पनवेल येथील असहाय गतिमंद मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी दोषी ठरलेल्या नराधम रामचंद्र करंजुले याला न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेचे स्वागतच करायला पाहिजे. भारतीय न्यायव्यवस्थेने कठीण समयी देशवासीयांच्या अपेक्षांची नेहमीच निर्भीडपणे पूर्तता केली आहे. आता देशाच्या अब्रूचे जगभरात धिंडवडे काढणाऱ्या दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांनाही अशीच कडक शिक्षा होणे अपेक्षित आहे.मुंबईत नुकत्याच झालेल्या अशाच प्रकारच्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमुळे आपल्या समाजात महिलांच्या स्वाभिमानाचा चक्काचूर झाला आहे. नोकरी व शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या सुरक्षेबाबत चिंताजनक स्थिती आहे. नोकरी व व्यवसायानिमित्त लाखो महिला घराबाहेर पडून देशाच्या विकासात हातभार लावत असताना ही स्थिती अशीच राहिल्यास देशाच्या प्रगतीस मारक ठरेल एवढे निश्चित. महिलांना आता स्वसंरक्षणाच्या बाबतीतही स्वयंपूर्ण होऊन आपल्यावरील अन्यायाचा सामूहिकपणे प्रतिकार करावा हेच योग्य ठरेल.
वणवा पेटता राहावा
२ मार्चच्या ‘चतुरंग’मधील ‘गुलाबी दहशत’ हा लेख सांगून जातो की, पूर्वी स्त्रिया कुठच्याही विरोधाला एकाकी पडत होत्या. संपत पालने सुरुवातीला एकाकी लढा दिला. आता तिच्या गँगमध्ये २२ हजार सदस्य आहेत. स्त्रीला काहीजण मुले जन्माला घालण्याचा कारखाना असे म्हणत असत. कालांतराने त्यांच्या वागण्यात थोडा फरक नक्की पडला. वयाची १५ वर्षे पूर्ण होण्याआधी संपत पाल पाच मुलांची आई पण झाली होती. याच्यावरून बुंदेलखंडात कशा तऱ्हेचे आयुष्य स्त्रिया जगत असत याची कल्पना येते.
संपतने आपली कहाणी सांगितली आणि ज्यांनी ती वाचली त्यांच्या डोळ्यात पाणी नक्कीच आले असेल. नवीन पर्व सुरू करताना कोणाला तरी बळी द्यावा लागला. निर्भयाने स्वत:ला बळी दिले, भारताच्या पुष्कळ भागात जाती-पातीचं प्रस्थ नक्कीच आहे. या लढय़ाला कशा तऱ्हेने तोंड द्यायचं हे संपत पालने लेखात सांगितलेले आहे. हा वणवा आता पेटताच ठेवला पाहिजे.
– रा. आ. कंटक, पुणे</strong>
स्त्रियांना समजून घेणे महत्त्वाचे
मंजिरी तिक्ता यांचा ‘घरचे बल्लवाचार्य’ हा लेख (१६ फेब्रुवारी)वाचला आणि त्या लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी मन अधीर झाले.
मी जून ७१ ते एप्रिल ७२ या वर्षी बी.एड. करत होते. त्या कालावधीत माझं सकाळचं कॉलेज. थेट बसची सोय नव्हती. एकाच्या पगारात पोळ्यांना बाई ठेवणे परवडणारे नव्हते. शिवाय सोवळं पाळणाऱ्या माझ्या वृद्ध सासूबाईंना तो पर्याय आवडलाही नसता. तेव्हा माझे पती सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी पोळ्या लाटत असत व सासूबाई भाजत असत. सर्वसाधारणपणे पुरुषांना, तरुण मुलांना सर्व पदार्थ करता येतात. पण पोळ्या करणे अवघड वाटते. माझे पती पातळ, गोलाकार मोठय़ा पोळ्या लाटू शकतात. इतकेच नाही तर, (यांनी अतिशय पातळ मोठय़ा व गोल पुरणपोळ्याही लाटल्या आहेत. सुगरणीला लाजवतील अशा).
माझ्या पतीला स्वयंपाकघरातील पदार्थ करण्याची आवड आहे असे मी म्हणणार नाही, पण गरज म्हणून ते माझ्या मार्गदर्शनाखाली सर्व पदार्थ प्रेमाने करतात. सध्या मी आजारी असल्याने मला आवडणारे अगदी थालीपीठसुद्धा प्रेमाने करून खाऊ घालतात.
माझा धाकटा मुलगा वेगवेगळे केक करतो. चिकन करतो. त्याला अमेरिकेला गेल्यावर करावेच लागले. मधला मुलगाही स्वयंपाक गरज म्हणून करतो.
एकूणच आजचा तरुण पुरुषी अहंकार बाजूला ठेवून काळाप्रमाणे बदलतो आहे हे जाणवते.
– सुचेता पावसकर
सल्ला पटला नाही
९ मार्चच्या पुरवणीमध्ये ‘विचारांची दुसरी बाजू’ या गौरी कानिटकर यांनी लिहिलेल्या लेखामध्ये माझा देवावर विश्वास नाही, देवपूजा करणार नाही अशा मुलीला कानिटकरांनी दिलेला सल्ला पटला नाही म्हणून हे पत्र.
सासूबाईंनी चार दिवस परगावी जाताना सुनेला ‘अगं, जरा चार दिवस माझ्या देवांना आंघोळ घाल हं..’’ असं सांगितलं असताना व सुनेचा देवावर विश्वास नसल्याने पूजा करणार नाही, असे तिचे विचार असताना कानिटकरांनी त्या सुनेला ‘‘जशी इतर कामे करतेस तशी देवांना आंघोळ घाल. चार दिवसांपैकी तीन दिवस काहीच करू नकोस आणि त्या यायच्या दिवशी फुलं बदल’ असा सल्ला दिला. असा चुकीचा, खोटं बोलण्याचा सल्ला त्यांनी कसा दिला? ही तर स्वत:ची व दुसऱ्याची फसवणूकच झाली. काही घरामध्ये वंशपरंपरागत देव असतात. त्या कुटुंबाची श्रद्धा असते म्हणून देवपूजा रोज करणे महत्त्वाचे आहे, असं अशा कुटुंबांना वाटतं. सासूने याच विचाराने सुनेला देवाला आंघोळ घालण्यास सांगितले असावे. ही काही अंधश्रद्धा नाही, तर आपल्याकडील रीतिरिवाज, सुसंस्कार आहेत. त्याचा मान राखण्याऐवजी समुपदेशकाने खोटा सल्ला द्यावा हे पटले नाही, राहवले नाही म्हणून हा प्रतिसाद.
-कुसुम दामले, पुणे.
मुलांच्या लैंगिक संबंधांसाठी संमतिवय १८ आणि लग्न मात्र होताहेत २४-२५ वर्षांनंतर. या पाच ते सहा वर्षांच्या दरम्यान अनेक गोष्टी घडू शकतात, विशेषत: मुलांच्या शारीरिक, भावनिक आयुष्यात. कसं सांभाळणार आपण आपल्या मुलांना या काळात. या विषयावर तुमच्याकडेही काही मुद्दे, विचार, अनुभव असणारच.. १५ मे रोजीच्या जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने लोकसत्ता-चतुरंग – समन्वय संस्था या विषयावर आपली मते/ विचार मागवत आहे. सुमारे ५०० शब्दांत आपले विचार वा प्रतिक्रिया पुढील ईमेल/ पत्त्यावर कळवाव्या. २१ एप्रिल २०१३ पर्यंत पाठवावेत.
‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com