४ ऑक्टोबरच्या पुरवणीतील डॉ. लिली जोशी यांचा ‘कबुतर जा जा जा’ हा अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि तपशीलवार लेख वाचला आणि माझ्या दु:खद स्मृती जाग्या झाल्या.  माझ्या पत्नीचे नुकतेच याच समस्येमुळे निधन झाले. ती जेमतेम ५९ वर्षांचीच होती.
 नवीन जागेचा ताबा मिळेपर्यंत म्हणून आम्ही एका सोसायटीत अकरा महिन्यांच्या कराराने भाडय़ाने जागा घेतली खरी, पण पश्चात्ताप झाला. तिथे कबुतरांचा धुमाकूळ होता आणि त्याची लागण माझ्या पत्नीला झाली. सुरुवातीला ही सर्दी, ताप, खोकला नेहमीचाच म्हणून तात्पुरते उपाय झाले, नेहमीच्या डॉक्टरना त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही, पण विशेषज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली तेंव्हा लक्षात आले की तिला ‘इंटरस्टीशियअल लंग डिसीज’ झाला आहे. अधिक तपासणी केल्यानंतर (पीएफटी वगरे) कळले की तिची फुप्फुसे ६५ टक्के कामातून गेली आहेत, आणि तिचे आयुष्य आता फक्त दहा महिने ते दीड वर्ष आहे. त्यानंतर अनेक उपाययोजना करून आणि लाखो रुपये खर्च करून ती दोन वर्षांत गेलीच.  त्यातच ती आधी नेब्युलायझर वापरीत होती, त्यानंतर स्टीरिओईडस्च्या अपरिहार्य (?) माऱ्याने तिचे एकेक अवयव कामातून जाऊ लागले. शेवटी सर्व उपाय थकले, तिचे हाल हाल झाले आणि तिने जगाचा निरोप घेतला, जाण्याअगोदर ती जवळजवळ महिनाभर २४ तास प्राणवायूवर होती. फिलिप्स कंपनीचे एक आटोपशीर आकाराचे मशीन मिळते, विजेवर चालते, त्याला चाकेही असतात.
 तेव्हापासून ‘कबुतर’ पहिले की त्याला ..  या लेखाने फार मोलाचे सामाजिक कार्य केले आहे, पण खेद वाटतो, की याचा उपयोग किती होईल? या विषयावर फार व्यापक प्रमाणात चळवळ सुरू होणे आणि जनजागृती करणे आवश्यक आहे.
 – सुभाष जोशी, ठाणे

या श्रद्धेचा त्रास?
 डॉ. लिली जोशी यांचा कबुतरांच्या सान्निध्यामुळे एखाद्याला श्वसन संस्थेशी निगडित जीवघेणा रोग कसा होऊ शकतो याची साद्यंत माहिती देणारा लेख ४ ऑक्टोबरच्या पुरवणीत आला आहे. काही लोकांची रोज पक्ष्यांना, त्यातल्या त्यात कबुतरांना, दाणे खायला घातल्यास पुण्य मिळते अशी श्रद्धा आहे, पण त्याचा त्रासही भोगावा लागतो. दक्षिण मुंबईत त्यासाठी बरेच ठिकाणी कबुतरखाने आहेत. उपनगरामध्ये जेथे आता नव्याने वस्ती निर्माण होत आहे तेथे प्रत्येक धान्य दुकानासमोर कबुतरखाने निर्माण होत आहेत. त्यातून अचानक झेप घेणाऱ्या काबुतरांमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाला अपघात होऊन काहींच्या प्राणावरही बेतले आहे. पूर्वी वर्तमानपत्रातून या समस्येवर लेख प्रसिद्ध झाले आहेत.  
कबुतरांचे सान्निध्य टाळण्यासाठी आपण आपल्या घराला जाळ्या बसवून कबुतरापासून सुटका करून घेऊ शकतो परंतु काही सोसायटींमध्ये कुत्री, मांजरी आणि कोंबडय़ा पाळणाऱ्या रहिवाशांमुळे होणारा असह्य़ त्रास होतो. आपली राहती जागा सोडून जाणे किंवा होणारा त्रास निमूटपणे सहन करण्यापलीकडे अन्य काहीही उपाय नाही. कारण कायदा हा मुक्या प्राण्यांच्या बाजूने आहे. किंवा असेही म्हणता येईल की काही रहिवासी या प्राण्यांना पाळून इतरांना बिनदिक्कत वेठीस धरू शकतात.
– मोहन गद्रे, कांदिवली.

