‘मामाचा गाव हरवलाय?’ या ‘चतुरंग’मधून विचारलेल्या प्रश्नाला वाचकांनी मनापासून उत्तरं दिली. उदंड प्रतिसाद दिला. काही जण मामाच्या गावात रमले तर काहींनी नव्या पिढीला हे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. काहींनी स्वत:ला मामाचा गाव मिळाला म्हणून ‘भाग्यवान’ म्हटले, तर काहींनी वास्तव स्वीकारलेच पाहिजे, असा आग्रही सूर मांडला. वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून जाणवलं की खरंच काळ बदललाय? की जगण्याचे, जीवनाकडे बघण्याचे संदर्भ? पुढच्या पिढीची ओढ पुढेच असते. म्हणून बदललेल्या संकल्पनांचाही विचार करायलाच हवा. नाती टिकवायची हे प्रत्येकानं मनानं ठरवलं तरच ती टिकतील, दृढ होतील, असंही मत व्यक्त केलंय. मामाचा गाव हरवलाय, पण काही गोष्टींवर गांभीर्याने विचार केला तर तो पुन्हा मिळू शकेल हा आशावाद नक्कीच महत्त्वाचा..
आठवणी.. कधी रम्य भूतकाळाच्या.. कधी मोरपिसी.. सुखद आनंद देणाऱ्या.. कधी अनोख्या विश्वाची सफर घडविणाऱ्या.. तर कधी आयुष्यभर शिदोरीसारख्या पुरून उरणाऱ्या..! मामाचा गावही तसाच..! आठवणीतला.. प्रेमाला ओलावा असणारा! नात्यांची वीण घट्ट करणारा.. कोणत्याही संस्कार वर्गात न जाता कळत न कळत संस्काराची खाण देणारा.. आणि नेहमीच हवाहवासा वाटणारा..!
आज हा निव्र्याज प्रेम देणारा ‘मामाचा गाव हरवला का?’ की मामाचा गाव आहे.. पण तिथे माणसंच नाहीत? की नातीच घट्ट नाहीत? की.. आपल्या आवडीनिवडी बदलल्या.. सुट्टीकडे बघण्याचे संदर्भ बदलले?.. की आपण सद्य:स्थिती आणि वास्तव स्वीकारले..?
मामाचा गाव म्हणजे.. समृद्ध निसर्ग.. सुगरण मामीच्या हातची मेजवानी.. आजीचा प्रेमळ हात.. आणि आजोबांचा धाक..! आज हे सगळं ऽऽ आहे की.. हरवलंय? अशा असंख्य प्रश्नांच्या अनुषंगाने तुमच्या-आमच्या मनात नेमकं काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ‘मामाचा गाव हरवलाय?’ या विषयांवर वाचकांची मते मागवली आणि अनुभवलेल्या मामाच्या गावचा आनंद सांगत, वास्तवाबद्दलचं सत्य सांगत तर कधी खंत व्यक्तकरणाऱ्या असंख्य प्रतिक्रिया मिळाल्या. त्या प्रतिक्रियांच्याच आधारे आम्हीही केली ही एक अनोखी सफर..मामाच्या गावाची. आधीच्या पिढीने अनुभवलेल्या आणि आताच्या तरुण, बाल पिढीला गवसलेल्या.
आशा प्रभाकर आरोळकर, वास्को, गोवा यांनी आजोळच्या निसर्गाचे, वातावरणाचे शब्दचित्र रेखाटले आहे. ‘बहुतेकांचा मामाचा गाव म्हणजे आजोळ खेडेगावात. थोडक्यात, शहरापासून दूर. तिकडे जाण्याची आम्हा भावंडांना ओढ. दरवर्षी त्याच त्याच गावी जाण्यात नवीन नवीन नवलाई वाटायची. आजोळी स्टॅण्डवरून टांगा करून जात असताना वाटायचे, पंख असते तर आधीच मामाच्या वाडय़ात पोचलो असतो. वाटेत रस्त्याने जाणारे-येणारे लोक आम्हाला हात दाखवत, ‘आली ही फौज’ म्हणत. कारण आम्ही येणार असल्याची पताका आधीच मामेभावांनी लावलेली असायची. दारात ए टू झेड सगळी कंपनी स्वागताला हजर असे. आजी आमच्या पायावर पाणी घालून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकत असे. आणि मग आत गेल्यावर आम्ही सर्वाच्या पाया पडत असू. आजीचे आम्हाला बघून नेहमीचं पालुपद असे ‘पोरं वाळली रे’.
आज काळ बदलला. मुलांची सुटी, त्यांच्या बरोबरीच्या मुलांबरोबरच जावी ही नोकरदार पालकांची इच्छा. एकमेकांत मिसळण्याची-वागण्याची सवय, सहकार्य, सहभोजन, संस्कृतीची देवाण-घेवाण याचा फायदा होतो. पण या संस्कारासाठी आता पैसे मोजावे लागतात. आम्हाला मात्र हे संस्कार मोकळ्या वातावरणात व विनामूल्य मिळाले. आम्ही खरंच नशीबवान!’
डॉ. मधुकर त्र्यंबक घारपुरे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग लिहितात, ‘मामाच्या गावचे वर्णन २०० शब्दांत लिहिणे म्हणजे पंडित भीमसेन, जसराज यांच्या मैफिलीचे वर्णन दहा वाक्यांत करण्यासारखे आहे. आम्हाला काय गवसले आणि आजच्या पिढीने काय गमावले हे सांगायला एकच शब्द पुरेसा आहे. तो म्हणजे ‘नातेसंबंध!’ संस्कारवर्गात न जाता संस्कारबीजे रुजविण्याची किमया तेथे होती. पैशाची श्रीमंती नव्हती पण खाण्याची ददात नव्हती. आज मामाच्या गावाला जायला वेळ नाही. पण पैसा असल्यामुळे पर्यटनातून विकसित झालेल्या मामाच्या गावाला सगळं विकत मिळतं. पण.. आभासी सुखाच्या दुकानात ‘नाती’ कशी मिळणाऱ? इंटरनेटवर मामाचा गाव क्लिक होईलही, तिथे सर्व दिसेलही पण अनुभवता येणार नाही..!! पण आम्हाला जे गवसलं ते तसंच या पिढीला हवं आहे का? हा यक्षप्रश्न आहे!
नीता सावंत, जोगेश्वरी, मुंबई, यांना घरातील स्त्रिया एकत्र आल्यामुळे सुखदु:खाची चर्चा होई. धीर देऊन सांत्वन होई. असे वाटते. घरी परतताना वडील आजोळच्या मुलांच्या हातात चार आणे-रुपया ठेवत हेही आठवते. मामाच्या गावाची ओढ लागायची हे सांगताना नृसिंह प्रल्हादराव गोरे म्हणतात, ‘‘उन्हाळ्याच्या सुटीत परीक्षा झाल्या की मामाच्या गावाची आतुरतेने वाट बघायचो. मामाच्या गावाला जायचं या आनंदात मामा आलेल्या दिवशी झोपच यायची नाही. आणि आलीच तर मामाच्या गावात गेलो अशी स्वप्नं पडायची. आणि सुटी संपवून परत घरी जाताना दाटून यायचे. घरी आलो तरी अजून गावीच आहोत असं वाटायचं. आजी-आजोबा, मामा-मामींची आठवण यायची. पण आज इंटरनेटच्या युगात मुलं मामाचा गावच हरवून बसली आहेत.’’
अश्विनी गावंडे, अकोला यांनी मामाकडचे दिवस म्हणजे निसर्ग आणि नात्यांचा ओलावा यांचे रम्य स्वप्न होते असे लिहिले आहे. मामाच्या गावच्या पर्वणीचे वर्णन करताना सुंदर निसर्ग, रग्गड रानमेवा, माणसांची वर्दळ, घरातील बायकांचे दुसऱ्यांसाठी झटणारे हात, यांच्या आठवणी नमूद केल्या आहेत. ‘‘एकमेकांसाठी झटणाऱ्या नात्यांनी दिलाय सुखाचा अनुभव. प्रसंगी धपाटेही खाल्ले, पण प्रेमाचा ओलावा जास्त जाणवला. कामेही केली पण त्याचा अभिमान होता. पण आज भौतिक प्रगतीच्या नावाखाली आपण एकमेकांपासून दुरावलो आहोत. आपली पोटं भरली पण मन मात्र अतृप्त आहे.’’ अशी खंतही व्यक्त केलीय.
श्रीनिवास डोंगरे, दादर लिहितात, ‘‘पूर्वीच्या काळी आमची आई ‘माहेरी’ आणि आम्ही मुलं ‘आजोळी’ जायचो. आम्हाला खरा लळा होता आजी-आजोबांच्या प्रेमाचा आणि धाकाचासुद्धा. आता चित्र बदलले. विभक्त कुटुंबामुळे ‘माहेरी’, ‘आजोळी’ हे शब्द इतिहासजमा झाले. मामाच्या गावी डेरेदार झाडांच्या आत कौलारू घर, प्रशस्त अंगण, झोपाळा, गुरांचा गोठा, बैलगाडी, नारळ, पोफळीची वाडी, रहाट ओढणारे बैल, विहीर, आंबे, फणस, करवंदाची रेलचेल. माझं आजोळ असं. न्याहारीला मऊ भात आणि पोहय़ाचा पापड, दुपारी गाडीवरचा बर्फाचा गोळा.. पण हे कधी बाधलं नाही आम्हाला. आता गाव बदलला, सुधारला. डांबरी रस्ते, दळणवळणाची साधने वाढलेली. मेहनत नको म्हणून मामाने शेत विकले. कष्ट नको, मजुरी महाग म्हणून गोठा बंद झाला. पिशवीचे दूध घरी येऊ लागले. टीव्हीमुळे खेळ बंद झाले. प्रत्येक वस्तूला किंमत आल्यामुळे कोकणमेवा भरपूर खाण्याची मजा कमी झाली. आणि त्यामुळे आमच्या मुलांचे मामाचे गाव हरवले, ही जाणीव तीव्र होते.’’
सुनीता नाईक यांनी कोकणातल्या मामाच्या गावाचे निसर्गरम्य वर्णन केले आहे. ‘‘नारळी-पोफळीच्या भरगच्च बागा, मांगरातील हापूस आंब्यांचा ढीग, विहिरीचे पाणी, चुलीवरचे जेवण आणि गुण्यागोविंदाने राहणारी वीस-पंचवीस माणसे होती. वीज, पंखे नसूनही कौलारू घरात छान झोप लागायची. आता माणसं एकमेकांपासून, निसर्गापासून दूर गेली. मामाचा गाव आता इतिहासजमा होत आहे.’’ असं म्हणत आठवणी भूतकाळात जमा केल्या आहेत.
शुभदा परचुरे, बऱ्हाणपूर (म.प्र.) आठवणीत रमताना म्हणतात, ‘‘आजीच्या हातच्या आमटीत डाळीचे दर्शन नसे. पण चव अप्रतिम होती. दुपारी आमरस पुरीचे जेवण जेवल्यावर पेंग येई. माजघरात एकच पंखा होता. मग काय! पंख्याखाली झोपायची चढाओढ. तो गोंधळ ऐकून आजोबा आवाज देत, ‘चला चुपचाप झोपा रे!’ झोपेचं नाटक करणारे आम्ही मोठे सगळे झोपले की हळूच पसार व्हायचो. संध्याकाळी देवघरात सगळे जमून शुभंकरोती, रामरक्षा म्हणायची. जप करायचा. यातून कुणालाही सूट नव्हती.
पण आजकाल मुलांना सुटीत कुठे गुंतवायचे, हा पालकांसमोर प्रश्न पडतो. विभक्त कुटुंबामुळे समृद्ध आजोळ मुलांपासून हिरावून घेतलंय. दरवर्षी एकाच ठिकाणी जायला मुलं कंटाळतात. मग छंद वर्गात मुलांना गुंतविण्याचा प्रयत्न पालक करतात, पण या सगळ्यात आमच्यासारखं समृद्ध बालपण उपभोगता येत नाही, ही सल मात्र कायम मनात राहते.’’
अनिरुद्ध चेऊलकर, दादर सांगतात, ‘‘या काळात पैसा फारसा हातात नसायचा. प्रवास एस. टी. नेच व्हायचा. बस बंद पडायची. पण सोबत्यांच्या बरोबर असल्यावर कशाचीच फिकीर नसे. खेळायला फार काही साहित्य नसायचं. लाकूड तासून बनवलेली बॅट, सायकलच्या रीमचा गाडा आणि चिंध्या गुंडाळून बनवलेला चेंडू! पण ‘ती’ मजा काही औरच! ‘टुरिंग टॉकीज’मधला सिनेमा बघून भुताच्या गोष्टी ऐकत उशिरापर्यंत जागणाऱ्या आम्हाला आजी रागावून म्हणायची, ‘झोपा आता दिवे मालवून .. दोन रुपये बिल येतं विजेचं’.
