१२ ऑक्टोबरच्या पुरवणीतील ‘प्रश्नांकित उत्तरायण’ हा लेख व पुढील पुरवणीतील ‘ऐसे असावे संसारी..’ हा लेख वाचून नवी आणि ज्येष्ठ पिढी जीवनाकडे, जगाकडे आणि एकमेकांकडे कुठल्या नजरेने पाहते, याचा उलगडा व्हायला हरकत नसावी. ज्या दृष्टीने आपण जीवनाकडे पाहतो त्याप्रमाणे त्याचे रूप आपल्याला दिसते. काहींना ते क्रीडांगण भासते तर काहींना रणांगण. काहींना ते रंगमंच वाटते तर काहींना प्रश्नमंच. काहींच्या मते ते अथांग महासागर आहे तर काहींच्या मते सुमधुर सूरसागर. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठलाही असला तरी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वावलंबी जीवन जगता आले पाहिजे, असे वाटत असले तरी बहुतेक जण जगतात परावलंबनातच. शारीरिक परावलंबित्व टाळता येत नसले तरी स्वत:च निर्माण केलेल्या मानसिक परावलंबित्वात आपण जगत असतो, हे साऱ्या दु:खाचे मूळ आहे.
किशोरावस्थेपासूनच परावलंबीपणाची सवय लागते, लावली जाते. नंतर ती भल्याभल्यांना सोडणे कठीण जाते. म्हणूनच आपल्यासमोर एखादा प्रश्न उभा राहिला की आपण निर्णय घेऊ शकत नाही. वास्तविकता स्वीकारायला जड जाते. परिस्थिती आहे तशीच स्वीकारावी लागते आणि त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा शोध घ्यावा लागतो. त्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते, जो आपल्याजवळ असतोच असे नाही. म्हणूनच दुसरे कुणी तरी येऊन आपले प्रश्न सोडवावेत अशी आपली अपेक्षा असते. गोंधळलेले आपण कुणाच्या तरी आश्रयाला धावतो. दैववादी बनतो. मनुष्येतर प्राण्यांमध्ये असे नसते. जन्मानंतर काही काळ माता-पिता पिल्लांची काळजी घेतात आणि नंतर आपापल्या मार्गानी निघून जातात. आपल्याला हे जमणार नसले तरी आई-बापांनी मुला-बाळांत आणि मुला-बाळांनी आई-बापांत किती काळ गुंतून राहायचे हे ठरविले पाहिजे.
असंख्य अपेक्षांच्या ओझ्याखाली वृद्धावस्था हरवून बसलेल्या ज्येष्ठांनी आता ठरवले पाहिजे. निवृत्तीपूर्वी मी अमुक अमुक होतो हे ज्यांना विसरता येत नाही त्यांची वृद्धावस्था कधीही सुखकर होत नाही. म्हणूनच मी स्वेच्छानिवृत्त होताच माझ्या नावामागे असणारी ‘प्राध्यापक’ ही उपाधी काढून टाकली आहे.
– सोमनाथ देशमाने, अहमदनगर
हेही नसे थोडके!
१४ सप्टेंबरच्या पुरवणीतील ‘जुनी विटी नवे राज्य’मधील ‘गोल गोल राणी’ हा मंगला गोडबोले यांचा लेख वाचला. तशी ती तीन वेगवेगळ्या वृत्तींची गोष्टच वाटली. वृद्धांचे सद्य जीवन सध्या मुले-मुली परदेशी राहात असल्यामुळे एका निराळ्या मार्गावरून जात आहे. तब्येत धड तोपर्यंत दोघेच राहाणे शक्य असते, पण पुढे संसार संपतो. बाई एकटय़ाच उरतात व मग मुले मुली त्यांच्या सोयीनुसार आईची राहाण्याची व्यवस्था करतात. खरे तर यात त्यांचीही चूक नाही. त्यांचेही संसार आहेत. मुलांचे शिक्षण-करियर आहे. थोडेथोडे दिवस एकेक मुला-मुलीकडे रहायचे. म्हणजे आईलाही बदल वाटेल व जबाबदारी पार पाडण्याचे श्रेयही सर्व मुलामुलींना मिळेल. दुसऱ्या पर्यायात एकाच घरी कायम आईने रहाणे हा होय. आता या दोन्हीमध्ये आईच्या वाटय़ाला जो येतो तो तिला त्रासदायक वाटतो. एकाच ठिकाणी वैताग वाटतो आणि दुसऱ्या पर्यायात वरचेवर घर, जागा, माणसे बदलणे व प्रवास करणे सगळेच आईला त्रासदायक वाटते. माणसाची ही प्रवृत्तीच आहे. जे वाटय़ाला येते ते नकोसे वाटते व जे मिळत नाही ते हवेसे वाटते. कोणत्याही पर्यायात असमाधानच आहे. पण त्यात मुला-मुलीचांही काही दोष नाही. सध्याचे फास्ट जीवन त्यांचाही विचार केला तर ‘कालाय तस्मै नम:’ अजून आपल्या भारतात निदान मुले मुली आईला विचारात तरी घेतात, हेही नसे थोडके!
-उषा खैराटकर, ठाणे.
उल्लेख खटकला
३१ ऑगस्टच्या अंकातील सुमन ओक यांचा ‘अंधश्रद्धेचा बळी’ हा लेख वाचला. मात्र विविध धर्मामध्ये स्त्रियांची होणारी अवहेलना वर्णन करताना त्यांनी लिहिलेले ‘समर्थ रामदासांनीसुद्धा ‘दासबोध’मध्ये स्त्रियांना नाना दूषणे लावली आहेत’ हे वाक्य खटकले.
वास्तविक समर्थानी दासबोधामध्ये
‘त्याचा महिमा कळे कुणाला। माता वाटोनी कृपाळू जाला। प्रत्यक्ष जगदीश जगाला। संभाळीत असे।।’ (२०-४-५) असे म्हणून स्त्रीला गौरवले आहे. स्त्री शक्तीचे महत्त्व जाणून त्यांनी वेण्णास्वामीना मठाधिपती केले. अक्कास्वामींनी सज्जनगडाचा २८ वर्षे कारभार पाहिला. समर्थसंप्रदायाच्या कार्यात अनेक स्त्रियांचे मोलाचे योगदान आहे. गिरिधरस्वामींच्या समर्थ प्रतापात ४२ महिला शिष्यांचा उल्लेख आहे. हे समर्थाचे द्रष्टेपण आहे. समर्थ जर स्त्रीद्वेष्टे असते तर हे कार्य त्यांनी केलेच नसते. समर्थ साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक न. र. फाटक यांनी आपल्या ग्रंथात ‘दासबोधात कुठेही शृंगाररस नाही आणि कुठेही स्त्रीद्वेष नाही’ असे दासबोधाचे वेगळेपण सांगितले आहे.
स्त्रियांच्या खच्चीकरणात इतर घटकांचा वाटा असेल, पण समर्थाचा खचितच नाही हे येथे नमूद करावेसे वाटते.
-डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर, विश्वस्त, श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड.
‘आनंदमयी’
३१ ऑगस्टच्या ‘चतुरंग’मधील लीला मस्तकार-रेळे यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्ताने त्यांच्या स्नुषा लता रेळे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यानिमित्ताने लिहिलेला लेख वाचला. विभिन्न क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याविषयी वाचून मी प्रभावित झाले. लेख वाचून त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाची जाणीव झाली आणि रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई इत्यादींच्या कार्याची आठवण झाली.त्यांनी स्वत: १९३०-४०च्या काळात अनेक पदव्या संपादन करून उच्च दर्जाचे शिक्षण तर घेतलेच, शिवाय स्वत:चे स्वतंत्र विचार प्रगल्भपणे मांडले. त्या काळी त्यांनी मांडलेले विचार बघितले तर एवढे बंडखोर विचार मांडायला धाडस लागते आणि ते विचार प्रत्यक्षात आणायला धडाडी लागते. ती त्यांच्यात नक्कीच होती. लीलाबाई एक अभ्यासक होत्या, विचारवंत होत्या, त्यांचे जीवन म्हणजे आचार-विचारांचा यज्ञ होता, असे वाटते
-सुलभा विलास वैद्य, नाशिक.
‘सासू-सासरे होताना’
थोडय़ाच दिवसांपूर्वी पुष्कळ वर्षांनी माझा शाळेतला मित्र भेटला. आम्ही दोघांनीही सत्तरी ओलांडलेली आहे. काही दिवसांनी त्याच्या घरी गेलो. बोलता बोलता त्याने आपण बाहेर हॉटेलात जाऊन बोलू असे सांगितले. शाळेत असताना तो हुशार होता आणि एका मोठय़ा कंपनीत उच्च पदावर होता. तो शिस्तीचा भोक्ता होता. निवृत्त झाल्यावर तो कचेरीप्रमाणे घरीपण शिस्तीत वागत होता. त्यामुळे त्याचे आणि मुलाचे पटत नव्हते. मुलाने आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. हा एकच विषय एकसारखा त्याच्या डोक्यात घोळत होता. सून आणि मुलगा त्याच्या इच्छेविरुद्ध वागत होती.
मी त्याला समजावले, लग्न झाल्यावर मुलगा आणि सून आपण सांगणार तसेच वागणार नाहीत. कचेरीतली शिस्त बाजूला ठेवली पाहिजे. मुलगा आणि सून कचेरीतून आल्यावर त्यांच्याकडे गोडीगुलाबीने वाग, आपल्या वयानुसार आपण वागायला हवे. कधी कधी त्यांना एकांत मिळण्यासाठी गावातल्या घरात थोडे दिवस राहत जा, अशा तऱ्हेने मी त्याला समजावले.
थोडय़ा दिवसांनी मी घरी त्याला फोन केला. तो खूप आनंदी वाटला. या पत्राचे मुख्य कारण म्हणजे गौरी कानिटकर यांचा ७ सप्टें. रोजी ‘चतुरंग’मध्ये आलेला लेख. त्याचा असा परिणाम दिसला.
-रा. आ. कंटक