योगेश शेजवलकर – yogeshshejwalkar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दिवाळी अगदी काही दिवसांवर आली आहे. भारतीय मन हे उत्सवप्रिय आहे. मात्र यंदा सगळ्यांच्याच उत्सवांवर आणि उत्साहावर मळभ दाटून आलं आहे.  इतर सणांच्या तुलनेत दिवाळी काही प्रमाणात तरी साजरी करता येऊ शकतेय. पण सगळ्यांनाच तसं वाटतंय का? ‘त्या’चीही हीच भावना होती. ‘‘साजरं करण्यासारखं काही नाहीच,’’ या त्याच्या म्हणण्यावर शेजारच्या आजींनी त्याला अनुभवाच्या चार गोष्टी सांगितल्या..

‘‘फ्लॅटवर आता पुढचे दोन आठवडे मी एकटाच. बाकीचे सगळे दिवाळीसाठी आपापल्या घरी परत गेले. नाही.. मी दिवाळीला घरी जाणार नाही. टाळेबंदीच्या वेळेला मी नेमका घरी होतो. गेल्याच महिन्यात तर इकडे आलो. हो.. प्रोजेक्टच्या काही गोष्टी कंपनीतूनच होऊ शकतात, त्यामुळे जावं लागतं. नियमाप्रमाणे जेवढे असू शकतात त्यापेक्षाही कमीच जण असतात कंपनीत. असो, तर मी इथंच आहे. दिवाळीनंतर तुझी कधी इकडे चक्कर झाली तर भेटूच. चालेल.. बोलूच परत.’’ असं म्हणून त्यानं मित्राबरोबर सुरूअसणारा फोन बंद केला.

मग अगदी सहज तो गॅलरीत येऊन उभा राहिला. संध्याकाळची वेळ होती. नेहमीप्रमाणे समोरच्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ सुरू होती. रस्त्यापलीकडच्या आकाशकंदिलांच्या दुकानात थोडा चकचकाट दिसत होता. मात्र या खेपेला दुकानासमोर मांडव घालून त्यात असंख्य आकाशकंदील लावलेले नव्हते. तेव्हा या वर्षीचा चकचकाट तसा मर्यादितच होता. ते दुकान सोडलं, तर आजूबाजूला नजर फिरवल्यावर इतर कोणतीही गोष्ट बघून दिवाळी आठवडय़ावर आली आहे असं वाटत नव्हतं. या वर्षी उत्साहालाही ओहोटी लागली आहे, असं त्याला उगाच वाटून गेलं. मग तो पुन्हा घरात आला आणि सोफ्यावर पसरलेल्या वस्तूंच्या ढिगाऱ्यातून रिमोट कंट्रोल शोधून पुढचे काही तास टीव्ही बघण्यात घालवले. पडल्या पडल्या अनेक गोष्टी चरून घरातले डबेही रिकामे करून झाले.

रात्र झाल्यावर, कंटाळा येऊन त्यानं टी.व्ही. बंद केला. तेवढय़ात बाहेरच्या दरवाजापाशी त्याला कसला तरी आवाज ऐकू आला. काय झालं हे बघण्यासाठी त्यानं दार उघडलं, तर शेजारच्या फ्लॅटमध्ये राहाणाऱ्या सत्तरीतल्या आजी त्यांच्या दरवाजाशेजारी रांगोळीसाठी फरशीवर काव लावत होत्या. भिंतीला टेकून ठेवलेली त्यांची काठी घसरून त्याच्या फ्लॅटच्या दरवाजावर आपटली होती आणि त्याचा आवाज झाला होता. आजी त्याच्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या, ‘‘सॉरी हं!’’

‘‘अहो सॉरी काय त्यात?’’ काठी उचलून पुन्हा भिंतीला टेकवत तो आजींना म्हणाला, ‘‘दिवाळीची तयारी जोरात दिसते आहे.’’ त्यावर आजी म्हणाल्या, ‘‘अरे, या वेळेला जरा बेताबेतानं गोष्टी करते आहे. मी बाहेर पडत नाही. पण गोष्टी मागवत असते. त्या जशा मिळतील तसं काम संपवते आहे. खरं तर या खेपेला दोन्ही मुली आणि नातवंडं दिवाळीसाठी आणि आधी तयारीसाठी येणार होती. पण आता मला एकटीला जेवढं जमेल तेवढं सुरू आहे.’’ ‘‘काही मदत लागली तर सांगा,’’ असं तो बोलून गेला. तसं आजी म्हणाल्या, ‘‘आतल्या टेबलावरचा तांब्या आहे तेवढा घेऊन आलास तर बरं होईल. मला माझ्या दुखऱ्या पायामुळे एकदा खाली बसल्यावर पटकन उठता येत नाही.’’ ‘‘हो, देतो की,’’ असं म्हणत तो त्यांच्या घरात गेला आणि टेबलावर ठेवलेला तांब्या त्यानं उचलला. पुन्हा वळून तो बाहेर पडणार तेवढय़ात टेबलावर पसरलेल्या असंख्य गोष्टींनी त्याचं लक्ष वेधून घेतलं. टेबलावर एका बाजूला अनेक पणत्या रंगवून वाळवत ठेवल्या होत्या, दुसऱ्या बाजूला एका पिशवीतून दिव्यांच्या माळा आणि आकाशकंदील बाहेर डोकावत होते. टेबलाच्या मधोमध एक मोठा डबा होता, ज्यात विविध रंगांच्या रांगोळ्यांचे पुडे होते. टेबलाशेजारच्या खुर्चीवर साडय़ांचा गठ्ठा होता. उद्या वॉचमनला बोलावून तो गठ्ठा इस्त्रीला जाणार हे स्पष्ट होतं. टेबलापलीकडे असणाऱ्या ओटय़ावर जुन्या धाटणीची भक्कम समई घासून लख्ख करून ठेवली होती. ओटय़ावरच्या एका कोपऱ्यात चिवडय़ाचे पोहे, दाणे, तेल अशा सगळ्या गोष्टी माप घेऊन ठेवलेल्या होत्या. त्या वयातही आजींची तयारी बघून तो थक्क झाला.

तेवढय़ात ‘‘अरे कुठे हरवलास?’’ असे आजींचे शब्द कानावर पडले आणि तो भानावर आला. मग तांब्या आजींना देत म्हणाला, ‘‘आजी, या वयात इतक्या सगळ्या गोष्टी एकटय़ानं करता ही कमाल आहे.’’ तेव्हा हसून आजी म्हणाल्या, ‘‘अरे आपली तयारी आपणच करायची असते. मी सगळ्या गोष्टी मुद्दामहून समोर मांडून ठेवल्या आहेत म्हणजे काही विसरायला नको. घरातली साफसफाई बाईची मदत घेऊन आज पूर्ण केली आणि अर्धी लढाई जिंकली. बाकीच्या गोष्टीही हळूहळू होतील. तू काय करतोयस की नाही तयारी? या वर्षी तूही दिवाळीत एकटाच आहेस ना? कालच तुझ्या घरमालकांबरोबर फोनवर बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले.’’

तो क्षणभर विचार करून म्हणाला, ‘‘आजी,अगदी खरं सांगू? मला या वर्षी काही उत्साहानं करावं असं वाटतच नाही. वर्षभरात जे काही करायचं ठरवलं होतं, त्यातलं काहीही झालेलं नाही. तेव्हा साजरं करण्यासारखं माझ्याकडे एकही कारण नाही.’’ ते ऐकून आजी शांतपणे म्हणाल्या, ‘‘अरे, गेले काही महिने जे घडलं ते बघता, या वर्षी दिवाळी साजरी करण्याची किमान संधी मिळते आहे, हीच गोष्ट तयारी सुरू करण्यासाठी पुरेशी आहे, नाही का?’’ त्यावर तो थोडा उदास होत म्हणाला, ‘‘बरोबर आहे, पण काही करावं असं वाटतच नाही. खरं तर या वर्षी दिवाळीसाठी मी बरेच बेत आखले होते. घरासाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या, नवीन गुंतवणूक करायची होती. गेल्या वर्षीपासून स्थळं बघायला सुरुवात केली होती. तो विषय पुढे जाईल असं वाटलं होतं. या वर्षी प्रमोशन होणार होतं, पगार वाढणार होता. पण त्यातली एकही गोष्ट झालेली नाही. त्यात भरीस भर म्हणजे दिवाळीत मला घरीही जाता येणार नाही. तेव्हा सण साजरा कुणासाठी करायचा?’’

त्यावर आजी चटकन म्हणाल्या, ‘‘स्वत:साठी. आपण एकटे असलो काय किंवा अनेकांबरोबर असलो काय, ‘सण आहे’ हे एकच निमित्त तो साजरा करण्यासाठी पुरेसं असतं. त्याचा आणि वर्षभरात काही भव्यदिव्य घडलं की नाही याचा काहीही सबंध नसतो. कारण सण साजरा करताना तो मोठय़ा झोकात, इतरांचे डोळे दिपतील असा साजरा करण्याची गरज नसते. आपल्याकडे जे आहे, तेवढय़ात तो साजरा करणं महत्त्वाचं.’’

त्याला आजींचं म्हणणं पटलं नाही. तो म्हणाला, ‘‘थोडं स्पष्टपणेच सांगतो. मनातूनच वाटत नाही की काही करावं. तसंही या वर्षी काही घडलेलं नाही आणि घडण्याची काही शक्यताही नाही. तेव्हा सण साजरा केल्यानं असा काय फरक पडणार आहे?’’ तेव्हा आजी म्हणाल्या, ‘‘फरक पडतो की पडत नाही, हे शेवटी आपल्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. मात्र एक नक्की होतं, निदान चार दिवस मनातल्या मनात आपलं जे सतत दु:ख उगाळणं सुरू असतं ते बंद होतं. एक गोष्ट लक्षात घे, आपल्याकडे जे नाही, आपल्याला जे हवं होतं तसं झालं नाही, असा विचार करत राहाणं, हा आपल्या सर्वाच्या मनाचा आवडता खेळ असतो. हा खेळ आपल्याला मानसिकदृष्टय़ा दमवतो, नाही नाही ते विचार करायला लावतो. पण आपल्याला हे माहिती असूनही आपण त्या खेळात सातत्यानं सहभागी होत राहातो हे आपलं अपयश आहे. आपल्याकडे जे आहे, त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचं माध्यम म्हणूनही सणांकडे पाहता येऊ शकतं. उलट या वर्षीच्या विचित्र परिस्थितीत तर आपण व्यवस्थित आहोत, हीच मुळात साजरं करण्यासारखी गोष्ट आहे, असं नाही वाटत?’’

आजींच्या त्या इतक्या स्पष्ट प्रश्नाचं नेमकं काय उत्तर द्यावं हे न समजून तो गप्प बसला. मग आजीच म्हणाल्या, ‘‘हे बघ, तुला जे काही वाटतं आहे. ते अतिशय स्वाभाविक आहे. पण सारखा तोच विचार करून वैताग येण्यापलीकडे दुसरं काहीच होत नाही. मी स्वानुभवावरून सांगते, असे अनेक दिवाळीचे प्रसंग होते, ज्यात घरातल्या दु:खद प्रसंगामुळे काही करता आलं नाही. हौसमौज पुरवून गोष्टी करता येणं दरवेळी शक्य नव्हतं. कित्येकदा तर सगळी तयारी करून काही तरी अनपेक्षित घडल्यामुळे गोष्टी मनासारख्या व्हायच्या नाहीत, तेव्हा काहीही करू नये असं वाटायचं. विचार करताना असं अंधारून आल्यासारखं वाटायचं.. आणि मग त्या अंधाराची सवय व्हायची. तशी सवय होणं.. प्रकाशापेक्षा अंधाराची ओढ जास्त वाटणं, हे खरं धोकादायक. आता त्याच्याही पुढचं सांगते, अशी अंधाराची ओढ वाटायला लागली, की मग उगाचच आपल्याला इतरांपेक्षा जास्त चांगलं समजतं, फक्त आपणच जास्त संवेदनशील आहोत, प्रवाहाविरुद्ध आपण काही तरी करत आहोत आणि ते मोठं धैर्याचं काम आहे, असा ग्रह बाळगून आपण स्वत:ला फसवायला लागतो, हे माझ्या मते तरी सर्वात मोठं अपयश आहे.’’

‘‘पण सण कसा साजरा करावा, हे प्रत्येक जण त्याचं त्याचं ठरवू शकतो ना?’’ तो म्हणाला.  त्याला एका बाजूला आजींचं म्हणणं पटत होतं, पण दुसऱ्या बाजूला त्यानं जो काही विचार केला होता, तो त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. आजी त्याचा प्रश्न ऐकून म्हणाल्या, ‘‘निश्चित! का नाही? हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. निमित्तही दरवर्षी वेगळं असू शकतं. मला विचारशील, तर या वर्षी दिवाळी हे माझ्यासाठी कृतज्ञता दाखवण्याचं निमित्त आहे. गेल्या काही महिन्यांत ज्यांनी माझ्या वयाचा विचार करून, मी एकटी असते या गोष्टीचं भान ठेवून मला हरतऱ्हेची मदत केली; मग तो बिल्डिंगचा वॉचमन असो, घरात कामं करणारी बाई असो, दूधवाला असो, वाणी असो, मेडिकलवाला असो, भाजीवाला असो किंवा सध्या इथं नसले, तरी टाळेबंदीच्या वेळेला मला मदत करणारे तुझे फ्लॅटमधले मित्र असोत.. त्या सर्वामुळे मला ही दिवाळी साजरी करण्याची संधी मिळते आहे, तेव्हा हे जे काही मी करते आहे, ते त्यांची मेहनत, चांगुलपणा साजरा करण्यासाठी.’’

आजींचं म्हणणं पटून तो म्हणाला, ‘‘खरं आहे. निमित्त आपल्या अवतीभोवतीच असतं.. फक्त ते नीट शोधता आलं पाहिजे.’’