‘गृहिणीचे श्रममूल्य आणि मानसिकता’ हा महिलादिनाच्या निमित्ताने काढलेल्या विशेषांक आवडला. पूर्ण वेळ गृहिणी आजही समाजात नोकरी/व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त प्रमाणात आहेत. यात वादच नाही. निव्वळ तिला होममेकर म्हणून तिचा सन्मान होत नाही. हे कटू वास्तव आहे. समजाबरोबरच नोकरी करणाऱ्या महिलासुद्धा त्यांच्याकडे याच दृष्टीने बघतात, पण मोलकरणीसुद्धा त्यांना गृहीत धरतात तेव्हा त्यांचा मोहभंग होतो.
गृहिणीच्या कामाला मूल्य द्यावे हे मुळात समस्त पुरुष कुटुंबप्रमुखाला पटतेच असे नाही कारण त्यांच्या मते गृहिणी घरात आराम करत असतात. हा गैरसमज जोपर्यंत नाहीसा होत नाही, गृहिणींना मानाचे स्थान दिले जात नाही तोपर्यंत गृहिणी स्वत:च्या श्रममूल्यांबाबत गोंधळलेलीच राहील, असे वाटते. वस्तुत: जिथे पूर्ण वेळ गृहिणी असते तिथे गृहस्थ पूर्णपणे आपल्या करिअरवर, व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकतो आणि प्रगती करू शकतो. टीव्हीवरील एक चहाची जाहिरात त्याचे प्रतिनिधित्व करते. ज्यात नवरा हातात ट्रॉफी घेऊन येतो आणि लेक म्हणते,‘ ही तर आईच्या कपाची कमाल आहे.’ तेव्हा नवऱ्याच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह संपूर्ण भारतीय समाजाचे प्रतीक आहे. आपल्याला गृहिणींना सन्मान द्यायला, त्यांच्या कामाला पावती देण्याची सवय लावायलाच हावी.
 – माया हेमंत भाटकर, मुंबई

महिला दिन की महिला दीन?
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने ७ मार्चच्या पुरवणीत आलेले लेख उत्तम वाटले. मी स्वत: उच्चशिक्षीत, सरकारी पदावर अधिकारी म्हणून कार्यरत असलेली स्त्री आहे. तरीही मला माझ्या आई-वडिलांची जबाबदारी घ्यायची इच्छा असून काही करता येत नाही. माझ्या या निर्णयाला माझ्या सासू-सासऱ्यांचा तीव्र आक्षेप आहे. त्यांच्याकडून याबाबत असहकार केला जातो इतका की माझे आई-वडील घरी आल्यावर त्यांच्याशी बोलणेसुद्धा हे लोक टाळतात. अशा परिस्थितीत संसार टिकवण्यासाठी माझी जबरदस्त मानसिक कुचंबणा होते आहे. अशा वेळी ‘महिला दिन’ वगैरे पोकळ वल्गना वाटतात. माझ्यासारख्या अजून किती स्त्रिया हे सर्व भोगत असतील कुणास ठाऊक?
आज कित्येक घरांत फक्त मुलीच आहेत. मग मुलीच्या आई-वडिलांनी म्हातारपणात मुली सक्षम असतानासुद्धा एकाकी राहावे का? अनाधार व्हावे का? जावयाने आपली जबाबदारी घेण्याचे संस्कार किती मुलांचे आई-वडील करतात?
– अवंतिका, मुंबई</strong>

स्त्री-पुरुष भेद नकोच!
‘ऐतिहासिक क्षणाच्या शिल्पकार’ (२८ फेब्रु.) हा मंगळ-मोहिमेतील स्त्री-वैज्ञानिक, सिस्टीम इंजिनीयर मीनल रोहित यांच्यावरील राजेंद्र येवलेकर यांचा लेख वाचला. यासह राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून डॉ. रोहिणी गोडबोले यांनी दिलेली इतर महिला वैज्ञानिकाची माहिती तरुण पिढीला नक्कीच मार्गदर्शक आहे. मीनल रोहित यांच्या मुलाखतीमधून ‘इस्रो’ची माहिती मिळाली. ‘स्त्री चूल आणि मूल’ यापेक्षाही वेगळं काही करू शकते हे यातून स्पष्ट दिसते. घरी मुलगा आजारी असताना ‘देशसेवेला’ प्राधान्य देणाऱ्या माता दुर्मीळच झाल्या आहेत. या मुलाखतीमधील स्त्री-पुरुषासंबंधी भेदभावाचा इस्रोचा अनुभव खरोखरच सर्व क्षेत्रातील स्त्रियांनी अमलात आणला तर ‘प्रगती’ वेगाने होईल. त्या सांगतात की, ‘‘इस्रोत काम करताना भेदभाव जाणवला नाही. इस्रोचा पोशाख अंगावर चढविल्यानंतर स्त्री-पुरुष हा भेद राहत नाही. तुम्ही देशाचे एकनिष्ठ सेवक बनता, तुम्ही स्त्री आहात की पुरुष हे पाहून तिथे कामाचे वाटप होत नाही. तुम्ही काय काम करता याचा लिंगभावाशी संबंध नसतो ते सगळे मनाचे खेळ असतात.’’
किती सुंदर विचार आहेत. अशाच प्रकारे स्त्रीने आपापल्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कार्य केल्यास प्रगती होईल. ही मुलाखत नक्कीच प्रेरणादायी आहे. मात्र कुठे दहा-बारा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या स्त्रिया अन् देशसेवेचे उदात्त भाव घेणाऱ्या या वैज्ञानिक स्त्रिया दुर्मीळ होत आहेत एवढे नक्की!
– संतोष ह. राऊत, सातारा</strong>

‘आड’ येणारे आडनाव!
हेमा गाडगीळ यांचा ‘माझं आडनाव आणि मी एक घटस्फोटिता’ (७ फेब्रुवारी) हा लेख वाचला. त्यांनी नवऱ्याचं आडनाव घटस्फोटानंतर कायम ठेवण्यासाठी केलेला संघर्ष कौतुकास्पद आहे. परंतु पत्नी, विधवा, घटस्फोटिता किंवा मुलगी कुणाची असं लिहिण्याची गरज व्यवहारात नेहमी भासते त्या वेळी त्या काय करणार?
जीवनात पदोपदी ‘आड’ येणारं ते आडनाव असं माझं मत आहे. महाराष्ट्रीय लोकांव्यतिरिक्त इतर समाजात आडनावाला क्वचितच फारसं महत्त्व असतं. उदा. दाक्षिणात्य लोकांमध्ये, स्वत:च्या नावानीच ओळख होते. उदा. एन. राम, सतीश चंद्र, चंद्रशेखर इ. प्रत्येकाला स्वकर्तृत्वानं ओळख निर्माण करावी लागते हे त्रिकालबाधित सत्य नव्हे का? पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये पती किंवा पतीचं नाव, आडनाव लावण्याखेरीज गत्यंतर नाही. घटस्फोटित स्त्रीनं पुनर्विवाह केल्यास कोणत्या आडनावाचा आग्रह धरावा हा प्रश्न उरतोच.
– सुभाषचंद्र निर्मळ, पुणे</strong>

Story img Loader