शंतनुरावांच्या पत्नी यमुताई एका साध्या मध्यमवर्गीय घरातून आल्या, पण सामाजिक जाणीव तीव्र आणि आपल्यावरच्या जबाबदारीचं भान यामुळे त्यांनी केवळ महिला कर्मचाऱ्यांसाठी बेअरिंग्ज बनवणारं युनिट काढलं. स्वत: शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रांत भरपूर काम केलंच, पण आपल्या सुनांनाही उत्तेजन दिलं. देशाच्या औद्योगिक प्रगतीचा पाया घालणाऱ्या किलरेस्कर समूहाची पाचवी पिढी सध्या कार्यरत आहे. त्यातल्या स्त्री-कर्तृत्वाविषयी ‘कुटुंब रंगलंय’च्या शेवटच्या सदरात.
बघता बघता, म्हणजे लिहिता लिहिता वर्ष कसं संपलं कळलंच नाही आणि निरोप घ्यायची वेळ आलीसुद्धा! चार किंवा त्यापेक्षा अधिक पिढय़ा एकाच क्षेत्रात, एकाच व्यवसायात टिकून राहिलेल्या दिसतात. तेव्हा नेमकं काय घडतं? काय घडत असेल? कुठली प्रेरणा त्यांना एकत्र बांधून ठेवत असेल? कुठले गुण त्यांच्या यशाला कारणीभूत ठरत असतील आणि एखादं अपयशी सदस्य कुटुंबाकडून स्वीकारलं जात असेल का?
‘घराणेशाही’ या शब्दाला आपण खूप झोडून काढलं आहे पूर्वी.. पण या घराणेशाहीची एक चांगली बाजू प्रकाशात आणायला काय हरकत आहे! काही क्षेत्रांत मोठी परंपरा असलेली ४-५ घराणी सापडली. यातून निवड कशी करणार? अशा वेळी नव्या युगाचा मंत्र समजला जाणारा वरढ (युनिक सेलिंग पॉइंट) म्हणजे अगदी वेगळा वैशिष्टय़पूर्ण मुद्दा शोधला. उदा. आयुर्वेद. त्यात कै. गणेशशास्त्री जोशींचं कुटुंब निवडलं, कारण त्यांचे महात्मा गांधींशी असलेले संबंध आणि १९४६ मध्ये त्यांनी ग्रामीण आरोग्य सेवकांसाठी आखलेला देशी अभ्यासक्रम.
अनेक क्षेत्रं राहून गेली. उदा. समाजसेवा, उद्योग, शिक्षण, वृत्तपत्र व्यवसाय, शेती या क्षेत्रांमध्ये पायाभूत तरीही उत्तुंग कामगिरी करणारी घराणी आहेत, पण शक्य तर सर्वसाधारण आणि अप्रसिद्ध कुटुंबं शोधण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी ज्यांनी व्यवसायात शंभरी गाठलीय अशी नावं शोधणं सोपं होतं. लेखमाला आवडू लागल्यावर वाचकांनी आपणहून काही नावं सुचवली आणि प्रवास सोपा झाला.
महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या औद्योगिक प्रगतीचा पाया घालणाऱ्या किलरेस्कर समूहाची पाचवी पिढी सध्या कार्यरत आहे. त्यांच्यावर कसं नाही लिहिलं अजून? हा प्रश्न खूप जणांकडून आला. खरी अडचण अशी की, किलरेस्कर कुटुंबीयांचं काम इतकं आहे, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रातसुद्धा, की एका लेखात पकडणंच अवघड, पण आपल्या ‘चतुरंग’च्या वाचकांसाठी दोन-तीन गमतीच्या गोष्टी सांगते.    कै. लक्ष्मणराव किलरेस्करांनी आपल्या यंत्रवेडातून काही जुने स्क्रू, नटस्, खिळे वगैरे जमवले होते. त्यांच्या नवपरिणीत पत्नीनं घर साफ करताना ‘काय कचरा जमवतात’ असं म्हणत सगळं सामान टाकून दिलं, पण भारतीय स्त्री पतीच्या रंगात कशी रंगून जाते ते पुढे दिसलं. याच पत्नीनं, त्यांच्या गोठ – पाटल्या- बांगडय़ा कारखान्यासाठी काढून दिल्या. साऱ्या ‘किलरेस्करवाडीचं’ आईपण त्यांनी पत्करलं. मम्मी म्हणून त्या लोकप्रिय झाल्या.
शंतनुरावांच्या पत्नी यमुताई एका मध्यमवर्गीय घरातून आल्या, पण सामाजिक जाणीव तीव्र आणि आपल्यावरच्या जबाबदारीचं भान यामुळे त्यांनी फक्त स्त्री   कर्मचाऱ्यांसाठी बेअरिंग्ज बनवणारं युनिट काढलं. काम, त्याच्या वेळा हे सारं स्त्रियांना सोयीस्कर असं ठेवलं. १९६५ ते २००५ मध्ये त्यांनी हा व्याप सांभाळला. स्वत: शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रांत भरपूर काम केलंच, पण आपल्या सुनांनाही उत्तेजन दिलं.
आज उरफ चा खूप बोलबाला आहे, पण सुमनताई किलरेस्करांनी १९८२-८३ साली किलरेस्कर संगीताचं जपणूक करण्यासाठी एक मोठा प्रकल्प हाती घेतला. सुधीर आणि श्रीकांत मोघे यांच्या मदतीनं त्यांनी मोठमोठय़ा कलाकारांचं नाटय़संगीत रेकॉर्ड केलं. अण्णासाहेब किलरेस्कर हे लक्ष्मणरावांचे चुलत-चुलत बंधू म्हणून का? असं विचारल्यावर सुमनताई म्हणाल्या,‘‘आपल्याकडे जीर्णोद्धारासाठी धावाधाव करतात, त्यापेक्षा आधीचं जतन करावं ना.’’
शशिताई किलरेस्कर म्हणजे कोल्हापूरच्या घाटगे घराण्याची कन्या. अगदी खऱ्याखुऱ्या प्रेमळ ताईच. अपघातानं ‘हॉटेल ब्लू डायमंड’ची जबाबदारी अंगावर पडली. लोकांना वाटलं या घरगुती ताई, हॉटेल कसं सांभाळणार? पण पहिल्याच दिवशी शशिताई पहाटे ४ वाजता ब्लू डायमंडवर हजर. ५ वाजता सफाईची कामं सुरू होताना त्यावर ताईंची नजर होती. अल्पावधीत या हॉटेलनं आपल्या भागधारकांना ४० टक्के डिव्हिडंड वाटला.
‘कुठून येतं हे सारं?’ रक्तातून म्हणावं तर सुना कशा पुढे नेतात घराण्याची कार्यसंस्कृती? संवेदनशील मन आणि कामाची ओढ असली की या गोष्टी टिपल्या जातात, आत्मसात होतात आणि पुढच्या पिढीकडे सोपवल्या जातात.
‘कुटुंब रंगलंय’च्या मुलाखतींमधून मी हा प्रश्न सतत साऱ्यांच्या समोर ठेवत गेले. कलावंतांचं कामेरकर घराणं, साऱ्यांचंच म्हणणं होतं हो, रक्तातून अभिनयाची जाण, सुरांचं प्रेम आलंच, पण चंद्रशालाच्या शिबिरांनी ठोकून ठोकून कलाकार घडवले, शिस्त आणली. सुलभाताई देशपांडय़ांचा मुलगा निनाद, त्यानं मात्र मोकळेपणानं सांगितलं की, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, पण आतून ऊर्मी तीव्र हवी तरच तुम्ही आयुष्यभरासाठी ती गोष्ट करू शकता.
पं. राम मराठे म्हणाले होते, ‘‘माझ्या घरात चोवीस तास तंबोरे झंकारत राहावेत.’’ त्यांच्या दोन्ही मुलांनी, सुनेनं, नातवंडांनी खरोखर ते घर गातं ठेवलं. शिवाय रोज पन्नास मुलं तिथं शिकत असतात. निनाद म्हणाला ती ‘आतली ऊर्मी’ हीच असावी.
स्वत: प्रतिभाशाली कलाकार आणि अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. एन. राजम मात्र थोडं वेगळं बोलल्या. ‘‘मी जर परंपरागत गुणांना महत्त्व दिलं, तर अपार कष्ट करून घरात संगीत नसतानाही जे शिष्य यशस्वी झाले त्यांच्यावर अन्याय होईल. हां, घरातल्या वातावरणाचा फायदा माझ्या मुलीला, नातींना, पुतण्या-भाच्यांना जरूर झाला, पण म्हणून कला ही रक्तातूनच येते असं म्हणणं धाडसाचं ठरेल.’’
महामहोपाध्याय काण्यांचं घराणं असो किंवा पदवी परंपरेतल्या न्या. रानडे-विद्वांस-आपटे यांची परंपरा.. पुढच्या पिढय़ांना आपापलं क्षेत्रं निवडण्याचं भरपूर स्वातंत्र्य मिळालं होतं. तरीही मुलं संशोधन अभ्यास क्षेत्राकडे वळली, कारण घरचे संस्कार. रमाबाईंच्या पणतीनं बरोबर शंभर वर्षांनी त्यांच्या नावाचा सन्मान स्वीकारला. हा योगायोग खचितच नव्हे. महिला अध्यापिका महाविद्यालयाची स्थापना करताना रमाबाईंनी पाहिलेली स्वप्नं अशीही खरी झाली, त्यांच्याच कुटुंबीयांकडून.
विद्येचा, औपचारिक शिक्षणाचा वारसा नसूनही व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रांत यशस्वी कुटुंब म्हणजे अमरावतीचं नरसू कुटुंब. चक्की, दत्तात्रय गॅरेज, पत्र्याचं सिनेमा थिएटर करता करता या कुटुंबाचे कारखाने उभे राहिले. परदेशातून एम.बी.ए. होऊन आलेल्या चौथ्या पिढीनं परत येऊन यंत्राची कुरकुर ऐकण्याचं कौशल्य जिवंत ठेवलं. या तरुण मुलांमुळे आपल्याला भारताच्या उज्ज्वल भविष्याची हमीच मिळाली, नाही का? अनेक वाचकांनी आश्चर्य व्यक्त केलं ते कोल्हापूरच्या मुनीश्वर कुटुंबाविषयी वाचल्यावर. ‘इतकी र्वष मंदिरात जातोय, पण पुजाऱ्यांची अशी माहिती कधी विचारलीच नाही.’ गेली कित्येक शतकं हे कुटुंब महालक्ष्मीची पूजा करत आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे ज्या पिढीत फक्त मुलीच झाल्या तिथे त्यांनी कन्या वारसा जपला. जावयांना पूजेचा हक्क दिला, त्या काळाच्या मानानं हे किती पुढचं पाऊल होतं.
सोनं घेणाऱ्या गिऱ्हाईकाचं स्वागत सोनाराच्या दुकानात छानच होतं, पण सोनं विकणाऱ्या माऊलीच्या डोळ्यांतले न ओघळणारे अश्रू जाणून दाजीकाका गाडगीळ म्हणायचे,‘‘अहो, थोडय़ाच दिवसांत दामदुपटीनं नवे दागिने घालाल बघा.’’ व्यावसायिक यशाची ही भावनिक किनार अनेक वाचकांना स्पर्शून गेली.
चार पिढय़ांच्या कुटुंबाची अट दोनच वेळा शिथिल केली. एक म्हणजे लठ्ठपणाशी लढाई करणारं धुरंधर कुटुंबाच्या तीनच पिढय़ा, कारण या विषयाचा उदयच १९६० नंतर झाला आणि दुसरं कुटुंब जनरल नातू यांचं. ४/९ गुरखा रायफल या तुकडीची स्थापना करून नेतृत्व करणारे महावीरचक्र सन्मानित मेजर जनरल अनंत विश्वनाथ नातू. एकाच घरातल्या तिघांनी एकाच तुकडीचं नेतृत्व करण्याचा हा मान इतिहासात नोंदला गेला.
वर्षभराच्या या प्रवासात या साऱ्या कुटुंबांचं प्रेम मिळालं. अनेक गोष्टी नव्यानं कळल्या तसंच वाचक किती जागरूकपणे वाचतात, सूचना करतात त्याचाही अनुभव आला. संत ज्ञानेश्वरांनी सहज म्हटलंय,  ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’
प्रत्यक्षात होत असेल का तसं? (समाप्त)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा