आजकाल घरोघरची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात आहेत. इथे त्यांचे वयाच्या उताराला लागलेले आईबाप उरतात. वर्षांवर्षांत आई-बाप व मुले-सुना-नातवंडे परस्परांना भेटत नाहीत आणि तरीही ही इकडे व ती तिकडे राहातात कशी, जगतात कशी? तर याचे उत्तर म्हणजे अस्तित्वाचा आधार! येथल्या ज्येष्ठ पिढीला त्या तिकडल्या दूरस्थ पिढीचा आधार वाटतो व नवीन पिढीला मायभूमीतील पिढीचा आधार वाटतो. दोन्हीपैकी एखादा आधार गळला तर ..
‘किसनराव आहेत का घरात?’
उंच आवाजातली बंडोपंत जोशांची हाक कानावर पडताच किसनराव भानावर आले. आरामखुर्चीतून उठून बंडोपंतांचे त्यांनी स्वागत केले. ‘अरे बंडू ये. बैस.’ कोचाकडे आपल्या जुन्या व जवळच्या मित्राला नेत किसनराव अगत्याने म्हणाले, ‘बरं झालं आलास ते.’
कोचात बसल्यावर बंडोपंतांनी विचारले, ‘आज जरा अपसेट दिसतोस, काय घडलंय? काय बिघडलंय?’
‘अॅबसोटय़ूटली नथिंग. एव्हरीथिंग इज ओ. के.!’
‘सीरियस नसेल. पण काहीतरी खटकतंय. मनात खदखदतंय. मी ज्योतिषी नाही, पण चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आलं. काय ते सांग बरं.’
मग मित्रापाशी मनमोकळं करणं किसनरावांना भागच पडलं. ‘अरे तसं काही खास नाही, पण एकूणच कंटाळा आलाय.’
अठ्ठय़ाहत्तराव्या वर्षीही स्वत: कार्यक्षम व सोबतीला काळजीवाहू पत्नी, मुलगा, सून उच्चशिक्षित पण तरीही सुस्वभावी. ‘जास्ती, आणखी जास्ती’ची ओढ व आवड नसणारी घरातील सुखवस्तू आर्थिक संस्कृती. गोड व खेळकर नातू व नात. मालकीचं मध्यवस्तीतील घर. छोटंसं, पण स्वतंत्र. सुखी माणसाचा सदरा कोठे मिळेल, तर तो किसनरावांकडे. असं सगळं छान असून गृहस्थ नव्र्हस! म्हणतो, मला कंटाळा आला! याचा अर्थ काय?
‘तुझ्या मनातील प्रश्न मी ओळखला’, किसनराव म्हणाले, ‘सर्व, ऑल वेल असल्यावर मी असा चेहरा पाडून का बसलोय? मग कंटाळा कसला आलाय? पण खरं सांगतो, हे सर्व ठाकठीक आहे ना त्यामुळे मला आता करायला काही उरलं नाही. माझा दिनक्रम बघ,’
किसनरावांनी आपलं डेली टाइम टेबल सांगितलं. सकाळी आरामशीर उठायचं. स्वत:चं आवरून कोचात बसल्या बसल्या सूनबाई आलं घातलेला गरमागरम चहाचा कप समोर धरून हजर. मग ताज्या वृत्तपत्राची घडी उघडायची. तास-दीड तास अठरा-वीस पाने वाचून काढायची. वर्तमानपत्र बाजूला ठेवून चष्मा काढणार तोच नाश्ता अगदी हातात. आवडला तर आणखी हवा तेवढा. सकाळचा चहा फराळ असा सुरेख झाल्यावर डोळ्यांवर झापड यायची. कोचातचं एक छोटीशी डुलकी. साधारण दहा वाजत आले की स्वयंपाक करीत व छोटय़ांचे आटोपल्यावर सून नोकरीवर. मुलगा छोटय़ांना बेबी सीटिंगमध्ये ठेवून स्वत: त्याच्या व्यवसायासाठी बाहेर. घरात आता फक्त किसनराव आणि वसुधा वहिनी. झाडांना पाणी घालणे, फुले आणणे, आंघोळ व मग दीड-दोन तास पूजा व पोथी. झेपतील तेवढी घरगुती कामे. वाचन. दुपारचे जेवण आणि विश्रांती. संध्याकाळचा चहा व चार बिस्किटे. मग पाय मोकळे करण्यासाठी फेरफटका. घरी परतल्यावर दूरदर्शनवरील सातच्या बातम्या. नंतर घरातील सर्वासह हसतखेळत भोजन. पुन्हा थोडा वेळ वाचन किंवा घरगुती गप्पाटप्पा. रात्री अकराच्या आत निद्रादेवीची आराधना. कारण वयपरत्वे झोप चटकन यायची नाही. पण आली की थेट सकाळी सहापर्यंत. नंतरचे घटनाचक्र नेहमीप्रमाणे.
‘तर बंडोपंत, आता हे सर्व इतकं रुटीन झालं आहे की, वाटतं, आता हे पुरे. प्रकृतीची साथ आहे तोवर हे काढदिवस- संपावेत.’
‘कंटाळ्याचे हे कारण आहे तर! म्हणजे शहारूख खानप्रमाणे!’
बंडोपंतांनी शाहरूख मध्येच कोठे आणला, किसनरावांना कळेना. त्यांनी लोकसत्तेचा अंक किसनरावांसमोर धरला. ‘थांब मीच त्यातील बातमी वाचून दाखवतो,’ त्यांनी म्हटले. ‘शाहरूखचा ४७ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला.. कोणालाही हेवा वाटावा असे सारे काही त्याच्याजवळ आहे. यश, पैसा, प्रसिद्धी, चाहते, मित्र हे सर्व आहे. पण तरीसुद्धा यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या शाहरूखला ‘आहे मनोहर तरी गमते उदास..’ ही भावना कुरतडते आहे. गोव्यात नुकत्याच झालेल्या ‘थिंकफेस्ट’ परिषदेत शाहरूख खानने ही भावना बोलून दाखविली. ‘यशाच्या शिखरावर पोहोचलो असलो तरी एकटेपणाची भावना तीव्र झाली आहे. एकप्रकारची ‘पोकळी’ निर्माण झाली आहे. या विचाराने मला पछाडले आहे,’ असे तो म्हणाला.
‘माझे सुंदर कुटुंब आहे. काही मोजक्या जिवलग मित्रांसोबत मी आनंदात वेळ घालवतो.. पण खरे सांगायचे तर शिखरावर असलो तरी मी एकटा पडलोय. विचित्र अशी ही भावना आहे.. आतून रिकामे झाल्याच्या भावनेने मी हवालदिल झालोय’, असे सांगताना शाहरूख गहिवरून गेला होता.’
किसनरावांनी ‘अंक’ हातात घेऊन पुन्हा शाहरूख खानचे मनोगत वाचले. ‘अरेच्चा! खरंच! त्याचंही माझ्यासारखंच झालेलं दिसतंय. अर्थात प्रसिद्धीच्या झोतातला हा नट कोठे आणि मी नगण्य म्हातारा कोठे?’
‘पण भावना एकच, त्याची व तुमची. नट-नटय़ांच्या निवेदनांना प्रांजळ म्हणणे कठीण. पण ते काहीही असले व तुम्हा दोघांचे मन व्यापून टाकणारी हतबलतेची भावना खरी धरली तरी त्यामागची दुसरी बाजू विचारात घेतली जात नाही. तुम्हा दोघांना भले सद्यस्थितीचा कंटाळा आला असेल, पण तुमचा, तुमच्या कुटुंबीयांना व शाहरूखचा त्याच्या घरच्यांना आणि चित्रसृष्टीत कंटाळा आल्याचे कसे गृहीत धरता येईल? तुम्हाला काही नको असले तरी तुमच्याशी संबंधितांना तुम्ही हवे असणारच. तुमचे अस्तित्व हा त्यांचा आधार आहे व तो त्यांना जितका मिळेल तितका हवा आहे.’
बंडोपंत मनापासून हे सांगत आहेत याबद्दल किसनरावांना खात्री होती. कारण ते त्यांचे एकमेव मित्र. ते बंडोपंतांचं म्हणणं ऐकत होते, ‘‘अस्तित्वाचा आधार म्हणून एक चिरंतन तत्त्व आहे व ते फार महत्त्वाचे आहे. तुमच्यामुळे दुपारभर दार बंद राहात नाही. पोस्टमन, कुरिअरवाला, कामवाली बाई, इतरही कोणाचे येणे-जाणे, निरोप वगैरे, हे सर्व व्यावहारिक फायदे आहेतच, पण ते किरकोळ म्हणता येतील. कारण त्याबद्दलची अन्य काही व्यवस्था करणे अशक्य नाही. पण घरच्यांच्या मानसिक व भावनिक आधाराचे काय? तुमच्या नुसत्या ‘असण्याने’ तो आपोआप मिळतो. त्याचे मूल्यमापन करताच येणार नाही. तुम्ही काहीही करू नका, पण तुमच्या नुसत्या अस्तित्वाचा भरभक्कम आधार तुमच्या घरच्यांना आहे. काही प्रमाणात समाजालाही आहे. तुम्हाला कोणाची गरज नसेल एकवेळ, पण अनेकांना तुमची गरज आहे. तुम्ही आहात म्हणून ते सध्या ज्या स्थितीत आहेत तेथे सुरक्षित आहेत त्यांच्यातून तुमची वजाबाकी केली तर खाली उरेल ते डेबिट. सध्या आहे ते ‘क्रेडिट’.
आजकाल घरोघरची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात आहेत. इथे त्यांचे वयाच्या उताराला लागलेले आईबाप उरतात. त्यांना ते हवे तेवढे धन पाठवितात. वर्षांवर्षांत आई-बाप व मुले-सुना-नातवंडे परस्परांना भेटत नाहीत आणि तरीही ही इकडे व ती तिकडे राहातात कशी, जगतात कशी? तर याचे उत्तर म्हणजे अस्तित्वाचा आधार! येथल्या ज्येष्ठ’पिढीला त्या तिकडल्या दूरस्थ पिढीचा आधार वाटतो व नवीन पिढीला मायभूमीतील पिढीचा आधार वाटतो. दोन्हीपैकी एखादा आधार गळला तर राहिलेल्यांना काय वाटते, याची उरलेली विद्यमान मंडळी विचार करू शकतात.’
मिस्किलपणे किसनरावांकडे पाहात बंडोपंत पुढे म्हणाले, ‘मित्रा, तुला त्याबद्दलची कल्पना करता येणार नाही. कारण तू सुखी आहेस, अतिसुखी आहेस आणि गंमत म्हणजे याचाच विषाद वाटून घेतो आहेस, अरे, तुझा मुलगा, सून, नातवंडे तुझ्यापाशी आहेत, ‘परि तू ते विसरतोचि’ याला काय म्हणावे? तुझा त्यांना आधार आहे व त्यांना तुझा आणि तसा भरभक्कम आधार असणं, सपोर्ट असणं हे परमभाग्य! ‘असणं’ आणि ‘नसणं’ यात महदंतर आहे, हे तेव्हाच कळते जेव्हा ‘नसणे’ दुर्दैवाने वाटय़ास येते. तोवर असण्याचे महत्त्व कळत नाही आणि हाच मानवजातीला शाप आहे.
मला येथे प्रख्यात लेखक पु. भा. भावे यांची आठवण येते. ते या विषयाला वैश्विक स्वरूप देतात. ‘भाषाप्रभू पु. भा. भावे’ हे वि. र. काळे यांनी लिहिलेले पुस्तक अलीकडे वाचनात आले. त्यात भाव्यांनी म्हटले आहे, काहींचे नुसते ‘असणे’ उपकारक होते. प्रेरक ठरते. आपल्या नुसत्या असण्यानेही सागर वातावरण सांद्र करतो. भव्यतेची कल्पना जागृत ठेवतो. आपल्या नुसत्या असण्यानेही सूर्य जगाला प्रकाश देतो. पृथ्वीला तेज देतो. मनुष्यमात्राला जगण्याला आवश्यक अशी उष्णता देतो. ऊर्जा देतो. भावे तुमचेही आवडते लेखक आहेत. तेव्हा त्यांनी केलेला बोध कायम ध्यानात ठेवा.’
बंडोपंत निघून गेले, पण त्यांनी सांगितलेली अस्तित्वाच्या आधाराची थिअरी किसनरावांच्या मनात घोळत राहिली. आता ते त्यानुसार सकारात्मक बदल करणार होते. सारं काही मनोहर असताना उदासपणाला जराही जवळ फिरकू देणार नव्हते.
अस्तित्वाचा आधार
आजकाल घरोघरची मुले नोकरी-व्यवसायानिमित्त परदेशात आहेत. इथे त्यांचे वयाच्या उताराला लागलेले आईबाप उरतात. वर्षांवर्षांत आई-बाप व मुले-सुना-नातवंडे परस्परांना भेटत नाहीत आणि तरीही ही इकडे व ती तिकडे राहातात कशी, जगतात कशी? तर याचे उत्तर म्हणजे अस्तित्वाचा आधार!
आणखी वाचा
First published on: 26-01-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship between indian parents and their kids staying abroad