संकटकाळी मदत मागायला, बोलावंसं वाटलं तर ‘शेअर’ करायला कोणी असावं, ही सुप्त अपेक्षा प्रत्येकाच्या मनात असते. विशेषत: दूरच्या गावी, वा परदेशात स्थलांतरित होणाऱ्यांना, काही काळासाठी दूर राहायला जाणाऱ्यांना ही पोकळी, ते एकटेपण खूप जाणवते. इतरांसाठी आणि पर्यायानं स्वत:साठीही ती पोकळी भरून काढायची असेल, तर आपल्याला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातही ‘शेजारधर्म’ नव्यानं शिकावा लागेल!
लहान मुलांचं बालपण पालकांच्या मायेच्या छायेत मजेत जात असतं. मूल दहावीपर्यंत शिकतं आणि मग त्यांना, त्यांच्या कुटुंबाला आपल्या गावापेक्षा, बाहेरच्या गावातील, राज्यातील, तर कधी बाहेरच्या देशातील संधी खुणावायला लागतात. पुढे मग शिक्षण किंवा नोकरी यानिमित्तानं त्या व्यक्तीला आपलं गाव, गोतावळा मित्रपरिवार सोडून लांब जायची वेळ येते. संधी मिळण्याच्या आनंदापाठी एकटेपणाची एक अदृश्य भीती लपलेली असते. अदृश्य शब्दांतच सगळं येतं खरं तर! जी भीती प्रत्यक्ष दिसत नसते, पण तिचं अस्तित्व असतं. मग केवळ दिसत नाहीये म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? हे दूर जाणं एकटेपणा कसा घेऊन येतं त्याविषयी बोलायला हवं…
हेही वाचा…ऑनलाइन जुगाराचा व्हायरस!
सात-आठ जणांच्या एकत्र कुटुंबात वाढलेली रजनी अभ्यासात हुशार होती. घरात बाकी सगळे जण प्रौढ, ही एकटीच लाडकं शेंडेफळ! पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी शहरातल्या विद्यापीठात प्रवेश मिळाला, आता समवयस्कांबरोबर राहायला मिळणार, खूप मजा येणार, अशी मनोराज्यं रंगवत रजनी हॉस्टेलमध्ये दाखल झाली. घर आठ-नऊ तास प्रवासाच्या अंतरावर राहिलं. सुरुवातीचे नवलाईचे दिवस संपल्यावर मात्र तिची रूममेट तिच्याशी स्पर्धा करतेय, तिला फक्त आणि फक्त स्पर्धक म्हणूनच बघतेय, हे तिला जाणवायला लागलं. वेगवेगळ्या गावांतून आलेल्या मुलींचे आधीचेच ग्रुप होते. रजनीच्या कॉलेजमधून दुसरं कोणीच इकडे आलं नव्हतं. रूममेटलाही तिच्या आधीच्या कॉलेजमधल्या मैत्रिणी होत्याच, त्यामुळे तिला रजनीच्या मैत्रीची गरज नव्हती. रजनीचा कॉलेजमधला वेळ कसाबसा जायचा, पण हॉस्टेलवरची संध्याकाळ आणि रात्र तिच्यासाठी खूप मोठी असायची. घरात सतत सगळ्यांची सवय आणि इथे बोलायला अजिबातच कुणी नाही. तिला प्रचंड एकटेपणा जाणवायचा. हळूहळू तिचं खाण्यापिण्यातलं लक्ष उडालं. कॉलेज बुडवून घरच्या फेऱ्या वाढल्या आणि याचा अप्रत्यक्ष परिणाम तिच्या अभ्यासावरही झाला. खरं तर नवीन प्रवेश घेऊन गेल्यावर कोणत्याही कॉलेजमध्ये काही मुलांना असं होऊ शकतं, पण कॉलेजचे पाच-सहा तास सोडता, बाकी सगळा वेळ घरच्यांचा आधार असतो. त्यामुळे एकटेपणा एकदम अंगावर येत नाही.
पूर्वीच्या काळी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागायचं, पण घर सहज प्रवास करून जाण्याच्या अंतरावर असायचं. केवळ अत्यंत हुशार असलेली काहीच मंडळी स्कॉलरशिप वगैरे मिळवून परदेशात जायची, पण ते अपवाद. आता पालकांकडे पैशांबरोबरच दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आहेत. बँका एज्युकेशन लोनचे फलक घेऊन उभ्या राहिल्या, तसं बाहेरगावी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलं. मात्र त्याबरोबर एकटेपणा येणं चुकलं नाही. घरात लाडाकोडात वाढलेल्या मुलांना अचानक नातेसंबंधांमधले डावपेच, छक्केपंजे कळतीलच असं नाही. कळले तरी त्यानुसार त्यांना वर्तन करता येईल असंही नाही. कोणावर पूर्ण विश्वास ठेवावा ते कळत नाही. अनोळखी असलेल्या लोकांबरोबर चोवीस तास एकत्र राहताना मनात अविश्वास घोळत राहतो. पर्यायानं शंभर मुलांच्या वसतिगृहात किंवा चार जणांच्या फ्लॅटमध्येही काही जणांना एकटेपणा येतो. अर्थात हॉस्टेलच्या दिवसांतून आयुष्यभराचं मैत्र, गोड आठवणी मिळतात आणि हा अनुभव असणारे पुष्कळ जण असतात. पण योग्य सोबती न मिळाल्यानं हॉस्टेलच्या वाईट आठवणी घेऊन जगणाऱ्यांची संख्याही कमी नसते.
हेही वाचा…नृत्याविष्कार!
गौरी आणि ओंकार दोघं पुण्याजवळच्या एका गावात मोठे झाले. दोघांचं लग्न झालं आणि ओंकारला बंगळूरुमध्ये एका चांगल्या नोकरीची संधी मिळाली. दोघंही तिथे गेले. संधी कितीही चांगली असली तरी गाव सोडून जाणं खरं तर दोघांच्या जिवावर आलं होतं. ओंकारला नोकरीच्या ठिकाणी जमवून घेताना जड गेलं, पण त्याहीपेक्षा दिवसभर घरी बसून राहणं गौरीच्या अंगावर येत होतं. सकाळ कामात जायची, पण दुपार, संध्याकाळ, कोणाशीही बोलणं नाही! गौरीला आधीपासूनच अधूनमधून अस्थमाचा त्रास व्हायचा. एके दिवशी ओंकार ऑफिसमध्ये असताना तिला अस्थमाचा अॅटॅक आला. कोणाला हक्कानं फोन करून ‘घरी जा,’ असं सांगायची सोय नव्हती. त्याला घरी पोहोचायला किमान अर्धा-पाऊण तास लागणार होता. तो कसाबसा घरी पोहोचला, तोपर्यंत गौरीनं अस्थमा पंप घेऊन स्वत:ला थोडं स्थिर केलं होतं. पण त्या प्रसंगानं ओंकारच्या आणि गौरीच्या मनात भीती निर्माण केली. ‘इथे आपल्याला काही झालं तर मदतीला पळत येणारं कोणी नाही… आपल्याला जबाबदारीनं परिस्थितीला सामोरं जावं लागेल. पण दर वेळेस आपण निभावून नेऊ शकू का?…’ व्यक्तीच्या मूळच्या गावी जाऊ त्या ठिकाणी काही ना काही तरी ओळख निघते. बहुतेक वेळा त्यातून मदतही मिळून जाते. ‘तू सदाशिवरावांचा नातू ना रे?’ , ‘अगं, तुझी आई माझ्या मोठ्या बहिणीची मैत्रीण!’, अशा ओळखी निघतात. तेव्हा समोरच्या माणसाच्या तोंडूनही ‘वा वा! छान छान!’ असा आनंददायक उद्गार निघतो. खरं पाहता यात एवढा आनंद होण्यासारखं काय आहे! पण एक माणूस जोडला गेल्याचा आनंद असतो. ‘मला जास्त लोक लागत नाहीत किंवा ‘सोसवत नाहीत’, ‘मला स्वत:तच रमायला आवडतं’ असं म्हणणाऱ्या लोकांनाही खरंच अशा ओळखी आणि त्यातून मिळणारा पाठिंबा नको असतो का?…
बँक, शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयं या सगळ्यांपेक्षा हॉस्पिटलमध्ये लागणारी मदत महत्त्वाची असते. जो माणूस आजारी असतो, त्याच्या बरोबरच्या व्यक्तीनं आर्थिक बाजू सांभाळावी की रुग्णाकडे बघावं?… लांब गावात राहणाऱ्या विभक्त कुटुंबांतल्या किती तरी व्यक्तींनी करोनाच्या दिवसांत याला तोंड दिलं. त्याची भीती त्यांच्या मनात घर करून गेली. परक्या प्रदेशात आपल्याला मदत न मिळण्याची, एकटेपणाची भीती अनेकांना शेकडो मैल पायी प्रवास करून का होईना, पण घराकडे, गावाकडे घेऊन जात होती. तिथे जाऊन पैसा कमावणं अवघड असेल कदाचित, पण काही ना काही तरी उपाय निघेल… निदान आपण एकटे नसू, ही भावना पक्की होती. आपण जेव्हा एखाद्या नवीन गावात जातो, तेव्हा आपल्याला नातेसंबंध नव्यानं तयार करावे लागतात. पारपत्रासाठी जसे पोलीस व्हेरिफिकेशन करतात, तसं आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या व्यक्तीला आपल्या मनाच्या व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावं लागतं. त्याला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत आपण कोणत्याच नात्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकत नाही. मूळ गावी त्या त्या कुटुंबाची, त्यातल्या व्यक्तींची थोडी फार माहिती आपल्याला आधीपासून असते. त्यामुळे एखादी नवीन सून लग्न होऊन सासरी आली, तरी तिला कुटुंबातल्या बाकीच्या सदस्यांनी शेजारपाजारचा अंदाज दिलेला असतो. त्यामुळे तिच्या ‘व्हेरिफिकेशन’ प्रक्रियेस मदत होते. नवीन गावात व्यक्तीला कोणाच्याही मदतीशिवाय नवीन संबंध आपल्या जबाबदारीवर निर्माण करावे लागतात. या काळातला अविश्वास आतून सतत एकटं असण्याची जाणीव करून देत राहतो.
