समाज घडत असतो माणसांनी. दुष्टांबरोबर सुष्ट प्रवृत्तीही समाजात कार्यरत असते म्हणूनच समाज प्रगती करत जातो. सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेतलेली अशीच अनेक सुष्ट माणसं माणसाच्या, निसर्गाच्या, प्रकृतीच्या दुष्टपणाला बळी पडलेल्यांना मदतीचा हात देऊन त्यांना सन्माननीय जगणं जगायला लावतात. हे सदर अशाच काही सत्प्रवृत्तीच्या माणसांचं. गेली अनेक वर्षे सातत्याने समाज कार्य करत असताना, त्यात ‘प्रत्यक्ष जगताना’ त्यांना आलेले हे अनुभव वाचकांना विचार, चिंतन आणि मनन करण्यासाठी दर शनिवारी..
वेश्यांच्या मुलांसाठी काम करण्याचा आमचा निर्णय झाला त्या वेळचा एक अनुभव, शरीरविक्रय करणारी ही बाई मला कळवळून म्हणाली, ‘‘दीदी, आमच्या लहान मुलांसमोर आम्हाला विवस्त्र केलं जातं आणि मुलांनी जे बघायला नको ते त्यांना आपली आई करताना दिसते. तेही रोज नव्या पुरुषासोबत. माझा चार वर्षांचा मुलगा एकदा एका गिऱ्हांइकासमोर सुराच घेऊन आला आणि मला म्हणाला, ‘तुला मारून टाकतो.. आणि या नंतर जे कोणी येतील त्यांनाही मारून टाकतो. सगळ्या बाहेरच्या लोकांसोबत तू झोपतेस, पण मला मात्र रात्री तुझ्या कुशीत झोपायला मिळत नाही..’ तो असं बोलला नि गिऱ्हाइक तर वैतागून परत गेलंच, पण मला दलालाच्या शिव्या व मार खावा लागला. आमच्या मुलांनी हे सगळे पाहू नये असं वाटतं. निदान रात्रीपुरतं त्यांना कोणी सांभाळायला हवंय ताई.’’ हा अनुभव ऐकला आणि आम्ही, ‘प्रेरणा’ने या मुलांसाठी शाळेतल्या एका वर्गात झोपायची व्यवस्था म्हणून एक पाळणाघर किंवा रात्र सेवा केंद्र सुरू केलं. हे ठरलं जगातलं ‘लालबत्ती’ एरियातलं पहिलं पाळणाघर.  
 ‘प्रेरणा’ ही वेश्यांच्या मुलांसाठी काम करणारी संस्था आम्ही स्थापन केली त्याला आता  २६ वष्रे होऊन गेलीत. या २६ वर्षांत काय काय नाही अनुभवलं? एका समाजसेवकाच्या आयुष्यात येणारी आव्हानं, त्याला/तिला भेटणाऱ्या समाजातील निरनिराळ्या प्रवृत्ती, समाजसुधारकांना विविध पातळ्यांवर होणारा विरोध सारं काही, पण त्या सर्वावर मात करून आपलं काम चालूच ठेवण्याचं आव्हान पार पाडू शकतोय याचंच समाधान आहे.
 हे इथे सांगण्याचा उद्देश हाच की आमचे हे अनुभव समाजकार्य हा व्यवसाय म्हणून करण्यापेक्षा सेवा म्हणून आचरताना आमच्या नंतरच्या समाजसेवकांच्या पिढीला कदाचित पाठबळ पुरवू शकतील, नवा हुरूप मिळेल आणि जमल्यास अनुभवातून येणारे शहाणपणही त्यांना यातून मिळवता येईल. त्याच प्रमाणे सर्वसामान्य वाचकाला विचार करायला भाग पडतील. कदाचित हे वाचून कोणी समाजसेवेचे व्रतही अंगीकारू शकेल..!
त्यापूर्वी मी स्वत:ची आधी थोडक्यात ओळख करून देते..मी प्रीती पाटकर, माहेरची प्रीती प.. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात मी जन्मले. सुरक्षित वातावरणात वाढले. बीएसडब्ल्यू करीत असताना ‘मार्जनिलाइज्ड क्लास’ हे काय प्रकरण असतं ते थोडंसं कळू लागलं. देशाचा विकास आणि विकासाच्या व्याख्या नेमक्या काय आहेत, काय असल्या पाहिजेत हेही विचार कुठेतरी येऊ लागले.
पदवी शिक्षण घेत असताना ‘निर्मला निकेतन’च्या फरिदा लांबे यांच्या विचारांनी मी प्रभावित झाले होते. त्यांना समाजकार्याच्या त्याच त्या चौकटीतले कार्य करण्यात विशेष रस नव्हता. याच दरम्यान आमच्या अभ्यासाचा एक भाग म्हणून मी पहिल्यांदा ‘रेड लाइट एरिया’ बघितला. समाजाचाच एक भाग असलेल्या, फसवल्या गेलेल्या, विकल्या गेलेल्या, आजारी आणि दुर्दैवी महिला आणि मुलींच्या आयुष्याची झालेली होरपळ पाहणं हा सुन्न करणारा अनुभव होता. त्यांच्या मुलांची अवस्था तर विचारूच नये इतकी भयानक होती. त्याक्षणी मी या मुलांसाठीच काम करायचंच हे मनोमन ठरवलं. पुढे ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी आल्यानंतर आमचे प्राध्यापक श्री. प्रवीण पाटकर यांच्याशी माझे विशेष सूर जुळले. आम्ही दोघांनी मिळून ‘लालबत्ती’ परिसरातील मानवी व्यापार व बाजारू लंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या संततीला शोषणापासून संरक्षण देण्याच्या, त्यांना आयुष्यात पर्यायी सन्मान्य आयुष्य जगण्याचा हक्क मिळवून देण्याच्या कामात स्वत:ला झोकून द्यायचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान आम्ही विवाहबद्धही झालो आणि अधिक जोमानं एकत्रितपणे कामाला लागलो. या महिलांना लोकशाही हक्क मिळवून द्यायचा व इतर मुली व स्त्रियांच्या शोषणाला प्रतिबंध घालायचा हे कार्य जोमानं सुरू झालं
या मुलांसाठी काम करणं सोपं नाही हे संस्थेच्या कार्यालयासाठी जागा मिळवतानाच लक्षात आलं. अखेर कामाठीपुरा म्युनिसिपल स्कूलच्या इमारतीत आम्हाला ‘प्रेरणा’साठी जागा मिळाली. ही जागा मिळवणे म्हणजे एक दिव्यच होते. पांढरपेशा समाज आपल्या निवासी भागात ‘हे’ काही चालू देणार नाही, अशा विचारांचा होता आणि ग्रांट रोड किंवा फॉकलंड रोडवरचे वेश्यांचे दलाल हे होऊ देणार नव्हते. ‘वेश्यांच्या मुलांसाठी काम करणं’ ही संकल्पना त्या वेळी समाजातील अनेक घटकांना पटली नव्हती. परंतु, या निरपराध मुलांचं दीनवाणं आयुष्य, अगतिकपणे त्यांचं त्यात खेचलं जाणं, मुलांची अवैध खरेदी-विक्री, दलालांमार्फत त्यांच्याकडून वयाला न शोभणारी व झेपणारी कामे करून घेतली जाणं..हे सर्व इतकं  उद्वेगजनक होतं की सर्व आघाडय़ांवर कडवा विरोध असूनही किंवा त्यापायीच म्हणा त्यांच्यासाठी काम करण्याच्या निर्णयावर आम्ही मात्र ठाम राहिलो. जागा मिळवण्याची खटपट सुरू ठेवली. शशी मिश्रा या मंत्रालयातील एका आयएएस अधिकारी महिलेने आम्हाला धीर दिला आणि कामाठीपुरा म्युनिसिपल स्कूलमध्ये आम्हाला जागा मिळाली. या वेश्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असायचा रात्रीच्या वेळी मुलं कुठे ठेवायची हा! त्यांना  रात्रीचं पाळणाघर हवं होतं. ते आम्ही सुरू करायचं ठरवलं. सुरुवातीला सांगितलेला किस्सा त्याचा पाया ठरला.
देह विक्रय करणाऱ्या महिलांच्या अठरा वर्षांखालील मुलांसाठी ‘डे अँड नाइट केअर सेंटर’, आरोग्य सुविधा निवारा केंद्र, किमान शिक्षणाचा व्यापक व यशस्वी कार्यक्रम आम्ही राबवला. पोलिसांच्या धाडीतून किंवा त्यांच्या मदतीशिवाय या कचाटय़ातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुली व तरुण स्त्रियांसाठी आम्ही प्रयत्न केले. माझ्या माहितीनुसार सामाजिक हस्तक्षेपाचा देशातला हा पहिलाच कार्यक्रम असावा. आजही हे सर्व कार्यक्रम सक्रिय आहेत.
पण या सर्व प्रवासात मन अस्वस्थ करणारे अनुभव आलेच, तेही समाजाकडून. काहींचे म्हणणे असे की वेश्यांच्या मुलांना तुम्ही तोच व्यवसाय का करू देत नाही? वेश्या व्यवसाय ही समाजाची गरज आहे, असाही एक मतप्रवाह आहे.. अन्यथा घरोघरी बलात्कार होतील, असं त्याचं म्हणणं. म्हणजे तुमच्या घरातील मुली आणि बायका सुरक्षित राहिल्या पाहिजेत आणि त्यासाठी यांनी आपल्या मुला-मुलींना मात्र पुन्हा हेच काम करायला लावायचं? हा विचारच किती भीषण आहे.
‘वेश्यांच्या मुलांसाठी सुविधा निर्माण करून तुम्ही त्या व्यवसायाला खतपाणी घालत आहात’, असे आरोपही आमच्यावर करण्यात आले. अलीकडचा आणखी एक अनुभव, एक पांढरपेशे गृहस्थ आले होते. आमच्या कामाकडे पाहण्याचा त्यांचा नूर एकूणच कुचेष्टेचा होता..
‘‘या मुलांनी शिकावं म्हणून तुम्ही एवढा आटापिटा करता.. पण ही मुलं दहावी तरी होतात का हो?’’ त्यांनी विचारलं.
‘‘हो, बारावी पण होतात, बी.एस्सी., काही एम.एस.डब्ल्यू. होऊन एनजीओमध्ये नोकरीदेखील करताहेत.. आमच्या हाताखालून गेलेल्या दहा हजारांपेक्षाही अधिक मुलांपकी पुन्हा कोणीही तिकडे वळलं नाही.’’ मग मात्र ते वरमले. मी त्यांना म्हटलं, ‘‘त्यांना सफलतेच्या  वाटेवर आणण्यात समाज म्हणून तुमचा सहभाग काय?’’ त्यावर ते निरुत्तर झाले. हे इथे सांगण्याचा हेतू हा की, कमीत कमी जे काम तुमच्याने होत नाही ते दुसरं कोणी करतंय तर त्याला नाउमेद तरी करू नका!
एकदा तर ‘जे जे अ‍ॅक्ट’ (जुवेनाईल जस्टीस अ‍ॅक्ट) अंतर्गत असलेल्या बाल कल्याण समितीची एक सदस्या म्हणाली की ‘तुम्ही या मुलांची काळजी घेऊन त्यांच्या आयांना अधिक बेजबाबदार बनवताय..’ जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तींकडून इतके उथळ विचार ऐकले की डोकंच चालेनासं होतं. विरोध, आरोप-प्रत्यारोप हे समाजातील कुठल्याही बदल घडवू पाहणाऱ्या व्यक्ती किंवा शक्तींसाठी बदलाच्या प्रक्रियेचा एक भाग असतो. पण आमचे सुदैव हे की विरोध करणाऱ्यांपेक्षा आमचा हुरूप वाढवणारे अधिक भेटले.
मुख्य प्रवाहातील मुलांसोबत या मुलांना आणणं हे आमचं उद्दिष्ट होतं. आणि तेच आमचं अंतिम यशही असणार होतं. आज आम्ही यात बऱ्यापकी यशस्वी झालो आहोत, असं मी अभिमानाने म्हणेन.
पूर्वी आम्हाला आíथक मदतीसाठी परदेशी फंडावर पूर्णपणे अवलंबून राहावं लागत होतं, आज तशी परिस्थिती नाही. ‘जॉन्सन अ‍ॅंड  जॉन्सन’, ‘वेस्टर्न युनियन’, ‘मास्टेक’, ‘एल अ‍ॅंड टी’सारख्या कॉर्पोरेट कंपन्या आम्हाला बरीच मदत करतात. दानशूर व्यक्तींकडून आíथक मदत मिळते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे अत्यंत सधन घरातील काही स्त्रिया स्वतहून आमच्याकडे स्वंयसेवक म्हणून काम करतात. ‘लिओ बन्रेट’ या जाहिरात कंपनीचे सीईओ यांची पत्नी संघामित्रा शर्मा गेली अनेक वष्रे नियमाने आमच्याकडे मुलांना इंग्लिश विषय शिकवायला येतात. कुठलेही मानधन नसताना त्यांच्या या सेवेत कधी कुचराई झालेली मला आठवत नाही. आमच्याकडे काम करणाऱ्या काहींना बाहेर कुठेही १० ते १५ हजार रुपये किंवा अधिक पगार मिळू शकतो, पण ही मंडळी इथेच टिकून आहेत. त्यांचा कृतज्ञभाव त्यांना इथेच राहण्यास भाग पाडतो.
 स्वित्र्झलडमधल्या एका एनजीओत स्वयं सेवक असणारी जेनेट गेन्यू भारतात आली तेव्हा आमचे काम बघून इतकी भारावली की, तिने स्वित्र्झलडमधील महिलांना सोबत घेऊन ‘असोसिएशन ऑफ कामाठीपुरा’ नावाची एक संस्था स्थापन केली. जेनेट आणि तिच्या मत्रिणी इथे या मुलांसमवेत राहण्यासाठी दरवर्षी भारतात येतात. अत्यंत सधन घरातील या महिला एखाद्या सामान्य हॉटेलात उतरतात. आपले इतर सर्व खर्च मर्यादित ठेवून या मुलांसाठी आíथक मदत देतात. जिल बेकिंगहम या मुंबईच्या ब्रिटिश डेप्युटी हायकमिशनरच्या पत्नी, मदतीसाठी सदैव तत्पर असतात. परंतु – तुमच्या या कार्यात आमचेही नाव कुठे प्रसिद्ध झाले पाहिजे – अशी अपेक्षा त्यांची नसते.
समाजासाठी काहीतरी करावे असे वाटणारी अनेक मंडळी आम्हाला भेटतात. पण त्यांना आखीव रेखीव समाजकार्य करायचं असतं. मी त्यांना सुचवू इच्छिते की बिकट वाट ही वहिवाट नसते म्हणून त्या वाटेला जाऊच नये, असं अजिबात नाही. अनेकदा आपल्या क्षमतांचा कस अशा वाटेवरच लागतो!
पण नुकताच घडलेला एक किस्सा मी तुम्हाला अभिमानानं सांगू इच्छिते. ‘प्रेरणा’तर्फे दर वर्षी आम्ही बालकोत्सव साजरा करतो. तेव्हा ‘उत्तम बालक’ आणि ‘उत्तम माता’ यांना गुणगौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदा हा पुरस्कार जिंकणाऱ्या मातेने आमच्या या कार्याला आपल्या साध्या शब्दात नावाजले. आपल्या छोटेखानी भाषणात ती म्हणाली, ‘आमच्या वेळी जर ‘प्रेरणा’ असती तर मी हा पुरस्कार उत्तम बालक म्हणून पटकावला असता.’
वर्षांनुवष्रे करीत असलेल्या कामाची अशी पावती हीच आमच्या पाठीवर पडलेली शाबासकीची थाप असते. संपर्कासाठीचा पत्ता-‘प्रेरणा’, तळमजला, खेतवाडी म्युनिसिपल स्कूल, अलंकार टॉकीजच्या मागे, पहिली लेन, खेतवाडी, ग्रँट रोड (पू) मुंबई-४०० ००४ दूरध्वनी -०२२-२३८७७६३७
वेबसाईट – http://www.preranaantitrafficking.org

Kavadi for lord importance of kavadi price of a kavadi
लोक-लौकिक : ‘कवडी’मोल!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
decision making process in religious and social welfare
तर्कतीर्थ विचार : धर्मनिर्णय पद्धती व समाजहित
district administration decision to crack down on extortionists along with making the district industry friendly
उद्योगस्नेही जिल्हा करण्याबरोबरच खंडणीखोरांना चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा ठोस निर्णय
philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
Article about large religious conference in marathi
तर्कतीर्थ विचार :  वेदांचे पावित्र्य माझ्या हृदयात
Special article on occasion of Swami Vivekanandas birth anniversary
धर्म, अस्मिता आणि हिंदू!
Loksatta explained Why has the issue of ash management in thermal power plants come into the spotlight
विश्लेषण : औष्णिक विद्याुत प्रकल्पातील राख व्यवस्थापनाचा मुद्दा चर्चेत का आला?
Story img Loader