४ ऑक्टोबरच्या पुरवणीतील डॉ. लिली जोशी यांचा ‘कबुतर जा जा जा’ हा अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण आणि तपशीलवार लेख वाचला आणि माझ्या दु:खद स्मृती जाग्या झाल्या. माझ्या पत्नीचे नुकतेच याच समस्येमुळे निधन झाले. ती जेमतेम ५९ वर्षांचीच होती.
नवीन जागेचा ताबा मिळेपर्यंत म्हणून आम्ही एका सोसायटीत अकरा महिन्यांच्या कराराने भाडय़ाने जागा घेतली खरी, पण पश्चात्ताप झाला. तिथे कबुतरांचा धुमाकूळ होता आणि त्याची लागण माझ्या पत्नीला झाली. सुरुवातीला ही सर्दी, ताप, खोकला नेहमीचाच म्हणून तात्पुरते उपाय झाले, नेहमीच्या डॉक्टरना त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही, पण विशेषज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली तेंव्हा लक्षात आले की तिला ‘इंटरस्टीशियअल लंग डिसीज’ झाला आहे. अधिक तपासणी केल्यानंतर (पीएफटी वगरे) कळले की तिची फुप्फुसे ६५ टक्के कामातून गेली आहेत, आणि तिचे आयुष्य आता फक्त दहा महिने ते दीड वर्ष आहे. त्यानंतर अनेक उपाययोजना करून आणि लाखो रुपये खर्च करून ती दोन वर्षांत गेलीच. त्यातच ती आधी नेब्युलायझर वापरीत होती, त्यानंतर स्टीरिओईडस्च्या अपरिहार्य (?) माऱ्याने तिचे एकेक अवयव कामातून जाऊ लागले. शेवटी सर्व उपाय थकले, तिचे हाल हाल झाले आणि तिने जगाचा निरोप घेतला, जाण्याअगोदर ती जवळजवळ महिनाभर २४ तास प्राणवायूवर होती. फिलिप्स कंपनीचे एक आटोपशीर आकाराचे मशीन मिळते, विजेवर चालते, त्याला चाकेही असतात.
तेव्हापासून ‘कबुतर’ पहिले की त्याला .. या लेखाने फार मोलाचे सामाजिक कार्य केले आहे, पण खेद वाटतो, की याचा उपयोग किती होईल? या विषयावर फार व्यापक प्रमाणात चळवळ सुरू होणे आणि जनजागृती करणे आवश्यक आहे.
– सुभाष जोशी, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा