‘नोकरदार स्त्रीच्या सुरक्षेचा प्रश्न’ हा विषय चर्चेसाठी घेतल्याबद्दल आपले आभार. भारतीय संस्कृतीत स्त्रीला माता, देवीचा दर्जा देण्यात आला आहे, पण ते फक्त लिहिण्यासाठी! आचरण्यासाठी नाही. स्त्री नोकरदार असो किंवा गृहिणी, तरुण असो वा लहान बालिका, ती कुठेच सुरक्षित नाही. तरीपण प्रयत्न न करता हा प्रश्न असाच अर्धवट सोडायचा? नाही.
कार्यालय, शाळा, कॉलेज इ. कुठेही असा हा त्रास होत (पुरुषांकडून होणारा लैंगिक त्रास) असेल तर सर्वप्रथम त्या पीडित स्त्रीने पुढे यायला हवे. लिहिणं जेवढं सोपं आहे तेवढं आचरणं नाही, हेही तेवढंच सत्य आहे. स्त्री आपल्यावरील हा अन्याय आपल्या कुटुंबासाठी, वैवाहिक आयुष्य नीट राहावे, करीअर आदीसाठी सहन करते. त्यामुळेच अन्याय करणाऱ्या पुरुषाला आणखीन उत्तेजन मिळते. स्त्रीच्या कुटुंबाने तिला या लढय़ात अखेपर्यंत साथ दिली पाहिजे. कार्यालयातील इतर स्त्रियांनी तिला साथ दिली पाहिजे. तिची खिल्ली, सहानुभूती यापेक्षा तिला भक्कम आधाराची गरज आहे.
काही पुरुषांमधील या विकृतीचा त्रास स्त्रियांना नेहमीच होतो. जेवढे त्या पीडित स्त्रीचे कुटुंब तिला साथ देईल तेवढी ती जास्त कणखर होईल, पण ‘अशा’ पुरुषांमध्येसुद्धा परिवर्तन घडविणे गरजेचे आहे. त्यांच्या अशा वर्तनाची त्यांच्या कुटुंबांनासुद्धा कल्पना देणे आवश्यक आहे. गरज लागेल तशी वैद्यकीय मदत त्यांना द्या. जेव्हा प्रथम त्रास त्या स्त्रीला होतो तेव्हाच तिने आपल्या इतर सहकाऱ्यांसह व कुटुंबासहित ही पावले वेगाने उचलली पाहिजेत.
जेव्हा सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा मात्र सकाळी गेलेली माझी मुलगी सुरक्षित घरी येईल का? ही धास्ती आईवडिलांना असते. म्हणूनच ‘मुलगी झाली’ या दोन शब्दांनी त्यांना धास्तावयाला होते. विशेषत: आईला आपली मुलगी आपल्याच घरी तरी सुरक्षित आहे का, याची खात्री वाटत नसते.
पुरुषांच्या मनोवृत्तीत सकारात्मक बदलदेखील घडवून आणू शकतो. कुटुंबातील मुलांना लहानपणापासून स्त्रीविषयीचा आदर, तिच्या मन आणि शरीर या दोन्हींचा आदर करणे याचे संस्कार व्हायला हवेत. ‘तू मुलगा आहेस म्हणून काहीही करू शकतो. तुझ्या आम्ही पाठीशी आहोत’ हे वागणं समाजात कोणतंच परिवर्तन आणू शकणार नाही. मुलींनाही प्रसंगी धीट होण्याचे मार्ग, आपल्या अन्यायाविरुद्ध कुटुंबाचा आपल्याला आधार हा विश्वासदेखील समाजातील ही कीड समूळ नष्ट करायला उपयोगी ठरेल.
ज्यांना रात्रीपर्यंत काम करावे लागते, त्यांचा प्रश्न सोडविणे हा त्यांच्या कार्यालयाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. स्त्रीने स्वत:च्या सुरक्षेचा प्रश्न सोडवूनच त्या कार्यालयात नोकरी करावी. यासाठी स्त्रियांनी संघटित होणे गरजेचे आहे. वाहनांसाठी स्त्रियांना चालक म्हणून ठेवणे अशा छोटय़ा छोटय़ा प्रयत्नांनी हा बदल घडवून आणू शकतो, पण सुरुवात तरी व्हायला हवी!
– अर्चना सागवेकर, अंबरनाथ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा