गेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय  वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे ‘लाखा(मोला)ची गोष्ट ठरलीय. त्यांच्या अखंड करिअरविषयी..
छोटय़ा पडद्यावरील काही मालिकांचं नुसतं शीर्षकगीत जरी कानावर पडलं तरी डोक्यात सणक जाते किंवा दोन्ही तळपायांची आग एकुलत्या एक मस्तकात तरी शिरते. याउलट काही मालिकांची वेळ गाठण्यासाठी अनेक जणी जिवाचा अक्षरश: आटापिटा करतात. काही अपरिहार्य अडचण उद्भवल्यास रीपीट टेलिकास्ट तरी आवर्जून बघतात. तेही शक्य झालं नाही, तर त्या हुकलेल्या भागात काय काय घडलं याचा सविस्तर वृत्तान्त कुणा ताई-माई-अक्काकडून घेतात तेव्हा कुठे त्यांचा जीव शांत होतो. अशा हुरहुर लावणाऱ्या मालिकांपैकी, तमाम मराठी प्रेक्षकांनी एकमताने कौल दिलेली मालिका म्हणजे अलीकडेच संपलेली ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’. ती मालिका संपली असली तरी त्यातील काही पात्र आजही अनेकांच्या मनात घर करून आहेत . त्यातल्याच एक घनाच्या माईआजी. त्यांची ही खरीखुरी गोष्ट. या आजींचं नाव रेखा कामत. त्यांच्यानिमित्ताने आताच्या प्रौढांच्या  पिढीतील अनेकांना त्यांच्या तरुणपणी ‘हिट’ झालेल्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटाचं स्मरण झालं असेल. त्यातील सुंदर, घरंदाज, शालीन व प्रेमळ नायिका ती हीच.
१९५२ ते २०१२ अशी ६० र्वष सिनेमा, नाटक व मालिकांच्या माध्यमातून मराठी मनांवर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीच्या कपाळावर तिचं हे भविष्य सटवाईनेच लिहून ठेवलं असावं. त्यानुसारच सगळं घडत गेलं. सुरुवात झाली ती लहानपणी मेळ्यात काम करण्यापासून. त्यांचं माहेरचं नाव कुमुद (कुमुद सुखटणकर). पाच बहिणी व दोन भाऊ अशी ही एकूण सात भावंडं. सगळ्यांच्या अंगात कोणती ना कोणती कला. कुमुद व तिच्या पाठची कुसुम या दोघींना नाचण्या-गाण्याची प्रचंड आवड. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिकत असताना त्यांनी नृत्यगायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. गाण्यासाठी भानुदास मानकामे व घोडके गुरुजी; तर नृत्यासाठी गौरीशंकर (कथ्थक) व पार्वतीकुमार (भरतनाटय़म्) असे नामवंत गुरू त्यांना लाभले. उपजत कौशल्याला पैलू पडू लागले. मेळ्यामुळे नाव होऊ लागलं. परिणामी १५-१६ व्या वर्षीच ‘सचिनशंकर’ यांच्या रामलीला या प्रसिद्ध बॅलेत या दोन बहिणींना पहिला ब्रेक मिळाला.
या नृत्यनाटिकेत त्यांनी अमुक एकच नव्हे तर माकडांपासून राक्षसांपर्यंत पडतील त्या भूमिका समरसून निभावल्या. रेखाताई म्हणाल्या, ‘‘या बॅलेमुळे आमची पहिलीवहिली मिळकत तर सुरू झालीच, पण त्याचबरोबर ठिकठिकाणी होणाऱ्या प्रयोगांमुळे लखनौपासून लाहोपर्यंत सगळी शहरंही फुकटात बघून झाली!’’ क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, ‘‘खरं तर त्या काळी या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींना/ स्त्रियांना समाजात प्रतिष्ठा नव्हती, पण प्रगत विचारांची आई आमच्या पाठी भक्कम उभी राहिल्यामुळे आमच्याकडे वाकडय़ा नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत झाली नाही.’’ अर्थात पुढे नाव झालं तेव्हा या शिव्यांच्या ओव्या झाल्या.
एकदा योगायोगानं हंसा वाडकर यांनी या मुलींना नृत्यावर थिरकताना बघितलं आणि त्यांचं नाव ‘गजराज’ चित्रच्या राजाभाऊ परांजपे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर या त्रिमूर्तीना सुचविलं. वाडकरांनीच तरफदारी केली म्हटल्यावर साहजिकच ‘गजराज’ चित्रच्या ‘लाखाची गोष्ट’ या आगामी चित्रपटासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. सिनेक्षेत्रात पदार्पण करताना ग.दि.मां.नी त्यांना रेखा व चित्रा अशी नावं दिलं. पुढे हीच नावं रूढ झाली.
‘लाखाची गोष्ट’ करीत असताना आणखी एक लाखमोलाची गोष्ट घडली. या सिनेमाच्या संवादलेखनाची बाजू ग.दि.मां.बरोबर ग. रा. कामत हेदेखील सांभाळीत होते. तिथेच जोडी जमली. १९५२ साली ‘लाखाची गोष्ट’ प्रदर्शित झाला आणि १९५३ साली, १८-१९ व्या वर्षीच त्यांच्या डोक्यावर अक्षता पडल्या.
लग्नानंतर कामत पती-पत्नीचं १२-१३ वर्षांचं सहजीवन पुण्यनगरीत व्यतीत झालं. त्या रम्य आठवणी जागविताना रेखाताई म्हणाल्या, ‘‘मंतरलेले दिवस होते ते. नव्या पेठेतील आमच्या लहानशा घरात रात्री उशिरापर्यंत गप्पांच्या मैफली रंगत. बा. सी. मर्ढेकर, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, पु. ल. देशपांडे, श्री. पु. भागवत ही मंडळी बोलायला लागली की माझ्या जिवाचे कान होत.. बालगंधर्वाचं गद्य बोलणंही इतकं सुमधुर की ते आजही माझ्या कानात व मनात उचंबळतंय.’’
लग्नानंतर मुलीचा जन्म झाला आणि पुढची काही र्वष आईचा रोल निभावण्यात गेली. धाकटी मुलगी बालमोहन शाळेत जाऊ लागली. मुलींच्या लहानपणी म्हणजे धाकटी ३ री/४ थीत जाईपर्यंत रेखाताईंनी कामं पूर्णपणे बंद केली आणि त्यांच्या वाढीवर लक्ष केंद्रित केलं. त्यांना शाळेतून आणणं, पोहचवणं, आवडीचा डबा करून देणं, त्यांचा अभ्यास घेणं या गोष्टीतील आनंद त्यांनी पुरेपूर उपभोगला. त्या म्हणाल्या, ‘माझ्या मोठीला स्वयंपाकाची आणि घरकामाची भारी आवड. समंजसही तेवढीच. धाकटय़ा बहिणीला प्रेमाने सांभाळायची. अर्थात याबरोबर त्यांच्या आईची सपोर्ट सिस्टीमही होतीच. रेखाताईंनी करियर करताना नेहमी आपल्या संसाराला पहिलं प्राधान्य दिलं. त्या म्हणाल्या, ‘बायका नाही का संसार सांभाळून नोकऱ्या किंवा पोटापाण्यासाठी काही ना काही उद्योग करत, तसाच माझा हा अभिनयाचा व्यवसाय. माझी पहिली भूमिका आईची आणि पत्नीची नंतर अभिनेत्रीची!’
रंगभूमीवर वावरताना कसोटीचे क्षण आलेच. त्यांचे वडील खूप आजारी होते तेव्हाची गोष्ट. ज्या रात्री वडिलांना देवाज्ञा झाली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी १० वाजता रवींद्र नाटय़ मंदिरात ‘प्रेमाच्या गावा जावे’चा प्रयोग होता. झालेली घटना कोणालाही न सांगता, रात्रभराचं जागरण व मनावरचा प्रचंड ताण घेऊन त्यांनी एंट्री घेतली. पण पहिला अंक संपता संपता त्या एकदम ब्लँक झाल्या. सहकलाकार अरविंद देशपांडे यांनी सावरून घेतलं आणि विंगेत आल्या आल्या त्यांचा बांध फुटला. ढसढसा रडून झाल्यावर डोळे पुसून त्या पुन्हा उभ्या राहिल्या आणि पुढचं नाटक व्यवस्थित पार पडलं. प्रेक्षकांना जरासुद्धा जाणीव न होता.
लग्नानंतर रेखाताईंनी एंट्री घेतली ती ‘कुबेराचं धन’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेच्या रूपाने. ही भूमिका भरपूर गाजली. पाठोपाठ ‘गृहदेवता’ या राष्ट्रीय पारितोषिकविजेत्या चित्रपटात त्यांनी डबल रोल केला.  मुली थोडय़ा मोठय़ा झाल्यावर कामतांनी आपलं बिऱ्हाड मुंबईला माहीम येथे हलविलं. इथे आईचा हक्काचा आधार मिळाल्याने निश्चिंत मनाने त्यांनी संगीत नाटकांद्वारे रंगभूमीवर पाऊल टाकलं. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ यांच्यापाठोपाठ सामाजिक नाटकांचेही प्रयोग सुरू झाले. ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘लग्नाची बेडी’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ अशा अनेक नाटकांमधून त्यांनी कामं केली. ‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकाने तर त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली. मोहन वाघांच्या ‘चंद्रलेखा’मधून त्यांनी ‘तरुण तुर्क..’, ‘ऋणानुबंध’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’ या नाटकांत ठळक व्यक्तिरेखा साकारल्या. रेखाताईंचं वैशिष्टय़ म्हणजे कौटुंबिक नाटकात त्या जेवढय़ा सहजतेने वावरल्या तितक्याच उत्कटतेने त्या प्रायोगिक नाटकांमध्येही रममाण झाल्या. ‘गंध निशिगंधाचा’ हे त्यांचं शेवटचं नाटक.
१९९४ मध्ये नाटक थांबवलं. त्यानंतर चार वर्षांनी प्रतिमा कुलकर्णी यांनी ‘प्रपंच’ या दूरदर्शन मालिकेसाठी विचारणा केली. सुनील बर्वे, भार्गवी चिरमुले, भरत जाधव या त्या काळच्या नवागतांबरोबर रेखा कामत, प्रेमा साखरदांडे आणि सुधीर जोशी अशा पट्टीच्या कलाकारांनी सादर केलेल्या या मालिकेला एवढा प्रतिसाद मिळाला की, आधी ठरलेल्या ५२ भागांचे पुढे वाढवून ७८ भाग करावे लागले. त्यानंतर ‘माणूस’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘सांजसावल्या’ अशी मालिकांचीही रांग वाढली.
वयाप्रमाणे भूमिका बदलत ऐंशीचा टप्पा आला. आता पुरे, असं मन म्हणत असताना श्रीरंग गोडबोलेंचा फोन आला आणि त्यांनी आपल्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील माईआजीच्या रोलसाठी गळच घातली. म्हणाले, ‘‘माझ्या कथेतील प्रेमळ व मिस्कील आजी मला तुमच्यामध्ये दिसतेय..’’ आणि खरंच रेखाताईंनी या भूमिकेचं सोनं केलं.
या मालिकेनं त्यांना पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या लाटेवर नेऊन बसविलं. त्या म्हणाल्या, ‘‘ही मालिका सुरू झाली आणि मला नेहमी बघणारी लोकदेखील माझ्याकडे पुन:पुन्हा वळून बघू लागली. छोटी मुलं तर हटकून विचारीत, ‘माईआजी, चॉकलेट खाणार?’..’’ आठवणीत रमलेल्या माईआजीला माझ्या प्रश्नाने अधिकच नॉस्टॅलजिक केलं, ‘‘या मालिकेतील तुम्हाला सर्वात आवडलेला प्रसंग कोणता?’’
‘‘..जेव्हा घना आणि राधाला जवळ आणण्याचे माईआजीचे सर्व प्रयत्न थकतात तेव्हा ती एकदा व्याकूळ होऊन खिडकीत बसलेल्या कावळ्याला विनविते.. ‘तुम्ही तरी सांगा ना हो आपल्या घनाला समजावून, तुमचं नक्की ऐकेल तो..’ आणि तिचं हे बोलणं घना पाठीमागून ऐकतो..’’ सांगता सांगता रेखाताईंच्या डोळ्यांत पाणी जमा झालं आणि भूमिकेशी एकरूप होणं म्हणजे काय याचं मला प्रत्यंतर आलं.
तुमचे पती म्हणजेच ग. रा. कामतांनी ‘काला पानी’, ‘कच्चे धागे’, ‘मैं तुलसी तेरे आँगन की’, ‘बसेरा’, ‘मेरा गाँव मेरा देस’ अशा अनेक चित्रपटांच्या कथा, पटकथा, संवाद लिहिले. तरीही तुम्ही मात्र हिंदी चित्रपटसृष्टीपासून लांब राहिलात. असं का? या प्रश्नावर त्यांचं उत्तर होतं, ‘‘आमचं लग्न झालं तेव्हाच कामतांनी मला स्पष्ट बजावलं होतं, ‘तुला मी माझ्या चित्रपटात घेणार नाही. कामतांनी आपल्या बायकोला प्रमोट केलं, असं कोणी म्हणायला नको.’ मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे कामतांचा हा मराठी बाणा रेखाताईंना तेव्हाही खटकला नाही आणि आजही त्या ‘बरोबरच होतं त्यांचं म्हणणं,’ म्हणत त्याचं समर्थनच करतात.
‘लग्नाच्या दुसऱ्या गोष्टी’नंतर मात्र त्यांनी आपल्या करिअरला पूर्णविराम द्यायचं ठरवलंय. आता घरकाम, वाचन आणि नव्वदीच्या घरातील थकलेल्या जोडीदाराला जपणं या गोष्टींवरच त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करताहेत. त्यांच्या दोन कन्यकांपैकी मोठी अमेरिकेत असते, तर दुसरी त्यांच्याजवळ. एम.ए.ला सुवर्णपदक मिळविलेल्या या मुलीचा फोर्ट भागात स्वत:चा व्यवसाय आहे.
अभिनयाच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील अनेक कडू-गोड आठवणी रेखाताईंपाशी आहेत. २००५ साली मिळालेला ‘जनकवी पी. सावळाराम पुरस्कार’ आणि २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारचा ‘जीवन गौरव पुरस्कार’. या सुखद क्षणांच्या सोबतीने काही कडू घोटही त्यांनी गिळले आहेत.. ज्या भूमिकेने त्यांना पुन्हा एकदा घरोघरी पोहोचविलं त्या मालिकेतील सर्व कलाकार त्या वाहिनीच्या उत्सवासाठी स्टेजवर जल्लोष करीत असताना या माईआजीची कुणाला आठवणदेखील आली नाही. ‘जन पळभर म्हणतील हाय.. हाय..’ या काव्यपंक्तीची आठवण करून देणारा त्यांचा हा अनुभव ऐकताना एक चारोळी आठवली..
काही आठवणी ओठावर हसू आणतात
तर काही डोळ्यांत आसू आणतात
कधी गर्दीत मनाला एकटं करतात
कधी एकटं असताना मनात गर्दी करतात.

Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
Success story of Pratiksha Tondwalkar who once worked as a sweeper and now holds the SBI AGM post
शौचालय साफ करून पूर्ण केलं शिक्षण, २० व्या वयातच सुटली नवऱ्याची साथ; वाचा SBI अधिकारी प्रतीक्षा तोंडवळकर यांचा संघर्षमय प्रवास
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
Story img Loader