प्रभावी लेख
‘महिलाही रणी ठाकल्या’ हा रोहिणी गवाणकर यांचा लेख (१० ऑगस्ट २०१३) मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे शेवटपर्यंत एका बठकीत संपूर्ण वाचला. भारतीय स्वातंत्र्यलढय़ामध्ये स्त्रियांचे योगदान फार मोठे आहे, याची जाणीव या लेखाने करून दिली. कित्येक अनामिक स्त्रिया भारतभूमीसाठी आपले प्राण धारातीर्थी अर्पण करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. १९-२०व्या शतकातील ज्ञात-अज्ञात स्त्रियांच्या योगदानाचा आपण घेतलेला आढावा विचार करायला लावणारा आहे. आजच्या तरुण पिढीला हे माहीत होण्यासाठी या महिलांचे कार्य पुस्तकरूपाने प्रकाशित होणे गरजेचे आहे. अशा उत्कृष्ट लेखाबद्दल धन्यवाद!
-चंद्रकांत तुपे, कळवा, ठाणे
‘हे आईचे कर्तव्यच
८ जून रोजी ‘डस्टबीन’ हा ब्लॉग प्रसिद्ध झाला. त्यानंतर अनेक वाचकांनी त्यावर प्रतिक्रिया पाठवल्या. त्यानिमित्ताने हा पत्रप्रपंच. सुनांना/ बायकांना आणि त्यांच्या माहेरच्या माणसांना वर्षांनुवष्रे मिळालेल्या दुय्यम वागणुकीची ही तीव्र प्रतिक्रिया आहे, हे मान्य करायलाच हवं. पण सगळा दोष नेहमी असं बोलणाऱ्या मुली किंवा सासू-सासरे आणि सासरचे इतर नातेवाईक यांचाच असतो का? मुलीच्या आईची यात काहीच जबाबदारी नाही?
माझ्यावर कसा अन्याय झाला आणि मी कशी सतत तडजोड करीत राहिले, याच्या कहाण्या मुलींना सांगताना माझ्या कुठे आणि काय चुका झाल्या ते न सांगणारी आई मुलीचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित करीत नसते का? मुलीची सासू खूपदा तिच्या आईच्याच वयाची असते, तेव्हा तिनेही किती तरी अन्याय सोसले असतील, तडजोडी केल्या असतील आणि आत्ताही करीत असेलच, याची जाणीव मुलीला तिने द्यायला हवी की नको? जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळालं पाहिजे असा अट्टहास करून मुलीची हरएक मागणी पुरी करताना, आयुष्यात तडजोड करावीच लागते, संपूर्ण स्वातंत्र्य ही केवळ कवी-कल्पना आहे याची जराही जाणीव न देणारी आई तिच्या अशा वागण्या-बोलण्याला जबाबदार नाही का? छळ, घुसमट, अन्याय आणि आवश्यक तडजोड यातली सूक्ष्म सीमारेषा ओळखण्याची नजर आणि तारतम्य मुलीला न देण्यात आईची काहीच चूक नसते? क्वचित कधी असंही होत असेल की, आईने खूप समजावलं तरी मुलगी तिचं बोलणं उडवून लावून आपलं तेच खरं करणारी असेल किंवा तिला इतर कोणाचा अस्थानी पाठिंबा मिळाल्यामुळे ती आईची पर्वा करीत नसेल. मुलींना मिळालेल्या आíथक स्वातंत्र्याचा यात किती वाटा आहे, त्याचाही विचार व्हायला हवा?
मी ज्या काळात सून म्हणून वावरले त्या वेळच्या समाजातल्या कुटुंबकल्पना, गरजा आणि घरातल्या वडीलधाऱ्यांच्या खऱ्या-खोटय़ा समजुती यांच्यामुळे मला काही गोष्टींत स्वातंत्र्य मिळालं नाही, काही अप्रिय तडजोडी कराव्या लागल्या. पण आता दिवस बदलले आहेत, आताच्या सासवा शिकलेल्या, बाहेरचं जग पाहिलेल्या असतात, तेव्हा तुला तशीच वागणूक मिळेल असं गृहीत न धरता सासूचा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करायचा प्रयत्न कर, तिने कोणत्या अडचणींना तोंड देत घर-संसार उभा केलाय ते जाणून घ्यायचा प्रयत्न कर, म्हणजे तिची मानसिकता तुला कळेल. ‘‘माझ्यापेक्षा तू वेगळ्या पद्धतीने वाढली, शिकली आहेस, मला मिळाल्या नाहीत अशा किती तरी संधी तुला मिळाल्या आहेत, मिळतील. दृष्टी निकोप आणि मन निर्मळ ठेवून सासरी जा’’ असं आपल्या मुलींना सांगणाऱ्या आया आहेत, पण संख्येने खूप कमी आहेत हे नक्की.
मुलीच्या तक्रारी ऐकून लगेच त्यावर भाष्य न करता, तिचा तिलाच नीट विचार करायला लावून तिने काय केलं तर ती आणि सासरची माणसं यांच्यात एक सौहार्द राहील असा सल्ला देणाऱ्या आया किती आहेत आणि मुलीच्या तक्रारी ऐकून लगेच जावयाला किंवा तिच्या सासूला जाब विचारणाऱ्या किंवा तिला वेगळं होण्याचा सल्ला देणाऱ्या आया किती आहेत, याची आकडेवारी किंवा टक्केवारी कुठे मिळेल?
-राधा मराठे, ई-मेलवरून
वाचनाचे समाधान
साधारण वीस वर्षांपूर्वीपासून मी चतुरंगची नियमित वाचक आहे. स्त्रीबद्दल तिच्या समस्या, आरोग्य असे अनेक विषय, कौटुंबिक, नातेसंबंध, मुलांच्या समस्या, अनेक सामाजिक विषय अशा कितीतरी विषयांबद्दल तुमच्या पुरवणीतून प्रसिद्ध होणाऱ्या लेखांनी माझे आयुष्य समृद्ध झाले. सगळ्याच बाबतीतील मी एक सर्वसाधारण स्त्री. पण तुमच्या अनेक लेखकांनी या एका साधारण स्त्रीला अनेक तऱ्हेचे, विषयांचे लेख लिहून सोप्या भाषेत मार्गदर्शन केले, समाधान-आनंद दिला. आज मी साठीनंतरच्या वयात कॉम्प्युटर, इंटरनेट शिकते आहे याचे श्रेय ‘लोकसत्ता’लाच आहे.
-चारुलता कोठावळे, ई-मेलवरून