आठवणीत रमलेले मनोज हडवळे लिहितात, ‘‘मामाचा गाव म्हणजे मजा-मस्ती आणि सुट्टय़ांचा आनंद. सुटय़ांमधल्या मौज-मस्तीचे प्रातिनिधिक नाव म्हणजे मामाचा गाव होय. उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्षभराचा शीण निघून जायचा. एकदम ताजेतवाने वाटायचे.. आज मामा आहे, पण मामाचा गाव राहिला नाही. ‘समर व्हेकेशन’मध्ये मुलांना सहलीला जायचे असते. गावात जाऊन असं शेणमातीत खेळणं आता आई-वडिलांनाच नको वाटतंय. आणि तेच त्यांनी मुलांमध्ये उतरवलंय. गावात जाऊन अशी मस्ती करणं आता डाऊनमार्केट झालंय. माहिती तंत्रज्ञानाच्या आणि दहा मिनिटांत ‘पिझ्झा’च्या जगात सर्व गोष्टी आताच हव्या असतात. आणि नाही मिळाल्या तर मुलांची चिडचिड होते. सुट्टीतला आनंदाचा संस्कार मुलं मिस करतात. रानमेवा एकमेकांसोबत वाटून खाणं, शेअिरग करणं यामुळे ‘व्यक्तिमत्त्व विकास’ होतो. आपली पिढी हे नैसर्गिक संस्कार मिस करते. सॉफिस्टीकेटेड आई-बाबांनाच जुन्या गोष्टींना महत्त्व द्यावेसे वाटत नाही आणि पर्यायाने कळत-नकळत मिळणाऱ्या अनोख्या आनंदाला ‘टीमवर्कला’ ही मुलं पारखी होतात.’’
बाळ पंडित, कोथरूड यांनी मात्र आम्हाला ‘जे’ गवसले ‘ते’ आजच्या मुलांना नको आहे म्हणण्यापेक्षा, त्यांच्यापुढे ठेवलेच जात नाही, अशी खंत व्यक्त केली आहे. १८-२० जणांच्या गोतावळ्यात कामे वाढत. पण नकळत स्वावलंबनाचा, श्रमविभागणीचा संस्कार होत असे, ही त्यांची भावना आहे. तर श्रीकृष्ण देवल, बोरिवली यांनी ब्रिटीशांच्या काळातील ७० वर्षांपूर्वीच्या आपल्या मामाच्या गावच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. ते म्हणतात, ‘‘ त्या काळात टीव्ही, ट्रान्झिस्टर असा प्रकार नव्हता, त्यामुळे इतरांबरोबरच्या गप्पांमधूनच करमणूक होई, पण त्यातून जीवनाला उपयोगी पडणारी शिदोरी मिळे. त्याचप्रमाणे एकमेकांजवळ सुखदुखे मोकळी केल्याने मनावरचा ताण कमी होई. ’’
मनीषा कुलकर्णी, नाशिक या लिहितात, ‘‘तेव्हा कुटुंबं मोठी असायची. सगळे बरोबरीचे असल्याने एकमेकांसोबत खेळ, खाऊ, भांडणे यातही मजा होती. रुसवा-फुगवा काढणारी प्रेमळ मामी असायची. आता बहुतेक माम्या कामवाल्या आहेत. महागाई, विभक्त कुटुंब यामुळे माणसं दुरावली आहेत. स्वत:तच जास्त रमलीत. पायाला चाकं आणि मनगटावर घडय़ाळ यातच दिवस संपतो. संवाद हरवलाय. वाटून खाणे, नात्यातला समजूतदारपणा, मिळून-मिसळून राहणे, महागडय़ा फीशिवायचा संस्कारवर्ग आजच्या मुलांनी गमावलाय.’’
प्रशांत दांडेकर यांनी, ‘‘मामाच्या गावच्या स्वर्गसुखाचा आनंद अनुभवण्याचा हक्क आजच्या पिढीचाही आहे, असे आग्रहाने सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘गाण्यातली आगगाडी आणि मामाचा गाव या गोष्टी काळाच्या प्रवाहात मागे पडल्या. खिडकीतून मागे पळणाऱ्या झाडांप्रमाणे, गावाप्रमाणे याला जबाबदार आपण आहोत, कारण भौतिक सुखाच्या मागे धावताना आपण निसर्ग आणि कुटुंबव्यवस्था यांची वाताहत केली आहे. त्यामुळे गाव आहे पण गावात पाणी नाही. महागाईमुळे नोकरीसाठी मामीलाही घराबाहेर पडावे लागले. गावाला जाताना प्रवासातले खाचखळगे, ट्रॅफिक जाम, रिझव्र्हेशन यामुळे मामाचा गाव स्वप्नातला होतो आहे. हे बदलायला हवे. मामावर आर्थिक ताण पडणार नाही ना याची काळजी घेऊन गावात सौर ऊर्जेचा वापर करून पाझर तलाव बांधून, हिरवाई जागवून नवीन उद्योग सुरू करायला हवेत. त्यामुळे मामाला गावही सोडायला लागणार नाही व गावचे सौंदर्यही टिकेल.’’
अशोक भागवत यांनी सुट्टीतल्या वानरसेनेचे आमरस, कॅरम, पत्ते यांच्या आठवणींचे वर्णन केले आहे. ‘‘आजच्या मुलांपासून हे साधे प्रसंग फार दुरावलेत. दोष मुलांचाही नाही आणि मामाचाही नाही, तर सर्वाजवळ असलेला पैसा व त्यामुळे करता येणारी मौजमजा. आई-बाबांनाही पर्यटनाला जायचं असतं. सोबत नातलगही असतात. पण आपलेपणाची सर कशातच नाही. एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा कमी झालाय. आणि सहवासाशिवाय झालेल्या भेटीमुळे तो वाटतही नाही, ही खंत वाटते.’’
नागपूरच्या सुप्रिया अय्यर यांच्या मते, ‘‘आत्ताच्या मुलांचा मामाचा गाव हरवला नाही तर तो स्थलांतरित झालाय. कुणाचा मामा शहरात गेलाय. कुणाचा आयटी जॉबमुळे गर्भश्रीमंत झालाय आणि बहिणीलासुद्धा भावाकडे पाठविण्यापेक्षा एकुलत्या एक मुलाला आयुष्यातली सुखं बहाल करायची आहेत. वर्षांतले दहा महिने पुरत नाहीत म्हणून सुट्टीतल्या दोन महिन्यातही व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, स्केटिंगचा वर्ग करून गुणवत्ता यादीत वरचं स्थान पटकवायचं आहे. आज कैरीचं लोणचं घालायला बेडेकर, केप्र सिद्ध आहेत. कार्टुन्स, कॉम्प्युटर गेमची रेलचेल आहे. पैसे फेकले की सेवेला वॉटर पार्क हजर आहे. आणि खेळून थकल्यावर खायला पिझ्झा, बर्गर आहेत. कुठे काय कमी आहे? ढीगभर पोळ्या लाटणारी आजी तेवढी कुठे दिसत नाही.’’
मंदार शास्त्री वास्तवावर प्रकाश टाकत लिहितात, ‘‘मामाच्या गावी न्यायला नोकरीवाल्या आईजवळ तरी कुठे वेळ उरलाय? यांत्रिकीकरणात मुलांनादेखील निसर्गाबद्दल गोडी उरली नाही. शेअर करण्यापेक्षा एकटय़ानेच मजा चाखायची ही विचारसरणी बनलीय. आजोबांचं ऐकण्यापेक्षा घरी हवं तेव्हा हवं ते पुरवणारे आई-बाबाच बरे असं ते समजतात. नात्यांच्या गोडीबाबत आजची पिढी कमनशिबीच आहे.
सकाळी गावभर फेरफटका, दुपारी हौदावरचं सामूहिक स्नान, दुपारी आंबे माचवण्यासाठी केलेली मदत, दुपारी घंटा वाजवत जाणारा कुल्फीवाला हे सारं आज हरवलंय. आज टीव्ही-कॉम्प्युटरसमोरून न हलणारी पिढी या आनंदाला पारखी झालीय. कालाय तस्मै नम:!’’
डॉ. अनघा लव्हेकर, नांदेड यांनी आजोळच्या दिवसांच्या आठवणी अत्यंत जिव्हाळ्याने मांडल्या आहेत. ‘‘पुण्याचे आजोळ. सारसबाग, पेशवे पार्कला डबे घेऊन जाणे, घरी आइस्क्रीमचा पॉट आणून सगळ्यांनी मिळून हँडल फिरवून आइस्क्रीम बनवणे, हा आनंद वर्णनातीत आहे. भाडय़ाने सायकल आणून शिकणे. पत्ते, कॅरम यातली मजा शब्दात कशी कळणार? मामे, आतेभावंडं खूप असल्याने शेअिरग अॅडजस्टमेंट, कमीत कमी उपलब्धीत भागविण्याची वृत्ती आपोआप अंगी यायची. मामा-मामी रागावले तरी राग-अपमान कधी मनातही आला नाही. लग्नप्रसंगी मामीच्या साडय़ा नेसून मिरवायचे, मामाने सांगितलेले काम पूर्ण करण्याची धडपड करायची. त्याने दिलेली शाबासकी लाखमोलाची वाटायची. आम्ही हे कमावले. आणि आजोळचे दिवस हा अक्षय आनंदाचा ठेवा ठरला. पुढच्या पिढय़ांना एकेक मूल असणाऱ्या कुटुंबांना हा आनंद कसा मिळेल?’’
पूर्णिमा नार्वेकर, दहिसर यांनी माझे आजोळ तसे अगदी शेजारच्याच बिल्डिंगमध्ये, तरी पण आम्ही आजोळी मामाकडे जायचो. मामाचे घर तसे लहान, पण खूप मजा यायची असे नमूद केले आहे. त्या म्हणतात, ‘आज आजोळ ही संकल्पनाच बदलली आहे. मुलांवर संस्कार करण्यासाठी त्यांना क्लासला घालण्याची वेळ येते. फेसबुकच्या जमान्यात मुलांचं बालपण हरवलंय. आता आते-मामे भावंडं एकत्रही येत नाहीत. मजाही करत नाहीत. ती मैत्री, भावा-भावांमधले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा कुठेतरी हरवलाय असे वाटते. आता गप्पांसाठी अंगण नाही की चांदणी रात्र एकत्रित अनुभवण्याची मजा नाही. सगळ्यांची दारं बंद. मुलं घराच्याच भिंतींना चांदण्याचे स्टिकर लावून आकाश अनुभवतात. आमच्या पिढीकडे बालपणीच्या अनमोल आठवणींचा ठेवा आहे. आजही त्या आठवल्या की मन उल्हसित होते, आज या मुलांनी खूप काही हरवलंय यांची खंतही वाटते.
भालचंद्र गोखले यांनी भूतकाळात रमताना, तिथल्या आठवणीचं चित्र साकार केलं आहे. आपल्या गणेशगुळे गावाचं वर्णन करून वाचकांनाही गावाच्या भेटीचं आमंत्रण दिलं आहे. त्यांच्या मते मामाचं गाव म्हणजे प्राणवायू साठवणं. तो मिळवायचा असेल तर गाव असायलाच हवं असं त्याचं म्हणणं. संतोष विणके, आकोट, अकोला यांनी, सगळीकडे ‘छुट्टी का मजा पहले जैसा नही रहा’ असा कॉमन सूर ऐकायला मिळतो, असे म्हटले आहे. मामाच्या गावची सुट्टी आंब्याच्या बागेतून निघून समर कँप, हॉबी क्लासमध्ये स्थिरावली आहे. ट्रेकिंगच्या नावाखाली पायात ना धड बूट ना अंगावर स्पोर्ट्स शर्ट, त्या वेळच्या उन्हाळ्याचा ड्रेस म्हणजे ‘चड्डी बनियन और फीर लगे रहो अवलीभाई’ आता उन्हाळा म्हटलं की आपलं यंगिस्तान अंगावरती स्विमिंग सूट टाकला की चालले हौदातल्या पाण्यात (स्विमिंग टँक) पोहायला नव्हे, डुंबायला.
