डॉ. सुवर्णा दिवेकर यांचा १६ फेब्रुवारीच्या अंकातील ‘न्यायावर अन्याय’ हा लेख वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही. एका घटनेचा तपशील येथे द्यावासा वाटतो. माझ्या परिचयातील एक नोकरदार अविवाहित स्त्री, नेहमीच स्त्री-स्वातंत्र्याबद्दल आणि भारतातील रूढीप्रिय समाजाबद्दल बोलत असे. एकदा ती अशीच जेवणाच्या सुट्टीत तिच्या स्त्री-सहकाऱ्यांबरोबर चर्चा करत होती. त्या वेळी त्यांच्याच ऑफिसातील एक पुरुष कर्मचारी आला आणि त्याचा या चर्चेशी काहीही संबंध नसताना त्या स्त्रीला म्हणाला, ‘तुम्ही स्वैराचार केला आहे की नाही ते सांगा?’ (सदर पुरुष सहकाऱ्याने पहिली बायको जिवंत असताना, दुसरे लग्न केले आहे. शिवाय त्याचे स्त्रियांबरोबरचे वर्तन आक्षेपार्ह राहिले आहे.) त्याचे हे बोलणे तेथे उपस्थित सर्व स्त्री-कर्मचाऱ्यांनी ऐकले होते. स्त्री-स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या या महिलेने त्या पुरुष कर्मचाऱ्याविरोधात न घाबरता वरिष्ठांकडे तक्रार केली. दरम्यानच्या काळात तेथील युनियन लीडरनी त्या साक्षीदार स्त्रियांना साक्ष न देण्याचे फतवे काढले. त्याप्रमाणे अर्थातच त्या महिला कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही तेथे उपस्थित नव्हतोच,’ अशी साक्ष दिली. यामुळे तक्रारदार महिलेला न्याय मिळाला नाही. फितुर झालेल्या बहुतेक महिला कर्मचाऱ्यांच्या मुली आयटीमध्ये नोकरीला आहेत. त्यांनी किमान एकदा हा विचार करणे गरजेचे होते की, त्यांच्या मुलीवरही अस प्रसंग ओढवू शकतो. तिच्यावर अशी अपमानास्पद टिप्पणी करू शकतो, तिला त्रास देऊ शकतो. पण सामाजिक भान हरवलेल्या स्त्रिया, अशा वेळी कातडीबचाऊपणा करताना दिसतात. बाईने ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा उच्चार जरी केला तरी, त्याला ‘स्वैराचार’ म्हणण्याची जुनीच चाल आहे. ज्याने बायकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होतो.
डॉ. दिवेकर म्हणतात की, कायद्याचा वापर पुरुषांविरुद्ध शस्त्र म्हणूनही केला जातो. त्यांनी शोषण झालेल्या स्त्रिया आणि खोटय़ा तक्रारी करणाऱ्या स्त्रिया यांचे प्रमाण तपासले आहे का? शिवाय एखाद्दुसरी बाई कायदा वाकवते, म्हणून कायदाच करायचा नाही हे अजब तर्कशास्त्र नाही का? डॉक्टरांना पुरुषांकडून त्रास झालेला दिसत नाही. आजच्या काळात आपल्यावर अत्याचार झाला नाही म्हणून समाधान मानायचे दिवस आहेत म्हणा. उद्या काय होईल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत आपल्या पुरवणीत असे पुरुषधार्जणिे लेख कसे काय छापले जातात?
-स्मिता पटवर्धन, सांगली

नाण्याची दुसरी बाजू
डॉ. सुवर्णा दिवेकर यांचा ‘न्यायावर अन्याय’ या लेखातील प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे. वर्षांनुवर्षे स्त्रियांवर अन्याय झाला, कबूल आहे. दिल्लीत जे घृणास्पद कृत्य झालं ते दंडनीयच आहे. त्या अपराध्यांना माफी नाही, मग तो कायद्याने बालगुन्हेगार असला तरी. परंतु नाण्याची दुसरीही बाजू ऐकून घेतली पाहिजे.
माझ्या मुलाच्या मित्राचे लग्न झाले. दुसऱ्याच दिवशी ती मुलगी सगळे दागिने घेऊन माहेरी निघून गेली आणि घटस्फोटासाठी अर्ज पाठवला. ‘सासरी छळ होतो’ म्हणे. अहो, पण ती राहिलीच कुठे छळ करायला?
 स्त्रियांना समान हक्क मिळाला पाहिजे म्हणून आपण धडपडतो, त्यासह पुरुषांवर आपण अन्याय करत नाही ना हे सुद्धा मुद्दाम तपासून बघितले पाहिजे. लेखिकेने जी सगळी उदाहरणं दिली आहेत ती सगळीच स्तुत्य आहेत. पण एक गोष्ट नक्की लहान मुलींवर जे अत्याचार करतात त्यांना माफी देऊ नये.
-अर्चना कुलकर्णी, नालासोपारा

