‘नोकरदार स्त्रीच्या सुरक्षेचा प्रश्न’ हा विषय चर्चेसाठी घेतल्याबद्दल आपले आभार. भारतीय संस्कृतीत स्त्रीला माता, देवीचा दर्जा देण्यात आला आहे, पण ते फक्त लिहिण्यासाठी! आचरण्यासाठी नाही. स्त्री नोकरदार असो किंवा गृहिणी, तरुण असो वा लहान बालिका, ती कुठेच सुरक्षित नाही. तरीपण प्रयत्न न करता हा प्रश्न असाच अर्धवट सोडायचा? नाही.
कार्यालय, शाळा, कॉलेज इ. कुठेही असा हा त्रास होत (पुरुषांकडून होणारा लैंगिक त्रास) असेल तर सर्वप्रथम त्या पीडित स्त्रीने पुढे यायला हवे. लिहिणं जेवढं सोपं आहे तेवढं आचरणं नाही, हेही तेवढंच सत्य आहे. स्त्री आपल्यावरील हा अन्याय आपल्या कुटुंबासाठी, वैवाहिक आयुष्य नीट राहावे, करीअर आदीसाठी सहन करते. त्यामुळेच अन्याय करणाऱ्या पुरुषाला आणखीन उत्तेजन मिळते. स्त्रीच्या कुटुंबाने तिला या लढय़ात अखेपर्यंत साथ दिली पाहिजे. कार्यालयातील इतर स्त्रियांनी तिला साथ दिली पाहिजे. तिची खिल्ली, सहानुभूती यापेक्षा तिला भक्कम आधाराची गरज आहे.
काही पुरुषांमधील या विकृतीचा त्रास स्त्रियांना नेहमीच होतो. जेवढे त्या पीडित स्त्रीचे कुटुंब तिला साथ देईल तेवढी ती जास्त कणखर होईल, पण ‘अशा’ पुरुषांमध्येसुद्धा परिवर्तन घडविणे गरजेचे आहे. त्यांच्या अशा वर्तनाची त्यांच्या कुटुंबांनासुद्धा कल्पना देणे आवश्यक आहे. गरज लागेल तशी वैद्यकीय मदत त्यांना द्या. जेव्हा प्रथम त्रास त्या स्त्रीला होतो तेव्हाच तिने आपल्या इतर सहकाऱ्यांसह व कुटुंबासहित ही पावले वेगाने उचलली पाहिजेत.
जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा मात्र सकाळी गेलेली माझी मुलगी सुरक्षित घरी येईल का? ही धास्ती आईवडिलांना असते. म्हणूनच ‘मुलगी झाली’ या दोन शब्दांनी त्यांना धास्तावयाला होते. विशेषत: आईला आपली मुलगी आपल्याच घरी तरी सुरक्षित आहे का, याची खात्री वाटत नसते.
पुरुषांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदलदेखील घडवून आणू शकतो. कुटुंबातील मुलांना लहानपणापासून स्त्रीविषयीचा आदर, तिच्या मन आणि शरीर या दोन्हींचा आदर करणे याचे संस्कार व्हायला हवेत. ‘तू मुलगा आहेस म्हणून काहीही करू शकतो. तुझ्या आम्ही पाठीशी आहोत’ हे वागणं समाजात कोणतंच परिवर्तन आणू शकणार नाही. मुलींनाही प्रसंगी धीट होण्याचे मार्ग, आपल्या अन्यायाविरुद्ध कुटुंबाचा आपल्याला आधार हा विश्वासदेखील समाजातील ही कीड समूळ नष्ट करायला उपयोगी ठरेल.
ज्यांना रात्रीपर्यंत काम करावे लागते, त्यांचा प्रश्न सोडविणे हा त्यांच्या कार्यालयाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. स्त्रीने स्वत:च्या सुरक्षेचा प्रश्न सोडवूनच त्या कार्यालयात नोकरी करावी. यासाठी स्त्रियांनी संघटित होणे गरजेचे आहे. वाहनांसाठी स्त्रियांना चालक म्हणून ठेवणे अशा छोटय़ा छोटय़ा प्रयत्नांनी हा बदल घडवून आणू शकतो, पण सुरुवात तरी व्हायला हवी!
– अर्चना सागवेकर, अंबरनाथ

सुजाण निर्णय घ्यायला हवा
दिनांक १० नोव्हेंबरच्या अंकातील अभिजीत घोरपडे यांचा ‘आवाज’ प्रदूषणाचा हा लेख आवडला. दिवाळीत फटाके (विशेषत: कर्कश आवाजाचे) उडवून पैशाच्या नासाडीबरोबर पर्यावरणाचीही हानी होते. तसेच अनेक व्याधींना निमंत्रण दिले जाते याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. आवाजाच्या प्रदूषणाचा बालके, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, प्राणी/पक्षी व रुग्णालय यांना किती त्रास होतो याचा प्रत्येक सुजाण व्यक्तीने विचार करणे आवश्यक आहे.
काही वर्षांपूर्वी नाताळ व नूतन वर्षांरंभाच्या दरम्यान जर्मनीत होते. तेव्हा नूतन वर्षांच्या आरंभी मध्यरात्री केवळ शोभेची आतषबाजी दिसली. आवाजाचे प्रदूषण किंचितही ऐकू आले नाही. ही बाब खचितच आपणास अनुकरणीय आहे. किंबहुना सदर लेखात म्हटल्याप्रमाणे फटाकेमुक्त दिवाळीचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
आता दिवाळीनंतर लग्नाचा मोसम सुरू होईल. लग्नाच्या मिरवणुकीत ‘उत्साही’ मंडळी फटाक्याच्या माळा लावून आवाजाचे प्रदूषण करतील. (जोडीला कर्णकटू वाद्यवृंद असतोच.) स्वत:च्या ‘तथाकथित’ आनंदासाठी इतरांच्या स्वास्थ्याचा बळी देतील. या बाबतीत सुजाणतेने निर्णय घ्यायला पाहिजे.
– स्वाती मुजुमदार, कांदिवली

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
jayant patil criticize ajit pawar about koyta gang in hadapsar
पुण्यातील कोयता गँगचा बंदोबस्त करा आणि मग आमच्या पोलीस स्टेशनवर बोला : जयंत पाटील
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

‘नवदुर्गा’ भावल्या
२० ऑक्टोबरची ‘चतुरंग’ पुरवणी वाचली. अपेक्षेप्रमाणे ‘नवदुर्गा’ म्हणजे खणखणीत नाणं असल्याचं कळालं. ही समाजाला लागलेली कीड आहे आणि ती दिवसेंदिवस पसरतच चालली आहे. बलात्कार करताना कसलाही विचार या विकृतांच्या मनात नसतो. ‘स्त्री’ हेच केवळ भक्ष्य! खरं म्हणजे अशांना जागच्या जागीच ठेचलं पाहिजे. पण.. हा पणच त्यांच्या फायद्याचा होतो. असो-
या वेळच्या नवदुर्गामध्ये काही तर फारच भावल्या. १) समाजव्यवस्थेशी लढा देणारी प्रीती सोनी. प्रीतीला व्यवस्थेशी लढा द्यायचाच नव्हता. पण परिस्थितीमुळे ती त्यात पडली नि लढत राहिली. २) आदिवासींच्या हक्कासाठी लढणारी सोनी सोरी. छत्तीसगडसारख्या नक्षलग्रस्त भागात काम करणारी ही युवती पोलिसांच्या हिशेबी नक्षलवादी आहे.. वेगवेगळ्या वर्तुळांमध्ये वेगळी ओळख देणारी सोनी आज तुरुंगात आहे. ३) पत्रकारिता- खरं म्हणजे हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे. ती आहे दुधारी सुरी. याच माध्यमातून आसाममधील तेरेसा रहमान पूर्वाचलाकडील अन्य देशांची ओळख करून देण्यासाठी लेखणीच्या आधारे लढत आहे. ४) पुरुषालाही मन असतं, अपत्यप्रेम असतं, पण हे अनेकदा स्त्रियांच्या लक्षातच येत नाही. उदा. कायद्याने आपल्याला भेटण्याची परवानगी दिली तरीही आई भेट होऊ देत नाही. अशा दुर्दैवी पुरुषांना, वडिलांना त्यांच्या हक्कासाठी ‘ऑल इंडिया डॉटर्स प्रोटक्शन फोरम’ची स्थापना करणारी रोशनी परेरा.
खरं म्हणजे या सगळ्या जणी आपापली जबाबदारी. यशस्वी करीत आहेत. संग्रही असावी अशी ही पुरवणी दिल्याबद्दल धन्यवाद.
प्रज्ञा मुळे, सातारा</p>

आनंद द्विगुणित करणारा लेख
१० नोव्हेंबरच्या ‘चतुरंग’मधील मोहिनी निमकर यांनी लिहिलेला ‘थर्टी फाइव्ह ऑस्टिन’ हा लेख वाचताना, पु. लं.चं लिखाण जसं आपल्याला स्वत:शीच खुदुखुदु हसवतं, तसा काहीसा अनुभव आला. संपूर्ण लेखावर विनोदाचा प्रसन्न शिडकावा जाणवतो.
गाडी एकदा थांबली की पुन्हा चालू होणं कठीण. म्हणून ती स्लो होताच उडय़ा टाकून आत-बाहेर करणारे शेजारी, रबरी हॉर्नला भोक पडल्यावर खिडकीतून डोकं बाहेर काढत ‘बाजू-बाजू’ असं ओरडणारा सहप्रवासी, गाडीचं खिळखिळं दार केव्हाही निसटेल या धास्तीने प्रवासभर दरवाजा घट्ट ओढून बसलेले मोहिनीताईंचे वडील आणि गाडीचा कुठचा भाग कधी बाहेर येईल या टेन्शनने कायमच अटेंशनमध्ये बसणारे निमकर पती-पत्नी ही शब्दचित्रं, ते दृश्य डोळ्यासमोर तंतोतंत उभं करतात. परंतु अशा क्षणोक्षणी फजिती करणाऱ्या गाडीला जेव्हा निरोप देण्याची वेळ येते, तेव्हा सहवासाने निर्जीव वस्तूतदेखील आपला जीव किती गुंततो, हे वास्तव अधोरेखित होतं.
एकंदरीत दिवाळीचा आनंद द्विगुणित करणाऱ्या या लेखाने, स्त्रियांच्या विनोदबुद्धीचा अप्रतिम उदाहरणाने दाखला दिला, हे नक्की!
संपदा वागळे, ठाणे</p>