रुचिरा सावंत
संशोधन क्षेत्रातल्या स्त्री वैज्ञानिकांचं योगदान, या विषयाचा आवाका किती प्रचंड आहे हे लक्षात आलं या सदराचा वर्षभराचा प्रवास करताना. आज अनेक स्त्री संशोधक मातीची सकसता वाढवण्यापासून ते आकाशातील ग्रहताऱ्यांचा शोध घेत आहेत. त्यांचं काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा तर या सदराचा उद्देश होताच, पण त्याच बरोबरीनं शालेय, महाविद्यालयीन मुलांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करणं, संशोधिकांच्या परिचयाच्या माध्यमातून त्यांना या क्षेत्रांतील संधींचा परिचय करून देणं हाही होताच. तो पूर्ण होत असल्याचं वाचकांच्या इ-मेल्सवरून, प्रत्यक्ष भेटीगाठींतून कळत गेलं. हे सदर आज जरी समाप्त होत असलं तरी जगभरात होत असलेल्या संशोधनाचा शोध घेण्याचा प्रवास अखंड चालू राहणार आहे..
२०२१च्या ऑक्टोबरमध्ये ‘लोकसत्ता चतुरंग’च्याच ‘दशकथा’ या विशेष पुरवणीमध्ये ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान, शोध-संशोधन’ या क्षेत्रातल्या स्त्रियांच्या योगदानाचा आढावा घेणारा लेख मला लिहायला सांगितला होता. त्या लेखाला वाचकांकडून आलेला प्रतिसाद लक्षात घेऊन २०२२ मध्ये या विषयाला समर्पित वार्षिक सदर ‘चतुरंग’मध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव माझ्याकडे आला. आणि हे सदर साकार झालं. आज वर्ष संपताना, या सदरातला शेवटचा लेख लिहिताना हा सारा प्रवास आठवतो आहे.
सदर सुरू करण्याआधी संपादकांशी दीर्घ चर्चा झाल्या आणि त्यातूनच मी माझ्यासाठी काही नियम ठरवले. हे सदर जरी संशोधिकांविषयीचं असलं तरी ते केवळ व्यक्तिचित्रण नसून विज्ञानव्रतींच्या कहाण्या सांगत असताना नव्या विषयांची व विज्ञानाची ओळख वाचकांना करून द्यायची होती. ‘प्रत्यक्ष संवाद झाल्याशिवाय लेख लिहायचा नाही. आणि लेख लिहून झाल्यावर वैज्ञानिकेकडून सगळं इत्यंभूत तपासून घेतल्यावरच ते संपादकीय मंडळाकडे पाठवायचं.’ असा आणखी एक नियम मी स्वत:ला घालून दिला. पण त्यामुळे अनेकदा लेख पाठवायला उशीरही होत गेला. पण वर्षभराचा हा अकल्पनीय आणि रंजक प्रवास होता, हे निश्चित.
या सदराच्या निमित्तानं माहितीच्या कक्षा रुंदावल्या जाव्यात व नव्या क्षेत्रांची दारं सर्वासमोर खुली व्हावीत हा माझा अट्टहास. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड रुजावी, विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी हा आणखी एक उद्देश होताच. संशोधिकांचा ‘स्व’च्या दिशेनं झालेला प्रवास, त्यांना उमगलेलं जीवनाचं सार या जोडीनंच सर्वाना विज्ञान व संशोधन सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न या लेखांच्या माध्यमातून सुरू केला. या जोडीनंच या संशोधिकांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावं, लोकांना त्यांचं कार्य समजावं व त्यांच्या कामाचा, योगदानाचा यथोचित गौरव व्हावा, ही मनापासून इच्छा होतीच.
या संशोधिका-वैज्ञानिकांबरोबर संवाद साधताना, त्यांच्या प्रवासाच्या कहाण्या ऐकताना मला एक व्यक्ती म्हणून त्यांची ओळख झाली. विविध भाषा बोलणाऱ्या, जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या, विविधांगी क्षेत्रात समरसून काम करणाऱ्या, विविध वयोगटाच्या तब्बल पंचवीस ज्येष्ठ मैत्रिणी मला यानिमित्तानं भेटल्या. वेळेचं भान विसरून केलेल्या त्या ‘दिल-से’ गप्पांनंतर त्यांचा स्नेह मला लाभला. हे सदरामुळे मिळालेलं मोठं बक्षीस वाटतं मला. त्यानिमित्तानं विज्ञानातल्या अनवट वाटा गवसल्या. त्यांच्याविषयी तज्ज्ञांकडून, दिग्गजांकडून समजून घेता आलं. शिकता आलं. सदर लेखनाच्या निमित्तानं त्या विषयांचा अभ्यास झाला. खूप वाचनही झालं. या सगळय़ा गोष्टी, त्यांचे प्रवास वेगवेगळय़ा काळात, वेगवेगळय़ा भागात घडत असले, तरी त्या कथा कायम मला एकमेकांशी जोडलेल्या भासल्या. एकसारख्या वाटल्या. त्यांचं विज्ञानावरचं प्रेम, ते सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठीची इच्छा, आपल्या कामाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ आणि प्रयत्न, प्रकाशझोतापासून दूर राहून कार्य करण्यासाठी निवडलेलं क्षेत्र आणि सगळय़ांच्यात भरभरून असलेला दुर्दम्य आशावाद असं सगळंच किती सारखं! महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारताना संघर्ष सर्वानाच अटळ असतो, म्हणत आपल्या अडचणींकडे प्रवासाचा निव्वळ एक अपरिहार्य भाग म्हणून पाहण्याची प्रत्येकीची वृत्ती. जणू त्या एकच गोष्ट मला वेगवेगळय़ा भाषेत आणि नवीन पात्रांसहित सांगत होत्या.
मला त्यांच्या जडणघडणीच्या या कहाण्यांमध्ये आपल्या समाजाचं, त्यांच्या कुटुंबाचं प्रतिबिंब पाहायला मिळालं. आणि जाणवलं, या कथा केवळ त्यांच्या वैयक्तिक प्रवासाच्या किंवा संघर्षांच्या नाहीतच मुळी! जगत असताना, घडत असताना, जगण्याचे स्तर उंचावत असताना, स्वप्नं पाहताना येणाऱ्या समाजभानाच्या गोष्टी आहेत या. विविध पातळय़ांवरील वैयक्तिक, कौटुंबिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक भूमिका अधोरेखित करणाऱ्या या गोष्टी खऱ्या अर्थानं समाजाविषयीचं, व्यवस्थेविषयीचं भाष्य करतात हा ठाम विश्वास यादरम्यान मला आणि वाचकांनाही मिळाला. त्यांच्या या गोष्टी वाचून वर्षभर अनेक इ-मेल्स आले. फोन कॉल्स आले. भेटीगाठींमध्ये अनेक हृद्य अनुभव आले. स्त्री वैज्ञानिकांच्या आयुष्याचे आणि पर्यायानं विज्ञानाचे विविध पदर उलगडण्याचा हा प्रयत्न, सदर सुरू करण्यासाठीचा उद्देश सर्वार्थानं सफल होतोय याची पोचपावती देणाऱ्या या अनुभवांनी मला आत्यंतिक आनंद आणि समाधान दिलं.
शहरी, निम्नशहरी आणि गावागावांतून विद्यार्थी व शिक्षकांनी विज्ञानाविषयी त्यांना निर्माण झालेल्या कुतुहलाविषयी लिहिणारे ईमेल्स केले. सोलापूर, परभणी, बारामती, कोकण भागातल्या शाळांमध्ये विज्ञानाच्या तासाला या लेखांचं सामूहिक वाचन घेणारे आणि शाळेच्या नोटीस बोर्डवर हे लेख लावणारे शिक्षक मला भेटले. इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या, आपल्या पालकांकडून लेख वाचून घेणाऱ्या माध्यमिक शाळेतल्या मुलांचे इ-मेल्स यानिमित्तानं मला आले. आपल्या मुलींनी जग सुंदर होण्यासाठी हातभार लावावा यासाठी दर शनिवारी नित्यनेमानं या लेखांचं कौटुंबिक वाचन करणारे पालक भेटले. हे लेख वाचून ‘मला वैज्ञानिक व्हायचं आहे,’ असं उत्साहानं सांगणारे अनेक शालेय विद्यार्थी भेटले. प्रयोगशाळांच्या उद्घाटनाची, विज्ञान प्रदर्शनाची आमंत्रणं आली.
एकदा मेलबॉक्समध्ये हार्वर्ड विद्यापीठातल्या एका वैज्ञानिकेचा इ-मेल आला. या सदराविषयी आणि त्यातल्या सध्याच्या विज्ञानजगातल्या मी सांगत असलेल्या नव्या गोष्टींविषयी ऐकल्यामुळे लेखांचं इंग्रजी भाषांतर उपलब्ध आहे का, अशी चौकशी करणारा तो एका ज्येष्ठ वैज्ञानिकेचा ईमेल वाचून मी शहारून गेले. त्यांनी माझ्या केलेल्या कौतुकापेक्षा या सदराच्या माध्यमातून मी सांगत असलेल्या गोष्टी परदेशातही चर्चिल्या जाताहेत, महत्त्वाच्या वाटताहेत हा विश्वास मिळाला. तर एकदा एका महत्त्वाच्या विज्ञानसंस्थेतल्या ज्येष्ठ वैज्ञानिकांनी मला त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये शनिवारी टी-टाईमच्या वेळी या लेखांवर आधारित नित्यनेमानं होणाऱ्या चर्चाविषयी सांगितलं. जगभरातल्या अनेक वैज्ञानिकांनी माझ्या कार्यात आपल्या क्षमतेनुसार सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. ज्येष्ठ वैज्ञानिकांकडून, संशोधन संस्थांकडून भेटीसाठीची आमंत्रणं आली. एका ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञांनी फार कौतुकानं मला भेटायला बोलावलं. स्वत: माझ्यासाठी जेवण करून मला खूप मायेनं जेवू घातलं. माझ्या वयाविषयी त्यांनी बांधलेले अंदाज ऐकून आम्ही खूप हसलो आणि त्या दिवशी एक मायेचं नातं मला कायमस्वरूपी मिळालं.
एकदा कॅफेमध्ये बसले असताना शेजारच्या टेबलावरच्या महाविद्यालयीन घोळक्यानं सदराविषयी येऊन गप्पा मारल्या. एका ठिकाणी मीटिंगसाठी गेले असताना त्यांच्या ड्रायव्हरनी येऊन हळूच माझी आणि सदराची चौकशी केली. ती मीच आहे याची खात्री करून घेतली. तर एके दिवशी रिक्षात बसल्यावर रिक्षावाल्या दादांनी ‘‘चतुरंगमध्ये वैज्ञानिकांवर एक सदर येतं. तुम्ही त्यांच्यासारख्या दिसता.’’ असं मला बिचकत सांगितलं. मी तीच आहे असं सांगितल्यावर आपल्या शाळेत जाणाऱ्या मुलांबरोबर ते लेखांचं वाचन करतात असं अगदी हुरळून सांगत होते. एका लांब पल्ल्याच्या प्रवासामध्येसुद्धा मला अशीच चौकशी करणारे एक दादा भेटले. मी तीच आहे हे कळल्यावर कॉमर्स विषयाची पार्श्वभूमी असणारे ते प्रवास संपेपर्यंत विज्ञानावर गप्पा मारत होते. गृहिणींनी पाठवलेले, ‘विज्ञान आता आपलंसं वाटतंय,’ असं सांगणारे इ-मेल्स, फेसबुक मेसेज पाहून मला झालेला आनंद कसा मांडू! विज्ञान खऱ्या अर्थानं सामान्य माणसांपर्यंत पोहोचतंय आणि हे सदर त्यासाठी निमित्त ठरतंय हा आनंद शब्दांत व्यक्त करण्यापलीकडे.
एका कार्यक्रमात भेटायला आलेल्या एका सातवीच्या मुलीला ‘तुझं स्वप्न काय?’ असं विचारल्यावर, ‘‘मला वैज्ञानिक व्हायचं आहे. एक दिवस तुम्ही माझ्याविषयी लिहाल इतकं मोठं!’’ असं ती म्हणाली! सदरात प्रसिद्ध होणाऱ्या कर्तृत्ववान वैज्ञानिकांसारखं होण्यासाठी प्रेरणा आणि इतके नवे आदर्श तिला लाभणं यापेक्षा आणखी काय हवं! तसंच आजीच्या हट्टामुळे हे सदर वाचू लागलेली आणि आता वैज्ञानिक व्हायचं नक्की झालेली, त्यासाठी तयारी म्हणून लवकरच एका प्रयोगशाळेत रुजू होणारी एक महाविद्यालयीन तरुणी एके दिवशी भेटायला आली आणि उद्देश सफल होताना पाहून मी स्तिमित झाले. सदर सुरू केल्यापासून या वर्षभरात वेगवेगळय़ा निमित्तानं आपला उद्देश सर्वार्थाने साध्य होतोय याचा खूप आनंद आणि समाधान देणारे असे अनेक अनुभव येत राहिले. अजूनही येताहेत. हे त्यापैकी अगदीच मोजके.
या सदरात प्रसिद्ध झालेल्या विज्ञानव्रतींच्या परिवारातील सदस्यांनी, पालकांनी, ‘‘आज आम्हाला खऱ्या अर्थानं आमची मुलगी नेमकं काय करते हे समजलं आणि त्याचं सगळं श्रेय तुला!’’ असं सांगणंही मला, माझ्या लिखाणाला आणि प्रयत्नांना मिळालेली आणखी एक सर्वोच्च पावती. त्यादिवशी बोलताना एका पालकांच्या डोळय़ातील ते आनंदाश्रू मला एखाद्या पारितोषिकासारखे वाटले.या सदराच्या निमित्तानं झालेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संशोधिकांच्या योगदानाची वेगवेगळय़ा पातळय़ांवर घेतली गेलेली दखल. आजवर प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील अनेकींना विविध माध्यमातून संवाद साधण्यासाठी आमंत्रणं आली, कुणाला पुरस्कार मिळाले, कुणाच्या जाहीर मुलाखतींसाठी प्रसिद्धी माध्यमांकडून चौकशा झाल्या. त्यांपैकी डॉ. प्राजक्ता दांडेकर यांना देण्यात आलेला – ‘महाराष्ट्र सेवा संघ’ यांचा ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ (पुरस्काराच्या इतिहासात पहिल्यांदाच एका वैज्ञानिकेला प्राप्त झाला) आणि झी मराठीचा ‘उंच माझा झोका’ हे दोन्ही पुरस्कार इथे अधोरेखित करण्याजोगे. या आनंदात भर पडली ती या वर्षीच्या ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कारा’साठी या सदरातल्या संदीपा कानिटकर आणि डॉ सुनीती धारवडकर यांची निवड झाली तेव्हा. या वर्षी पुरस्कारप्राप्त लोकसत्ता दुर्गापैकी ४ दुर्गा विज्ञान क्षेत्रातल्या आहेत आणि त्यांपैकी दोन जणी या सदराचा भाग आहेत ही गोष्ट किती अभिमानास्पद आहे.
या सदराच्या निमित्तानं विज्ञान क्षेत्राविषयी संवाद साधला जातोय, सामान्य माणूस हा विषय आपला समजून आणखी खोलात जाण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करू पाहतोय हा आनंदही आहेच.आज हा या सदरातला शेवटचा लेख लिहिताना मिश्र भावना आहेत. वर्षभर मला मिळालेला तुमचा स्नेह आणि प्रेम हीच माझी मोठी पोचपावती. मला जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या या समृद्ध अनुभवासाठी मनापासून आभार! ही लेखमाला आज इथे संपत असली तरी लेखमालेनं वैज्ञानिक संवादाला दिलेली चालना आणि त्यानिमित्तानं सुरू झालेल्या प्रवासाची ही केवळ सुरुवात आहे हे मला ठाऊक आहे. आणि म्हणूनच ही लेखमाला इथे थांबत असली तरी वैज्ञानिक संवाद मुळीच थांबणार नाहीये. वैज्ञानिकांच्या आणि विज्ञानाच्या या गोष्टी हे जनमानसात वैज्ञानिक विचारसरणी रुजवण्याच्या दृष्टीनं टाकलेलं केवळ पहिलं पाऊल आहे. आलेल्या अनेक इ-मेल्स आणि विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पुढील पायरी म्हणून वैज्ञानिकांच्या मदतीनं वैज्ञानिक संवाद घडवून आणण्यासाठी, नव्या वाटांची ओळख करून देण्यासाठी नव्या वर्षांत नवे प्रयत्न मी करणार आहे. तुम्हाला या उपक्रमाचा भाग व्हायचं असेल तर मला जरूर इ-मेल लिहा.
एका कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थ्यांच्या एका घोळक्यानं मला भेटून ‘आम्ही वैज्ञानिक होणार आणि वैज्ञानिक झाल्यावर तुम्हाला कळवणार. तेव्हा संपर्क करायला इ-मेल आयडी द्या.’ असं घट्ट मिठी मारत सांगितलं आणि मी अवाक् होऊन पाहत राहिले. भविष्यात येणार असलेल्या त्या आणि तशा असंख्य इ-मेल्सशी वाट पाहत, वैज्ञानिक विचारसरणी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या या कार्यात अनेक जण जोडले जातील या आशेनं आज तुमचा निरोप घेते. पुन्हा लवकरच एका नव्या वळणावर भेटण्यासाठी!
postcardsfromruchira@gmail.com