ते दोघंही एचआयव्ही पॉझिटिव्ह. आयुष्यात जीवनसाथीची गरज असल्याने त्यांनी जाणूनबुजून लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांच्या पाठबळामुळे आता ‘त्या’ आजाराशी खंबीरपणे लढण्याचं धैर्य त्यांना लाभलंय.. ‘व्हॅलेन्टाइन डे’ च्या निमित्ताने दोन ‘वेगळ्या’ जोडप्यांविषयी..
‘दि ल तो पागल हैं’मधील ‘सम वन, सम व्हेअर, मेड फॉर यू’ या ओळीने साद दिली तेव्हा काहीसा भारावून गेलो. कोणी तरी आपलं, खास आपल्यासाठी जगणारं असेल, की ज्याच्या समोर आपण आपली सर्व गुपिते बिनदिक्कत खुली करू.. प्रसंगी त्याच्याशी भांडू, पण वेळ पडली तर त्याच्यासाठी अवघं आयुष्य ओवाळून टाकू.. स्वप्नाचा हा इमला सुनीताचा हात हातात आल्यावर पूर्ण झाला. यापूर्वी आयुष्यात जे घडलं ते विचित्रच; परंतु त्यात कोणाचाही दोष नव्हता. आज आम्ही दोघेही एकमेकांच्या पाठबळामुळे ‘त्या’ आजाराशी खंबीरपणे लढतोय. आमच्या लग्नाचा पहिला वाढदिवस लवकरच येत आहे. इतर दाम्पत्यांप्रमाणे आमच्यातही वर्षभरात कधी खटके उडाले; परंतु वाद घालणारे आणि पुन्हा सांभाळून घेणारेही आम्हीच असतो. आयुष्य आनंदाने जगण्यासाठी जीवनसाथीची नितांत गरज असते. तो लाभल्याने आता आम्हाला खऱ्या अर्थाने जगण्याचा आनंद मिळत आहे, मुकेश भरभरून सांगतो.
कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेतलेला मुकेश आणि इलेक्ट्रॉनिक्सची पदविका धारण करणारी सुनीता (दोघांची नावे बदललेली) यांची लग्नाची गोष्ट इतरांपेक्षा काहीशी वेगळी. चारचौघांसारखे सामान्य आयुष्य जगताना एका विशिष्ट ध्येयाने पछाडलेले हे दोघे. आयुष्याच्या एका टप्प्यावर त्यांना आपल्या ‘दुर्धर’ आजाराविषयी कळले आणि मनातले विचार तसेच हवेत विरून गेले. आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचा सल सोबत घेऊन आपल्यासारख्या समदु:खी साथीदाराच्या शोधात त्यांचा जीवनक्रम सुरू राहिला.
‘‘मी एचआयव्ही पॉझिटिव्ह असलो तरी मला आयुष्याचा भरभरून आनंद घ्यायचा होता. या आजाराची व्याप्ती अधिक वाढण्यापेक्षा नियमितपणे औषधोपचाराकडे माझा कल असल्याने एआरटी (अँटी रिट्रोव्हिरल थेरपी) सेंटरची वारी कधी चुकली नाही,’’ मुकेश सांगतो. असेच एकदा एआरटीमध्ये औषध घेण्यासाठी गेलो असता मला सुनीता भेटली. ओळख झाल्यावर ‘यश फाऊंडेशन’च्या निमित्ताने वारंवार भेटी होत राहिल्या. सुनीताच्या घरी तिची आजी वगळता सर्वच एचआयव्ही बाधित. मात्र समाजात किंवा इतर नातेवाईंकांना त्याची कल्पना नव्हती. माझ्या घरी सर्वाना माझ्या आजाराची कल्पना होती. त्यांची अट एवढीच की, लग्न करताना मुलगी आपल्या समाजातील हवी. सुनीताच्या निमित्ताने त्यांची ही अट बिनदिक्कत पूर्ण झाली.
मार्च महिन्यात मुकेश-सुनीता यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरातील सहजीवनाबद्दल सुनीता भरभरून बोलते. या आजाराचा आमच्या वैवाहिक आयुष्यावर किंचितही फरक पडलेला नाही, किंबहुना तो आम्ही पडू देत नाही. आमच्यात कधी कधी वाद होतात, पण मुकेश मला सांभाळून घेतो. कधी कामात मदत करून माझा ताण हलका करतो, तर कधी चेहऱ्यावरचे त्रासिक भाव पाहत, चल! आपण कुठे तरी फिरून येऊ या, असे म्हणत माझा मूड पार पालटवतो. कुटुंबातील साऱ्यांनी मला आपलं मानल्यानं कुठलीच तक्रार नाही की खंत नाही. हे ती सांगत असतानाच त्यांच्या संसारात लवकरच नवा पाहुणा येणार असल्याचं गुपितही ती फोडते.
सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेले राकेश- नीता (दोघांची नावे बदलली आहेत.) एकमेकांना समजून घेत आहेत. मुळात दोघांच्या आवडीनिवडी विभिन्न, पण एकमेकांच्या भावनांचा आदर करण्याचा ते प्रयत्न करतायत. पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या राकेशच्या पहिल्या पत्नीचे एड्सने निधन झालेले. गर्भवती असताना ही बाब उभयतांना समजली; परंतु सुशिक्षित असूनही ती कुटुंबीयांपासून लपवून ठेवत आपण आयुष्यात सर्वात मोठी चूक केल्याचे तो मान्य करतो. पत्नीने निधनापूर्वी त्याची कल्पना कुटुंबीयांना दिल्यामुळे त्यांनी मला दोष दिला. घरातील सर्व जण सुशिक्षित. आधी कल्पना दिली असती, तर पत्नीचेही प्राण वाचविता आले असते, असे तो म्हणतो. दरम्यानच्या काळात एका नातेवाईकाकडून त्यांच्या विधुर मुलीसाठी कुटुंबीयांकडे मागणी आली, परंतु त्यास नकार देत आपण लग्नाचा विषय पुढे ढकलत राहिलो, कारण ही बाब लपवून कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त करणे घरात कोणालाही मान्य नव्हते. ‘यश फाऊंडेशन’चा अर्ज भरून आपल्यासारख्याच मुलीचा सुरू केलेला शोध अखेर नीतावर येऊन थांबला. घरच्यांनी या लग्नाला नाइलाजास्तव मंजुरी दिली. काही वर्षे मुंबईत वास्तव्य करणाऱ्या नीताच्या पतीचेही याच आजाराने निधन झाले होते. घरातील वातावरणामुळे बाहेरील जगाविषयी ती पूर्णपणे अनभिज्ञ होती, परंतु संकटच असे कोसळले की, तिला मोठय़ा बहिणीच्या घरी राहावे लागले. त्यानंतर ती नाशिकला आली आणि ‘यश फाऊंडेशन’च्या कुटुंबाचा एक भाग बनली. या ठिकाणी राकेशशी भेट झाल्यावर विवाहाचा निर्णय पक्का झाला. मात्र जुनं सारं काही विसरून नवा डाव मांडण्याच्या एका अटीवर ते ठाम होते.
राकेशच्या विवाहाला वरवर पाठिंबा देणारे त्याच्या कुटुंबातील सदस्य प्रत्यक्ष लग्नाला मात्र हजर नव्हते. नोंदणी पद्धतीने विवाह झाला. संसार नवीनच असल्याने ते अजून परस्परांना पूर्णपणे ओळखू शकलेले नाहीत. प्रत्येक खाद्यपदार्थात कांदा व तिखट यांची सवय असणारा राकेश आता खमंग ढोकळा, छोले-भटोरे व तत्सम पदार्थाना दाद देऊ लागला आहे. याशिवाय दोघांमध्ये वादाचा ठरू शकणारा मुद्दा म्हणजे शिक्षण. राकेश उच्चशिक्षित, तर नीता जेमतेम चौथी उत्तीर्ण. यामुळे दोघांच्या विचारात साहजिकच तफावत आहे. मात्र ते सामंजस्याने त्यावर तोडगा काढतायत. नीताने आता राकेशच्या ‘पार्टी कल्चर’मध्ये समरस होण्यासाठी स्वत:मध्ये आवश्यक बदल करणे सुरू केले आहेत. यासाठी राकेशने तिच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबत तिला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
लग्नाच्या वेळी तोंडी पाठिंबा देणारे राकेशचे नातेवाईक आता दोघांचा संसार कसा चाललाय, याची परीक्षा घेण्यासाठी अधूनमधून भेट देत असतात. नीतामुळे आपल्या रागाचा पारा पूर्वीच्या तुलनेत काही अंशी घसरत असल्याचे राकेश बिनदिक्कत मान्य करतो, तर राकेशमुळे आयुष्यात आलेली पोकळी भरून निघाली, राकेश जगण्याचा केंद्रबिंदू झाला, असं नीता म्हणते. पत्नी म्हणून त्याने माझ्यात आमूलाग्र बदल केले. मात्र माझी ‘नीता’ म्हणून असलेली ओळख पुसली जाणार नाही हे आवर्जून बघितले, हे ती अभिमानाने सांगते.
मुकेश-सुनीता, राकेश-नीता यांचे सूर जुळण्यास ‘यश फाऊंडेशन’ने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. संस्थेच्या वतीने एचआयव्ही बाधित, एड्सग्रस्तांसाठी विवाह समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून आजवर चार जोडय़ांचे सूर जुळले आहेत.
समाजात एचआयव्ही बाधित रुग्णांचे विवाह होण्याचे अलीकडे काहीसे वाढले आहे. या दोन जोडय़ा प्रातिनिधिक आहेत. मात्र प्रेमाच्या भावनेचा इतका ‘पॉझिटिव्ह’ विचार करणारी ही जोडपी नव्या सामाजिक परंपरेचा पायंडा पाडत आहेत, हे नक्की.
नाते जुळले, मनाशी मनाचे
ते दोघंही एचआयव्ही पॉझिटिव्ह. आयुष्यात जीवनसाथीची गरज असल्याने त्यांनी जाणूनबुजून लग्न करण्याचा निर्णय घेतला. एकमेकांच्या पाठबळामुळे आता ‘त्या’ आजाराशी खंबीरपणे लढण्याचं धैर्य त्यांना लाभलंय.. ‘व्हॅलेन्टाइन डे’ च्या निमित्ताने दोन ‘वेगळ्या’ जोडप्यांविषयी..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 09-02-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relation connects to heart