रजनी परांजपे

सरकारी शाळांमधून शिकणाऱ्या मुलांची घरची परिस्थिती काय असते हे आपण पाहिलेच. या मुलांना पाठय़पुस्तकांशिवाय दुसरे काही वाचायला तर सोडाच, पण बघायलादेखील मिळणे कठीण. शाळांमधून मुलांना अवांतर वाचनासाठी पुस्तके मिळावीत अशी सोय असते, पण बऱ्याचदा पुस्तके फाटतील, हरवतील या भीतीने ती मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. शिवाय मराठीत टप्प्याटप्प्याने वाचन शिकता येईल अशी पुस्तके फारशी नाहीत. आहेत तीदेखील या मुलांपर्यंत पोहोचणे कठीण. मग केवळ पाठय़पुस्तके वाचून वाचन कसे येणार?

‘‘आम्हाला तीनेक शाळा दत्तक घ्यायच्या आहेत म्हणजे आम्ही तिथे स्वयंसेवक म्हणून काम करू शकू. अर्थातच केवळ स्वयंसेवकांवर हे काम होणार नाही. कारण स्वयंसेवक फार तर आठवडय़ाचा एक दिवस, दोनेक तास देऊ शकतात. पण शाळेतल्या मुलांना काही शिकवायचे म्हटले, म्हणजे इंग्रजी, गणित वगैरे, तर त्यात नियमितपणा पाहिजे. म्हणून कुठल्या तरी संस्थेबरोबर हे काम करावे अशा विचाराने मी तुमच्याकडे आले आहे.’’ एका मोठय़ा कंपनीकडून त्यांच्या सीएसआरच्या (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) प्रतिनिधी आमच्याकडे आल्या होत्या. त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांना विचारले, ‘‘या मुलांना इंग्रजी शिकवावे असे का वाटते तुम्हाला? मुले तर पहिली ते चौथीचीच आहेत.’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मराठी तर ती शिकतातच ना शाळेत? मराठी माध्यमाच्याच शाळा आहेत. आता सुरुवातीपासून इंग्रजी शिकवावे, असे धोरण आहे आणि बहुतेक शाळांमधून इंग्रजी शिकवता येईल असे शिक्षक नाहीत.’’

त्यांचे म्हणणे बरोबरच होते. मराठी माध्यमाच्या शाळांमधून पहिलीपासूनच इंग्रजी शिकवायला सुरुवात केली आहे हेसुद्धा खरे. आणि बऱ्याच शाळांमधून इंग्रजी शिकवायला तितके सक्षम शिक्षक नाहीत हेसुद्धा खरे. नाही तरी आजकाल इंग्रजीची लाटच आली आहे. त्याविरुद्ध उठवला जाणारा आवाज हा फारच क्षीण, अगदी टिटवीने समुद्र आटवण्याचा प्रयत्न करावा तसाच आहे. ते असो. इथे खरे तर मुद्दा इंग्रजी-मराठीचा नाही. मुद्दा आहे तो आमच्या महानगरपालिकेच्या किंवा सरकारी शाळांमधून स्वभाषेतून अथवा प्रांतिक भाषेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची परिस्थिती कशी आहे याविषयी अंधारात असण्याचा. आपण तसे अंधारात असायला हवे असे नाही. कारण ‘असर’ (अ‍ॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट)सारखी सर्वेक्षणे आणि इतर किती तरी लहान-मोठे अहवाल हे वास्तव सतत आपल्यासमोर आणताहेत. त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न आपण करीत नाही किंवा तितका वेळ आपल्याकडे नसतो. शिवाय काहीएक गृहीतक मनात धरून त्याचा अर्थ लावतो. माझ्यासमोर बसलेली सीएसआरची प्रतिनिधी ही दुसऱ्या गटातली. ‘मुले मराठी शाळेत जातात तर मराठी तर येतच असणार’ हे तिने गृहीत धरलेले.

मुलांच्या गुणवत्तेच्या बाबतीत किंवा त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आमचे चाललेले प्रयत्न बऱ्याचदा याच गृहीतकावर आधारित असतात. म्हणूनच शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या आमच्यासारख्या बऱ्याच जणांचे प्रयत्न पाचवी-सहावीच्या पुढच्या मुलांची अभ्यासात प्रगती कशी होईल, त्यांना गणित, इंग्रजी, शास्त्र इत्यादी महत्त्वाचे विषय कसे चांगले येतील, त्यात त्यांना कसे चांगले गुण मिळतील आणि त्यांचे आयुष्य कसे सुधारेल या दृष्टीने चाललेले असतात आणि एका दृष्टीने ते बरोबरच आहे. चौथी-पाचवीपर्यंत यशस्वीपणे पुढे गेलेल्या मुलांना मदतीचा हात देणे गरजेचेच. पण चौथी-पाचवीपर्यंतही पोहोचू शकत नाही, अथवा पोहोचूनही लिहायला, वाचायला शिकलेला असतोच असे नाही, असाही फार मोठा विद्यार्थीवर्ग आहे आणि त्याला चौथी-पाचवीत किंवा त्यानंतर पुढे केलेला मदतीचा हात फारसा उपयोगी पडत नाही. लिहिण्याचे कौशल्य मुळातच आत्मसात न झाल्याने एकदा मागे पडलेला अभ्यास मागेच राहतो, तो भरून काढून इतर मुलांच्या बरोबरीला येणे म्हणजे वाळूत चालण्यासारखेच. जमिनीवर चालणाऱ्यांबरोबर वाळूत चालणारे बरोबरी कशी करणार?

म्हणून मुले अशी राहूच नयेत यासाठीच प्रयत्न करायला हवा.

सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याच्या मार्गातले दोन मुख्य टप्पे. पहिला अर्थातच सर्व मुलांना शाळेपर्यंत घेऊन जाण्याचा व दुसरा शाळेत घातल्यानंतर इयत्तेनुसार त्यांची प्रगती होते आहे की नाही हे बघण्याचा. या दुसऱ्या टप्प्याकडे आपले सर्वाचेच दुर्लक्ष होते आहे असे मला वाटते. ‘शाळेत जातात म्हणजे शिकतात’ असे नसते हे आपल्या लक्षात येत नाही. किंबहुना शाळेत घातले म्हणजे रोज शाळेत जातातच असेही नसते, किंबहुना असे नसतेच. या मुलांचे शाळेतील हजेरीचे प्रमाण बघितले तर त्यांच्या शिक्षणाचा दर्जा इतका कमी असण्याचे एक कारण अनियमित हजेरी आहे हे कळते. मुले शाळेत नियमित जातील हे बघणे जसे आवश्यक आहे तसे आणि तितकेच आवश्यक आहे वर्गावर रोज शिक्षक हजर असणे. पहिली-दुसरीच्या वर्गावरील शिक्षक हे कुठल्याही कामासाठी सर्रास वापरावेत असा समज असल्यासारखे त्यांचे वरिष्ठ आणि एकूणच सरकारी खाते वागत असताना आपल्याला दिसते. कारण बोलूनचालून पहिलीच, त्यात काय शिकवायचे, असा, किंबहुना काहीच विचार केलेला नसतो.

मुलांचा पहिलीचा अभ्यास आपल्या दृष्टीने सोपा, साधा पण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि अवघडच असतो. ‘बालभारती’चे पहिलीचे पुस्तक पाहिले तर त्यात पूर्ण मुळाक्षरे, पूर्ण बाराखडी आणि काही जोडाक्षरे वापरलेली दिसतात. याचाच अर्थ असा, की लिहिण्याच्या दृष्टीने बघितले तर मुलांना पहिलीत पूर्ण मुळाक्षरे, पूर्ण बाराखडी आणि काही जोडाक्षरे येणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षात पहिलीतून दुसरीत जाताना साधारण २० ते ३० टक्के मुलांना पूर्ण मुळाक्षरेही येत नसतात. ‘असर’च्या सर्वेक्षणाचे महाराष्ट्राचे २०१८ चे आकडे पाहिले तर त्यावरून असे दिसते, की पाचवीत गेलेल्या फक्त ६६ टक्के मुलांना दुसरीच्या मुलांइतके वाचता येते. ही सरासरी आहे खासगी आणि सरकारी शाळांमधल्या मुलांची. फक्त सरकारी शाळांची टक्केवारी पाहिली तर केवळ ४४ टक्के पाचवीतील मुलांना दुसरीतील मुलांसारखे वाचता येते आणि जवळजवळ ७० टक्के मुले सरकारी शाळांमध्येच जातात.

मुलांची वाचनक्षमता कमी असण्याचे एक कारण वाचनसरावाचा अभाव हे आहे. वाचन हे एक कौशल्य आहे. कशातही कौशल्य मिळवण्यासाठी त्याचा सराव करणे अनिवार्यच. सरकारी शाळांमधून शिकणाऱ्या मुलांची घरची परिस्थिती काय असते हे आपण पाहिलेच. या मुलांना पाठय़पुस्तकांशिवाय दुसरे काही वाचायला तर सोडाच, पण बघायलादेखील मिळणे कठीण. शाळांमधून मुलांना अवांतर वाचनासाठी पुस्तके मिळावीत अशी सोय असते. पण बऱ्याचदा पुस्तके फाटतील, हरवतील या भीतीने ती मुलांपर्यंत पोहोचतच नाहीत. शिवाय मराठीत टप्प्याटप्प्याने वाचन शिकता येईल अशी पुस्तके फारशी नाहीत. आहेत तीदेखील या मुलांपर्यंत पोहोचणे कठीण. मग केवळ पाठय़पुस्तके वाचून वाचन कसे येणार?

अर्थात, वाचनसराव देण्यासाठी आधी वाचायला शिकवणे गरजेचे आणि अभ्यासक्रमानुसार ते पहिलीतच झाले पाहिजे. पहिलीचे पाठय़पुस्तक जर पहिलीतच वाचता आले तर मग त्यापुढे काहीही वाचणे हा सरावाचा प्रश्न आहे. देवनागरी लिपीचे ते वैशिष्टय़च आहे. मुख्य टप्पे मुळाक्षरे, बाराखडी आणि जोडाक्षरे वाचणे. मुळाक्षरे बिनचूक ओळखता येण्यासाठी ती गिरवणे ही जुनी पद्धत. ती आता कोणी वापरत नाही. मात्र कुठल्याही पद्धतीने शिकवली तरी ती पाठच व्हावी लागतात. कारण त्यात तर्काला जागा नाही. वाचता येणे म्हणजे केवळ शब्द ओळखता येणे नाही, ती वाचनाची पहिली पायरी. वाचलेल्याचा अर्थ समजणे ही त्याच्या पुढची पायरी. पाचवीत गेलेल्या मुलाला दुसरीच्या मुलाइतकेच वाचता येते असे आपण म्हणतो तेव्हा आपण त्याची वाचण्यातली सफाई आणि बिनचूक अक्षरे ओळखण्याची क्षमता याविषयी बोलत असतो, आकलनाविषयी नाही. आणि असे असेल तर मग पहिली ते चौथीच्या मुलांना वाचायला शिकवणे आणि वाचनाचा सराव देण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करणे आणि युद्धपातळीवर त्यासाठी काम करणे किती गरजेचे आहे ते आपल्या लक्षात येईल.

एकदा पोलिओ झाला की झालेले नुकसान भरून काढता येत नाही. तो होऊ नये यासाठीच प्रयत्न हवेत, तसेच आहे हे.

rajani@doorstepschool.org

chaturang@expressindia.com

Story img Loader