शोभा सकपाळ, विलेपार्ले लिहितात, आम्ही मामाच्या गावचे सुख उपभोगले. पण आताची नातीही वरवरची नावापुरतीच आहेत. गाव, माणसं, वातावरण सर्व काही बदललंय. गावाकडे गेल्यावरही फोन करून ‘येऊ का?’ असे विचारावे लागते. आम्ही जे उपभोगले ते सुंदरच होते. त्याच्या आठवणीत रमून जावे हेच बरे.
नीता नाग, मुंबई लिहितात, ‘‘खेळ, पत्ते, कादंबरीवाचन या सुट्टीतल्या गमतीजमतीपेक्षा वेगळं सुट्टीत आणखी काही असूच शकत नाही, असं वाटायचं. सुट्टीतले दिवस आठवून मन कसं भरून गेलंय! पुन:प्रत्ययाचा आनंद झाला. आजचा जमाना २०-२०चा आहे. मुलांचं मन कोणत्याही गोष्टीत फार वेळ रमत नाही, लगेच बोअर होतं. इंटरनेट, फेसबुक सोबत पॉपकॉर्न, केक असतो. कुणाकडे जाण्याचा प्रश्नच नाही. ट्रॅव्हल कंपनीबरोबर टूर केली की झालं आऊटिंग. मुलांचा मामाचा गाव हरवलाय. पण त्याची त्यांना गरजही वाटत नाही. फोन, नेट, फेसबुकमुळे आजची पिढी वेल-कनेक्टेड आहे. मॅक्डोनाल्ड, पिझ्झा हट, डॉमिनो हे सगळे काका, मामा त्यांची खाण्याची हौस पुरवायला सुसज्ज आहेत. याला आपण जबाबदार आहोत. दिवसभर कामानिमित्त बाहेर राहणारे आई-बाबा आणि त्रिकोणी चौकोनी कुटुंबपद्धती. स्पर्धाचे युग असल्याने सुट्टीतही क्लासेस व शिबिरांचे ओझे! सगळ्यांनीच विचार करायला हवा.. कसा देता येईल मुलांना मामाचा गाव..!’’
अंबरनाथचे विजयमोहन लिहितात, ‘निसर्गाचा आस्वाद, नात्यांचा स्निग्ध ओलावा हे सर्व मी अनुभवलेलं आहे. पण आता तो गाव, ती नाती सर्वच काळाच्या ओघात बदललंय, तरीसुद्धा आजची पिढीसुद्धा खूप भाग्यवान आहे. ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना त्यांच्यासमोर उभी ठाकली आहे. त्यासाठी इंटरनेट, संपर्कासाठी मोबाइल आहेत. त्यामुळे आताच्या पिढीला निवडण्यासाठी फक्त मामाचा गाव हा पर्याय नसून पूर्ण विश्वच मामाचं असं चित्र आहे.
आम्हाला नात्यांची शिदोरी मिळाली जी आम्ही आजपर्यंत गाठीशी बांधली आहे. आजची मुलं भावनिक स्तरावर जगत नाहीत व उद्याचंही त्यांना भान नसतं. आजचा दिवस आत्ताचा क्षण माझा, एवढंच काय ते. आम्ही अनुभवली ती चुलीवरची भाकरी, ठेचा व त्यावर तेलाची धार! आताची पिढी अनुभवते ते पिझ्झा, बर्गर, पावभाजी, चायनीज. शेवटी, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.’
अरविंद मोरे, अमरावती यांनी सद्य:स्थितीवर प्रकाश टाकला आहे- ‘फोन मोबाइलमुळे संपर्क वाढला आहे. पूर्वी एकमेकांशी बोलणे होत नसे. लांबच्या अंतरामुळे नातेवाईकांना भेटण्याची ओढ, गोडी, आतुरता असायची. परंतु आता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भेट होत असल्यामुळे गावाला जाण्यात नावीन्य राहिलेले नाही. आता मुले टी.व्ही., संगणक, व्हिडीओ गेम खेळणेच पसंत करतात. बहुतेकांचे मामाचे गाव ग्रामीण भागात असते. तिथे १०-१२ तास वीजच नसते. त्यामुळे भाचेमंडळी आपल्या घरी ए.सी., कुलरमध्ये राहणेच पसंत करतात. या सगळ्या बदलांमुळे मामाचा गाव हरवलाय.
मीना अभ्यंकर, कल्याण यांनी, आताच्या मुलांना सर्व सुखांमुळे मी ‘स्वर्गाचा राजा’ आहे असे वाटले तरी या एकलकोंडय़ा मुलांना नैराश्य येईल अशी भीती व्यक्त केली आहे. पर्यटनाचा आनंद तुम्हाला पैशाने मिळेल पण तो चिरकाल टिकणारा आनंद नसेल. यंत्रयुगात जो तो पैशाच्या मागे आहे. नाती विरळ झाली आहेत. कमावणारे हात पैसे आणि हिशेबात गुंतलेले, पण जे जे चांगले ते आपल्याच मुलाला मिळाले पाहिजे हीच भावना असते. आम्ही वडीलधाऱ्यांचा आदर करून त्यांची प्रेमळ थाप मिळविण्याचा आनंद घेतला. ‘मामाचा गाव’ आम्हाला खूप काही शिकवून गेला.
कल्याणी बिदनूर, नवीन पनवेल यांनी मात्र वास्तव स्वीकारले आहे. खेडय़ात राहण्यापेक्षा शहरात मित्रांबरोबर राहण्यास मुलं उत्सुक असतात. परदेशची टूर, सहल ही संकल्पना रुजत असून फॅमिली ‘एन्जॉय’ करत आहे. मामाच्या गावचा आनंद त्यांना कार्यक्रमात गवसत आहे. म्हणून त्यांना काही हरवल्याचं दु:ख जाणवत नाही. सद्य:परिस्थितीनुसार दोन पिढय़ांतील आनंदाचा हा फरक आहे.