संकल्पना भावली
१६ फेब्रुवारीच्या ‘चतुरंग’मधील मंगला गोडबोले यांचा ‘फ्रीझमधील अन्न’ हा लेख आवडला. ही संकल्पना ज्या पद्धतीने त्यांनी मांडली, ते अतिशय आवडले. तसेच एक स्त्री असून डॉ. दिवेकर यांनी लिहिलेला ‘न्यायावर अन्याय’ हा लेखही पसंतीस उतरला. याबाबतीत असे म्हणावेसे वाटते की, सध्या सुरू असलेल्या मराठी मालिकांमधील दाखवत असलेली स्त्रीची प्रतिमा पाहून कोणत्याही महिला हक्क समितीने तितका कठोरपणे आवाज उठाविलेला नाही. बहुसंख्य घरांमध्ये स्त्रीला होणारा त्रास हा स्त्रीकडूनच केला जातो, हे फार अभागीपणाचे आहे.
-सुधीर डांगे, नाशिक  

माणुसकी नांदणारा समाज
‘न्यायावर अन्याय’ हा लेख म्हणजे दिल्लीतील पाशवी बलात्काराचे निखारे अजूनही धगधगत असताना एका लेखिकेने पुरुषांना दिलेला कौतुकास्पद दिलासा होता, असे वाटले. कौतुक पुरुषांची बाजू घेतली म्हणून नव्हे तर पीडित स्त्रियांचे हुंदके चहूबाजूंनी निनादत असताना नाण्याची दुसरी बाजू इतक्या समर्थपणे मांडण्याचे धर्य त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरले म्हणून. अलीकडेच एका झेरॉक्सच्या दुकानासमोर घडलेला प्रसंग यामुळे आठवला. एक तरुण स्त्री बराच वेळ तिथे कामानिमित्त उभी होती. एक साठी ओलांडलेले वयस्कर गृहस्थ तिथे आले व जागा करून त्या स्त्रीच्या बाजूला उभे राहिले. त्यांच्या हातातील बँगेचा तिला स्पर्श होताच ती तावातावाने म्हणाली, ‘तुम्हाला दिसत नाही का मी उभी आहे? मला धक्का कशासाठी म्हणून देत आहात?’ आपण ज्या व्यक्तीवर आरोप करीत आहोत ती व्यक्ती आपल्या वडिलांच्या जागी आहे हे तिच्या क्रोधी नजरेला दिसत नव्हते. ‘मॅडम, मला जास्त वेळ उभे राहता येत नाही म्हणून मी पुढे आलो. मला क्षमा करा,’ असे त्यांनी सांगूनही तिचे समाधान होत नाही हे पाहून आजूबाजूच्या लोकांनी तिला खडसावले व प्रकरण मिटवले. इथे प्रश्न न्यायनिवाडय़ाचा नसून माणूस म्हणून दुसऱ्याकडे (स्त्रियांनी पुरुषाकडे किंवा पुरुषांनी स्त्रियांकडे) कोणत्या नजरेने आपण पाहतो हा आहे. पुरुष-स्त्री यांमध्ये असा पराकोटीचा भेद केला व प्रत्येक पुरुषाकडे पूर्वग्रहदूषित नजरेने पाहिले तर सारे जग बलात्कारी फूत्काराने भरलेले दिसेल. रस्त्यावर चालणाऱ्या स्त्रीचा तोल गेला तर मागेपुढे न पाहता तिला आधारासाठी पुढे आलेला एखाद्या अनोळखी पुरुषाचा मदतीचा हात देखील बलात्कारी वाटेल व स्त्री स्वत:च्याच चुकीमुळे सुसंस्कारित व सह्रदयी पुरुषांच्या स्त्रीदाक्षिण्याला वंचित होईल. अपार सेवा असलेल्या मनाला स्त्री-पुरुष फरक जाणवत नाही आणि म्हणूनच समाजरथाची ही दोन चाके आजवर एकाच मार्गावरून निर्भयपणे चालली आहेत. सत्याचे पारडे नेहमीच वजनदार असते हे दोघांनीही ध्यानात ठेवले तरच सत्य, शील, करुणा, माणुसकी नांदणारा आदर्श समाज तयार होईल
– सूर्यकांत भोसले, मुलुंड

निपक्षपाती दृष्टिकोन
डॉ. सुवर्णा दिवेकर यांच्या ‘न्यायावर अन्याय’ या लेखातून लेखिकेने निडर आणि प्रवाहाविरुद्ध तर्कसंगत सडेतोड मत मांडणारी भूमिका घेतली आहे. खऱ्या अर्थाने आपल्या प्रतिपादनाप्रमाणे अनेक चांगले पुरुष या अवस्थेतून गेलेले आहेत. अनेक फक्त तडजोड वा भीती म्हणून रोज मरत मरत जगताहेत. आपण एक स्त्री असूनही आपल्या लेखणीतून एका नि:पक्षपाती दृष्टिकोनातून लेखन झाले याबद्दल आपले अभिनंदन.
-प्रा. संदीप गायकवाड, औरंगाबाद</p>

Story img Loader