लहानपणापासूनच भीतीचे अनेक प्रकार नकळत मनात बिंबवले वा बिंबले गेलेले असतात. त्यामुळे त्याचा अनुभव घेण्याचीही अनेकांना भीती वाटते. जशा भूतकथा, रोरावता प्रवाह, जत्रेतला आकाश पाळणा, फॉर्म्युला रेसिंग किंवा बुलफायटिंगसारखे खेळ, हॉरर फिल्म्स. काही वेळा मात्र या आंधळ्या भयाचं निराकरण झाल्यावर मिळणारा दिलासा खूपच सुखाचा असतो, जसं इतर जातीधर्मांविषयी निर्माण केला गेलेला भयगंड.
भय किंवा भीती ही अगदी सार्वत्रिक भावना प्रत्येकाने अनुभवलेली. जन्मापासून अखेरच्या श्वासापर्यंत आहेचं नाही करणारा तो क्षण कधी आणि कसा येईल, हे कुणालाच सांगता येणार नाही.
मनात डोकावून पाहिलं तर बहुतेकांच्या जीवनात असा एकही दिवस नसतो की, कुठला ना कुठला भयाचा ढग मनावरून तरळत गेलेला नसतो. भीतीत सकारात्मक काही नसतं, पण तरीही ती प्रमाणाबाहेर न गेल्यास, वाईटही काही नसावं. भयमुक्त आणि त्यामुळे चिंतामुक्त मन मात्र निरभ्र आकाशासारखं, हलकं, हवंहवंसं वाटणारं पण कधीमधीच लाभणारं! भीतीची सकारात्मक बाजू बघायची, तर कधी कधी स्पर्धेत अपयशाच्या भीतीमुळे जास्तीची मेहनत होते आणि यश मिळाल्यावर भीती आणि कुरकुर दोन्ही बंद होतात. यशाची माळ गळ्यात पडल्यावर, नसलो आपण निरोगी मनाचे तरी काही हरकत नाही, अशीही उडत उडत स्वत:ची समजूत घातली जाते.
आणखी वाचा-स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?
मी एका निर्भय, वृक्षप्रेमी वनाधिकाऱ्याची लेक! पायवाटांनी जंगलं तुडवताना भीतीचा टिपूसही नसायचा मनात.‘सर्वशक्तिमान’ वाटणाऱ्या आपल्या बाबांचं बरोबर असणं, त्यांचं वेगवेगळ्या झाडांबद्दल, जंगली पशु-पक्ष्यांबद्दल सहज सांगत जाणं, अशा एकंदरीतच उत्साहाने भारून टाकणाऱ्या जीवनशैलीमुळे घनदाट जंगलांची किंवा पशूंची भीती कधी उगवलीच नाही मनात! मुक्त निसर्ग आणि त्याच्याबद्दलची वाढती उत्सुकता कायमच एक अभयारण्य बनून राहिली जीवनात! लहानपण वेगवेगळ्या गावांबाहेरच्या जुन्या चिरेबंदी सरकारी बंगल्यांमध्ये गेलेलं. तिघी बहिणींना स्वतंत्र खोल्या असायच्या. रात्री मात्र मला मोठ्या नाही तर लहान बहिणीची मनधरणी करावी लागायची, कारण बाहेरच्या झाडांच्या सावल्यांमध्ये, हलणाऱ्या फांद्यांमधून मला एकटीलाच कसले कसले भास होत, आवाज ऐकू येत. ‘भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ हे मी अक्षरश: जगलेली आहे. दिवसा कशाला न घाबरणाऱ्या मला अंधाराची प्रचंड भीती वाटत असे. उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी इगतपुरीला, आम्ही सगळी भावंडं जमायचो. रात्री हॉलमध्ये गाद्या टाकल्या की, भूतकथांना बहर येई. आम्ही १५-१६ जण असलो तरी काही भाऊ आम्हा भित्र्यांना जाम घाबरवत, विचित्र आवाज आणि वातावरणनिर्मिती करून, नंतर आरडाओरडा, जोरजोरात हसणं आणि शेवटी आजोबांनी रागवून सगळ्यांना झोपायला सांगायचं, हे नेहमीचं. या भुतांपेक्षा तर गोष्टीतले राक्षस परवडले. कुठूनही उलट्या पायांनी येऊन जीवघेणा लपंडाव तरी नाही खेळत, असं वाटत राहायचं. आमच्या घरात बालमानसशास्त्र वगैरेला फारसा थारा नव्हता. ‘पडो झडो, मूल वाढो’ हा खाक्या असल्याने माझ्या भीतीचं निराकरण करण्याचे कधी प्रयत्न झाले नाहीत, अवचेतन मनात बालपणी चविष्टपणे ऐकलेल्या, वाचलेल्या भूतकथा घर करून आहेत, त्या अजूनही बेसावध क्षणी गाठतात आणि मला घाबरवतात.
आजही अंधाराची भीती वाटतेच, पण मी तर्कसंगतीआधारे ती झटकून टाकायचा प्रयत्न करते. तो नेहमीच सफल होतो असं नाही. आपल्या भयभीती, खऱ्यापेक्षा काल्पनिकच जास्त हे कळलेलं असून, वळलेलं नाही. परीक्षा, रिझल्ट, गाडी चुकणे, पाण्यात बुडणे बाई/ सर रागावणे यांसारख्या अनेक भीतीचे प्रकार अनुभवले नाही बुवा कधी, पण उंचीवर जाऊन खाली पाहिलं की डोळे फिरतात, पोटात ढवळतं ते भीतीपोटी असावं की व्हर्टिगोमुळे हे कळत नाही. हायवे किंवा मोटर वेमध्ये अपेक्षित वेगही मला झेपत नाही. जत्रेतला आकाश पाळणा, फॉर्म्युला रेसिंग किंवा बुलफायटिंगसारखे जिवावर बेतणारे खेळ आवाक्याबाहेरचे, ‘रामसे ब्रदर्स’च्या हॉरर फिल्म्ससारखे. मी त्यांच्या वाट्याला जात नाही. वेग म्हणजे अपघात हे समीकरण डोक्यात घट्ट बसलेलं आहे. त्यातूनही अपघातात मरणारा सुटतो पण अवयव तुटून, जायबंदी होऊन जन्मभरासाठी अपंगत्व आलं तर? ही माझी ‘लाडकी’ भीती! परावलंबी जगण्याची भीती असतेच.
काही आंधळ्या भयांचं निराकरण झाल्यावर मिळणारा दिलासा केवढा सुखाचा असतो. एक उदाहरण द्यायचं तर अगदी लहानपणी खऱ्या-खोट्या गोष्टींमधून अमुक एका धर्मातल्या क्रौर्य आणि हिंसक वृत्तीबद्दल, कसा कोणास ठाऊक मनात पेरला गेलेला प्रचंड भयगंड. आम्ही रोज शाळेत चालत जायचो. वर्गमैत्रीण सकिनाचे बाबा कधीमधी तिला त्यांच्या मोठ्ठ्या गाडीने घ्यायला यायचे. माझं घर रस्त्यांत. म्हणून त्यांनी एकदा मला लिफ्ट दिली. गाडीत बसले ती घाबरूनच. नाही म्हणता येईना म्हणून. माझी भीती गावीही नसलेल्या तिच्या बाबांनी प्रेमानं माझ्या घरच्यांची चौकशी केली. मला अगदी दारापर्यंत सोडलं. या अनुभवानं मी इतकी भारावले की, प्रचंड घाबरलेल्या अवस्थेतच कसंबसं ‘थँक्यू’ म्हटलं. हे कुटुंब तर फारच छान वाटतंय हे यानिमित्तानं डोक्यात शिरलं. पुढे सकिना आणि मी खूप छान मैत्रिणी झालो. एकमेकींच्या घरी जाऊ-येऊ लागलो. त्यांचं घर आपल्यासारखंच तर आहे, हा शाळकरी मला बसलेला सुखद आश्चर्याचा धक्का! तरी तिच्या घरी जाताना निष्कारणच मनात किंचित तणाव असे, पण कॉलेज आणि नंतर व्यावसायिक जीवनात हा पूर्वग्रह मुळापासून उखडला गेला. माणसाचं बरं-वाईटपण किंवा त्याच्या सहृदय, निर्दय असण्याशी धर्माचा संबंध नसतो हे सर्वधर्मीय, सर्वजातीय मित्रत्वानं दाखवून दिलं आणि जीवन वैविध्यतेने इतकं समृद्ध केलं की, परधर्मीयां- बद्दलची बिनबुडाची भीती कुठल्या कुठे पळून गेली.
आणखी वाचा-सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा
मानवी मन म्हणजे ठाव न लागणारा डोह आहे खरा! आग, पाणी, नैसर्गिक अक्राळविक्राळ आपत्ती यांची आपल्याला मुळीच भीती वाटत नाही, असा अनेकांचा गैरसमज असतो. प्रत्यक्ष आमना-सामना होईपर्यंत चोर, गुन्हेगारही काही दबकून राहायची मंडळी नव्हेत, पण उत्तराखंडमधील महाकाय दरडी कोसळणं, बघता बघता उभा कडाच्या कडाच कोसळून पडणं. पुराचा राक्षसी लोंढा आणि लहानथोर सजीव त्यात वाहून जाताना हतबल होऊन पाहाणं हे अधिक भयप्रद होतं की, सुन्न करणारं हे कळत नव्हतं. काठावरून स्वत: सुरक्षित राहून, भयग्रस्त बळींचा धड कंठातून न उमटणारा मदतीचा धावा ऐकून जीव वाचवण्यासाठी काही न करू शकणं हा एक प्रचंड धसकाच होता. एका अनोळखी भीतीशी झालेली पहचान, ते दृश्य मागे पडायला फार काळ जावा लागला.
वाढत्या वयाबरोबर, दुसरे काही भयगंड मनात प्रवेशले, म्हणजे न्यूयॉर्क आणि इटलीत सर्वत्र जाणवणारी स्टॉकर्सची भीती, जी आपल्या देशात किंवा जगात इतरत्रही कधी जाणवत नाही. कदाचित कथा-कादंबऱ्यांतून खूप वाचलेलं असल्याने असेल, पण रात्री झगमगत्या मॅनहॅटनमधून चालताना किंवा उशिरा सबवेतून घरी परतताना उगीचच असुरक्षित वाटत असतं. आसपासची रहदारी बिनचेहऱ्याची वाटत असते.
नंतर शहरात आल्यावर नवीन गोष्टींची भीती वाटू लागली आहे. वाहन चालवणं तर दूरच राहो, रस्ता क्रॉस करणं, पुण्याच्या पदपथावर आक्रमकतेने येणाऱ्या बाइक्सचा सामना करणं वगैरे कदाचित गेली १४ वर्षं हिमालयातील शांत खेड्यात घालवल्याचा परिणाम असावा. पण फिनलंड किंवा स्वीडनमधल्या निबिड अरण्यातून, कच्च्या रस्त्यांवरून रात्री-अपरात्री पायी हिंडताना भयाचा लवलेशही मनात येत नाही. माझा पिंड दिल्लीकर. रात्री नऊनंतर एकटी फिरणं म्हणजे संकटाला आमंत्रण हे मनावर बिंबलेलं. त्यामुळे हा सुखद बदल, हे आयुष्याच्या उत्तरार्धात वेळोवेळी लाभत राहणारं विहारस्वातंत्र्य मनाला आश्वासक उभारी देणारं. एकदा अशाच एका उन्हाळ्याच्या रात्री, अकरा वाजता तीन-चार मित्रमैत्रिणींनी उमलणारी फुले बघायला जायचा बूट काढला. शुभ्र, बिनवासाची, लांब दांड्याची रानफुलं काही खास वाटली नाहीत माझ्या मोगरा, जाई-जुईवर पोसलेल्या सौंदर्यदृष्टीला, पण एक महाकाय मूस मात्र अचानक सामोरा आला. मला कुठल्याच जंगली प्राण्याचं भय वाटत नाही, त्यामुळे माझं हरखून जाणं मैत्रिणींना आश्चर्याचं वाटलं. त्यातून हे चारेकशे किलोचे प्रकरण शाकाहारी आहे हे ऐकून असल्याने लोभ वृद्धिंगत झालाच होता. त्याला मारायची आणि शिकार घेऊन जाण्याची परवानगी तिथल्या सरकारने दिली आहे, हे काही मला पटलेलं नाही.
आणखी वाचा-‘ती’ च्या भोवती : विस्तारलेल्या आईपणाचा प्रत्यय!
एक मात्र होतं. वय वाढतं तसे भीतीचे विषय बदलत जातात. अशा वळणावर भय किंवा भीती वैयक्तिक राहत नाही फारशी. प्रियजनांना कायम हरवून बसण्याच्या भीतीशिवाय…
मनातले सकारण/ अकारण भीतीचे चोरकप्पे आपोआपच बंद होत जातात आणि विस्तारलेल्या क्षितिजावरची कृष्णविवरे त्यांची जागा घेतात. जसं की, जगाच्या नकाशावरून आक्रसत चाललेल्या लोकशाहीच्या टिकण्यासाठी वांझोटी भीती वाटायला लागली आहे. हुकूमशाहीचे पोलादी पंजे आम जनतेच्या आयुष्यातलं स्वातंत्र्य संपवून संपूर्ण समाजाला कळसूत्री बनवून टाकतात. प्रगत राष्ट्रांचा अति उजवीकडे झुकता कल हाही असाच एक मुद्दा काळजीचा, पण आपल्या हातात काही नसल्याने कदाचित भीतीचाही!
arundhati.deosthale@gmail.com