पुनश्च एक वाचनीय पुरवणी
  ४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली पुरवणी म्हणजे पुनश्च एक वाचनीय पुरवणी ठरली आहे. अगदीच उल्लेख करायचा तर –
– शहरी लोकांची कबुतरं नि भटकी कुत्री यांना टनावारी खायला घालण्याची हौस कशी जिवावर बेतते ते डॉ. लिली जोशींच्या लेखाने पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. मुंबई, पुण्यातून बाहेर पडलं की कबुतरे तर दिसतच नाहीत नि भटकी कुत्रीपण कमी दिसतात.
– डॉ. विजया वाडांचा ‘गृहविष्णू’ लेख तर अप्रतिमच. सहजीवनावरचे त्यांचे दोन ओळींचे भाष्य विशेष उल्लेखनीय.
– ‘ब्लॉग माझा’मधील ‘त्या दोघी’ लक्षात राहतील.
– टìनग पॉइंट, आनंदाची निवृत्ती, आनंद साधना, खा आनंदाने ही नेहमीची सदरे नेहमीच वाचनीय असतात.
– ‘प्रतिसाद’मधले श्रीनिवास डोंगरे यांचे मत मात्र न पटणारेच. घरातील ‘ओला कचरा’चे ओझे नगरपालिकेवर पडत नाही नि स्वनिर्मित भाजीपाला, फुले किती आनंद देतात ते केल्यावरच कळेल. अशा बागेला खालच्या मजल्यावर गळेपर्यंत पाणी घालायची खरं तर गरजच नसते. त्याने उलट मातीतली पोषक द्रव्ये वाहून जातात नि इतरांना त्रास होतो हे मात्र खरे. हे नक्कीच टाळता येईल.
– जयंत साने, ठाणे</strong>

मुलीसाठीही मार्गदर्शक तत्त्व हवे
अ‍ॅड. नीलिमा कानेटकर यांचा २० सप्टेंबरच्या पुरवणीतील वडिलोपार्जित मालमत्तेवरील मुलींच्या हक्काबाबत झालल्या कायद्याबाबत लेख वाचला. मुलींच्या हक्काच्या बाबतीत जागरूक असलेला हा कायदा, मुलींच्या जबाबदारींबाबत मात्र सोयीस्कररीत्या मौन पाळतो आहे असे वाटायला लागले आहे. आपल्याकडे सर्वसाधारणपणे समज आहे की मुलगे स्वार्थी, मतलबी असतात आणि ते आपल्या म्हाताऱ्या आई-बापांकडे लक्ष देत नाहीत, याउलट मुली खूप प्रेमाच्या असतात आणि लग्नानंतरसुद्धा आपल्या पालकांची काळजी घेत असतात. पण हा समज नेहमीच खरा असतो असे मानण्याचे कारण नाही. ज्या मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क मिळवायचा आहे त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब होणे बंधन कारक असले पाहिजे. उदा. वर्षांतून किमान चार महिने तरी आपल्या म्हाताऱ्या पालकांना स्वत:च्या घरी ठेवले पाहिजे. पालकांचा दैनंदिन व्यवहारात लागणारा खर्च, तसेच वैद्यकीय उपचारांसाठी लागणाऱ्या खर्चातदेखील मुलींनी अर्धा वाटा उचलायला हवा. नाही तर जे मुलगे आर्थिक परिस्थिती बेताची असूनसुद्धा इमाने इतबारे आपल्या म्हाताऱ्या पालकांची सेवा करत आहेत, त्यांना हा कायदा नक्कीच जाचक वाटेल आणि आर्थिक सुस्थितीत असलेल्या काही कोडग्या मुली, ज्या आपल्या आई-बापांना विचारत नसतील, त्यांना घराच्या उंबरठय़ाच्या आत पाऊलही ठेवू देत नसतील, त्या मुली, या कायद्याचा आधार घेऊन, नाकावर टिचून समान हक्क जेव्हा मिळवतील, तेव्हा हा कायदा नक्कीच अन्यायकारक वाटेल. म्हणूनच कायदा करताना सर्व बाबींचा सखोल विचार करूनच तो करावा.
– धैर्यशील सूर्यवंशी, दादर, मुंबई

विनम्र स्वभावाचे दर्शन
  ‘झाली फुले कळ्यांची’ या सदरातील सगळेच लेख त्या त्या लेखांमधील व्यक्तिमत्त्वांमुळे वाचनीय असतात. २० सप्टेंबरला प्रसिद्ध झालेला ‘लय-तालाचा मेळ’ हा लेख विशेष भावला. पंडित सुरेश तळवलकर आणि पद्माताई दोघेही आपआपल्या कलेच्या क्षेत्रातील दिग्ग्ज, परंतु या लेखात दोघांनीही एकमेकांविषयी व्यक्त केलेल्या आदरभावातून त्यांच्या विनम्र वृत्तीचे दर्शन झाले. आपल्या सहधर्मचारिणीचे शास्त्रीय संगीतातले स्थान लक्षात घेऊन चार चौघांसमोर आपण पत्नीचा उल्लेख आदराने ‘आहो-जाहो’मध्ये करतो हा सुरेशजींनी व्यक्त केलेला विचार तसेच आध्यात्मिक साधनेमुळे भौतिक गोष्टींची आस न धरता समाधानी वृत्ती विकसित झाली असल्याचे विचार आजच्या युगात महत्त्वपूर्ण म्हटले पाहिजेत. संगीत आणि वादन क्षेत्रातील उच्च स्थान मिळवूनही या दोन्ही कलाकारांच्या नम्र स्वभावाचे दर्शन या लेखामधून झाले.
– अ‍ॅड. सुरेश पटवर्धन, कल्याण</strong>

मुलीपेक्षा सून श्रेष्ठ ?
तिचा ‘वारसा हक्क’ हा २० सप्टेंबरचा लेख वाचला. थोडासा एकांगी वाटला. भाऊ-बहीण, वडील-मुलगी यांच्यात या कायद्यामुळे भांडणे कशी वाढतील याचाच विचार केलेला दिसतो. ही नाती कायम टिकावीत व एकमेकांबद्दल प्रेम वाटावे याबद्दल काहीच दखल घेतलेली नाही.
या सर्व प्रकरणाला एक बाजू आहे ती अशी की, सर्व ठिकाणी मालमत्तेच्या (जमीन व दागदागिने) यांच्या किमती गेल्या ८-१० वर्षांत प्रचंड (सोने १० पटींनी व जमिनी, प्लॉट, बंगले ९-१० पटींनी) वाढल्या आहेत व त्यामुळे सर्वाचे डोळे पांढरे झाले आहेत व त्याचे परिणाम समाजामध्ये दिसू लागले आहेत. त्याची काही ज्वलंत व अलीकडील उदाहरणे म्हणजे, बाळासाहेब ठाकरे, भीमसेन जोशी, कालनिर्णयकार साळगावकर यांची मृत्युपत्रे त्याच्याच वारसांनी न्यायालयात नेली आहेत.
अंबानी बंधू व महिंद्रा कुटुंबातसुद्धा मालमत्तेवरून वाद झाले ही फक्त वर्तमानपत्रात उजेडात आलेली काही उदाहरणे. या वाढलेल्या प्रॉपर्टीच्या किमतीमुळे न्यायालयात सध्या मालमत्तेसंबंधातील वाद ४०० पटींनी वाढले आहेत. असे कळते.
खरं तर मुलगी जन्मापासून ‘पराया धन’ म्हणून ओळखली जाते. शिवाय मुलगी आयुष्यात मुलगी म्हणून २०-२५ वर्षे जगते तर सून म्हणून पुढची ५०-६० वर्षे आपले कर्तृत्व निभावण्याची तिच्याकडून अपेक्षा असते. तेव्हा खरेच मुलीपेक्षा सुनच श्रेष्ठ असते व सासरच्या लोकांनी सुनेलाच मुलगी म्हणून वागवावे कारण मुलगी आपल्या सख्ख्या भावाला, बहिणीला आई-वडिलांना सोडून आपले नाव/अडनाव बदलून नव्या घरात येते. खरच मोठा त्याग. आपली मुलगी आवडते म्हणून कोणी तिला लग्नाशिवाय घरात ठेवत नाही.
खरंच आता वेळ आली आहे नाती टिकवण्याची.  म्हणूनच गरज आहे चर्चा होण्याची, ठरवण्याची की मुलगी श्रेष्ठ की मुलगा की सून?    
– प्रदीप जाधव

Story img Loader