अनुश्री कुबडे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या वर्षी आमच्या लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाली. माझी आणि शैलेशची पहिली भेट अजूनही मला तशीच्या तशीच आठवते. आईच्या घरी ‘टिपिकल कांदेपोहे’चा कार्यक्रम आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी कॅफे किंवा मॉलऐवजी आमची महालक्ष्मी मंदिरातली भेट. आमच्या जुळणाऱ्या महत्त्वाकांक्षा, आमची स्वप्नं आणि आवडलेले स्वभाव. म्हणूनच आम्ही दोघांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला. म्हणतात ना, जन्मोजन्मीच्या गाठी बांधलेल्या असतात तसंच काहीतरी!
लग्न, वरात, सनई-चौघडे इत्यादी समारंभानंतर एक खास प्रवास सुरू होतो. या प्रवासात बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतात. नवीन जागा, नवीन घर, नव्या कुटुंबाशी नातं. लग्नानंतर माझ्या आणि शैलेशच्या नव्या जीवनातले नवीन अनुभव, नवीन जाणिवा, यांच्याबरोबर आमच्या सहजीवनाला सुरुवात झाली. अभ्यास आणि नोकरी करता करता बरंच काही शिकायचं राहून गेलं होतं हे तेव्हा लक्षात आलं. पण माझ्या नवीन कुटुंबानं मला नवीन घरी रुळण्यास खूप मदत केली आणि सगळं सांभाळून घेतलं. शैलेशला इतका चांगला स्वयंपाक येतो हे मला प्रेरणादायी झालं आणि मीसुद्धा छान स्वयंपाक करायला शिकले. आमच्या मुलीच्या- अन्विकाच्या जन्मानंतर पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. नोकरी आणि घर सांभाळताना तारेवरची कसरत व्हायची, पण या अडचणींसमोर आईपणाचं सुख हे शब्दात न मांडता येणारं! मला इथे नक्की सांगावंसं वाटतं, की माझ्या सासू-सासऱ्यांनी आणि माझ्या आई-वडिलांनी नेहमी अन्विकाची बरीच जबाबदारी घेतली आणि म्हणूनच मी निश्चिंतपणे माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकले.
कुटुंब आणि नोकरीमध्ये योग्य ताळमेळ साधत आम्ही आमचा हा प्रवास सुरू ठेवला. लग्नाआधी मी ‘एमबीए’ केलं होतं. माझ्या क्षेत्राशी निगडित काही परीक्षा देत होते, पण लग्नाच्या गडबडीत ते सगळं बाजूला पडलं होतं. नंतर शैलेशनं आणि घरच्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी त्या परीक्षा दिल्या आणि उत्तमप्रकारे उत्तीर्णही झाले. घरच्यांनी दाखवलेला विश्वास आणि केलेलं कौतुक हे माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरलं आहे. मला मनापासून वाटतं, की कुठल्याही कुटुंबानं लग्नानंतर घरी आलेल्या मुलीला तिच्या गुणांना, आवडींना पुढे नेण्यास उत्तेजन दिलं तर ती बरीच प्रगती करू शकते.
मधल्या काळात शैलेशनं जबाबदारीची नोकरी सांभाळत काही स्वतंत्र व्यवसायसुद्धा सुरू केले. त्यादरम्यान शैलेशला सारखं बाहेरगावी जावं लागायचं. एकदा अन्विकाला खूप ताप आला होता. शैलेश बाहेरगावी गेला होता आणि मलाही महत्त्वाच्या कामामुळे त्या दिवशी ऑफिसला जाणं खूपच गरजेचं होतं. तेव्हा अन्विकाच्या आग्रहानंतरही मी घरी थांबू शकले नाही. म्हणूनच नंतर मी अपराधी भावनेनं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि काही महिने अन्विकाबरोबर वेळ घालवला. शैलेशला जाणवलं, की मी करिअरची महात्त्वाकांक्षा असूनसुद्धा त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यानं मला परत नोकरी सुरू करण्यास सुचवलं, पण माझ्या मनाची घालमेल होत होती. त्यानं मला विश्वास दिला, की आपण घर, अन्विका, नोकरी आणि व्यवसाय सगळं व्यवस्थित सांभाळू. त्या दिवशी हे आम्ही एकत्र बसून ठरवल्यानंतर परत मागे वळून पाहिलं नाही आणि सर्व गोष्टी समर्थपणे सांभाळत गेलो. पुढे शैलेशच्या व्यवसायात आर्थिक आपत्ती आली. सर्व बचत त्यातच गुंतवलेली असल्यानं आम्हाला आर्थिक झळ सोसावी लागली. ताणतणावात आणि संघर्ष करताना आपली कसोटी लागते. ती माझी वेळ होती शैलेशला धैर्य देण्याची. परस्परांवरचं प्रेम, विश्वास आणि त्यानं अगोदर दिलेल्या आधारामुळे मी यावेळी खंबीरपणे त्याच्याबरोबर उभी राहू शकले आणि त्याला आर्थिक व मानसिक आधार देऊ शकले. अर्थातच यात घरच्यांनी दिलेली साथही मोलाचीच होती. ते नेहमीच आमचे आधारस्तंभ राहिले आहेत.
