‘आदरपूर्वक पुनर्विचार’ हा मुक्ता गुंडी यांचा लेख वाचकांच्या मनातील जपलेल्या आदरयुक्त भावनेला साद घालणारा होता. केवळ शिष्टाचार म्हणून गरजेपोटी दर्शविलेला आदर क्षणिक असतो. परंतु प्रेमापोटी दाखविलेला दखलवजा आदर निश्चल असतो. १९७२ साली भारतीय स्टेट बँकेच्या सांताक्रुझ शाखेत नुकताच मी रुजू झालो होतो. पहिल्याच दिवशी शाखा व्यवस्थापकांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून सांगितले की सकाळी आल्यावर त्यांना गुड मॉर्निग व जाताना गुड नाईट म्हटल्याशिवाय पुढे जायचे नाही. बँकेतील इतर कर्मचारीही हा बळजबरीचा रामराम करत होते. एखाददिवशी, घाईघाईने असे चुकून कुणाचे करायचे राहिले तर दुसऱ्या दिवशी त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागे. यामागे स्वत:चा मोठेपणा दाखविण्याचा त्यांचा अट्टहास आहे असे आम्हा कर्मचाऱ्यांना वाटत असे. पण नंतर त्यामागे असलेला त्यांचा हेतू समजताच आम्ही थक्क झालो. आम्हाला असे म्हणायची सवय झाली की खातेदारांशीसुद्धा आम्ही आदरपूर्वक वागायला लागू व आपोआप त्यामुळे बँकेची प्रतिमा उजळली जाईल, हा त्यांचा उद्देश होता.
हा वसा घेतलेला मी जेव्हा स्वत: शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागलो तेव्हा सहकारी कर्मचाऱ्यांकडून ती अपेक्षा न ठेवता स्वत: त्यांच्याशी आपुलकीवजा आदराने वागू लागलो आणि त्यांच्याकडे एक कुटुंब म्हणून पाहू लागलो. अनेक शाखांच्या प्रमुखपदी काम करून निवृत्तीनंतर आज सहा-सात वर्षांचा काळ लोटला तरी भेटल्यावर सहकारी जो आपुलकीवजा संवाद साधतात तेव्हा नि:स्वार्थी व निखळ नात्याची जाणीव होते. आदर ही गरज नसून ती मनोवृत्ती असली तरच ती चिरंतर राहते. मे महिन्यात आम्ही काश्मीरच्या कौटुंबिक सहलीवर गेलो होतो. त्यावेळच्या एका प्रसंगाने मी बरेच काही शिकलो. श्रीनगर विमानतळापासून आम्ही भाडय़ाने एक कार ठरविली होती. पहिल्याच दिवशी ड्रायव्हरने जेवणासाठी एका हॉटेलापाशी कार थांबवली. आम्ही आत जाऊन टेबलावर बसताच सात वर्षांचा माझा नातू आर्यन माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, ‘आपण जेवायला बसलो पण आपल्याबरोबर ड्रायव्हर का नाही आला?’ इतकेच नव्हे तर तो माझा हात धरून ड्रायव्हरला शोधायला बाहेर आला. ड्रायव्हर आपल्यापेक्षा वेगळा आहे हे त्याच्या बालमनाला पटत नव्हते. शेवटी ड्रायव्हरची व त्याची प्रत्यक्ष भेट घालून दिली. ड्रायव्हरने परिस्थिती ओळखून त्याला खोटे सांगितले की तो जर जेवला तर त्याला झोप येईल व गाडी चालवता येणार नाही. त्याच्या बालमनाची समजूत पटल्यावरच तो आमच्याबरोबर जेवायला आला. आपण जन्मापासून शिकविलेल्या चुकीच्या विचारसरणीचे गुलाम बनतो आणि नको तेथे आदर दाखवतो. आदर हा जर हृदयातून पाझरला तर तो उपचार न ठरता खऱ्या प्रेम व आपुलकीचा झरा समजावा.
-सूर्यकांत भोसले, मुलुंड
अधिक स्पष्टीकरण हवे होते!
‘इवलीशी रोपे लावियेली दारी’ हा सरस्वती कुवळेकर यांचा (२३ ऑगस्ट) लेख वाचला. शहरी शेती फुलविण्यासाठी गच्ची, गॅलरी किंवा खिडक्यांवरी ग्रिलचाही वापर करावा व स्वयंपाकघरातल्या कचऱ्यावर (खतावर) सेंद्रिय अन्न भाज्या, फळे पिकवून कुटुंबाचे पोषण आणि पर्यावरणाचे रक्षण करावे, असा त्यांचा आग्रह दिसला. मात्र मुंबईत गृहसंस्थेच्या इमारतीत राहणाऱ्यांना ही अतिशयोक्तीच वाटते. त्यातल्या त्यात जे लोक तळमजल्यावर राहतात किंवा स्वत:च्या बंगल्याची गच्ची आहे त्यांनाच थोडी फार शहरी शेती शक्य होईल, बाकीच्यांना कठीण प्रसंगी अशक्यप्राय वाटते.
मुंबईसारख्या शहरातून सोसायटीचे सभासद पावसाच्या व संडास-बाथरूमच्या गळतीने बेजार झाले आहेत. त्यात गच्ची, गॅलरी किंवा ग्रिलवरून खालच्या मजल्यावर झाडांचे पाणी झिरपले, पडले तर सोसायटय़ांतून नव्या वादाला तोंड फुटेल. तांबड मातीच्या ओघळलेल्या पाण्यामुळे बिल्डिंगचा रंग खराब होतो तो वेगळाच. गच्ची, गॅलरी, ग्रिलवर कितीशा पालेभाज्या, फळे, पिकणार दोन दिवस जरी भाज्या फळांचा कचरा घरात राहिला तरी घरभर घाण सुटते, मग सेंद्रिय खताचा वास इतर कुटुंबीय कसा सहन करतील.
लेखाच्या शेवटी गच्ची, गॅलरी, ग्रिलवर कुंडय़ा, बागकाम शेती करताना इतर सभासदांना त्रास होणार नाही, याकरता काय काय काळजी घ्यायची या विषयी सूचना लिहिल्या असत्या तर बरे झाले असते.
– श्रीनिवास स. डोंगरे, दादर,
‘वैविध्यपूर्ण’ मैत्रीचा बंध
‘मैत्र जिवांचे’ अशा प्रस्तावनेसह ‘मैत्री’ला अर्पण केलेली पुरवणी (२ ऑगस्ट) म्हणजे अप्रतिम, वाचनीय आणि मानवी मनातील मैत्रीच्या भावनेला खूप खूप उंचीवर नेऊन ठेवणारी आहे. ‘मैत्र जिवांचे’ ही कल्पनाच किती उदात्त आणि सुंदर आहे! ज्ञानेश्वर माउलींनी पसायदान मागताना ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ हेच मागणे मागितले आहे. कृष्ण आणि सुदामा हेही एकमेकांचे मित्रच होते की!
पुरवणीतील ‘स्नेहस्निग्ध आश्वासन’ अर्थात नामदार गोपाळ कृष्ण गोखले व सरोजिनी नायडू यांच्या मैत्रीतील-वयाचे अंतर दूर ठेवून एकमेकांचे विचार, बुद्धीचा कस, कामाचा दर्जा, समाजाप्रति असलेली तळमळ- या पैलूंमुळे एकमेकांबद्दल दृढ झालेला आदर-भावच व्यक्त झालेली वैशिष्टय़े आहेत. स्नेहभाव वात्सल्याची ऊब घेऊन आलेला आहे.
खरी मैत्री संयम शिकवते, हा बोध डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि फॅनीची प्रेमळ, स्नेहपूर्ण मैत्री आपल्याला देते. फॅनीची पत्रं बोलतात, पण ती सतत बाबासाहेबांचं श्रेष्ठत्वच व्यक्त करत राहतात. इतक्या श्रेष्ठ व्यक्तीचा कायमचा सहवास हवासा वाटणं अगदी नैसर्गिक आहे, पण स्वत:ला सतत सावरणारे बाबासाहेब दृढनिश्चयाने फॅनीला दूरच ठेवतात. मैत्रीच्या व्याख्येच्या भारतीय मर्यादांचे पालन करतात. तिलाही करायला लावतात.
कविमनाचे रवींद्रनाथ यांच्या जीवनात अॅना आली नसती तर रवींद्रनाथांना आपण कवी प्रतिभा लाभलेले आहोत हे कळलेच नसते, उमगलेच नसते. अॅना मोकळीढाकळी आहे. ती रवींद्रनाथांना मोकळेपणाने वागायला, विचार करायला शिकवते. जगाचा विचार करताना स्त्रीचा विचार, उल्हसित करायला लावणारी स्त्री शक्ती याचा अनुभव शिक वून जाते आणि त्यामुळे रवींद्रनाथांची कविता ऐकून ती एकदम हळवी होते. मोठय़ा भरलेल्या, गजबजलेल्या घरात वावरणारे रवींद्रनाथ यांच्या जीवनातली निर्मळ-निव्र्याज मैत्री जपणारी अॅना ही पहिली बाहेरची मैत्रीण आहे.
मैत्रीचे हे वैविध्य व त्यातून मित्रत्व जपण्यासाठी केलेला त्याग असे अनुभव लेखिका अरुणा ढेरे यांनी या लेखांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवले आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
-निळकंठ नामजोशी, पालघर
तात्यांची यशोगाथा
‘झिजणे कणकण’ हा संपदा वागळे यांचा लेख (१६ ऑगस्ट) म्हणजे पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटणारी यशोगाथा आहे. तात्या कर्वे यांची ही विलक्षण जीवनगाथा आजच्या कलियुगात मनाला थक्क करणारी आहे तर लेखिकेची शब्दरचना अप्रतिम वाटली. समर्पित वृत्तीने जगणारी मंडळी स्वातंत्र्यपूर्व काळात मोठय़ा प्रमाणावर होती असेच आज प्रकर्षांने जाणवते. माझे एक स्नेही ‘हुकेरी’ आडनावाचे. त्यांचे वडील स्वत:च्या घरातील वस्तू चोरून बाहेर विकत असत व ते पैसे गुप्तपणे स्वातंत्र्यसैनिकांना पुरवीत असत. काही झाले तरी चालेल, माझा देश स्वतंत्र झालाच पाहिजे, असे ते सर्वाना सांगत. नंतर देश स्वतंत्र झाला व आमच्या घरातील सर्व वस्तू संपून आम्ही रस्त्यावर आलो तरीही न डगमगता हालअपेष्टा आनंदाने सहन करून पुन्हा सावरलो. ही गोष्ट अभिमानाने आमचे स्नेही सांगतात, मला वाटतं ‘हुकेरी’ काय किंवा तात्या कर्वे या प्रभृतीच ‘भारतरत्न’ आहेत; तर या रत्नांना प्रकाशात आणणाऱ्या संपदा वागळे या रत्नपारखी आहेत.
-प्रदीप करमरकर, ठाणे.
बालविवाहाच्या समस्या
भारताची लोकसंख्या जवळजवळ १२५ कोटी आहे, असे समजले जाते. पण त्याच्यातले किती कोटी बालविवाह आहेत ही निश्चित आकडेवारी मिळणे फार कठीण आहे. तरीही ‘चतुरंग’च्या (५ जुलै) अंकात बालविवाहाच्या समस्येवर योग्य प्रकाश टाकण्यात आला आहे, असे वाटते.
बालविवाह हा जागतिक प्रश्न आहे. आपल्या देशात काही मुलींचा पाळण्यात असताना विवाह होत असे; तर आताही घरातले वडिलधारे मुलींचे विवाह नक्की करतात. अगदी शिकल्यासवरलेल्या घरातही हे चित्र दिसून येते. धर्म, जात आणि त्याचबरोबर जोडले गेलेले हे बुरसटलेले विचार भारताला त्रास देतात. पुष्कळ राज्यांत खाप संस्था कार्यरत आहेत. कोणाचा विवाह केव्हा आणि कुठे होणार याची माहिती या खाप संस्थांना असते. त्यामुळे त्यांनी मनात आणले तर असे विवाह थोपवू शकतात. काही काही जातींत मुलींना नहाणे आले की लगेचच त्यांचा विवाह ठरविला जातो. लग्न झाल्यावर मुलींचे आईवडील मुले झाल्याशिवाय तिच्या घरी जात नाहीत. प्रत्येक जण धर्माप्रमानेच वागतो. म्हणून अशा तऱ्हेच्या चालीरीती चालतच राहतात. धार्मिक परंपरा आणि चालीरीती यांचा परंपरेत जास्त सहभाग असतो. मला वाटते की कितीही जागतिक लोकसंख्या दिन साजरे केले तरी जोपर्यंत जनतेची मानसिकता बालविवाहाबद्दल बदलत नाही तोपर्यंत हे असेच चालू राहणार हे नक्की.
-रा. आ. कंटक, पुणे</strong>
सहजीवनाचे तत्त्व अधोरेखित झाले
२६ जुलैची पुरवणी वाचली. ‘एस.एन.डी.टी एक अश्वत्थ!’ यासह स्कूल चले हम.., रिअल उद्योजिका, क्लिक, गीताभ्यास, झाकू कशी मी चांदणी गोंदणी, मदर, रुग्णसेवक, आनंदाची निवृत्ती, धान्य, राजकन्या, हातात हात घेता- प्रा. वीणा देव हे सगळेच लेख एकसे बढकर एक होते. ‘वाचू किती आनंदे’ अशी अवस्था झाली. मात्र एका उत्तम लेखाने एक वेगळेच समाधान दिले. ‘हातात हात घेता’ प्रा. वीणा देव यांचा लेख साधा, सरळ, आणि प्रसन्न वाटला. साहित्यिक मूल्ये असलेला त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखाच वाटला. त्यांचा माझा अल्पपरिचय होता, त्यामुळे त्यांच्यातील लेखिका, अभिवाचिका व्यक्तिमत्त्वाबद्दल नेहमीच आदर आणि आत्मीयता वाटली. प्रा. विजय देव, प्रा. वीणा देव, मृणाल देव-कुलकर्णी, मधुरा देव या सर्वच कुटुंबाबद्दल नेहमीच एक आदरयुक्त वलय वाटत आले. ‘मंगळागौरी, हळदीकुंकु व जेवणखाणी याच गोष्टींमध्ये रमू नकोस. तुझ्यामध्ये खूप गुण आहेत. त्यांचा विकास व्हायला हवा.’ हे विजय देव यांचे शब्द सहजीवनाचे उत्तम तत्त्व अधोरेखित करते. त्यांच्यातील सिद्धहस्त लेखिकेचे दर्शनच या लेखातून होते.
– मीनल श्रीखंडे, पुणे