प्रा. मुक्ता आंभोरे यांचा ‘झाकू कशी. चांदणं गोंदणी’ हा २६ जुलैच्या अंकातील ‘ब्लॉग माझा’ खूप आवडला. वाचून बालपणची एक आठवण झाली.
आमच्या गावच्या यात्रेत विविध दुकाने येत. वडील आम्हाला दोन-दोन आणे देत व खाऊ अथवा तुमच्या आवडीच्या वस्तू/खेळणी घ्या म्हणून सांगत. माझ्या थोरल्या बहिणीने यात्रेतील गोंदणवालीकडून दोन आण्यात हातावर मारुती काढून घेतला. माझी बहीण ऐक्याऐंशी वर्षांची आहे. तो मारुती अजूनही तिच्या हातावर आहे. ती या वयातही सर्व घरकाम करते जणू काय त्या मारुतीनेच तिला ते बळ दिले.
प्रा. आंभोरे काळ्या का गोऱ्या हे मी पाहिले नाही, पण सध्या ‘झी मराठीवरील’ एका मालिकेतील पात्राच्या चेहऱ्यावरील गोंदण पाहिले की त्या कॉलेज-जीवनात कशा दिसल्या असतील याची कल्पना येते.
दर शनिवारी ‘चतुरंग’ पुरवणी हातात कधी पडते याची मी वाट पाहात असतो. ती पूर्ण वाचून झाल्याशिवाय समाधान होत नाही. सर्वच सदरे अगदी वाचनीय असतात.
– सुरेश पु. कळमकर, मुलुंड
वाचनीय, संग्राह्य़ पुरवणी
‘स्कूल चले हम’ हा २६ जुलैच्या अंकातील मेघना जोशी यांचा लेख वाचला आणि माझे बालपणच डोळ्यासमोर उभे राहिले, शाळेत जाण्या-येण्याच्या अनेक गमती-जमती मन:चक्षूसमोर जशाच्या तशा उभ्या ठाकल्या. जुन्या गोष्टींचा उजाळा मिळाला आणि मन पुन्हा त्या दिवसात रमले.
यासह आवर्जून उल्लेख करावा अशी बाब म्हणजे ‘बोधिवृक्ष’ या सदरातील येणारा प्रत्येक लेख मी माझ्या संग्रहात जतन करून ठेवतो. त्याचा उपयोग नातवंडांना, मित्रपरिवारांना, घरातील इतरांना वाचन करून. त्यातील महत्त्वाचे मुद्दे मानवी जीवनात कसे उपयुक्त आहेत हे पटवून देतो.
१२ जुलैच्या ‘विज्ञानाचा वारकरी’ या अनुराधा मोरे यांच्या लेखांतील संजय पुजारी सर आणि त्यांचे सहकारी यांची लहान मुलांमध्ये विज्ञानदृष्टी वाढविण्याची धडपड पाहून अनेकांना स्फूर्ती मिळेल असे वाटते. तसेच २१ जूनच्या ‘टर्निग पॉइंट’च्या सदरात ‘हमालाऐवजी झाला साहेब’ या लक्षराज सानप यांच्या लेखांतून त्यांच्या कष्टाची कहाणी वाचून गरिबीतून मनुष्य स्वत:ला घडवू शकतो हे दिसून आले. अशा अनेक विविधांगी लेखांमुळे ‘चतुरंग’चा प्रत्येक अंक संग्रही असावा असे मनापासून वाटते
– लक्ष्मीकांत संसारे, महाड
सामंजस्याची गरज
प्रवीण दामले यांचा ‘हवंय कणखर आनंदी घर’ हा १२ जुलैच्या अंकातील लेख वाचकांना अंतर्मुख करून विचार करायला प्रवृत्त करणारा लेख आहे. आजची घराबद्दलची संकल्पना बदललेली दिसून येते आहे. आनंद, करमणूक, अभिरुची याबाबतच्या कल्पनाही बदललेल्या आहेत. असे अनेक बदल होत असले तरी ‘भावनिक सुरक्षितता’ हा कुटुंब संस्थेचा स्थायीभाव आहे. आजच्या बदलत्या परिस्थितीत घरात विविध सुविधा असल्या तरी घरचे ‘घरपण’ मात्र हरवत चालल्याचे जाणवत आहे. घराचे ‘घरपण’ जपले गेले तरच ते आनंदी होऊ शकेल. त्यासाठी हवी आहे कुटुंबातील सर्वामध्ये सामंजस्य वृत्ती. हवा आहे पालकांचा आदरयुक्त धाक. पालकांनी मुलांना धाकात ठेवले असा याचा अर्थ नव्हे तर पालकांनीदेखील मुलांचे भावविश्व समजून घ्यायला हवे.
मुलांना योग्य प्रमाणात स्वातंत्र्य देऊन त्यांच्याबद्दल क्षमाशीलवृत्ती बाळगून त्यांच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांना योग्य दिशा दाखविणे व सर्व प्रकारचे सहकार्य करते. या गोष्टींची कुटुंब स्वास्थ्याच्या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे. प्रेम आणि सामंजस्य लेखकाने या लेखात व्यक्त केलेले विचार पालकांच्या मनात नव्याने विचार जागृती घडवून आणणारे आहेत.
– द. श्री. कुलकर्णी, अहमदनगर</strong>
आपली व्यवस्थाच कारणीभूत
‘अजुनी यौवनात मी’ हा २८ जूनच्या पुरवणीतील ‘मेघना वर्तक यांचा लेख वाचून एक विचार आला. युरोप अमेरिकेतील वृद्ध आणि आपल्याकडील वृद्ध यांच्या सद्यस्थितीत आमूलाग्र फरक असला तरी मुळात आपल्या जीवनपद्धतीत मूलभूत फरक आहे असे वाटते. हा फरक आहे तो असा-
वयाच्या तिसऱ्या वर्षांपासूनच तिथल्या बाळाला स्वावलंबी, निर्णयस्वातंत्र्य व जबाबदारीचे उत्तरदायित्व घेण्याचे शिक्षण दिले जाते. (निसर्ग नियम खरंतर असाच आहे! असतो) स्वच्छता, वाहतुकीचे नियम याचे बाळकडूच त्यांना मिळते. दुसऱ्या महायुद्धानंतर ते खूपच शहाणे झालेत. त्यांना जगण्यातील तत्त्व आणि मग सत्त्वही कळले आहे. कुठल्या वेळी काय करायचे, किती वेळात करायचे त्याचा आनंद कसा घ्यायचा हे त्यांच्याकडूनच शिकावे. युरोपमधील रस्त्यावरची शिस्त जरी आपण अंगीकारली तरी खूप झाले. तेथील ७० वयाच्या पुढच्या स्त्री-पुरुषांना सायकली वापरताना बघूनच मन थक्क होते. मी काही दिवस युरोपमध्ये होतो. माझ्या नातवाला मी हौसेनं तास-दोन तास बागेत फिरवून आणायचो. रस्त्यावर, बागेत ‘आम्हाला’ किती आदर मिळायचा. भारतात आल्यावर माझा मी सुखरूप यायची खात्री नसते. मुलांनी ऑनलाइन बँकेचे व्यवहार केले, त्याचे बँकेचे पासबुक अपडेट करायला गेलो तरी तीन तास लागतात. घरात मान नाही, रस्त्यावर सुरक्षितता नाही. मनानं वानप्रस्थाश्रमी पण शरीरानं ग्रहस्थाश्रमी अशी अवस्था. तिकडे ज्यांचे शरीर साथ देतंय त्यांच्यासाठी आणि शरीर साथ देत नाही त्यांच्यासाठीही युरोपमधली तिथली व्यवस्था उत्तम आहे.
– रवी कुलकर्णी, पुणे</strong>
बदल होतो आहे!
‘अजुनी यौवनात मी’ हा मेघना वर्तक यांचा २८ जूनच्या पुरवणीतील लेख वाचला. भारतात वयाच्या मानाने म्हणजे ६०-६५ व्या वर्षीच लोक, स्वत:ला म्हातारे समजू लागतात यासह अमेरिकेतील वृद्धांच्या जीवनशैलीबद्दल त्यांनी लेखात ऊहापोह केला आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनशैलीबाबत माहिती द्यावीशी वाटते. म्हणून हा पत्रप्रपंच.
महाराष्ट्रात डोंबिवलीचे प्रसिद्ध रोटेरियन डॉ. राधाकृष्ण भट यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘फेडरेशन ऑफ सिनिअर सिटिझन्स ऑर्गनायझेशन महाराष्ट्र’ अर्थात ‘फेस्कॉम’ या संस्थेची स्थापना करून ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीचा ३५ वर्षांपूर्वीच चेहरा-मोहरा बदलला आहे. या चळवळीची पाळेमुळे आता सर्वत्र दूरवर पसरली आहेत. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रातील वृद्ध लोक ‘मनोयुवा’ झाले आहेत. आणि अत्यंत आनंदाचे जीवन व्यतीत करत आहेत.
अनेक शहरांतून तालुक्यातून ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाले आहेत व त्यांच्या सहली दरवर्षी निघत असतात. आपल्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाडय़ात ५० टक्के सवलत दिलेली आहे व त्याचा पुरेपूर उपभोग ज्येष्ठ मंडळी घेत आहेत. प्रवासात अमेरिकेतील स्त्रिया जीन्स, पँटमध्ये असतील तर येथील सर्व आज्या सर्रास पंजाबी ड्रेस वापरतात व सराईतपणे बोटीचा, विमानाचा प्रवास करतात. कुणाला मानेला पट्टा असतो तर कोणाला कंबरपट्टा, पण सहप्रवासाचा आनंद मनसोक्त लुटतात! कोल्हापूरमध्ये एका नाटय़संस्थेने ज्येष्ठांसाठी एकांकिका स्पर्धा घेतली व तेथील १५ संघांनी त्यात सहभाग घेतला होता. नाशिकमधील एका ज्येष्ठ नागरिक संघाने अखिल भारतीय मराठी अभिवाचन स्पर्धेत विशेष पुरस्कार मिळवला आहे!
या घटनांवरून हे लक्षात येते की, आपले ज्येष्ठ नागरिक सजग झालेले आहेत. आनंदाने जीवनावर, जगण्यावर प्रेम करताहेत. शिवाय सामाजिक कामातही हिरीरीने सहभागी होतात. चित्र आपल्याकडे बदलत आहे, बदलण्याचा वेग थोडा कमी आहे, एवढेच!
– वसुधा पाध्ये, नाशिक