हेही वाचा…सांदीत सापडलेले : मैत्री
देशातच वसतिगृहात नंबर लागल्यावर अनेक मुलांचे आई-वडील त्यांना तिथे सोडायला जातात, लागणारं सामान खरेदी करून देतात. पण परदेशात नोकरी लागली काय किंवा शिक्षणासाठी जावं लागलं काय, तिथे व्यक्ती पूर्णपणे एकटी असते. तुमच्या अडचणींवर तुम्हालाच उपाय शोधायचे असतात. या उदाहरणात सांगितलेल्या मुलीला घर मिळत नव्हतं. तेव्हा ती तात्पुरती काही तरी सोय करायची, पण परत दहा-पंधरा दिवसांनी तिचं ५५-६० किलो सामान हलवून दुसरीकडे न्यायची. असं ती दोन महिने करत होती. सामानाच्या हलवाहलवीत तिच्या मदतीला कोणीच नसायचं. या सगळ्या अनुभवात मनाला आलेल्या एकटेपणासंबंधी ती समुपदेशनासाठी आली होती.
हेही वाचा…माझी मैत्रीण : लोणच्यासारखी मुरलेली मैत्री
माझ्या आजीचं तर पूर्ण आयुष्य आमच्या गावात, एका वाड्यात गेलं. मी माझ्या संसारातल्या काही अडचणी सांगितल्या की ती म्हणायची, ‘‘कोणी तरी येईलच गं मदतीला! निघेल काही तरी उपाय.’’ या लेखाच्या निमित्तानं विचार करताना असं वाटलं, की कुठून आला असेल हा विश्वास तिच्याकडे? वर्षभराच्या कुरडया-पापड करायच्या असोत की घरात कोणी तरी वारलेलं असो… तिनं कायम हक्काची माणसं ‘मैं हूँ ना!’ म्हणत पुढे आलेली पाहिली होती. तिनंही तेच इतरांसाठी आयुष्यभर केलं होतं. पण नवीन काळात प्रदेशांच्या सीमा धूसर झाल्यात. स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलंय. त्याबरोबर माणसाच्या आतला एकटेपणा वाढला. चाळ आणि वाडा संस्कृतीत कदाचित ‘प्रायव्हसी’ मिळत नसेल, पण बाजूच्या घरात संकटाची चाहूल लागली की पटकन दारं-खिडक्या बंद तरी व्हायची नाहीत! आता फ्लॅट संस्कृतीत ‘आपण भलं, आपलं कुटुंब भलं’ असं करताना आपण फक्त आपल्या शेजाऱ्याला त्याच्या संकटात एकटं टाकत नसतो, तर आपणही स्वत:च्या एकटेपणाची एक पायरी वर चढत असतो. आपण आपल्याच गावात स्थिरस्थावर होऊ, याची खात्री असणारे खूप कमी जण आता आहेत. अशा वेळी हाकेच्या अंतरावर असणारा शेजारच मदतीला येऊ शकतो, समजून घेऊ शकतो. परक्या प्रांतात प्रत्येक जण एकटा आहे. पण खिडकीवर, दारावर केली गेलेली एक टकटक जर मदत मिळवून देऊ शकली, ‘माझं कोणी तरी ऐकून घेईल,’ ही खात्री वाटली, तर ‘हे विश्वचि माझे घर’ असा आत्मविश्वास येऊ शकेल. त्यामुळे नव्यानं शेजारधर्म पाळायला आणि एकटेपणाला पळवून लावायला आपल्याला शिकावं लागेल…
trupti.kulshreshtha@gmail.com