दि. ५ जानेवारी व १२ जानेवारी २०१३ रोजी मंगला सामंत यांनी दोन विस्तृत लेख लिहून स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या मुळाशी जाऊन अत्यंत समर्थपणे शोध घेण्याचा प्रयत्न केलाय याबद्दल शंकाच नाही. शरीरशास्त्र, समाजशास्त्र, तर्कशास्त्र अशा शास्त्रांचा आधार घेऊन हे लेख लिहिले गेले असल्याने ते शास्त्रशुद्ध झाले आहेत म्हणूनच त्या लेखात सांगितलेल्या वास्तवांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
आपल्या पारंपरिक लैंगिक नीतिमत्तेच्या कल्पना आता त्याज्य करून आधुनिक काळानुसार नवीन कल्पना स्वीकारल्या पाहिजेत, यासाठी जी प्रगल्भ मानसिकता हवी ती घडविण्याचे काम आता समाजशास्त्रज्ञांनी करावयाचे आहे. अर्थात त्यामध्ये सनातनी, धर्मवेडे व परंपरावादी मंडळींचा मोठा अडसर होईल. कारण आमच्या जुनाट विचारसरणीमध्ये लैंगिक वासनांचं ‘दमन’ केले पाहिजे शमन नाही असाच पुकारा केला आहे. हे अत्यंत अनैसर्गिक आहे हे या मंडळींच्या लक्षात येत नाही. म्हणूनच लैंगिक वासना अनावर झाली तर अत्यंत ‘सहजगत्या’ तिचे शमन होईल अशी परिस्थिती समाजात निर्माण झाली पाहिजे, ती आज नाही हे तितकंच खरं!
लैंगिक गुन्हे कमी व्हावे म्हणून शालेय पातळीवर लैंगिक शिक्षण अत्यंत तातडीचे आहे. त्या शिक्षणात स्त्रीकडे निरोगी दृष्टीनं कसे पाहावे, नेमकं प्रेम-वासना यातला फरक सांगणे आदी गोष्टींचा अंतर्भाव असायला हवा. शिक्षकांना या संदर्भात मोठे योगदान करता येईल. एवढं मात्र खरं, समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे’, म्हणून लैंगिकदृष्टय़ा आपला समाज निकोप होईल, असा आशावाद बाळगायला काहीच हरकत नाही.
– चंद्रसेन टिळेकर, अंधेरी (पू.), मुंबई.

ध्यास लागता आत्मशोधाचा
नवीन वर्षांतील नव्या रूपातील ‘चतुरंग’ चे स्वरूप खूपच भावले. प्रजासत्ताक दिनाच्या पुरवणीतील सारेच लेख चांगले आहेत. ‘ते झेंडावंदन येरवडा जेलमधील’ हा रोहिणी गवाणकर यांचा लेख वाचून स्फूर्ती मिळाली. स्फुरण चढले. कारागृहाच्या प्रवेशद्वाराच्या शिखरावर तिरंगा फडकवणाऱ्या, देशप्रेमाने भारलेल्या त्या शूर युवतींची कामगिरी वाचून ऊर अभिमानाने भरून आला. नारी संघटनेतून कशाप्रकारे शक्ती निर्माण होते आणि असाध्य ते साध्य होते हे समजले. त्या वीरांगनांना मानाचा मुजरा. सोबतच असलेला ‘लिहित्या व्हा..’  हा ज्योती तिरपुडे यांचाही लेख खूप सुखावून गेला. लेखाच्या सुरुवातीच्या ओळी वाचताना जणू आपल्याच मनातील विचारांचे प्रतििबब आहे असे वाटले. मागील वर्षी ‘चतुरंग’ ने एका विषयांवर प्रतिक्रिया मागवल्या होत्या ,त्या पाठवताना माझ्या मनात अशाच विचारांचा गोंधळ उडाला होता, तरी मी प्रयत्न केला. उल्लेखनीय प्रतिसादात नाव आल्यामुळे हुरूप आला. आत्मविश्वास वाढला. आम्हाला लिहिते केल्याबद्दल ‘लोकसत्ता चतुरंग’चे खूप आभार. नागपूरमध्ये या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला हे उत्तमच. आमच्याही शहरातून अशा कार्यशाळांचे आयोजन झाल्यास माझ्यासारख्या अनेकींना सहभागी होता येईल, मार्गदर्शन मिळेल व आनंद लुटता येईल.
ध्यास लागता आत्मशोधाचा
करीत जावे आत्मचिंतन
आत्मज्ञान आत्मसात होता
उरी भरेल आत्मानंद.
-सौ.शिल्पा फडके,अंधेरी

rape college student in Odisha
Rape On Girl : महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार, कॅफेतला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग, सहा नराधम अटकेत
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
stepfather rape daughter
मुंबई: अडीच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या, मानखुर्दमधील धक्कादायक घटना
Supriya Sule asked why the investigative agencies are misusing power
सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांचा ससेमिरा कशासाठी; सुळे यांचा सवाल
Loksatta editorial on Donald Trump unique campaign in us presidential election
अग्रलेख: ‘तो’ आणि ‘त्या’!
Book Self discovery in space Science
बुकरायण: अंतराळातला आत्मशोध
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण

लालन ताईंचे छान शब्द
२६ जानेवारीच्या ‘चतुरंग मफल’ या सदरातील अभिनेत्री लालन सारंग यांनी लिहिलेला लेख खूप आवडला. प्रत्येक स्त्रीच्या मनाची तीच तडफड आहे, परंपरा! तेंडुलकर व पूर्वीचे नाटककार फार विचारी होते. दुसऱ्याच्या बाजूने सखोल व प्रमाणित विचार करण्यासाठीची क्षमता अंगात असायला हवी, हेच खरे!  
अगदी लहान वयापासून, गोष्टी ऐकण्याचे वय असल्यापासून मुलेमुली हेच ऐकत असतात, थोर परंपरा. तसेच ठसवले जाते त्यांच्या मनातून. स्त्री म्हणजे ‘अनंत काळाची माता ‘. दुसरे काय तर स्त्री ‘गृहलक्ष्मी’ म्हणजे तिची लक्ष्मणरेषा घराच्या आत. घराची व घरातल्या मंडळींची सगळी जबाबदारीही अर्थात तिची. तिसरे काय तर म्हणे ‘अन्नपूर्णा’ म्हणजे स्वयंपाकघर. अर्थातच तिने सांभाळायचे. बाकीच्यांनी फक्त हादडायचे! अर्थात हे सर्व करताना मनाचे काहीच नाही करायचे, सगळे कसे अगदी सासरच्या परंपरेला शोभेल असेच व्हायला हवे. हळदीकुंकूसहित व्रतवैकल्ये, कुलधर्म, कुलाचार  तिनेच करायची. एकतर कुंकवाचा व पर्यायाने तिचा धनी त्याच्यासाठी किंवा मग पोटच्या गोळ्यांसाठी म्हणजे अर्थातच मुलांसाठी. ब्लॅक मेल परंपरा !! हे ‘चलाख’ परंपरेचे जोखड  तिच्या गळ्यात कितीही रुतले तरी ते तिलाच झुगारावे लागणार हे लालनताईंनी किती छान शब्दात सांगितले आहे..
‘‘आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव करून द्यायला हवी. पुरुषांच्या बरोबरीनं वागून, त्यांच्याइतकंच बाहेर कमवून कधीही समान हक्कं मिळणार नाही. त्यापलीकडे जाऊन तिनं आधी आपलं मन स्वतंत्र केलं पाहिजे. पारंपरिकतेचं जोखड झुगारून दिलं पाहिजे. जोपर्यंत तिचं मनच अशा वर्गवारीला बळी पडत राहील तोपर्यंत स्त्री कधीच मुक्त होऊ शकणार नाही.’’
 बाकी कुणीही येणार नाही कारण स्वत:च्या मस्त आरामात कोण खोडा घालून घेईल? तिने स्वत:साठी काहीच करायचे नाही व तिच्यासाठी इतर कुणीही व्रत -ब्रीत करण्याचा प्रश्नच नाही. तशी परंपराच नाहीय ना आपल्याकडे !
राधिका, ई-मेलवरुन

स्वातंत्र्याचे मोल अनमोल
‘ते झेंडावंदन…येरवडा जेलमधलं’ हा रोहिणी गवाणकर यांचा लेख वाचला आणि अभिमानानं ऊर भरून आला. आपल्या देशातील अनेक वीर योद्धयांप्रमाणेच विरांगनांनीही आपल्या प्राणांची बाजी लावत स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. म्हणूनच आपण हे स्वातंत्र्य उपभोगतोय. पण या स्वातंत्र्याला गेल्या काही वर्षांपासून उथळपणा आलाय. स्वातंत्र्यसैनिकांचे मोल कस्पटासमान लेखले जाते आहे. हे पाहून खंत वाटते. गेल्या ६५ वर्षांचा विचार करता स्वातंत्र्योत्तर भारताने अनेक क्षेत्रांत नेत्रदीपक प्रगती केली आणि त्याच वेळी आपल्याला स्वातंत्र्याचा विसर पडला. स्वैराचाराचा उथळपणा समाजात तळागाळापर्यंत मुरत चालला आहे. आजच्या तरुण-तरुणींना सुखेनव स्वातंत्र्य मिळाल्याने त्यांनाही करण्यासारखे काहीच शिल्लक राहिले नाही.
१५ ऑगस्ट २००२ रोजीची गोष्ट. कुठल्याशा चॅनेलवर एक पत्रकार भारताच्या संसद भवनासमोर उभा राहून येणाऱ्या-जाणाऱ्या तरुणांना तसेच इतरांना महात्मा गांधींचे संपूर्ण नाव विचारत होता. खेदाची गोष्ट म्हणजे, याचे उत्तर फक्त दोन-चार अपवाद वगळता कुणालाच देता आले नाही. कुणी म्हणाले महात्मा मोहनदास गांधी तर कुणी करमचंद गांधी. तर, आणि कुणी काही. ज्या महात्मा गांधींनी आपल्या अिहसेच्या लढय़ाने इंग्रजांना हा भारत देश सोडून जायला भाग पाडले, ज्यांची कीर्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली आहे, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीचे संपूर्ण नावही आजच्या पिढीला माहीत नाही. ही खरे तर आपल्या भारताची (नव्हे इंडियाची) शोकांतिका आहे. महात्मा गांधींचे नाव सांगता न येणे म्हणजे सख्या बापाचे नाव न सांगता येण्यासारखे आहे.
-धनराज खरटमल, कांजुरमार्ग

धुमसते निखारे
‘फूल बने अंगारे’ हा डॉ.अनघा लवळेकर यांचा १९ जानेवारीच्या ‘चतुरंग’मधील लेख विचारप्रवर्तक होता. खरं तर स्त्री हे टोकाच्या भावनांचं रसायन आहे असं म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही.
स्वत आणि कुटुंब यांच्याबद्दलची प्रेमभावनाही टोकाची, भौतिक, वैयक्तिक, कौटुंबिक सुखाच्या साधनांबाबतचा आपलेपणाही टोकाचा, त्यात कोणीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहे, हा एकदा संशय आला की तोही टोकाचा, त्यातून निर्माण होणारी असुरक्षिततेची भावनाही टोकाची आणि या साऱ्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीचा निचरा करण्यासाठी केली जाणारी कृतीही टोकाची.
यामुळेच असेल कदाचित पण पूर्वी एकत्र कुटुंबातील स्त्रियांना कौटुंबिक हिताच्या / प्रश्नांच्या बाबतीतील निर्णय प्रक्रियेत सामील करून घेत नसत. शिवाय स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू होत हे सर्वचजण अनुभवत, सासू-सुनेच्या रुपात. आता ते वरपांगी कमी झालेलं दिसतं. पण, ते विभक्त कुटुंबपद्धतीमुळे ‘दुरून डोंगर साजरे’ आणि स्वतच्या उत्पन्नसाधनांमुळे ‘मनाची राणी’ झाल्यामुळे. नाहीतर ‘धुमसते निखारे’ कुणी फुलवण्याचा अवकाश,.. िहदी मराठी मालिकांमध्ये भडकपणे दाखवतात तसे किस्से काहीअंशी प्रत्यक्षात घडायला लागतात.
लेखामध्ये स्त्रियांनी केलेल्या िहसेची उदाहरणं दिली आहेत. त्यात आठवण्याजोगी आणखी उदाहरणं म्हणजे, पुण्यात वयस्कर घरमालकानं भाडेकरूच्या मुलीवर केलेल्या बलात्कार व खुनाची घटना. यात पुरावे नष्ट करायला मदत करणारी त्या दुर्दैवी मुलीची आई; दुसरं उदाहरण शिर्डीच्या कोवळ्या जीवाच्या बलात्कार व खून प्रकरणातील आरोपी सुनील साळवे याची पत्नी त्याला आजपावेतो त्याच्या पापाची प्रेतं गाडायला मदत करत होती ते. या दोनही घटनांमध्ये आरोपी पुरुष सर्वार्थानं फाशीच्या शिक्षेला पात्र आहेत यावर जनमत ठाम आहे. पण माफीच्या साक्षीदार झालेल्या त्या खुनातल्या बायका, त्यांचं काय, त्यांनी स्वतची कातडी बचावत आरोपी पुरुषांचा फास आवळलाच ना ?
 आता अत्याचाराचा सामना करण्यासाठी सगळीकडे कार्यशाळा सुरू झाल्यात. त्यात कराटे शिकवतील, मिरची पूड देतील, पिनांचा जुडगा वापरा म्हणतील. पण त्या स्त्रियांना प्रशिक्षण देताना हेही सांगायला हवं की, आपल्या शिक्षणाचा, नातेसंबंधांचा, उपलब्ध भौतिक साधनांचा आपल्याकडून गरवापर होणार नाही, टोकाची कृती होणार नाही याचे पदोपदी भान ठेवायला हवं. कारण तुमच्या मानसिकतेवर स्त्री-पुरुष समानतेचं यश अवलंबून आहे. बदलत्या स्त्री प्रतिमेवर चिंता व्यक्त करून तिचं रूप शुभंकर व्हावं ही अपेक्षा करणाऱ्या लेखिकेचा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
-श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>