डॉ. सुवर्णा दिवेकर यांचा १६ फेब्रुवारीच्या अंकातील ‘न्यायावर अन्याय’ हा लेख वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही. एका घटनेचा तपशील येथे द्यावासा वाटतो. माझ्या परिचयातील एक नोकरदार अविवाहित स्त्री, नेहमीच स्त्री-स्वातंत्र्याबद्दल आणि भारतातील रूढीप्रिय समाजाबद्दल बोलत असे. एकदा ती अशीच जेवणाच्या सुट्टीत तिच्या स्त्री-सहकाऱ्यांबरोबर चर्चा करत होती. त्या वेळी त्यांच्याच ऑफिसातील एक पुरुष कर्मचारी आला आणि त्याचा या चर्चेशी काहीही संबंध नसताना त्या स्त्रीला म्हणाला, ‘तुम्ही स्वैराचार केला आहे की नाही ते सांगा?’ (सदर पुरुष सहकाऱ्याने पहिली बायको जिवंत असताना, दुसरे लग्न केले आहे. शिवाय त्याचे स्त्रियांबरोबरचे वर्तन आक्षेपार्ह राहिले आहे.) त्याचे हे बोलणे तेथे उपस्थित सर्व स्त्री-कर्मचाऱ्यांनी ऐकले होते. स्त्री-स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या या महिलेने त्या पुरुष कर्मचाऱ्याविरोधात न घाबरता वरिष्ठांकडे तक्रार केली. दरम्यानच्या काळात तेथील युनियन लीडरनी त्या साक्षीदार स्त्रियांना साक्ष न देण्याचे फतवे काढले. त्याप्रमाणे अर्थातच त्या महिला कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही तेथे उपस्थित नव्हतोच,’ अशी साक्ष दिली. यामुळे तक्रारदार महिलेला न्याय मिळाला नाही. फितुर झालेल्या बहुतेक महिला कर्मचाऱ्यांच्या मुली आयटीमध्ये नोकरीला आहेत. त्यांनी किमान एकदा हा विचार करणे गरजेचे होते की, त्यांच्या मुलीवरही अस प्रसंग ओढवू शकतो. तिच्यावर अशी अपमानास्पद टिप्पणी करू शकतो, तिला त्रास देऊ शकतो. पण सामाजिक भान हरवलेल्या स्त्रिया, अशा वेळी कातडीबचाऊपणा करताना दिसतात. बाईने ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा उच्चार जरी केला तरी, त्याला ‘स्वैराचार’ म्हणण्याची जुनीच चाल आहे. ज्याने बायकांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न होतो.
डॉ. दिवेकर म्हणतात की, कायद्याचा वापर पुरुषांविरुद्ध शस्त्र म्हणूनही केला जातो. त्यांनी शोषण झालेल्या स्त्रिया आणि खोटय़ा तक्रारी करणाऱ्या स्त्रिया यांचे प्रमाण तपासले आहे का? शिवाय एखाद्दुसरी बाई कायदा वाकवते, म्हणून कायदाच करायचा नाही हे अजब तर्कशास्त्र नाही का? डॉक्टरांना पुरुषांकडून त्रास झालेला दिसत नाही. आजच्या काळात आपल्यावर अत्याचार झाला नाही म्हणून समाधान मानायचे दिवस आहेत म्हणा. उद्या काय होईल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत आपल्या पुरवणीत असे पुरुषधार्जणिे लेख कसे काय छापले जातात?
-स्मिता पटवर्धन, सांगली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा