‘आदरपूर्वक पुनर्विचार’ हा मुक्ता गुंडी यांचा लेख वाचकांच्या मनातील जपलेल्या आदरयुक्त भावनेला साद घालणारा होता. केवळ शिष्टाचार म्हणून गरजेपोटी दर्शविलेला आदर क्षणिक असतो. परंतु प्रेमापोटी दाखविलेला दखलवजा आदर निश्चल असतो. १९७२ साली भारतीय स्टेट बँकेच्या सांताक्रुझ शाखेत नुकताच मी रुजू झालो होतो. पहिल्याच दिवशी शाखा व्यवस्थापकांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावून सांगितले की सकाळी आल्यावर त्यांना गुड मॉर्निग व जाताना गुड नाईट म्हटल्याशिवाय पुढे जायचे नाही. बँकेतील इतर कर्मचारीही हा बळजबरीचा रामराम करत होते. एखाददिवशी, घाईघाईने असे चुकून कुणाचे करायचे राहिले तर दुसऱ्या दिवशी त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागे. यामागे स्वत:चा मोठेपणा दाखविण्याचा त्यांचा अट्टहास आहे असे आम्हा कर्मचाऱ्यांना वाटत असे. पण नंतर त्यामागे असलेला त्यांचा हेतू समजताच आम्ही थक्क झालो. आम्हाला असे म्हणायची सवय झाली की खातेदारांशीसुद्धा आम्ही आदरपूर्वक वागायला लागू व आपोआप त्यामुळे बँकेची प्रतिमा उजळली जाईल, हा त्यांचा उद्देश होता.
हा वसा घेतलेला मी जेव्हा स्वत: शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागलो तेव्हा सहकारी कर्मचाऱ्यांकडून ती अपेक्षा न ठेवता स्वत: त्यांच्याशी आपुलकीवजा आदराने वागू लागलो आणि त्यांच्याकडे एक कुटुंब म्हणून पाहू लागलो. अनेक शाखांच्या प्रमुखपदी काम करून निवृत्तीनंतर आज सहा-सात वर्षांचा काळ लोटला तरी भेटल्यावर सहकारी जो आपुलकीवजा संवाद साधतात तेव्हा नि:स्वार्थी व निखळ नात्याची जाणीव होते. आदर ही गरज नसून ती मनोवृत्ती असली तरच ती चिरंतर राहते. मे महिन्यात आम्ही काश्मीरच्या कौटुंबिक सहलीवर गेलो होतो. त्यावेळच्या एका प्रसंगाने मी बरेच काही शिकलो. श्रीनगर विमानतळापासून आम्ही भाडय़ाने एक कार ठरविली होती. पहिल्याच दिवशी ड्रायव्हरने जेवणासाठी एका हॉटेलापाशी कार थांबवली. आम्ही आत जाऊन टेबलावर बसताच सात वर्षांचा माझा नातू आर्यन माझ्याजवळ येऊन मला म्हणाला, ‘आपण जेवायला बसलो पण आपल्याबरोबर ड्रायव्हर का नाही आला?’ इतकेच नव्हे तर तो माझा हात धरून ड्रायव्हरला शोधायला बाहेर आला. ड्रायव्हर आपल्यापेक्षा वेगळा आहे हे त्याच्या बालमनाला पटत नव्हते. शेवटी ड्रायव्हरची व त्याची प्रत्यक्ष भेट घालून दिली. ड्रायव्हरने परिस्थिती ओळखून त्याला खोटे सांगितले की तो जर जेवला तर त्याला झोप येईल व गाडी चालवता येणार नाही. त्याच्या बालमनाची समजूत पटल्यावरच तो आमच्याबरोबर जेवायला आला. आपण जन्मापासून शिकविलेल्या चुकीच्या विचारसरणीचे गुलाम बनतो आणि नको तेथे आदर दाखवतो. आदर हा जर हृदयातून पाझरला तर तो उपचार न ठरता खऱ्या प्रेम व आपुलकीचा झरा समजावा.
-सूर्यकांत भोसले, मुलुंड
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा