‘घटस्फोटिता’ म्हणून स्त्रियांना सहन करावे लागणारे दु:ख आणि अपमान हळूहळू कमी होत आहेत आणि मुलीही याकडे अधिक वास्तवतेने पाहत आहेत. तसेच समाजही घटस्फोटाकडे सकारात्मकतेने पाहत आहे हे वास्तव अॅड. मनीषा तुळपुळे यांनी त्यांच्या चतुरंग २० एप्रिलच्या लेखात मांडले आहे.
परंतु याबद्दलचे उल्लेख न झालेले व बदलते वास्तव दर्शविणारे पैलूही लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘घटस्फोट’ ही मुलगा व मुलगी त्याचबरोबरच त्यांचे आई-वडील, नातेवाईक जवळचे स्नेही सर्वानाच क्लेष देणारी बाब असते. प्रस्तुत लेखात मुलींच्या बाबतीतील बाबी मांडल्या आहेत पण घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या मुलाचे/पुरुषाचे दु:ख व वेदनाही लक्षात घ्यावयास हवी. या अनुभवातून जाणाऱ्या आमच्यासह अनेकांची वेदना कोर्टात जाणवली आणि सहवेदनेतून संवादही झाले, त्यातून बदलत्या समाजाने लग्नाकडे पहाण्याच्या दृष्टीचे प्रखर वास्तव चटके देऊन गेले व जात आहे.
घटस्फोटातून जाणारे मुलगे तिशीच्या आसपासचे आहेत (बहुसंख्येने हा वयोगट दिसतो कोर्टात). त्यापैकी अनेकांना चांगले पगार आहेत. करिअरच्या दृष्टीने त्यांची विचारसरणी नेमकी आहे. सहमती घटस्फोटासाठी तयारी ठेवणारे आहेत, त्यामुळेच अनेक जण याला तयारही होत आहेत, पण त्यामागचे अजूनही एक सत्य लक्षात घ्यायला हवे ते असे की, या ‘सहमती’साठी मुली कित्येक लाखांची मागणी करताना दिसत आहेत. त्याला पालक व वकीलदेखील काही अंशी साथ देत आहेत. कायदा मुलींच्या दृष्टीने झुकते माप देणारा असल्याने मुलांची ‘अडवणूक’ करून कित्येक लाखांतच सहमती दिली जाते आहे. एवढी गलेलठ्ठ रक्कम (एकरकमी पोटगी/ अलीमनी) मिळते आणि तीही विरहित. हा तर झटपट श्रीमंतीचा मार्ग सापडल्यासारखे बऱ्याच मुली करत आहेत. मुला-मुलींत मतभेद असतील तर किती आई-वडील याचा समंजसपणे विचार करतात हे पाहण्याजोगे आहे. इतके लाखो रुपये व मनस्ताप मोजल्यानंतर त्या मुलाची या विवाहातून सुटका झाली तरी हा मुलगा खरच विश्वासाने दुसऱ्या विवाहाकडे पाहू शकेल का? तर नाही हेच उत्तर असावे. याशिवाय त्या मुलाला पुन्हा आर्थिक, मानसिक जबाबदारीने दुसऱ्या विवाहाकडे जावे लागते, तर मुलीला आर्थिक पाठबळ मिळालेले असते आणि सामाजिक सहानभूतीसुद्धा!
बऱ्याच वेळेला अशा एकरकमी पोटगी घेणाऱ्या मुली पुन्हा लवकर स्थिरस्थावर होत असल्याचे दिसते.
घटस्फोटात ‘स्त्रीधना’चाही विषय असतो. लग्न करताना दोन्हीकडचे नातेवाईक आपल्या परीने दागदागिने देऊन लग्न करतात. तेव्हा घटस्फोट होईल असे कोणाच्याच मनात नसते. त्यामुळे एकुलत्या एका मुलीला/ सुनेला घरातले पारंपरिक व स्वत:कडीलदेखील डाग घातले जातात. मात्र घटस्फोट प्रक्रिया सुरू झाली की त्यातल्या प्रत्येकावर मुलीचा हक्क शाबीत केला जातो. खरे तर हा मुलगा नवरा म्हणून नको तर त्याच्याकडचे दागदागिने, पारंपरिक चीजवस्तू का हव्यात? मुलीपण कमावत्या आहेत पण किती जणी खरेच हे सर्व समजून सोडतात याचा विचार न्यायालयात होतो का?
