मंगला गोडबोले

mangalagodbole@gmail.com

मुलांना ‘माणूसघाणं’ म्हणावं तर तसंही नव्हतं. त्यांना सख्खे, चुलत, मावस, मामे, फेसबुके, व्हॉट्स अ‍ॅप, वगैरे अनेक मित्र असायचे. मैत्रिणींचा मोठा राबता असायचा. त्यांच्यामुळे कधी बोअर व्हायचं नाही. मग नातेवाईकांनीच काय एवढं घोडं मारलंय या काटर्य़ाचं? हा प्रश्न ममाला आताशा फार सतावायचा. अशाने आपल्या पश्चात आपल्या मुलांना कोणीही ‘जवळचं’ राहणार नाही, ती एकटी पडतील, पुढे त्यांच्या मोठेपणी त्यांच्या घरच्या लग्नाकार्याना ‘कोण्णी कोण्णी’ येणार नाही.. ममाला चिंता वाटू लागली आणि तिने ‘व्वा’ हेल्पलाइनचा फोन फिरवला..

‘‘अभीऽऽ या रविवारी माझी अक्कलकोटची आत्या येणार आहे बरं का..’’

‘‘ग्रेट’’

‘‘या खेपेला भेटलंच पाहिजे.. किती जीव आहे तिचा आपल्यावर.’’

‘‘मागच्या वर्षी भेटलोच की.. तुझ्या अक्कलकोटच्या आत्याला.’’

‘‘मागच्या वर्षी? कधी रे?’’

‘‘त्या नाही का? त्या आजीलाईक लेडी आलेल्या.. मोठा फुल्ल रव्याचा लाडू दिलेला त्यांनी मला.. मी तो पाण्याबरोबर कसा तरी गिळलेला.. याक्..’’

‘‘ए ऽऽ ती बार्शीची, मनू मावशी माझी.. ’’

‘‘तीच ती!’’

‘‘आत्या आणि मावशी एकच कशी असू शकते रे?’’

‘‘म्हणजे तशा थोडय़ा वेगळ्या असणार त्या.. नो डाऊट.. पण तू काही आमची ‘वरी’ करू नकोस.. गो अहेड..फक्त जायच्या आधी आमच्यासाठी फिशकरी आणि राईस करून ठेव..’’

‘‘वरणभात? ठेवू उकडून? चांगला कुकरभर?..’’

‘‘क्याय.. मम्मा?.. मी बोललो फिशकरी.. तू बनवणार वरण.. ते काय जेवण आहे?’’

‘‘का रे? ते म्हणजे तेच नाही का तुझ्या मते? करी काय, वरण काय! आत्या काय ऽऽ मावशी काय!’’

‘‘तू नेहमी असंच करतेस ममा.. उगाच आम्हाला एकेका ओल्ड रिलेटिव्हकडे यायला लावतेस.. अभ्यास असतो, प्रोजेक्ट्स कम्प्लीट करायचे असतात.. केवढा लोड असतो..’’

‘‘अरजित सिंगच्या इव्हेंटच्या वेळी नसतो रे कुठलाही लोड तुमच्यावर?.. का तो तेवढा अर्जित आणि बाकी सगळे वर्जित, असं असतं तुमच्यात?’’

‘‘पकवू नकोस गं उगाच.. सी, बेसिकली रिलेटिव्ह्ज बोअर असतात. नमस्कार.. लाडू.. यंदा तू कितवीत बाळ? वगैरे प्रश्न..परीक्षेत किती मिळाले मार्क.. अरे वा!..’’

‘‘आम्हाला वाटत असतं, आमची मुलं त्यांना दाखवावीत..’’

‘‘मग डी. पी. दाखवत जा ना आमचे! ताई तर सारखी बदलत असे तिचे.. पण आमची तिकडे वरात नको बुवा.. प्लीजच..’’

हा अभी ‘अभी नही सुधरेगा’ हे कटू सत्य स्वीकारत ममाने ताईकडे मोहरा वळवला. छोटीशी गोष्ट होती. घटकाभर आत्याला भेटणं. ममाच्या लहानपणचा मोठा भाग होती ती आत्या. लहानपणी नातेवाईकांचे दोन मुख्य प्रकार ममाच्या मनावर बिंबवले गेले होते. जवळचे नातेवाईक. दूरचे नातेवाईक. आता काळाबरोबर ते बदलले होते. कमी बोअर नातेवाईक आणि जास्त बोअर नातेवाईक. पण मुळात नातेवाईक म्हटलं की बोअर हे ठरलेलं!

‘‘अर्चूऽऽ रविवारी अक्कलकोटची आत्या येणार म्हणत्येय.’’

अभि मोबाईलशी खेळतखेळत बोलत होता. ही स्वत:च्या नखांशी खेळत होती. अंगठय़ाच्या नखावरची नजर क्षणभरही न हलवता तिनं जाहीर केलं,

‘‘आत्या?.. वाव.. येऊ दे की मग.’’

‘‘भेटायला जायला हवं!’’

‘‘तुम्ही दोघं जा ना.. आम्ही घेऊ ‘पार्सल’ मागवून!’’

‘‘तिची नातवंडं आली असली तर तुम्हालाही कंपनी होईल.’’

‘‘ती.. गावठी नातवंडं? किती बोअर ममा.. गेल्या वेळी जीन्सवर बांगडय़ा घालून आलेली ती एक बोअर नात!’’

‘‘मग वाटल्यास आपण सांगू तेवढय़ा काढून ठेवायला!’’

‘‘काय काढायचं? जीन्स?’’ नखं

४५ अंशाच्या कोनात धरलेली.

‘‘नाही गं ऽऽ बांगडय़ा!’’

‘‘थँक गॉड! तुझ्या गावाकडच्या गुड ओल्ड रिलेटिव्हज्ना भेटायला कोणत्याही लेव्हलला जाऊ शकशील हं तू ममा!

लुक् .. इट इज प्लेन अ‍ॅण्ड सिम्पल बोअरडम फॉर अस.’’ कन्येने नखांसोबत तिच्या प्रस्तावावरही बोळा फिरवत म्हटलं. अलीकडे असं एकेका निरीक्षणासह एकेका नातेवाईकाला एकेका ‘बोअर’मध्ये धडाधड ढकलायची दोन्ही कार्टी. कोणी मराठी मीडियममध्ये शिकतो म्हणून बोअर. कोणाला ‘पब्जी’ माहीत नाही म्हणून बोअर. कोणी पोह्यांवर शेव टाकून खात होतं म्हणून बोअर. तर कोणाचं नाव ‘प्रसन्नजीत’ आहे म्हणून बोअर. सारांश काय, तर मुलांना आपल्या, म्हणजे खरं तर ह्य़ांच्याही नातेवाईकांमध्ये जराही रस वाटत नाही. आता कोणाचंही झालं तरी १०० टक्के सग्गळं आपल्यासारखं कसं असणार? का असावं? वेगळेपणा म्हणजे वाईटपणा असं त्यांनी का मानावं? उलट माणसांच्या नाना तऱ्हा सवयी लकबी रीतीभाती समजून घेण्याच्या संधीच मिळतात ना अशा भेटीगाठींमधून? शिवाय, कितीही (बोअर) झालं तरी ही माणसं सगळी आपलीच ना? मुलांना ती समजायला तर हवीत, या बाबतीत मुलांचा डॅडी एकच फतवा काढायचा. ‘‘तुला एवढं वाटतंय ना?.. मग त्यांना विचारत बसू नकोस. कंपल्सरी घेऊन जात जा. व्हा म्हणावं किती ‘बोअर’ होता ते.’’

हे फक्त म्हणायलाच ठीक असायचं. मारून मुटकून मुलांना नातेवाईकांकडे सोबत न्यावं तर ती फाशी द्यायला निघाल्यासारखे चेहरे करून येणार. पोचल्या क्षणापासून ‘‘चला’’, ‘‘निघूया’’ असे इशारे करणार. ‘‘तिकडे गेल्यावर मोठय़ांसमोर वाकावं.. त्यांना बरं वाटतं,’’ असं सांगून मनुमावशीकडे अर्चूला नेलं होतं तेव्हा तिने मावशीसकट तिच्या पाय चोळणाऱ्या बाईला, त्या घरातल्या माळीदादांना, तेवढय़ात तिकडे आलेल्या एका कुरिअरवाल्यालाही टपाटपा नमस्कार ठोकले होते. सगळे बापडे गोंधळून इकडेतिकडे बघायला ‘लागलेले’, अर्चूचा चेहरा तेवढा आज्ञाधारकपणाच्या तेजाने झळकून ‘उठलेला.’ ‘‘ तू सांगितल्यासारखे सगळ्या मोठय़ांना नमस्कार केले की नाही? आणखी कोणाला करायचे राहिले असतील तर आताच सांग. नंतर तक्रार नको.’’

या उलट कधी कोणी नातेवाईक वाट वाकडी करून आपल्या घरी आले तर घर त्यांच्या स्वाधीन करून आपण कसे  कधी लवकरात लवकर पसार होऊ या योजनेत मुलं गर्क. बाहेरची सगळी कामं त्या पठ्ठय़ांना तेवढय़ातच उरकून घ्यायची असायची. कर्मधर्मसंयोगाने पाहुण्यांबरोबर जेवायला बसावं लागलं तर सर्कशीतला ‘वाघ, शेळी आणि जोकर एकाच थाळीतून जेवताहेत’ हे दृश्य तिकीट न काढता, घरच्या घरी बघायला मिळायचं. मुलं वाघासारखी अन्नावर तुटून पडून लवकरात लवकर जेवणं उरकणार, पाहुणे शेळीसारखे दबूनदबून चार घास कुरतडणार, आणि यांची मोट बांधल्यावर आपला ‘जोकर’ होणार.

बरं, यावरून मुलांना ‘माणूसघाणं’ म्हणावं तर तसंही नसे. त्यांना सख्खे, चुलत, मावस, मामे, फेसबुके, व्हॉट्स अपे, वगैरे अनेक मित्र असायचे. मैत्रिणींचा मोठा राबता असायचा. त्यांच्यामुळे कधी बोअर व्हायचं नाही. उलट जितक्या ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट्स’ येतील तेवढा मान वाढायचा. वेळप्रसंगी भांडणं व्हायची, पाटर्य़ा पडायच्या, कोणाकोणाला कटवण्याचे बेत व्हायचे, पण ‘बोअर’ कधी व्हायचं नाही. मग नातेवाईकांनीच काय एवढं घोडं मारलंय या काटर्य़ाचं? हा प्रश्न ममाला आताशा फार सतावायचा. अशाने आपल्या पश्चात आपल्या मुलांना कोणीही ‘जवळचं’ राहाणार नाही, ती एकटी पडतील, पुढे त्यांच्या मोठेपणी त्यांच्या घरच्या लग्नाकार्याना ‘कोण्णी कोण्णी’ येणार नाही, कुचाळक्या करायला काही विषयच उरणार नाहीत, मग त्यांचा वेळ जाणार नाही. असल्या शंका घेरून राहायच्या. बरं, ‘‘तुम्ही माझ्या मुलांना बोअर का वाटता? तीन कारणे द्या,’’ असं एखाद्या नातेवाईकालाच कसं विचारणार? आणि विचारलंच, तर, पुढचे काही महिने मुलांसकट आपणही तमाम नातेवाईकांकडून मजबूत ‘कुटले’ जाऊ तेव्हा काय करणार?

ममा अशी हैराण असतानाच तिला ‘व्वा’ या नव्या हेल्पलाइनची माहिती समजली. ‘वत्सलावहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाईस’ या पूर्ण नावाचा हा संक्षेप व्हीव्हीएए ‘व्वा’ असं म्हणत हळूहळू लोकप्रिय व्हायला लागला होता. उगाच कुठे पानभर समस्येचं हृदयद्रावक वर्णन लिहून पाठवा वगैरे कष्ट त्यात नव्हते. फोनवर, झटपट, फुकट, तोंडी सल्ला घ्यायला काय लागतंय? घरात कोणी नाही असं पाहून ममाने सरळ ‘व्वा’ला फोन लावला.

‘‘हॅलो ऽ आमच्याकडे फार विचित्र समस्या आहे हो. आमच्या मुलांना नातेवाईकांचं नाव काढलं तरी ‘बोअर’ होतं.. असे एकजात सगळे बोअर, पीळ, पकाऊ लोक आमच्याच नात्यात गोळा व्हावेत हे विचित्र वाटतं नाही का?’’

‘‘विचित्र? नाही हो.. पुष्कळ घरांमध्ये हेच चित्र आहे आता.’’

‘‘मित्रांमध्ये कशी हो तासन्तास बडबडतात कार्टी? जरा कुठे काकामामाने दोन प्रश्न विचारले की लगेच ‘बिग बोअर’?’’

‘सो ऽ फ्रेण्डस आर देअर रिलेटिव्हज,’.. असं म्हणू या?’’

‘‘छय़ाऽऽ मित्रमंडळी बदलतात.. कुटुंब कायमचं असतं. आम्ही लहानपणी कुठल्याकुठल्या सोम्यागोम्या नातेवाईकांकडे जायचो.. यायचो. मस्त टाइमपास व्हायचा!’’

‘‘ओह् या ऽऽ नातेवाईक टाइमपास असतातच. आताचा संपूर्ण टीव्ही सीरियल्सचा झमेला नात्यांवर तर उभा असतो. त्या काडय़ा घालणाऱ्या नणंदा.. त्या एकमेकींचा स्वयंपाक जास्त तिखट वगैरे घालून बिघडवणाऱ्या जावा.. आणि एव्हरग्रीन सासवा.. त्या नसत्या तर डेली सोप्स चालले असते का? .. आय अ‍ॅग्री. पण मला सांगा, तुम्ही जितक्या नातेवाईकांकडे पूर्वी जायचात त्यातले किती पुरले तुम्हाला लाईफमध्ये? किती टिकले?’’

‘‘इश्श.. न टिकायला काय झालं?.. आजकाल कसंय, बॉडीचे एकेक पार्ट बदलत जातात. पण माणसं जात नाहीत. टिकतात.’’

‘‘तसं नाही.. रिअल बॉण्डिंग.. खरे बंध किती टिकल्येत?’’

‘‘खरे बंध.. काय की बाई.. संदर्भ बदलतात, तसं कोणी कोणी आपल्याला गाळतं, कोणी आपोआप गळत जातं..’’

‘‘सो ऽऽ एलिमिनेशन्स..’’

‘‘हं.. थोडंफार तसंच.. पण मोठेपणी हं.. या पोरांना आताच काय झालंय?

‘‘आताची मुलं ज्या वेगात जगताहेत त्यात त्यांच्या निवडीपण अ लिट्ल फास्टर होत असतील का?’’

‘‘नाही नाही.. नाक पुसायची अक्कल यायच्या आत निवड वगैरे होते का? .. काहीतरीच!’’

‘‘असं झटकून टाकू नका.. थोडा विचार करा..

‘‘याला काय अर्थ आहे? म्हणजे आम्ही आमच्या नातेवाईकांची आमच्या मुलांशी गाठ घडवायची की नाही?’’

‘‘एक दोनदा ट्राय करावं. मुलांसाठी ती ‘टाइमपास’ ठरतात की ‘नापास’ ठरतात ते बघावं.. नाहीतर आपली नाती आपणच आपल्या लेव्हलवर मॅनेज करावीत.. तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती कशी करणार?.. हॅलो.. हॅलो.. ऐकताय ना?..

कॉल ‘ड्रॉप’ झाला होता. कारण ममाला दुसरं कोणीतरी फोन करायचा प्रयत्न करत होतं. औरंगाबादची मामेबहीण..? ममाने डोळे बारीक करून फ्लॅश झालेला नंबर पाहिला. औरंगाबादच्या मामेबहिणीचा होता तो..आता हिला आपल्या घरी यायचंय की काय?.. अरे बापरे.. पुन्हा ‘टाइमपास’ की ‘नापास’ चा खेळ सुरू करावा लागणार!