‘घटस्फोटिता’ म्हणून स्त्रियांना सहन करावे लागणारे दु:ख आणि अपमान हळूहळू कमी होत आहेत आणि मुलीही याकडे अधिक वास्तवतेने पाहत आहेत. तसेच समाजही घटस्फोटाकडे सकारात्मकतेने पाहत आहे हे वास्तव अॅड. मनीषा तुळपुळे यांनी त्यांच्या चतुरंग २० एप्रिलच्या लेखात मांडले आहे.
परंतु याबद्दलचे उल्लेख न झालेले व बदलते वास्तव दर्शविणारे पैलूही लक्षात घेणे आवश्यक आहे. ‘घटस्फोट’ ही मुलगा व मुलगी त्याचबरोबरच त्यांचे आई-वडील, नातेवाईक जवळचे स्नेही सर्वानाच क्लेष देणारी बाब असते. प्रस्तुत लेखात मुलींच्या बाबतीतील बाबी मांडल्या आहेत पण घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या मुलाचे/पुरुषाचे दु:ख व वेदनाही लक्षात घ्यावयास हवी. या अनुभवातून जाणाऱ्या आमच्यासह अनेकांची वेदना कोर्टात जाणवली आणि सहवेदनेतून संवादही झाले, त्यातून बदलत्या समाजाने लग्नाकडे पहाण्याच्या दृष्टीचे प्रखर वास्तव चटके देऊन गेले व जात आहे.
घटस्फोटातून जाणारे मुलगे तिशीच्या आसपासचे आहेत (बहुसंख्येने हा वयोगट दिसतो कोर्टात). त्यापैकी अनेकांना चांगले पगार आहेत. करिअरच्या दृष्टीने त्यांची विचारसरणी नेमकी आहे. सहमती घटस्फोटासाठी तयारी ठेवणारे आहेत, त्यामुळेच अनेक जण याला तयारही होत आहेत, पण त्यामागचे अजूनही एक सत्य लक्षात घ्यायला हवे ते असे की, या ‘सहमती’साठी मुली कित्येक लाखांची मागणी करताना दिसत आहेत. त्याला पालक व वकीलदेखील काही अंशी साथ देत आहेत. कायदा मुलींच्या दृष्टीने झुकते माप देणारा असल्याने मुलांची ‘अडवणूक’ करून कित्येक लाखांतच सहमती दिली जाते आहे. एवढी गलेलठ्ठ रक्कम (एकरकमी पोटगी/ अलीमनी) मिळते आणि तीही विरहित. हा तर झटपट श्रीमंतीचा मार्ग सापडल्यासारखे बऱ्याच मुली करत आहेत. मुला-मुलींत मतभेद असतील तर किती आई-वडील याचा समंजसपणे विचार करतात हे पाहण्याजोगे आहे. इतके लाखो रुपये व मनस्ताप मोजल्यानंतर त्या मुलाची या विवाहातून सुटका झाली तरी हा मुलगा खरच विश्वासाने दुसऱ्या विवाहाकडे पाहू शकेल का? तर नाही हेच उत्तर असावे. याशिवाय त्या मुलाला पुन्हा आर्थिक, मानसिक जबाबदारीने दुसऱ्या विवाहाकडे जावे लागते, तर मुलीला आर्थिक पाठबळ मिळालेले असते आणि सामाजिक सहानभूतीसुद्धा!
बऱ्याच वेळेला अशा एकरकमी पोटगी घेणाऱ्या मुली पुन्हा लवकर स्थिरस्थावर होत असल्याचे दिसते.
घटस्फोटात ‘स्त्रीधना’चाही विषय असतो. लग्न करताना दोन्हीकडचे नातेवाईक आपल्या परीने दागदागिने देऊन लग्न करतात. तेव्हा घटस्फोट होईल असे कोणाच्याच मनात नसते. त्यामुळे एकुलत्या एका मुलीला/ सुनेला घरातले पारंपरिक व स्वत:कडीलदेखील डाग घातले जातात. मात्र घटस्फोट प्रक्रिया सुरू झाली की त्यातल्या प्रत्येकावर मुलीचा हक्क शाबीत केला जातो. खरे तर हा मुलगा नवरा म्हणून नको तर त्याच्याकडचे दागदागिने, पारंपरिक चीजवस्तू का हव्यात? मुलीपण कमावत्या आहेत पण किती जणी खरेच हे सर्व समजून सोडतात याचा विचार न्यायालयात होतो का?
मुलाच्या घटस्फोटात त्याच्या आई-वडिलांच्याही जिवाची घालमेल होत असते. त्यांचे दु:ख, अवहेलना, अडवणूक यात त्यांना साथ देणारे कमीच असतात. खरे तर त्यांच्यासाठीपण ‘साहाय्यक गट’ कार्यरत करावे लागणार आहेत. कारण त्यांना गुन्हेगार समजून कधी ४९८चा धाक दाखवून तर कधी खोटय़ानाटय़ा आरोपांनी वकील मंडळी घायाळ करत असतात. घरी आलेल्या मुलीला घरातील पद्धती/ चालीरीती/ विचार सांगितले तर त्या मुलीचा मानसिक छळ, बळजबरी, कौटुंबिक व घरगुती हिंसाचार इ. नवनवे आरोप झेलून त्यांचे खच्चीकरणच होते. नव्या पिढीला हस्तक्षेप नको पण तो कोणत्या टोकापर्यंत हे समजायच्या आतच सारे घडते आहे. अशा वेळी किती मुलींचे पालक संतुलित भूमिका घेत आहेत याचा विचार करण्याची वेळ आली आहे. मुली जर सुज्ञ असतील तर हे सहजतेने सुटणार नाही का? कायदेशीर प्रक्रिया चालवणारे आणि आपल्या अशील मुलीला गलेलठ्ठ भरपूर एकरकमी पोटगी व स्त्रीधन मिळवून देणाऱ्या सर्वानी संधीसाधूपणा सोडून न्यायतेने विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा अनेक मुली घटस्फोट हाच झटपट श्रीमंतीचा मार्ग स्विकारून तरुण मुलांची लूट करण्यास कचरणार नाहीत आणि त्यातून अनेक समाजस्वास्थ्याचे प्रश्न निर्माण होत राहतील, यात शंका नाही.
– एक व्यथित पालक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा