प्राचीन भारतीयांनी धर्म आणि अर्थ याच्या बरोबरीने काम यालाही तीन अटळ मानवी जबाबदाऱ्यांमध्ये जागा दिली आहे. ज्या जोडप्याचं कामजीवन समृद्ध, समाधानी असतं ते जोडपं सुखी, असं म्हटलं जातं, पण हे कळणं आणि प्रत्यक्षात आणणं यात महद्न्तर आहे. कारण अनेकांना वैवाहिक आयुष्यातलं सेक्सचं स्थान, त्याची मर्यादा याचं महत्त्वच लक्षात येत नाही आणि मग.. नाती कुजायला लागतात. अशी नाती वेळीच सावरावी लागतात, त्याचसाठी हे खास सदर ‘कामस्वास्थ्य’.. पाणी गढूळ करणारी एक छोटी काटकी काढून टाकली की पाणी वाहतं होतं. तसं तुमचंही आयुष्य स्वच्छ, नितळ करणारं दर पंधरवडय़ाने.
मानवी जीवन हा अव्यक्ताकडून अव्यक्ताकडे होणारा एक व्यक्त प्रवास. या प्रवासात काही नाती निर्माण होतात, काही निर्माण केली जातात. मग त्यात गुंतागुंत होत जाते आणि ती सोडवण्यात बराचसा प्रवास होत राहतो. असेच एक महत्त्वाचे नाते मानवाने खास निर्माण केले ज्याच्यामुळे त्याच्या संस्कृतीची बैठक बसली गेली. ते नाते म्हणजे विवाह. निसर्गत: प्रत्येक प्राणिमात्राला त्याचे जीवन सुखकर व्हावे म्हणून काही मूलभूत प्रेरणा त्याच्या मेंदूतील गाभाऱ्यात नोंदवल्या गेल्या आहेत. ज्यांना आपण कधीच नाकारू शकत नाही. सेक्स ही त्यातलीच एक मूलभूत प्रेरणा. फारच बलवान. स्वरक्षणाच्या खालोखाल, तहान, भुकेप्रमाणेच मरेपर्यंत पिच्छा न सोडणारी. या प्रेरणेला शिस्तबद्ध करण्यासाठी तसेच ती मानवी संस्कृतीला पोषक व्हावी म्हणून हे विवाहाचे नाते. दोन व्यक्तींमध्ये असे संबंध इतरांना मान्य असून त्यातून निर्माण होणारी प्रजा ही त्यांच्या धर्म आणि अर्थ परंपरेचा वारसा पुढे चालू ठेवण्यास कोणाचाच विरोध असणार नाही, अशा विचारांनी वैवाहिक नात्याची बैठक तयार झाली.
लग्न म्हणजे कायद्याने आणि समाजाने त्या दोन व्यक्तींमधील कामजीवनाला दिलेली मान्यता. याचाच अर्थ मुळात मानवी संस्कृती निर्माण करणाऱ्या समाजाला निर्माण करणारी प्रजा ज्यातून उत्पन्न होते ते हे विवाहाचे नाते. म्हणजे पर्यायाने सेक्स हाच सामाजिक संस्कृतीचा पाया बनला. म्हणून प्राचीन भारतीयांनी याला तीन अटळ मानवी जबाबदाऱ्यांमध्ये जागा दिली, धर्म आणि अर्थ यांच्या बरोबरीने.. यांनाच प्राचीन भारतीय संस्कृतीने पुरुषार्थ म्हणून संबोधले. धर्म म्हणजे वर्तणूकशास्त्र, सामाजिक आणि कौटुंबिक. अर्थ हे संपादनशास्त्र. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यक्तिगत जीवनसौख्याच्या साधनांचे. सेक्सला केवळ लिंग-योनी क्रियेपुरतेच मर्यादित न ठेवता त्याची व्याप्ती त्या संबंधित दोन व्यक्तींच्या एकमेकांविषयी असणाऱ्या भावनांच्या वैचारिकतेपर्यंत वाढवून प्राचीन भारतीयांनी त्याला काम असे म्हटले.
या कामभावनेचा उदय होणाऱ्या काळाला नवतारुण्याचा किंवा युवावस्थेचा काळ म्हणतात. या अवस्थेमध्ये युवक-युवतींच्या मनात प्रामुख्याने जो भाव निर्माण होतो तो हा कामभाव, रतिभाव. परंतु युवावस्थेच्या मूलभूत स्वभावधर्मात वैचारिक गांभीर्याचा अभाव निसर्गत:च असल्याने हा कामभाव हाताळायचा जबाबदारपणा अशा युवावस्थेच्या व्यक्तींना कष्टानेच साध्य होत असतो. याच काळात सर्वसाधारणपणे विरुद्ध लिंगी आकर्षण निर्माण होऊन शृंगारिक प्रेमभावना प्रकर्षांने जाणवत असते. कामभावातूनच या प्रेमभावाचा उगम होत असतो. म्हणून कुठलेही विरुद्ध लिंगी प्रेम हे निष्काम असू शकत नाही. सेक्सचे आकर्षण हे मूलभूत प्रेरणेतून तर प्रेमाची ओढ ही भावनेतून होत असते. या सर्वाना वेळीच कशा पद्धतीने हाताळायचे हे न शिकल्याने, न शिकवले गेल्याने या बाबतीत नवीन पिढी भरकटत जात असल्याचे चित्र आपल्याकडे दिसत आहे.
तरुणांना लैंगिक रोग, लैंगिक समस्या आणि नात्यातील गुंतागुतीच्या समस्या यांसारख्या राहू-केतूंचे ग्रहण लागू नये म्हणून युवा पिढीने वेळीच जागरूक राहायला पाहिजे. यासाठीच आवश्यक आहे त्या वैद्यकीय नजरेतून विवाहबंधनाकडे पाहणे. यालाच आपण विवाहासाठीची वैद्यकीय पत्रिका म्हणायला हरकत नाही.
लग्न म्हणजे जबाबदारपणा. त्याची बैठक ही वास्तवतेच्या पायावरच असणे महत्त्वाचे असते. सेक्स आणि प्रेम यांच्यात जबाबदारपणा आणता आला तर युवा पिढीला आयुष्य निरामयपणे तर जगायला मदत होईलच, पण त्यामुळे भारतीय समाजाचा ऱ्हास टाळता येईल. आज केवळ बेजबाबदार वागण्यामुळेच भारत एचआयव्ही संसर्गात नंबर दोनवर आहे हे दुर्दैवी वास्तव नाकारता येत नाही. त्यात भरीस भर म्हणून घटस्फोटांचे प्रमाणही झपाटय़ाने वाढत आहे. वैवाहिक जीवनाला गांभीर्याने न घेण्याच्या युवा पिढीच्या वृत्तीला लगाम न घातल्यास समाजाचा पायाच ढासळून जाणार यात शंकाच नाही.
अर्निबध लैंगिक संबंधांनी एचआयव्ही तर फोफावत आहेच, पण एकटेपणाच्या वैफल्याने नैराश्य, नशापाणी यांच्या विळख्यात सहजपणे गुरफटतात. त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींनाही याचे भोग भोगावे लागतात.
वैवाहिक वैफल्याचे महत्त्वाचे कारण सेक्सच्या समस्यांमध्ये दडलेले असते. उघडपणे बोलताही येत नाही आणि सांगितले तरी योग्य मार्गदर्शनही मिळत नाही, या वास्तवामुळे आजवर युवा पिढी या बाबतीत मन मानेल तसा निर्णय घेत आहे. सुदैवाने सध्या मॅरेज कौन्सिलर, सेक्स कौन्सिलर उपलब्ध आहेत. आपण कितीही बुद्धिमान असलो तरी आपल्यालाही कौन्सिलरची गरज असते हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे.
युवा पिढीची मानसिकता बदलणे हे सध्याच्या काळात सहज शक्य नाही. कमी वयात मिळणारा जुन्या पिढीच्या दृष्टीने अमाप पैसा, त्यातून उद्भवणारे गुर्मी, उद्धटपणा, बेगुमानी, स्वकेंद्रित विचारसरणी यांसारखे स्वभावदोष महत्त्वाचा अडथळा आहेत. व्यवसायानिमित्त येणारा विरुद्ध लिंगी सहज संपर्क, वर्तणुकीतील मनमोकळेपणा, नेट सर्फिग, नेट चॅटिंग, मोबाइल, एसएमएस या सर्व गोष्टींचा प्रभाव, यामुळे सेक्स, प्रेम आणि लग्न याबाबतचे युवा पिढीचे विचार बदलत जात आहेत. पालकांचा अलिप्तपणा आणि त्यांच्या विचारांना तुच्छ मानून दुर्लक्षित करण्याची युवा पिढीची प्रवृत्ती याचा परिपाक आता प्रकर्षांने दिसत आहे.
सेक्स मिळवण्यासाठी जी धडपड करायची असते त्याला प्रेम म्हणतात, असा सोयीचा अर्थ सध्याच्या पिढीतील युवक-युवतींनी घेतल्याचे जाणवते. पटतंय की नाही हे एकत्र राहून बघू, नाही तर आपले मार्ग वेगळे आहेतच अशी वृत्ती लग्नापूर्वी निर्माण होत आहे. लग्न हे बंध नसून बंधन आहे, पटत नसूनही नाइलाजाने ते चालू ठेवावे लागते हे भांडणातच वेळ खर्च करणाऱ्या त्यांच्या पालकांकडे बघून युवा पिढीचे मत झालेले असते. म्हणून त्यात सर्वस्वी त्यांचाच दोष असतो असे म्हणणे चुकीचे ठरेल. पालकांनी भांडणाबरोबरच प्रेम काय असते हे जर दाखवले तर युवा पिढीला ते मार्गदर्शक ठरेल हे निश्चित!
लग्नानंतर तीनच दिवसांत सेक्स जमत नाही म्हणून घटस्फोटाचा विचार करणारी किंवा तीन महिन्यांतच आम्ही एकमेकांना विटलो, असे सांगणारी युवामंडळी पाहिली की संसार, घर आणि कुटुंब यासाठी धडपडणाऱ्या जुन्या पिढय़ांना नोबेल पारितोषिक द्यावे असे वाटते. सुरुवातीला जाणवणारे जवळजवळ ३० टक्केसेक्स प्रॉब्लेम अज्ञान किंवा नेटसारख्या माध्यमांतून मिळणाऱ्या विचित्र ज्ञानातून निर्माण होत असतात. हे सेक्स प्रॉब्लेम सेक्स कौन्सिलिंगने सहज दूर होतात. गरज पडल्यास सेक्सथेरपीचाही उपयोग करून उरलेले सेक्स प्रॉब्लेम सोडवता येतात. सेक्स प्रॉब्लेम या फक्त समस्या असतात, रोग नव्हे. म्हणून यासाठी कुठलीही औषधे शोधण्यात वेळ, पैसा व मन:स्वास्थ्य गमावू नये. नातेसंबंध सुरळीत होण्यासाठी लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही ‘मॅरेज कौन्सिलिंग’ करणे फारच आवश्यक असते.आयुष्यात शेवटी टिकते ते साहचर्य प्रेम, लैला-मजनू प्रेम नाही. साहचर्य प्रेम हे प्रत्येक पती-पत्नी दाम्पत्याला निर्माण करता येते. मुळातच आपल्या समाजात ८५ टक्केलग्ने ठरवून झालेली असतात. अशा पती-पत्नींना आपण एकमेकांवर प्रेम करायचे असते, एकमेकांशी मैत्री करायची असते हे माहीतच नसते. ते त्यांना अशक्यही वाटते. प्रेमविवाह करणाऱ्यांना लग्नानंतरच्या अपेक्षाभंगातून त्यांचे लैला-मजनू प्रेम कधी उडून गेले हे लक्षातही येत नाही. पण कुठल्याही प्रकारचे लग्न असले तरी ते यशस्वी करण्यासाठी साहचर्य प्रेमच महत्त्वाचे असते आणि हे प्रेम निर्माण करता येते. यासाठी आवश्यक असतो संवाद आणि तडजोड वृत्ती. सध्याच्या युवा पिढीत मार्गदर्शन नसल्याने याचाच अभाव जाणवतो. युवा पिढीने सेक्सला साहचर्य प्रेमाचे कोंदण दिल्यास नातेसंबंधांचा दागिना उठून दिसेल यात शंका नाही. अशा दागिन्याने समाजस्वास्थ्याचे सौंदर्य खुलायला मदतच होईल.
(डॉ. शशांक सामक हे पुण्यातील त्वचारोगतज्ज्ञ व सुप्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट असून त्यांनी स्वतची ‘डॉ. सामक सेक्शुअल फिटनेस थेरपी’ प्रसिद्ध केली आहे. ती एकमेव भारतीय सेक्स थेरेपी असून अमेरिकन व इतर विविध आंतरराष्ट्रीय वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. स्त्रीच्या लैंगिकतेतील ‘पी स्पॉट’ या सिद्धांताचे ते संकल्पकही आहेत. १९८१ सालापासून लैंगिकशास्त्र क्षेत्रात कार्यरत असून ‘क्रिस’ या संस्थेचे अध्यक्ष व ‘डॉ. सामक अॅकॅडमी ऑफ सायंटिफिक सेक्शुआलिटी’ या संस्थेचे अध्यक्षीय संचालक आहेत. ‘चाळिशीनंतरचे कामजीवन’ या प्रसिद्ध स्टेज शोचे ते जनक व सादरकर्ते आहेत.‘वैद्यकीय कामशास्त्र’ व ‘नवविवाहितांचे कामजीवन’, या पुस्तकांचे ते लेखक आहेत. भारतातील अग्रगण्य व मोजक्या सेक्स थेरपिस्टमध्ये त्यांची गणना होते.)