मुलाच्या घटस्फोटात त्याच्या आई-वडिलांच्याही जिवाची घालमेल होत असते. त्यांचे दु:ख, अवहेलना, अडवणूक यात त्यांना साथ देणारे कमीच असतात. खरे तर त्यांच्यासाठीपण ‘साहाय्यक गट’ कार्यरत करावे लागणार आहेत. कारण त्यांना गुन्हेगार समजून कधी ४९८चा धाक दाखवून तर कधी खोटय़ानाटय़ा आरोपांनी वकील मंडळी घायाळ करत असतात. घरी आलेल्या मुलीला घरातील पद्धती/ चालीरीती/ विचार सांगितले तर त्या मुलीचा मानसिक छळ, बळजबरी, कौटुंबिक व घरगुती हिंसाचार इ. नवनवे आरोप झेलून त्यांचे खच्चीकरणच होते. नव्या पिढीला हस्तक्षेप नको पण तो कोणत्या टोकापर्यंत हे समजायच्या आतच सारे घडते आहे. अशा वेळी किती मुलींचे पालक संतुलित भूमिका घेत आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मुली जर सुज्ञ असतील तर हे सहजतेने सुटणार नाही का? कायदेशीर प्रक्रिया चालवणारे आणि आपल्या अशील मुलीला गलेलठ्ठ भरपूर एकरकमी पोटगी व स्त्रीधन मिळवून देणाऱ्या सर्वानी संधीसाधूपणा सोडून न्यायतेने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा अनेक मुली घटस्फोट हाच झटपट श्रीमंतीचा मार्ग स्विकारून तरुण मुलांची लूट करण्यास कचरणार नाहीत आणि त्यातून अनेक समाजस्वास्थ्याचे प्रश्न निर्माण होत राहतील, यात शंका नाही.
– एक व्यथित पालक
संदर्भही विचारात घ्यायला हवेत!
माझ्या लेखातील मूळ वाक्य ‘खरेतर दर वेळेस मुलगी होण्यामागे शास्त्रीयदृष्टय़ा त्याच्याकडे जबाबदारी जात असेल, तरी तो त्याचा दोष नक्कीच नव्हता.’(डॉक्टरांच्या जगात- ६ एप्रिल)
माझ्या लेखातील या वाक्याचा स्मिता पटवर्धन यांनी गरसमज करून घेतल्याचे दिसते. स्त्रीला मुलगा होणार की मुलगी हे पुरुषाच्या शुक्रजंतूच्या प्रकारावर अवलंबून असते. स्त्रीचे बीजांड जर पुरुषवाचक (व्हाय प्रकारच्या) शुक्रजंतूने फलित केले तर मुलगा व स्त्रीवाचक (एक्स प्रकारच्या) शुक्रजंतूने फलित केले तर मुलगी होते. हे जीवशास्त्रीय सत्य लक्षात घेता अपत्याचे िलग ठरण्याचे जीवशास्त्रीय उत्तरदायित्व पुरुषाकडे जाते; पण मुलगी झाल्याचे खापर मात्र वर्षांनुवष्रे स्त्रीवर फोडले जाते; या गोष्टीची चीड येते. खरेतर या घटनेवर स्त्रीचे नियंत्रण नाही व पुरुषाचेदेखील नाही. मग याला दोष कसे म्हणता येईल? पण समाज जर याला दोष मानतच असेल तर तो अप्रत्यक्षपणे पुरुषांकडे जातो एवढाच या वाक्याचा अर्थ. पण तो दोष मानता येणार नाही हेही त्या वाक्यातच अध्याहृत केले आहे. ‘दोष’ हा शब्द माझ्या लेखातील या वाक्यात एवढय़ासाठी वापरला आहे, की अजूनही समाजातील बऱ्याच घटकांची मानसिकता ‘मुलगी झाली हो’ म्हणून दुख करणारी आहे; या संदर्भानेच या शब्दाकडे पाहावे. मुलगी होणे – या घटनेकडे समाज – स्त्रीचा ‘दोष’ म्हणून बघत आहे; मी नव्हे. काही वाक्यरचना मागच्या पुढच्या संदर्भाच्या अनुषंगाने पाहाव्यात, त्यातील एकेका शब्दांचे स्खलन सुटे करू नये ही विनंती.
स्मिताताई यांनी लिहिल्याप्रमाणे धडधाकट मुलगी होण्याला लोक ‘वाया गेलेल्या मुलाचा पर्याय’ म्हणून बघतात असे आले आहे; पण अद्याप माझ्या अनुभवात असे न आल्याने मी याबद्दल लिहिलेलेदेखील नाही.
तसेच माझ्या लेखात स्त्री जन्माला ‘दोष’ हा शब्द वापरून मी धडधाकट मुलींच्या मनात न्यूनगंड निर्माण करत असल्याचे त्यांचे विधान म्हणजे अर्थाचा विपर्यास वाटतो. माझ्या आत्तापर्यंतच्या सर्व लेखांमध्ये जर मी ‘डॉक्टरांच्या जगात’सुद्धा घडणाऱ्या सत्य घटना मांडत आहे; ज्यातून बव्हंशी स्त्रीच्या वाटय़ाला येणारी िलगसापेक्ष दुय्यम वागणूक व्यक्त होत आहे; तर दूरान्वयानेदेखील स्त्रीबद्दल तिरस्काराचे वा गौणत्वाचे उद्गार माझ्या वाक्यांतून येतीलच कसे?
मात्र यानिमित्ताने एक नम्रपणे सांगू इच्छिते की; यानंतर मी स्त्रीस्वभावातील मला जाणवलेल्या दोषांबद्दल काही अनुभव प्रांजळपणे लिहिले; तर तो स्त्रियांसाठी आत्मपरीक्षणाचा व त्यायोगे अपेक्षित अशा स्व-सुधारणेचा भाग समजावा; तेव्हा त्यातून स्त्रीला कमी लेखले आहे; असे समजू नये. इति- लेखन सीमा!
– डॉ. वर्षां दंडवते
बदल समर्पकपणे पाहाण्याची गरज!
‘गतिमान काळातील कुटुंबसंस्था’ हा १८ मेच्या पुरवणीत आलेला मंगला सामंत यांचा लेख फारच उद्बोदक वाटला. कौरव-पांडव युद्धाकडे पाहाण्याचा आपला दृष्टिकोन फार भावला. या बदलांकडे समंजसपणे पाहाण्याची गरज, अतिशय समर्पकपणे आणि मनाला ‘पटावी’ अशा पद्धतीने आपण विशद केली आहे. मात्र कुटुंबसंस्थेचा विचार करताना अलीकडे आलेला ‘सरोगसी’ हा प्रकार व या पर्यायाचा उल्लेख राहून गेला की काय असे मात्र जरूर वाटले. अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव हे याचे अलीकडच्या काळातील उदाहरण. कुटुंब व्यवस्थेत अपत्यप्राप्तीसाठीचा हा पर्याय या संस्थेसाठी स्वीकारलेले एक प्रकारचे आउटसोर्सिगच नाही का ?
– अविनाश जोशी, ईमेलवरून
शिक्षकांकडून अधिक अपेक्षा!
‘जड झाले दप्तराचे ओझे’ हा अनुराधा गोरे यांचा ‘कट्टा मुलांचा’ या सदरातील लेख खरोखरच उत्तम आहे. माझाही अनुभव येथे सांगावासा वाटतो, जर एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांना चांगले रिफ्रेशर कोर्स आणि ओरिएन्टेशन कोर्स दिले गेले व त्यासह पठडी बाहेरचे कसे शिकवायचे याची प्रात्यक्षिके दिली गेली तर आपण खऱ्या अर्थाने चांगले शिक्षण आजच्या पिढीला देऊ शकू. पण त्यासाठी शिक्षकांनी आपल्या चाकोरीतून बाहेर पडून आजच्या पिढीचे गुण आणि चौकस बुद्धिमत्ता विचारात घ्यायला हवी. मी म्हणीन तीच पूर्व दिशा या विचारातून बाहेर येऊन नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. बऱ्याचदा शिक्षकांनाच नवीन गोष्टी माहिती नसतात आणि त्या अभ्यासायची त्यांची तयारीही नसते. त्यामुळे नवी पिढी घडविण्यात शिक्षक खरंच समर्थ आहेत का, असा प्रश्न पडतो. आज बऱ्याचशा शाळांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची आíथक परिस्थिती बघून त्यांना शिकवतात. हे खूपच चुकीचे आहे. सगळ्याच शिक्षकांना एक कळकळीची, त्यांनी कृपया साने गुरुजी वाचावेत व त्यांची विचारधारा समजून घेण्याचा व ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. कारण एक पिढी घडवण्याची जबाबदारी त्यांच्या हाती असते, हे विसरता कामा नये.
-पूजा निमकर, मुंबई.
‘चतुरंग’ बाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया, तुमची मते, तुमचे विचार आम्हाला जरूर लिहून कळवा. निवडक प्रतिक्रियांना नक्कीच प्रसिद्धी दिली जाईल. ‘लोकसत्ता चतुरंग’, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई, ४००७१० किंवा ईमेल करा. chaturang@expressindia.com