सुरेखा दसरे, परभणी यांनी बदललेल्या दृष्टिकोनाविषयी सांगितले आहे, ‘‘शाळेला सुट्टी लागली की मनावरचं ओझं उतरायचं आणि वेध लागायचे मामाच्या गावाचे. मामाच्या गावाला सगळा गोतावळा जमायचा. बालजत्रा भरायची, पण आज मामाचा गाव हरवला नाही तर नात्यातला आंबट-गोडपणा कमी झाला आहे. सुट्टीचे वेळापत्रक तयार करतात. मुलांच्या सुट्टय़ा वाया न घालवता आपण त्यांना व्यस्त कसे ठेवतो यातच त्यांना आपल्या पालकत्वाचा अभिमान वाटतो. जीवनाच्या धावपट्टीवर पालक तर धावतातच, पण मुलांनाही घडय़ाळाच्या काटय़ावर धावायला लावत आहेत. त्यांचं लहानपण आपण हिरावून घेतो, याचा विचार करण्याइतपत क्षणभर वेळ नाही. मामाच्या गावची सर यांत्रिक समरकम्पला कशी येणार? म्हणून नात्यातली जवळीक वाढवायची असेल तर उचला फोन आणि सांगा मामीला, ‘गोटय़ा पिंटय़ा येतात गं गावाकडे सुट्टीत मज्जा करायला. आणि त्यांच्यासोबत चिंगी-मंगू येतील इकडे राहायला.’
अमित पंडित यांनी कोकणातल्या फणस, आंबे, करवंद, गाई-गुरं अशा वातावरणाचा आनंद घेतला आहे. ते म्हणतात, ‘‘आज कोणालाही विचारा तुझं गाव कोणतं? उत्तर ठरलेलं असतं. ‘गाव अमुक अमुक पण आता तिथं कोणी राहत नाही.’ आजची पिढी गावी जात नाही. पण आजही गावातली आजी झाडावरचे पाच-पन्नास आंबे राखून ठेवताना म्हणते, ‘माझा नातू येणार आहे. त्याला झाडावर आंबे कसे असतात ते पाहायचंय म्हणून ठेवलेत.’ आमच्या पिढीनं गावं राखली नाहीत. आजी-आजोबांना मात्र अजूनही आशा आहे. मुलानं सांभाळलं नाही पण नातू तरी राखेल.’’
विक्रोळीचे आनंदराव यांनी, इंटरनेटच्या मायाजालात मामाचा गाव हरवला आहे, असे सांगत आपला मामाच्या गावचा अनुभव सांगितला आहे. ‘पॉटभर जेवा हाँ’ म्हणण्याची आपली पद्धत. ‘पावन्यानु उद्या आमच्याकडे जेवाक व्हवा हाँ,’ म्हणून शेजाऱ्यांकडे आपल्या पाहुण्यांना होणारी विनंती. मुंबईला परतताना अश्रुभऱ्या नयनांनी हात उंचावत निरोप देणारी आपुलकी मनाला हुरहुर लावत असे. ते दिवस काळाआड गेले. महागाईच्या वणव्याने प्रेम आटून गेले. इंटरनेटच्या मायाजालात गुरफटलेल्या भाच्यांना मामाचे गाव नकोय. कारण ते घरबसल्या दिसू लागले.
‘मावशीचा गाव’ अशी नवी संकल्पना राबवावी ही कल्पना वैशाली शेंबेकर – मोडक यांची. ‘आम्ही भावंडं खूप भांडलो तरी एकमेकांशिवाय चैन पडायची नाही. आता हे सगळंच हरवलंय. कुडाची घरं जाऊन तिथं आधुनिक घरं आली. महागाई असली तरी हातात खेळणारा पैसा आहे. यांत्रिकीकरणामुळे जग जवळ आलं तरी कुणाकडेही वेळ नाही. त्यामुळे नात्यांतही कोरडेपणा आलाय.’
संध्या रवींद्र देशपांडे, वाशी, नवी मुंबई यांनी, हरवलेल्या मामाच्या गावाला आमची पिढीच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. आज घरी आलेल्या पाहुण्यांसाठी वेळ कुठे आहे? आम्ही पालकच त्या विचित्र वळणावर आहोत. पावलोपावली वागण्यात कृत्रिमता आहे. कामाचे तास वाढल्याने कोणीच कोणासाठी थांबत नाही. शिष्टाचार, अहंकार, अभिमान यामुळे कुणी नातेवाईकांकडे हक्काने जाऊन राहत नाही. सर्व गोष्टी इतिहासजमा झाल्यात याला कारणीभूत आपणच आहोत हे विसरता कामा नये. आम्ही अक्षरश: पैसे कमावणारे यंत्र बनलो आहोत, सुंदर नातेच हरवून बसलो आहे.
पुष्पा चितांबर या ‘हा मामाचा गाव खरंच हरवला आहे, अशा भावना व्यक्त करतात. भाडेवाढ, वाढलेली महागाई यामुळे सहलीचा आनंद घेता येत नाही. मुंज, लग्न, वास्तुशांती या निमित्ताने नातेवाईक बोलावतात, पण ‘डायरेक्ट कार्यालयातच या’ म्हणतात व तिथून पुन्हा घरचा पत्ता. नातेवाईकांकडे गेलोच तर मुलांचे पटले पाहिजे. त्यांना आवडले पाहिजे. मुलं अॅडजेस्ट होत नाहीत. महागाई, जागेची अडचण यामुळे आत्या, मावशीकडे पाठवणे बरे वाटत नाही. आता मामाचा गाव ओस पडला आहे. नोकरीच्या निमित्ताने मामा-मामी शहरात आले. मोठय़ा इमारती उभारून पर्यावरणाची हानी होते. आपुलकी, प्रेम, जिव्हाळा दूर गेला. या सर्व गोष्टींना जबाबदार आजची परिस्थिती, दुष्काळ, चंगळवाद, स्वार्थी वृत्ती आहे. पैसे मिळविण्यासाठी प्रत्येकाची धडपड असल्याने थांबून बोलायला कुणालाच वेळ नाही. म्हणूनच मामाचा गाव हरवला आहे.
वनिता म्हैसकर, सोलापूर यांनी मात्र, एकलकोंडी, अभ्यासाच्या ओझ्यांनी वाकलेली, फास्टफूड खाणारी ही मुलं दुर्दैवी आहेत. नाती, प्रेम, जिव्हाळा कुठे बरं हरवून गेला? असा प्रश्न विचारला आहे. अलका जोशी केळकर, कोल्हापूर यांनी, मामाचा गाव हरवला अशी खंत व्यक्त करू नये, असा सल्ला दिला आहे. आम्ही आजोळ अनुभवलं, पण रोज बाबांच्या गाडीतून फिरणारी माझी नात ऋजुता बसमधून मामाच्या गावी जाण्यास कंटाळली, असा अनुभव त्या सांगतात. ‘‘सुट्टी म्हटल्यावर नातीपेक्षा मलाच आनंद झाला, कारण तिला आजोळ, मामाचा गाव, कोल्हापूरचा रंकाळा मला दाखवायचा होता. मुक्तपणे जगू द्यायचं होतं. पण.. बसच्या प्रवासाला कंटाळलेल्या नातीला ‘मामाची बायको सुगरण.. रोज रोज पोळी शिकरण’ हे गाण म्हणून दाखविल्यावरही ‘त्यासाठी मामाचा गाव का? शिकरण तर रोजच घरात खातो’ असे उत्तर मिळाल्यावर माझी बोलतीच बंद झाली,’’ असे त्या म्हणतात. पण आमचा आनंद आता नाही म्हणून उसासे टाकायचं कारण नाही. सुट्टीच्या त्यांच्या कल्पना एकविसाव्या शतकाला अनुसरून असल्या तर नवल कशाला? मुलांना कणखर आणि अप टू डेट बनवायचं असतं. करिअर एका दिवसात होत नाही. त्यासाठी सुट्टीचा उपयोग करून घ्यायला हवा. मग नोकरी करणाऱ्या मामा-मामींनी पिझ्झा बर्गर आणले तरी चालेल, हा आधुनिक विचार स्वीकाण्याची गरज त्या व्यक्त करतात.
साधना धारवाडकर, डोंबिवली यांनी आत्ताच्या आजी-आजोबांना वयपरत्वे नातवंडांचे चोचले पुरवणे कठीण जाते. मुलांमुळे त्यांना टीव्हीचे कार्यक्रमही बघता येत नाहीत आणि आजोळी नेण्यासाठी आईला वेळही नसतो, या वास्तवावर प्रकाश टाकला आहे. त्यांना संगणक, मोबाइल इंटरनेटचा आनंद आहे पण तो आरोग्याला घातक असल्याचे मतही त्या नोंदवतात.
विभावरी दत्तवाडकर, कोथरूड यांनी, सुट्टीकडे आधुनिक दृष्टिकोनातून पाहायला हवे असे लिहिले आहे. ‘आता काळ बदलला. पावसाच्या अनियमितपणामुळे बहुतेक नद्या कोरडय़ा पडतात. साधे पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील तेथे पोहणे ही संकल्पना मागे पडली. ती जागा स्वििमग टँकने घेतली. आता सगळीकडे शिबिरे; वयाप्रमाणे व आवडीप्रमाणे तेथे पाठवावे. त्यामुळे मुलांच्या अंतरी; उपजत गुणांचा शारीरिक, बौद्धिक विकास होईल. सुट्टी नुसते गावी जाण्याने हुंदडण्याने काही साध्य होणार नाही. मुले कंटाळतात. त्यांना योग्य मार्ग दाखवला तर मुलांना भविष्यात उपयोग होऊन प्रगती होईल. त्यामुळे मुलांनी काही हरवलंय, असं म्हणता येत नाही. उलटपक्षी मुलेच म्हणतील, ‘चला सुट्टी झाली आता नवीन काही शिकायचंय.’
वर्षां लोणकर, पुणे, यांनी मध्य प्रदेशातल्या गावाचं वर्णन केले आहे. गावात गेल्यावर वाडय़ापर्यंत पोहोचेपर्यंत अध्र्या गावाशी गप्पा व्हायच्या. शहरातली माहेरवाशीण मुला-बाळांना घेऊन आली आहे ही वर्दी गावाला मिळायची. आईचे चेहऱ्यावरून फिरणारे खरखरीत हात आणि सुरकुतलेल्या चेहऱ्याचा भाव आपण गमावलाय ही भावना खूप अस्वस्थ करते. सुप्रिया तडकोड, बोरिवली यांनी मुंबईतल्या आजोळचे वर्णन केले आहे. तिथे खेळलेले विविध खेळ, गच्चीतली वाळवणं, आजीच्या कुशीत झोपून ऐकलेल्या गोष्टी, हे सर्व आठवतंय. लहानपणी बघितलेली बालनाटय़ं त्यांच्या अजून स्मरणात आहेत. मुलं आत्ता कृत्रिमरीत्या उभारलेल्या मामाच्या गावाला जातील, पण ते खरे आजोळ, नाती, ‘वास्तव’ त्यांना ‘जगता’ येणार नाही. तो मामाचा गाव हरवलाच आहे.
सीमा देवस्थळी, अंधेरी यांनी, पालकांना आपली मुले स्पर्धेत मागे पडण्याची धास्ती वाटत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी प्रा. शिवाजीराव भोसलेंच्या शब्दांची आठवण करून दिली आहे. ‘अरे सोडा त्याचा हात, जाऊ दे त्याला पुढे – पडू दे – झडू दे, त्यातूनच वाढू दे त्याला; तरच तो टिकेल आजच्या स्पर्धेत. मुलाचे मुक्त बालपण, आपसूक संस्कार होण्याचे केंद्रच मामाच्या गावाबरोबर हरवल्याची हळहळ त्यांनी व्यक्त केली आहे. माझेही आजोळ खेडय़ातले. सुट्टीत आम्हीही पंधरा-वीस भावंडे जमायचो. आजीचे प्रेम, आजोबांचा धाक, मामीचा सुगरणपणा, मामाचे आम्हा भाच्यांत रमणे हे आम्हीही मनसोक्त अनुभवलेय. आम्हा भावंडांची भांडणे व्हायची, पण मिळून राहण्यातला, खाण्यातला, काम करण्यातला आनंद आम्ही उपभोगला. कष्टाची सवय, निर्मळ मनाची माणसांवरील भक्ती करण्याची जाण तिथूनच मिळाली. माझी आजी वयाच्या ८३व्या वर्षी लेकी – नातवंडांच्या गोतावळ्यात खूश असते. आजही आमची मुले मोठी झाली तरी आम्ही ‘मामाचा गाव’ अनुभवतो. वाटेकडे डोळे लावून बसलेली आजी, हसतमुखाने स्वागत करणारी मामी आजही मनाला, भावनांना तृप्त करते. आजीने लावलेल्या कष्टाच्या सवयींमुळे आजही टिकून आहोत, या धकाधकीच्या जीवनात. मऊ मेतकूट भात-आमरसाची पातेली, पोळ्यांचा ढीग आणि उठणाऱ्या पंक्ती आठवल्या की आजही डोळे भरून येतात. तो स्वर्गसुखाचा आनंद होता. त्यामुळे नाती घट्ट होत गेली. आम्हा भावंडांना ‘सर्वासाठी जगावं’ हा संदेश मिळायचा सुट्टीतून. आज ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’चे कोर्स करतात. पण आम्ही गोतावळ्यातच मत व्यक्त करायला शिकलो. कम्युनिकेशन स्किल्स्, स्टेज डेअरिंग तिथेच मिळाले. सुट्टी संपून निघताना.. आजीने हातावर खाऊसाठी ठेवलेले पैसे.. भरून येणारे डोळे.. निरोपाचे हलणारे हात.. सारखी मागे वळून बघणारी आमची मान.. आणि मामीने ‘परत या हं!’ म्हणताक्षणी गालावर खुदकन् येणारे हसू हा सगळा सुखाचा नजराणा आमच्यासाठी. तर प्रशांत एल. दांडेकर यांनी वास्तवाचं भान आणून दिलंय, ‘‘मामाच्या गावच्या स्वर्गसुखाचा आनंद अनुभवण्याचा हक्क आजच्या पिढीचाही आहे,’’ असे आग्रहाने सांगितले आहे. ते म्हणतात, ‘‘गाण्यातली आगगाडी आणि मामाचा गाव या गोष्टी काळाच्या प्रवाहात मागे पडल्या. खिडकीतून मागे पळणाऱ्या झाडांप्रमाणे, गावाप्रमाणे याला जबाबदार आपण आहोत कारण भौतिक सुखाच्या मागे धावताना आपण निसर्ग आणि कुटुंबव्यवस्था यांची वाताहत केली आहे. त्यामुळे गाव आहे पण गावात पाणी नाही. महागाईमुळे नोकरीसाठी मामीलाही घराबाहेर पडावे लागले. गावाला जाताना प्रवासातले खाचखळगे, ट्रॅफिक जाम, रिझव्र्हेशन यामुळे मामाचा गाव स्वप्नातला होतो आहे. हे बदलायला हवे. मामावर आर्थिक ताण पडणार नाही ना याची काळजी घेऊन गावात सौरऊर्जेचा वापर करून पाझर तलाव बांधून, हिरवाई जागवून नवीन उद्योग सुरू करायला हवेत. त्यामुळे मामाला गावही सोडायला लागणार नाही व गावचे सौंदर्यही टिकेल.’’ हा त्यांचा विचारही नक्कीच सकारात्मक आहे.
एकूणच ‘मामाचा गाव हरवलाय’? या प्रश्नाला वाचकांनी मनापासून उत्तरं दिली. उदंड प्रतिसाद दिला. काही जण मामाच्या गावात रमले तर काहींनी नव्या पिढीला हे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. काहींनी स्वत:ला मामाचा गाव मिळाला म्हणून ‘भाग्यवान’ म्हटले, तर काहींनी वास्तव स्वीकारलेच पाहिजे, असा आग्रही सूर मांडला. वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून जाणवलं की खरंच काळ बदललाय? की जगण्याचे, जीवनाकडे बघण्याचे संदर्भ? भावना, प्रेम महत्त्वाचे असले तरी व्यवहाराकडे दुर्लक्ष कसे करावे? काही गोष्टी किती वास्तव आणि सत्य आहेत? वीज, पाण्याची वाढती टंचाई, वाढलेली महागाई, मुलांच्या चैनीच्या बदललेल्या संकल्पना आणि नोकरी व्यवसायाचे व्यस्त रुटीन. यामुळे एकत्रपणाच्या आनंदावर विरजणच पडतं थोडंसं! विभक्त कुटुंबामुळे प्रत्येकालाच आपली मुलं परमप्रिय, मग त्यांना कुणी रागवायचं नाही. त्यामुळे जमलेली भावंडं असोत, जावा-जावा नाही तर बहिणी-बहिणी असोत; प्रत्येकालाच आपला स्वाभिमान महत्त्वाचा. दुसऱ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती नसते. मग मुलांची भांडणं आणि पर्यायाने मोठय़ांच्यात मतभेद! त्यापेक्षा एकत्र जमणेच नको, इतक्या टोकापर्यंत विचार पोहोचतात.
पुढच्या पिढीची ओढ पुढेच असते. म्हणून बदललेल्या संकल्पनांचाही विचार करायलाच हवा. मुलांना रिकाम्या वेळेत नवं काही देण्याचा प्रयत्न व्हावा. आजीच्या प्रेमाबरोबरच नवं काही शिकण्यासाठी सुट्टी ही एक संधी आहे, ही भूमिका स्वीकारायला हवी. नाती टिकवायची हे प्रत्येकानं मनानं ठरवलं तरच ती टिकतील, दृढ होतील.
बुद्धिमत्तेच्या जोरावर शिक्षण, नोकरी व पर्यायाने सुबत्ता मिळेल, पण नाती-माणसं दुरावली तर? एकमेकांना भेटावसं वाटणं आणि भेटल्यावर ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ असा आनंद होणं, हेच मामाच्या गावी आप्तस्वकीयांच्या गोतावळ्यात साधतं. मग ते गाव असो किंवा शहर, मामाचा वाडा असो किंवा फ्लॅट, चार दिवस असोत किंवा अख्खी सुट्टी; मामाच्या गावची गंमतच न्यारी. आजीच्या कुशीत शिरल्याचा आनंदच वेगळा. कारण तोच मनाला उत्साही ठेवतो. वर्षभराच्या धकाधकीतसुद्धा..!
सुटी कुठेही व्यतीत करणं असो.. मामाच्या गावी.. शिबिरांमध्ये.. कँपमध्ये.. किंवा पर्यटनस्थळी.. वर्षभराच्या बिझी रुटीनमधून मिळालेल्या त्या निवांतपणावर भरभरून प्रेम करावं हेच खरा..! कारण तो निसर्ग.. ती नाती.. तेव्हाही आणि आताही नितांतसुंदरच आहेत.. संदर्भ बदलले तरी..! त्यासाठी मिळालेली सुट्टी ही एक संधी आहे, खरं ना? चला तर मग.. या मिळालेल्या ‘ब्रेक’वरही प्रेम करू या.. असं..
‘हिरवे हिरवे माळ मोकळे
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई..
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरूनी भीती विसरूनी घाई.
प्रेम करावे रक्तांमधले
प्रेम करावे शुद्ध पशूसम
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.
प्रेम करावे मुके अनामिक
प्रेम करावे होऊनिया तृण
प्रेम करावे असे परंतु ..
प्रेम करावे हे कळल्याविण..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा