ही सत्यकथा आहे एका नवनिर्माणाची.. जे कधी झालंच नाही!
नव्या मानवी जिवाची निर्मिती –म्हणजे स्थळ -अर्थातच प्रसूतिगृह. मुंबईच्या एका उपनगरातील खासगी नìसग होममधील मॅटíनटी वॉर्डमध्ये प्रत्यक्ष घडलेली ही घटना. कथेत सहभागी झालेले कलाकार – नेहमीचेच यशस्वी! ..म्हणजे गायनॅकॉलॉजिस्ट, डॉक्टर, भूल देणारे डॉक्टर, प्रसूतीच्या प्राणांतिक वेदनांनी विव्हळणारी स्त्री, मदत करणाऱ्या नर्सेस आणि कथेचा शेवट काय होणार हे ठरविणारा सूत्रधार.. खरं तर वरचा ‘तो’.. ..पण इथे मात्र त्या रुग्ण स्त्रीचे नातेवाईक..त्यात अनेक स्त्रिया आणि पुरुषही! प्रसूतिगृहामधील वातावरण सतत चिंता, निराशा, उत्कंठा, समाधान, आनंद, हर्षोल्हास, अशा विविध भावनांच्या गुंतागुंतीने भारलेलं! काळाची टाइमलाइन कितीही भूतकाळाकडे किंवा भविष्यकाळाकडे न्या, पण हे वातावरण कधी बदलेल असं वाटत नाही.
दुपारी बाराच्या सुमारास ‘त्या’ गर्भवती स्त्रीला पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूतिकळा येऊ लागल्या, डिलिव्हरीची तिची ही दुसरी वेळ. तिच्या चार वर्षांच्या लहानग्या मुलीला नात्यातल्या बाईंकडे सोपवून ती दाखल होण्यासाठी आली होती. डॉक्टरांनी तिला तपासून ते मूल पायाळू असल्याचे निदान केले. त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होण्यात अडथळा व धोका निर्माण होऊ शकतो, हे डॉक्टरांनी ओळखले. तिच्या नातेवाईकांना बोलावून ते म्हणाले, ‘हे बघा, या बाईंचं मूल पायाळू आहे म्हणजे बाळाचं डोकं अजूनही वर आहे आणि मांडय़ा, पाय हे भाग खाली आहेत. बाळाचे वजन पण चांगले आहे. पहिल्या मुलीच्या वेळी जरी हिची नॉर्मल डिलिव्हरी झाली असली, तरी हे बाळ नॉर्मल पद्धतीने बाहेर येण्याची शक्यता कमी आहे. कळा येत राहूनदेखील बाळाची अपेक्षित वाटचाल होत नाही असे वाटले, तर सिझेरियन ऑपरेशन करावे लागेल.’ यावर सर्व नातेवाईकांनी डॉक्टरांना ऐकवलं, ‘डॉक्टर, पूर्वी नाही का अशा अवस्थेतील बाळांचे सुद्धा घरी जन्म व्हायचे. तुम्ही प्रयत्न करत राहा, नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा. सिझर नकोच.’
डॉक्टरांना हे उत्तर अपेक्षित होतंच. त्यांनी कळा वाढवण्यासाठी व डिलिव्हरीत बाळाचं खाली सरकणं सुकर व्हावं यासाठी काही इंजेक्शनं सलाइनमध्ये टाकली व सीनियर सिस्टरला तिथेच बसून पेशंटचं मॉनिटिरग करायला सांगून ते ओपीडीत गेले. दर एक एक तासाने ते पेशंटला बघायला येत. तिला तपासून बाळाचे हृदयाचे ठोके, कळांची गती, गर्भपिशवीचे तोंड उघडण्याचे प्रमाण, बाळ सरकण्याच्या अवस्था वगरे अनेक गोष्टींवर ते सतत लक्ष ठेवून होते. प्रसूतिपूर्व शेवटच्या तपासणीत डॉक्टरांनी बाळ पायाळू आहे व ते योग्य पद्धतीने फिरले नाही तर सिझर लागेल याचे सूतोवाच तिच्या नवऱ्याकडे केलेले होतेच.
प्रत्येक कळ सहन करताना तिला ब्रह्मांड आठवत होतं. नातेवाईक बायकांपकी जी बाई तिला धीर द्यायला यायची ती ती स्वत:च्या डिलिव्हरीच्या कहाण्या ऐकवत होती. दोन वाजता डॉक्टर ओपीडीतले पेशंट संपवून तिच्याकडे आले. त्यांनी तपासून सांगितलं, ‘हे बघा. एवढी इंजेक्शने देऊनदेखील बाळाची प्रगती झालेली नाही. कळा भरपूर जोराच्या आहेत, पण बाळ पुढे सरकायला त्यांचा काही उपयोग होत नाहीये. सिझर करावंच लागेल. बाळ-बाळंतीण दोन्ही सुखरूप हवे असतील, तर मला सिझरसाठी लवकर लेखी परवानगी द्या. मी अजून ट्रायल देऊ इच्छित नाही.’ हे ऐकून ‘हां डॉक्टर, जरा थांबा, आम्हाला विचार करायला जरा वेळ द्या;’ असे सांगून निम्मे नातेवाईक तिथून निघून गेले. इकडे डॉक्टर, नस्रेस, – डोळ्यांत तेल घालून पेशंटचे, बाळाचे मॉनिटिरग करत कधी एकदा सिझरची परवानगी देतात याची वाट पाहत होते. या गदारोळात ती बिचारी कळा देऊन देऊन थकत चालली. डॉक्टरांनी – भूल देणाऱ्या डॉक्टरांना फोन करून ‘कधीही मी सिझरसाठी बोलावीन, तू तयार राहा’ असे कळवले. डॉक्टरांनी सिझर करणे अपरिहार्य असल्याचे सांगून तब्बल एक तास झाला, तरी तिच्या नातेवाईकांकडून काहीच उत्तर आले नाही. शेवटी पुन्हा उरलेल्या नातेवाईकांना केबिनमध्ये बोलावून डॉक्टरांनी विचारलं, तेव्हा ते म्हणाले, ‘थांबा ना जरा, आमच्या मोठय़ा काकांना येऊ देत, ते ठरवतील.’ डॉक्टरांनी संभाव्य धोक्याची कल्पना देऊनही सर्व परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच होती. अशा वेळेला डॉक्टरांच्या मनाची जी घालमेल होते ना, ती ‘जावे त्याच्या वंशा त्यालाच कळे’ अशी असते. पुन्हा थोडय़ा वेळाने सिस्टर लेबर रूमच्या दाराबाहेर जाऊन नातेवाईकांना बोलावू लागली; तेव्हा त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या, ‘आजकालच्या डॉक्टरलोकांना ना जरा थांबायला नको की पेशंटला वेळ द्यायला नको. ते तर सिझर सांगणारच; त्यात जास्त पसा मिळतो ना! मी डॉक्टरांची पॉलिसी चांगली ओळखून आहे. माझ्या आत्तेबहिणीच्या जावेच्या मुलीलाही यांनी असंच सिझर सांगून चांगले बिल लावले होते’. ही मुक्ताफळं ऐकून सिस्टर चरफडत डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनाही हे संवाद नवे नव्हते, पण त्यांची उद्विग्नता वाढवणारे मात्र नक्कीच होते. त्यांनी सिस्टरला पेशंटकडे लक्ष द्यायला सांगून संपूर्ण वॉर्डचा राऊंड संपवला; व वॉर्डच्या सिस्टरला प्रत्येक पेशंटबद्दल सूचना देऊन ते ऑपरेशन थिएटरकडे वळले व तेथील सिस्टरला सिझरची तयारी करून ठेवायला सांगितली. परवानगी मिळाल्यावर या गोष्टीत वेळ जायला नको हा त्यामागचा हेतू! असहायता, राग सगळ्यांवर काबू ठेवून ते पुन्हा पेशंटजवळ गेले. कळांचा जोर वाढत होता पण बाळ पुढे सरकत नव्हते. हतबल होऊन ते बाहेर आले व त्यांनी तिच्या नवऱ्याला बोलावलं, ‘तुम्ही काय ठरवलं आहे तुमच्या पेशंटबद्दल? मला लवकर निर्णय हवा आहे. मी सिझर सांगूनही तीन तास होऊन गेले आहेत.’ त्यावर कोणीतरी आत्याबाई पुटपुटल्या ‘पण डॉक्टर, सिझर अगदी लागेलच का करायला? नक्की नॉर्मल नाही का होणार?’ डॉक्टर म्हणाले, ‘पुन्हा वेगवेगळ्या मार्गानी तेच तेच प्रश्न विचारून सिझरची गरज कमी होणार आहे का? या परिस्थितीत किती वेळ घालवणार आहात तुम्ही?’ त्यांचा आवाज नाही म्हटलं तरी थोडा चढलाच. तेवढय़ात धापा टाकत लेबर रूममधली एक सिस्टर डॉक्टरांना बोलवायला आली, ‘सर, सर, लगेच आत या; बाळाचा काही भाग आता खालून दिसायला लागला आहे.’ डॉक्टर तत्काळ आत गेले व त्यांनी पाहिले तेव्हा बाळाची शू ची जागा, त्याच्या आजूबाजूचा भाग दिसू लागला होता. खूप काळ आत कमी जागेत अडकून पडल्यामुळे तो भाग सुजलासुद्धा होता. वैतागून डॉक्टर म्हणाले, ‘आता त्या सगळ्या नातेवाईक बायकांना आत बोलावून बघू दे एकदा प्रत्यक्ष- हे पायाळू बाळ कसं अडकलं आहे ते; मग तरी ते लगेच सिझरला हो म्हणतील. मला या पेशंटची खरंच कीव येते.’ सिस्टरने खरंच दोघी-तिघींना आत बोलावलं. त्यांनी ते पाहिलं आणि त्या चीत्कारल्या, ‘अय्या, मुलगाच आहे बघ; मी म्हटलं नव्हतं का तिचं पोट बघून की हिला मुलगाच होणार म्हणून! बाहेर जाऊन आत्ता भाऊजींना सांगते की द्या तुम्ही परवानगी लागलीच.’ जे डॉक्टरांच्या डोक्यात पुसटसंदेखील आलं नव्हतं तेच घडलं होतं. ‘याचि देहि, याचि डोळा’ मुलगा जन्माला येणार हे कळताच त्या विजयोन्मादात चुलत सासूने बाहेर जाऊन ताबडतोब पेशंटच्या सासऱ्याची व तिच्या नवऱ्याची सही आणलीदेखील! जे इतक्यातासात शक्य झालं नव्हतं, ते मुलगा असल्याचं कळताक्षणी लगेच शक्य झालं. डॉक्टरांनी भूलतज्ज्ञ डॉक्टरांना तातडीने बोलावलं व पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं. आत नेल्यावर बाळाचे ठोके तपासले; ते व्यवस्थित होते. भूल देण्यासाठी पेशंटला पाठीत पोक काढून बसवणंही शक्य नव्हतं, कारण तिच्या अवघड जागेत बाळाचे काही भाग खाली आलेले होते. शेवटी तिला एका कुशीवर झोपून, पाठीत वाकायला सांगून मोठय़ा कष्टाने दोन-तीन प्रयत्नानंतर भूलतज्ज्ञांना कशीबशी ती दोन मणक्यांतील नियोजित जागा मिळाली व त्यांनी तिथून भूल दिली. तिला सरळ झोपवून आता सिझर चालू करणार तेवढय़ात डॉक्टरांना बाळाचे ठोके लागेनासे झाले. दोन्ही डॉक्टरांना या गोष्टीची खात्री पटली व ते हताश झाले. डॉक्टरांना इतक्या मानसिक ताणानंतर- एका जिवाच्या निर्मितीचा हा क्षण असा मृत्यूने झाकोळावा याचं अपरंपार दु:ख, स्वत:ची मर्यादा, हतबलता आणि वेळेवर सांगूनही पाच तास सिझरची परवानगी न देता, आता मुलगा होणार कळल्यानंतर परवानगी देण्यातली नातेवाईकांची चपळाई या साऱ्या गोष्टी निराशेच्या खाईत टाकून गेल्या. शेवटी मृत अर्भक काढण्यासाठी गर्भाशयावर जखम नको म्हणून सिझर न करता, त्याच बेहोशीच्या अमलाखाली बाळ कसंबसं ओढून काढावं लागलं.
या घटनेला दहा-बारा र्वष उलटून गेलीत तरी माझा भूलतज्ज्ञ मित्र ही घटना विसरू शकलेला नाही; कारण ती केस करणारा तोच बेहोशीचा डॉक्टर असल्याने आजही ही कथा मला सांगताना त्याचे डोळे भरून येतात. तशा अवघड परिस्थितीत बेहोशी देण्याला लागलेल्या १०-१५ मिनिटांच्या कालावधीचं अपराधीपण त्याला पुढे कित्येक दिवस छळत होतं व तो अस्वस्थ होई; कारण तो तेवढा संवेदनशील होता. पण डॉक्टरांनी सिझरचा निर्णय दिल्यावर परवानगी देण्यासाठी पाच तासांचा अमूल्य वेळ फुकट घालवलेल्या नातेवाईकांचं काय? त्या अक्षम्य उशिराची जबाबदारी त्यांचीच आहे. आपण का वाईट वाटून घ्यायचं?’ असं त्या स्त्रीरोगतज्ज्ञांनी त्याला समजावलं. दोघेही डॉक्टर्स आपापल्या क्षेत्रात तेव्हाही व आजही पारंगत म्हणून ओळखले जातात. प्रश्न हा आहे की, एका अडलेल्या बाळंतिणीची सुटका करायची की नाही, हे ठरवणं – तिला मुलगा होणार की मुलगी यावर कसं अवलंबून असू शकतं? मुलगा होणं वा मुलगी होणं यातल्या पारंपरिक कल्पनांचं जोखड स्त्रियांच्याच मनावर एवढं पक्कंअसावं हे वैषम्य नाही का?
म्हणूनच मी सुरुवातीला खेदाने म्हटलं ना-‘ही सत्यकथा आहे एका नवनिर्माणाची.. जे कधी झालंच नाही.!’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा