्तनात सुधारणा होईल तो सुदिन!
– राजेंद्र घरत, वाशी, नवी मुंबई.
शुद्धलेखनाची ऐसीतैशी
शुध्द नव्हे ‘शुद्ध लिही रे शुद्ध’ या शीर्षकाचा २८ सप्टें.च्या ‘चतुरंग’मधील प्रा. स्वाती दामोदरे यांचा लेख फार कळकळीने लिहिला आहे. मराठी लेखन शुद्ध असावे असे वाटणारे चार-दोन लोक शिल्लक आहेत हे पाहून फार समाधान वाटले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लेखन किंवा शालेय विद्यार्थ्यांचे लेखन ऱ्हस्व-दीर्घापुरते तरी काळजी वाटावी इतके अशुद्ध झालेले आहे. वृत्तपत्रातच काय ते शतप्रतिशत नाही, तरी ९८ टक्के शुद्धलेखन वाचावयास मिळते. महानगरपालिकेने लिहिलेल्या फलकावर दीनानाथ ऐवजी दिनानाथ, हॅपी ऐवजी हॅप्पी, वसुंधरा ऐवजी वसुधरा, क्षेत्रीय ऐवजी क्षेत्रिय, पुणे ऐवजी पूणे, नवीन ऐवजी नविन, परीक्षा ऐवजी परिक्षा, अधीक्षक ऐवजी अधिक्षक आणि प्रदूषण ऐवजी प्रदुषण असे वाचून इतके वाईट वाटते की, ज्याने कुणी या पाटय़ा लिहवून घेतल्या त्याच्याकडून या पाटय़ा पुन्हा ‘शुद्ध’ लिहवून घ्याव्यात व त्याचा खर्च संबंधिताला करायला लावावा. जे परिपत्रक, नोटीस, सूचना, नियतकालिक किंवा अन्य काही मजकूर छापतात किंवा फळ्यावर लिहितात आणि त्यातील शुद्धलेखनाची चूक दाखवून दिल्यावर ज्यांना वाईट वाटते अशांना मी विनंती करतो की, त्यांनी मजकूर लिहिल्यानंतर माझ्याकडून तपासून घ्यावा. या कामासाठी मला मध्यरात्री उठविले तरी मी तक्रार करणार नाही. अशुद्ध पाटय़ा पाहिल्यावर मनात शब्द उमटतात ‘शुद्ध लिही रे शुद्ध’!
– मोहन ठेकेदार, पुणे.
..हे एक अग्निदिव्यच!
‘लग्नातला अडथळा- व्यसन’ हा (चतुरंग २१ सप्टेंबर) लेख वाचला. संपूर्ण लेखात दारूला ‘दारू’च म्हटलं आहे हे विशेष! दारूला मद्य म्हटलं की, उगाचच उच्च अभिरुचीच्या मुलाला अकारण प्रतिष्ठा दिल्यासारखे वाटते.  ग्रामीण स्त्रियांना तर दारुडय़ा नवऱ्यांमुळे फार सोसावे लागते. त्यांच्या मुलाबाळांचे आयुष्य भेदरलेल्या क्षणांनी झाकोळलेले असते!  व्यसनाधीन तरुणाचे एखाद्या संस्कारी मुलीशी लग्न झाले तर तिची होणारी कुतरओढ किंवा एखाद्या निव्र्यसनी तरुणाच्या आयुष्यात ‘स्टेटस्’ सांभाळणारी एखादी तथाकथित आधुनिक मद्याधीन तरुणी आली, तर त्याचं होणारं माकड या दोन्ही गोष्टींना तथाकथित उच्चभ्रूच जबाबदार समजायला हवेत. दारूच्या कौतुक सोहळ्याचं ही मंडळी अवास्तव प्रदर्शन मांडतात आणि त्या जाळ्यात कोवळे तरुण अलगद अडकतात. विवाहाच्या या सुंदर, राजस खळखळणाऱ्या निर्झराचं डबक्यात रूपांतर होऊन जातं! दारूसारख्या या अभद्र पेयांना प्रतिष्ठा देणारे अशा बौद्धिक लेखांची टर उडवतात.
 दारूमुळे विनाशाकडे वाटचालीला सुरुवात होते, त्यावरूनच ‘दारुण’ हा शब्द तयार झाला असावा. पाश्चिमात्य शैलीचे राहणीमान दाखविण्यासाठी मद्यपान ही जणू एक अटळ अट बनली आहे. प्रतवारी भलेही वेगवेगळी असेल, पण या ‘जादू -ई- लाल’ पाण्यानं अनेकांना मोहित केलं आहे! ‘धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी गरिबी’ हे सूत्र जीवनमान समृद्धीच्या, प्रगतीच्या प्रयत्नांना खीळ घालणारे वाटत असले
तरी ही श्रीमंती जर व्यसनांचे माहेरघर बनवणारी असेल तर तिलाच लुळीपांगळी म्हणायला हवं! अशी
श्रीमंती माणसाला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग करते. जोडीदाराच्या आयुष्याशी खेळण्याची ही कृती निषेधार्ह ठरवून शिक्षेस पात्र ठरवली पाहिजे. सशक्त व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी आपली पवित्र
विवाह संस्था व्यसनांच्या अडथळ्यातून मुक्त झाली पाहिजे. हे काम अशा उद्बोधक लेखांमुळे साध्य होऊ शकते.
– दिलीप जोशी, उरण, रायगड
प्रेरणादायी ‘दीपस्तंभ’!
२१ सप्टेंबर ‘कॅन्सर पेशन्ट एड् असोसिएशन’तर्फे साजऱ्या होणाऱ्या दिनानिमित्त ‘चतुरंग’मध्ये जे उल्लेख प्रसिद्ध झाले ते मनास स्पर्श करून गेले. कर्करोगाने आपल्या स्वत:च्या मुलाचा मृत्यू मनात खोल दडवून ठेवून कर्करोगग्रस्त लोकांसाठी स्वत:चं आयुष्य वेचणाऱ्या तीनही ज्येष्ठांचे कार्य बघून मन हेलावून गेले व जगात आजही परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रूपाने आहे याची खात्री देऊन गेला.
डॉ. ऋतुजा पाटील-कुशलकर यांचा हा लेख मनात अतिशय भावला! वाचून मन हेलावले. पण त्यांचे त्यागमय कर्तृत्व बघून द्रवले. अशाच प्रकारच्या विचारप्रवर्तक लेखांनी समाजमनं घडवली जातात. समाजाने अशा प्रकारच्या कार्याचा मागोवा घ्यावा, असं मनापासून वाटतं.
‘टर्निग पॉइंट’ नावाचा सुमती नाईक यांचा लेख वाचला. कर्करोगातून बाहेर पडून चांगलं जीवन जगता येतं याचा सत्यानुभव सांगणारा लेख फारच आवडला.
‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.’
निराधार आभाळाचा तोच भार वाहे, या ओळी प्रत्यक्ष जगताना ज्योती घिया यांच्या ‘भय केव्हाच संपले आहे’ या लेखातून मिळाला. नैसर्गिकरीत्या, अपघातग्रस्त किंवा दंगलीतील मृतांना मुक्ती देण्याचे काम आज ७५ व्या वर्षीही त्या करत आहेत, केवढे हे धैर्य! नि केवढे हे पुण्यकर्म! अशा देवमाणसांना वंदन केल्याशिवाय राहवत नाही. लेख वाचून माणसातच प्रत्यक्ष देव भेटल्याचा प्रत्यय आला.
– सौ. सुनीती सुरेश सराफ, डोंबिवली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा