विभावरी देशपांडे
महेश एलकुंचवार यांच्या ‘आत्मकथा’ या नाटकातील तीन नायिका उत्तरा, वासंती आणि प्रज्ञा. या तिघींच्या कथा एकाच पुरुषाशी, ७८ वयाच्या नायकाशी जोडलेल्या असल्या, तरी या स्त्रिया काळाबरोबर त्यांच्यापेक्षाही प्रगल्भ होत जातात. त्यांचा सामान्याकडून असामान्याकडे प्रवास होतो. यातली प्रज्ञा वयानं लहान आणि आजही प्रेक्षकाला कालसुसंगत वाटेल अशी; किंबहुना तेव्हा आणि आताही काळाच्या पुढचीच!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणसाचं मन, मानवी नातेसंबंध, विचार, तत्त्वं, निष्ठा, भावना हे सगळं अत्यंत गुंतागुंतीचं, सत्य आणि भास-आभासाच्या सीमेवरचं असतं असं मला नेहमी वाटतं. आपली ‘मी स्वत:’ याविषयीची कल्पना, त्याचं आपल्याला आयुष्याच्या विविध टप्प्यांवर झालेलं (किंवा अनेकदा न झालेलं) आकलन आणि प्रत्यक्ष आपण, यातलं अंतर मला नेहमी आकर्षित करतं आणि अस्वस्थही.

आपल्यातले विरोधाभास, हिंस्रा वृत्ती, खोटेपणा, कातडीबचाऊपणा, या सगळ्याला आपण जगण्याचा एक सुंदर मुलामा देऊन ते लपवत असतो. एका अर्थानं ‘मी अमुक आहे, तमुक नाही,’ असं स्वत:चं आणि आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक वास्तवाचं गुळगुळीत सपाटीकरण करत आपण सगळे जगत असतो. अर्थात ते अपरिहार्यच आहे, नाही तर रोजचं जगणं कठीण होऊन जाईल. पण लेखक, कलाकार म्हणून व्यक्त होताना किंवा वाचक वा रसिक म्हणून कशाचाही आस्वाद घेताना, तेवढ्या काळापुरता का होईना, तो थर खरवडून काढता आला, तर तो अनुभव सत्याच्या जवळ जाणारा ठरू शकतो. पण हे करण्यासाठी आणि करवून घेण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. महेश एलकुंचवार हे धाडस अत्यंत खोलवर जाऊन करतात आणि वाचक म्हणून आपल्याला त्या व्यामिश्रतेपर्यंत, त्या अस्वस्थ करणाऱ्या सत्यापर्यंत नेत राहतात. म्हणूनच लेखक म्हणून ते फार थोर आहेत असं मला वाटतं.

आणखी वाचा-‘एका’ मनात होती : ‘फोमो’चं उत्तर ‘जोमो’?

एक स्त्री म्हणून लिहिताना स्त्रीचं मन, तिच्यातली गुंतागुंत, तिच्या इच्छा-गरजा, दु:ख, अगतिकता, निष्ठा, धारणा शोधण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करते आणि अनेकदा मला असं वाटतं की एखादी स्त्रीच हे करू शकते! पण एलकुंचवारांच्या लेखनात ते स्त्रियांचं मन ज्या प्रखरपणे, निर्भीडपणे आणि तितक्याच हळुवारपणे उलगडतात, ते पाहून लेखक म्हणून त्यांची अंतर्दृष्टी आणि जाण किती अफाट आहे हे वारंवार जाणवत राहतं.

‘आत्मकथा’ हे नाटक वाचताना मला कायमच त्याचे नायक- नामवंत लेखक असलेले ‘राजाध्यक्ष’ यांच्याइतक्याच किंवा त्यांच्याहूनही जास्त त्यातल्या स्त्रिया महत्त्वाच्या वाटतात. कारण राजाध्यक्षांची त्यांनी स्वत: सांगितलेली मोघम, वरवरची आणि स्वत:चं समर्थन करणारी ‘आत्म’कथा त्यातल्या स्त्रिया खोलवर जाऊन उलगडतात. त्यांची पत्नी उत्तरा आणि तिची बहीण वासंती. या दोघी त्यांच्या खासगी आयुष्याची दिशा बदलून टाकणाऱ्या स्त्रिया. राजाध्यक्षांच्या घरी राहायला आलेल्या त्यांच्याहून २५ वर्षांनी लहान असलेल्या, वरकरणी सामान्य वाटणाऱ्या त्यांच्या मेहुणीशी- वासंतीशी त्यांचे विवाहबाह्य संबंध निर्माण होतात आणि अर्थातच याची माहिती त्यांच्या पत्नीला, उत्तराला मिळाल्यावर रातोरात दोन्ही स्त्रिया त्यांच्या घरातून आणि पर्यायानं आयुष्यातून निघून जातात. संपूर्ण नाटकात या दोघींचे त्यांच्याशी असलेले संबंध आणि त्यातून राजाध्यक्षांच्या वाट्याला आलेलं एकटेपण, या सत्याची वेगवेगळी रूपं आपल्यासमोर येतात.

निमित्त ठरतं उत्तराचं, राजाध्यक्षांनी तिला लिहिलेल्या पत्रांचं पुस्तक छापण्याचं. त्या पुस्तकाच्या ऊहापोहात राजाध्यक्षांनी त्यांच्यापुरतं आणि नंतर त्यांच्या कादंबरीत उभं केलेलं ‘सत्य’ वास्तवापेक्षा कसं वेगळं आहे, हे या दोघी- कधी उत्तरा आणि वासंती म्हणून, तर कधी ‘उर्मिला’ आणि ‘वसुधा’ या त्यांच्याच कादंबरीतल्या पात्रांमधून त्यांच्यासमोर उघड करतात. त्यांनी आपल्या निर्णयांचा, कमकुवत क्षणांचा, अहंकाराचा, असुरक्षिततेचा संदर्भ आपल्या सोयीपुरता कसा लावला आहे, हे त्यांना दाखवून देतात. सत्या-असत्याच्या, वास्तव आणि आभासाच्या सीमारेषेवर राहून या दोन स्त्रिया एकमेकींमधले ताण सोडवत आपल्याला सहजपणे राजाध्यक्षांच्या खऱ्या रूपाकडे नेतात. या दोन्ही स्त्रियांमधलं एक सामान्यत्त्व, असूया, मत्सर, मोह आपल्याला दिसत राहतो, पण काही वर्षं उलटल्यावर, पुलाखालून पाणी वाहून गेल्यावर याच दोघी वस्तुनिष्ठ आणि संवेदनशील होऊन त्यांच्यातलं असामान्यत्वही दाखवून जातात. वासंतीचा दिलीप हा मुलगा देवदत्त या राजाध्यक्षांच्या प्रतिस्पर्ध्याचा नसून त्यांचाच आहे, हे सत्य त्यांना सांगण्याचा आग्रह उत्तराच धरते. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर त्यांना हा आनंद मिळावा, असा प्रयत्न करणारी उत्तरा आणि इतके दिवस हे सत्य माहीत असूनही त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा न ठेवणारी वासंती, या दोघी ‘सामान्य ते असामान्य’ हा प्रवास फार सुंदर पद्धतीनं करतात.

आणखी वाचा-स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?

पण ‘आत्मकथा’मधली मला कायमच ‘रिलेटेबल’ आणि जवळची वाटणारी व्यक्तिरेखा म्हणजे प्रज्ञा. ‘२२-२४ वर्षांची’ असा उल्लेख असला, तरी प्रज्ञा तिच्या वयापेक्षा खूपच प्रगल्भ वाटते. आज हे नाटक वाचताना ती ‘आजची’ वाटते. म्हणजे एलकुंचवारांनी त्या स्त्रीचा विचार काळाच्या कितीतरी पुढे जाऊन केला असेल, हे जाणवतं.

प्रज्ञा राजाध्यक्षांवर ‘पीएच.डी.’ करत असते. त्यांच्यावरचा शोधनिबंध लिहिताना केवळ त्यांचं साहित्य वाचणं पुरेसं नाही, हे तिला नक्की माहीत आहे. त्यांचं लिखाण पूर्णपणे प्रामाणिक नाही. त्यावर त्यांनी एक गुळगुळीत, बचावात्मक मुलामा चढवला आहे, याची जाणीव झाल्यामुळे माणूस म्हणून ते कसे आहेत, हे शोधायची तिला गरज वाटते आहे. त्यांच्या आत्मचरित्राची लेखनिक म्हणून ती त्यांच्या घरात आणि पर्यायानं भावविश्वात प्रवेश करते. ७८ वर्षांचे राजाध्यक्ष आणि बाविशीची प्रज्ञा यांचं एक विलक्षण नातं निर्माण होतं. पहिल्या प्रवेशातच प्रज्ञा तिची बुद्धी, वेगळेपण आणि विनाकारण दबून न जाणारी वृत्ती दाखवते. राजाध्यक्षांचा आपलं वय लपवण्याचा प्रयत्न असेल, आणीबाणीच्या काळात ठरवून टाळलेला तुरुंगवास असेल, प्रज्ञा निर्भीडपणे आणि फटकळपणे त्यांना प्रश्न विचारत राहते. त्यांच्या लिखाणातला गुळगुळीतपणा, भावनांचं, प्रसंगांचं त्यांनी सोयीस्करपणे केलेलं सपाटीकरण त्यांना दाखवत राहते. समाजात आदरस्थानी असलेल्या ‘पद्माभूषण’ राजाध्यक्षांना प्रश्न विचारणारी, त्यांच्या अहंकाराला, स्व-प्रतिमेला ‘चॅलेंज’ करणारी प्रज्ञा मला फारच आवडते. ‘जे समोर आहे ते मान्य करायचं. प्रश्न विचारायचे नाहीत, नवीन काही शोधायचं नाही,’ या सामान्य वातावरणाला छेद देणारी प्रज्ञा याचसाठी आजही काळाच्या पुढची वाटते.

प्रज्ञा अत्यंत संवेदनशील आहे. तिनं राजाध्यक्षांच्या साहित्याचा खूप खोलवर जाऊन अभ्यास केला आहे. त्यांच्या कामावर तिचं प्रेम आहेच, पण त्याहीपलीकडे जाऊन त्यांच्यात खूप काही आहे, जे त्यांनी कधी लोकांसमोर आणलेलं नाहीये, याची तिला पूर्ण जाणीव आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर तरी त्यांनी निर्भीड व्हावं, स्वत:च्या आयुष्यात घडलेल्या घटनांच्या, नात्यांच्या, दु:खाच्या, चांगल्या-वाईट वास्तवाच्या जास्तीत जास्त जवळ जावं, अशी तिची इच्छा आहे. त्यांचं आत्मचरित्र ही त्यांच्या आयुष्यातल्या घटनांची यादी न होता माणूस म्हणून त्यांनी स्वत:चा नव्यानं घेतलेला शोध असावा, अशी तिची अपेक्षा आहे. आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाणारं, तिलाही नीटसं न कळलेलं त्याच्यावरचं प्रेम आहे.

आणखी वाचा-इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’

प्रज्ञाचं राजाध्यक्षांमध्ये गुंतत जाणंही एलकुंचवार अतिशय संवेदनशीलतेनं आणि हळुवारपणे आपल्यासमोर उलगडतात. सुरुवातीला त्यांच्या नात्यात वडील-मुलीच्या नात्याचा पोत जाणवतो. त्यांना जास्त चहा पिऊ न देणारी, हक्कानं ओरडणारी, ते ‘तू गाढव आहेस, निघून जा’ म्हणाले तरी राग न येणारी, आपल्या प्रियकराला आपण कसं पटवलं होतं ते हसतहसत सांगणारी प्रज्ञा. तिचे वडील पूर्वीच गेलेले असल्यानं राजाध्यक्षांमध्ये ती एक ‘फादर फिगर’ पाहते आहे असंच वाटत राहतं. पण ती जेव्हा उत्तरा आणि वासंती या त्यांच्या आयुष्यातल्या स्त्रियांबद्दल त्यांना बोलतं करत जाते, तेव्हा स्त्री-पुरुष नात्याच्या संदर्भातले राजाध्यक्ष आपल्यासारखे तिच्याहीसमोर उलगडू लागतात. तिच्या त्यांच्यातल्या गुंतण्याचा पोत तिथे बदलत जातो.

एखाद्या रक्ताच्या नात्यापलीकडच्या व्यक्तीबद्दल आपल्याला खूप काहीतरी आतून, उत्कटपणे वाटतं, ते कधीच एकाच रंगाचं नसतं. त्यात अनेक पदर, अनेक छटा असतात. त्या काळानुसार, सहवासानुसार बदलतही जातात. पण आपलं हे वाटणं त्या ठरवून ठेवलेल्या नात्याच्या आणि पर्यायानं समाजमान्य चौकटीत बसवण्याचा प्रयत्न आपण कळत-नकळत करत असतो. पण कधी कधी या चौकटीला धक्का बसतो आणि आत खोलवर दडवलेलं ते सत्य अचानक समोर उभं राहतं. प्रज्ञाच्या बाबतीतही तसंच काहीसं होतं. तिचा प्रियकर प्रमोद तिला राजाध्यक्षांकडे जाण्यापासून, त्यांच्याबरोबर काम करण्यापासून रोखू लागतो. आपल्या स्वातंत्र्यावर ही गदा आहे, असं म्हणून ती त्याच्यापासून दूर जाते, पण आपण त्यांच्यात गुंतत चाललोय, याची तिला जाणीव होते. ही भावना आणि जाणीव त्या अर्थानं असामान्य नाही, पण प्रज्ञा ते स्वत:शी आणि नंतर राजाध्यक्षांपाशी कबूल करते, यात तिचं असामान्यत्व दिसून येतं. वास्तविक यातून नकार, निराशा आणि दु:खच निर्माण होणार आहे, याचीही तिला पूर्ण जाणीव असते. पण तरीही ती या सत्याकडे पाठ फिरवत नाही. ती ते स्वीकारते. त्यांच्यापाशी कबूल करते आणि त्यांच्यापासून दूरही जाते.

खरेपणा, निर्भीडपणा, आपल्या मनाच्या खोलात शिरून आपलं सत्य शोधण्याचा जो प्रयत्न राजाध्यक्षांनी करावा असा आग्रह प्रज्ञा सतत करत असते, तो प्रयत्न ती स्वत:सुद्धा करते आणि यशस्वी होते. याचमुळे माझ्यासाठी ‘प्रज्ञा’, एलकुंचवारांचं हे नाटक आणि त्यातला त्यांचा ‘ती’चा शोध असामान्य आणि अद्भुत आहे!

vibhawari.deshpande@gmail.com