टाळेबंदीच्या काळात दोघांचं काम घरूनच चालायचं, तर अन्विकाची शाळा ‘ऑनलाइन’ होती. सगळा एकत्र गोंधळ व्हायचा आणि कधीकधी खूप चिडचिड व्हायची. घरातली सर्व कामं, अन्विकाचा अभ्यास, ऑफिसचं उशिरापर्यंत चालणारं काम, हे सगळं एकत्र चालू असायचं, पण आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि त्या आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे गेलो. किंबहुना, त्या काळात घरून काम करण्याच्या पद्धतीची सवय झाल्यानंतर मी वेळेचं व्यवस्थापन थोडय़ा हुशारीनं केलं आणि ‘कंपनी सेक्रेटरी’ (सीएस) या आव्हानात्मक परीक्षेतलं पहिलं सत्रसुद्धा उत्तीर्ण होऊ शकले. सध्या मी त्या परीक्षेच्या शेवटच्या सत्राची तयारी करते आहे. जीवनात जोडीदारानं दिलेलं प्रोत्साहन हे खरंच खूप महत्त्वाचं आहे हे आज मी स्वानुभवातून सांगू शकते.
प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव वेगवेगळे असतात, तसेच आमचेही स्वभाव, आवडीनिवडी वेगवेगळय़ा आहेत. मला खूप बोलायला आवडतं, तर तो शांत आहे. मला फिरायला फार आवडतं, तर त्याला घरी बसून वाचायला, सिनेमा किंवा वेब मालिका पाहायला आवडतं. पण आम्ही नेहमीच एकमेकांची आवडनिवड जपतो. त्यामुळेच कदाचित आमच्याही आवडीनिवडी आता सारख्या होत चालल्या आहेत. शैलेशसुद्धा आता माझ्याबरोबर भटकंती ‘एन्जॉय’ करू लागला आहे. या धकाधकीच्या जीवनात थोडासा वेळ काढून एकत्र, कुटुंबासोबत फिरणं, वेळ घालवणं हे कॉम्प्युटरवर ‘रीफ्रेश’ बटण वापरण्यासारखं आहे. छोटय़ा छोटय़ा सहलींमुळे कौटुंबिक संबंध तर दृढावतातच, पण नातीसुद्धा टवटवीत राहातात. आमचं नातं नवरा-बायकोपेक्षा खूप जास्त मैत्रीचं आहे. या सगळय़ा वर्षांमध्ये आम्ही आमच्याच अनुभवांतून शिकलो की कुठला विषय किती ताणायचा किंवा कुठे थांबायचं. कुठलंही नातं हे परिकथेसारखं परिपूर्ण नसतं. आमचेही बरेच वादविवाद होतात, मतभेद होतात, मग थोडं शांत होऊन त्या परिस्थितीला वेळ देऊन आम्ही एकमतावर येतो आणि अगदीच अबोला झाला, तर आमचं कन्यारत्न मदत करतं वाद सोडवायला! मग रागाला काही जागाच उरत नाही.
आम्ही आज पालक म्हणून नवीन भूमिकेत आहोत. नवीन जबाबदाऱ्या नवीन अनुभव देत आहेत. शिकलेले संस्कार पुढे देण्याचं दायित्व आहे. जगातल्या कोणत्याही बाजारात चांगले संस्कार विकत मिळत नाहीत. आपल्या समाजात लग्न हा एक संस्कार मानला जातो. त्यातून निर्माण होणारी कुटुंबपद्धती ही समाजपद्धतीचा मुख्य पाया आहे. तसं पाहाता लग्नं हीदेखील झाडाप्रमाणेच वादळांचा सामना करतात आणि परिणामी अधिक मजबूत होतात. झाडं आणि कुटुंब ही दोन्ही सुरक्षिततेची ठिकाणं आहेत. लग्न या नात्याची सुरुवात एका रोपटय़ासारखीच नाही का? आणि मग ते मोठं होऊन वटवृक्षासारख्या भक्कम नात्यात रूपांतरित होतं, ज्याची मुळं खोलवर रुजलेली असतात! आज त्या झाडाच्या बहरात मीसुद्धा बहरत आहे. मुग्धपणे वाटचाल करतेय.
anushree_sa19@yahoo.com