नवीन वर्ष सुरू होणार म्हणताच आपल्याला आठवतात करायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टी. मग या वर्र्षी त्या करायच्याच असं पक्क मनाशी ठरवत आपण नानाविध संकल्प करतोच. अशाच काही पूर्ण- अपूर्ण संकल्पांची ही कथा…
‘बघता बघता वर्ष संपत आलं की..’ सकाळी चहा पिता पिता माझ्या मनात आलं. गेलं वर्ष साधारणत: तीनशे दिवस मी रोज सकाळचा चहा आयता पिते आहे. कारण माझा मुलगा रोज पहिला चहा करतो आणि मलाही देतो. सकाळचा चहा आयता मिळणं ही समस्त महिलावर्गासाठी किती आनंदाची गोष्ट आहे ते वर्णन करण्यापेक्षा अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि तो सुखद अनुभव मला मिळायचं कारण म्हणजे माझ्या मुलाचा २०१२ सालचा संकल्प. डिसेंबर ११मध्ये सहज गप्पा मारता मारता मी त्याला विचारलं होतं ‘काय मग या १ जानेवारीपासून विशेष काय?’ त्यावर तो सहजच म्हणाला की, ‘तुला रोज सकाळचा पहिला चहा करून देणार.’ खरंच त्याने सुरुवात केली आणि सातत्यही राखलन् हे विशेष.
नवीन वर्षांचा संकल्प हा अनेकदा गमतीचाच विषय ठरतो. ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ वगरेसारख्या म्हणी त्याला तंतोतंत लागू पडतात. त्यामुळे विनोदी साहित्यिकांसाठी तो एक हमखास लेखनाचा विषय असतो. जो रंगतोच. कारण संकल्पाच्या नानाविध तऱ्हा आणि त्यांचे ढासळणारे बुरुज यांचंच विनोदी वर्णन हमखास रंगत आणतंच. अनेकदा वेटलॉसचा संकल्प, डाएटिंगचा संकल्प, डायरी लिहिण्याचा, सकाळी व्यायाम करण्याचा अगर स्लिम होण्याचा संकल्प हे विनादाचेच विषय ठरतात. कारण यातील बहुसंख्य कहाण्या आध्या-अधुऱ्याच राहतात आणि इतरांसाठी चेष्टेचा विषय बनतात.
पण संकल्प म्हणजे पुढे सातत्याने अमलात आणण्याजोगा एक छोटासा बदल, असं आधीच विचारात घेतलं तर संकल्प ही हास्यास्पद गोष्ट ठरू नये. याबाबतचं एक छोटसं उदाहरण. आमच्या शेजारच्या आजींचा देवपूजेबाबत फार अट्टहास. त्यामुळे देवपूजेबाबत त्यांचे कठोर दंडक होते आणि ते सर्वानी पाळलेच पाहिजेत अशी हिटलरशाहीही. पण हे सगळं मारून मुटकूनच चाललं होतं. हे त्यांच्याही लक्षात आलं होतंच. एका नववर्षांदिनी आजींनी स्वत:ला बदलत म्हटलं, ‘आजपासून मी देवपूजा मुलगा व सुनेच्या स्वाधीन करते व मी स्वत: मानसपूजेचा संकल्प करते.’ त्यामुळे पूर्वी पूजा हा जो घरात तणावाचा विषय होता तो सर्वाच्याच सोयीचा आणि आनंदाचा बनला. अशीही असू शकते संकल्पाची जादू.
अर्थात असे संकल्प करताना ते कितपत वाजवी आहेत याचाही विचार करणे गरजेचे आहे. कारण आमच्या एका साठीच्या दरम्यानच्या स्नेह्य़ांनी रोज आठ किलोमीटर चालण्याचा अघोरी संकल्प केला आणि पुढच्या आठवडय़ाच्या आधीच आठ दिवसांसाठी दवाखान्यात दाखल झाले. बरोबर साधारण आठ-दहा हजार रुपयांचा चुराडा आणि पुढचे सर्वाचेच आठ-दहा महिने वाया. अविचारी संकल्पाचा हा एक दाखला.
पण माझी एक विद्याíथनी या संकल्पाबाबत मला गुरूप्रमाणे भासते. लिहिताना खाडाखोड करण्याची आणि गिरवागिरवीची चुकीची सवय अचूक जाणून तिने संकल्प केला की, लिहायच्या आधीच विचार करून लिहीन म्हणजे खाडाखोड व गिरवागिरव होणारच नाही. त्यात सातत्यही राखलं आणि हळूहळू गणिताचा पेपरही एवढा अचूक लिहू लागली की दहावीत गणितात पकीच्या पकी गुण मिळवून बक्षीसपात्र ठरली.(तेव्हा गणितात पकीच्या पकी गुण मिळणं खूप अवघड होतं.) सुहासिनी मुळगांवकरांचा रोज एक श्लोक पाठ करत पूर्ण भगवद्गीता पाठ करण्याचा किस्सा तर आम्हा सर्वाच्याच माहितीचा आहे.
पण जर का वरील उदाहणांमधली चिकाटी आपल्याजवळ नसेल तर संकल्प करायचाच नाही का? कारण चिकाटी नसणारे माझ्यासारखे अनेकजण असतात आणि ते विनोदाचा विषय बनतात. पण माझे गुरू प्रा. आर. एस्. कुलकर्णी सर यांनी आम्हाला वर्गात सांगितलेलं एक वाक्य यावरचा रामबाण उपाय ठरतो. ते म्हणायचे, एक गोष्ट पक्की ठरवून करण्याएवढी चिकाटी नाही ना मग दहा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींना सुरुवात करा. दहांतल्या काही तरी पूर्णत्वाला जातातच. त्या एवढय़ा छोटय़ाछोटय़ा असू शकतात की, बाहेरून आल्या आल्या कपडे बदलणे, फ्रिजचं दार न आपटता लावणे, इंटरनेटवर एक तासापेक्षा जास्त वेळ न बसणे, कपडे बोळे करून न फेकणे, रोज रात्री गॅसचा नॉब बंद करणे, पाणी घेताना र्अध भांडंच घेणे, दुसऱ्याचं पूर्ण बोलून झाल्याशिवाय स्वत: सुरुवात न करणे, घरात छोटी मुलं असतील तर आठवडय़ातून एकदा त्यांच्याबरोबर पायी फिरायला जाणे अशा अनेक.
जर का या दहांपकी दहाही संकल्प साध्य झाले तर सोन्याहून पिवळं! पण समजा निम्मेच पूर्ण झाले तरी दु:खाचं कारण नाही कारण, something is better than nothing.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा