सातवीच्या वर्गात बाई मनापासून ‘श्यामची आई’ वाचून दाखवण्यात मग्न होत्या. श्यामला बसलेले दारिद्रय़ाचे चटके, झालेला अपमान, त्यातही आईने दिलेली ‘स्वाभिमानाची’ शिकवण सारं काही मुलांना कळावं म्हणून झटत होत्या. तेवढय़ात तनयानं हात वर केला. ‘‘मॅडम, पण श्यामचे बाबा असं वागलेच का मुळी? माझे बाबा असते तर त्यांनी मुळीच आपले पैसे असे जाऊ दिले नसते! मुद्दाम गरीब राहणाऱ्या माणसांना का शहाणं म्हणायचं? बाबा तर म्हणतात, जेव्हा मिळवायचं तेव्हा भरपूर मिळवलं पाहिजे, जगातल्या सगळ्या सुखसोयी आपल्यासमोर हात जोडून उभ्या राहिल्या पाहिजेत. मला नाही पटत श्यामच्या आई-बाबांचं वागणं!’’
बाई ऐकत राहिल्या. त्यांच्या लक्षात आलं काळ बदलला आहे, संदर्भ बदललेत, मुलं ज्यातून शिकतात ते अनुभवही बदललेत! श्रीमंत, अधिकाधिक श्रीमंत होणं- याची एक मोठ्ठी शिडी चढण्याची जणू स्पर्धा लागली आहे. प्रत्येकाच्या ओठावर वाक्य आहे- ‘पळा-पळा कोण पुढे पळे तो’ आणि ‘थांबला तो संपला!’
तनयाचा प्रश्न आपल्यालाही अंतर्मुख करणारा आहे. खरंच भरपूर पैसा समृद्धीच्या प्रमाणात आनंद- समाधानही वाढत जातं का, हा प्रश्न जसा आपल्यासारख्या सामान्य माणसांना पडतो, तसाच तो जगभरातल्या अनेक अभ्यासकांनाही पडला आहे. एका सर्वेक्षणात लोकांना ‘सर्वात जास्त आनंद देणाऱ्या गोष्टींचीं’ यादी करायला सांगितली तेव्हा ‘पैसा’ ही गोष्ट पहिल्या पाचातही नव्हती. पण त्याच लोकांना जेव्हा ‘तुम्हाला अधिक पैसा मिळाला तर काय वाटेल?’ असं विचारलं तेव्हा ‘खूप आनंद होईल.’ असंच उत्तर बहुतेकांनी दिलं. आहे का नाही गुंतागुंतीचं कोडं? पैसा हवा तर आहे- पण तो जगण्यात फार महत्त्वाचाही नाही.. मग त्याचं नेमकं स्थान काय? समृद्धीच्या मागे निरंतर पळणाऱ्यांची आयुष्यं कशी घडत-बिघडत आहेत, त्या मागची कारणे काय, असे प्रश्न मनात येतात.
हे थोडंसं ‘तंत्रज्ञाना’सारखं आहे. एकूण मानवी प्रगतीसाठी तंत्रज्ञान आवश्यकच आहे, पण तेच जर का आपल्या तळहातावर आलं, तर त्याचे परिणाम आपल्या मानसिक स्वस्थतेवर कसे होतात हे अनेक अभ्यासांती दाखवून दिलंय ना! एकमेकांसमवेत जाणाऱ्या दोन मित्रांची कुठल्या तरी टप्प्यावर फाटाफूट होते ना? तशीच संपन्नतेची आणि मनाच्या स्वस्थतेची होते असं दिसतंय.
पीटर हा अमेरिकेतील एक प्रातिनिधिक माणूस. गेल्या दहा वर्षांत त्याचं उत्पन्न जवळजवळ पाच पटीनं वाढलं; पण जेव्हा त्याच्यामुळे होणाऱ्या आनंदाबद्दल विचारलं तेव्हा त्यात फार फरक पडलेला नाही, असं लक्षात आलं. थोडक्यात, सुरुवातीच्या प्रगतीच्या काळात पगारवाढीनं झालेला आनंद पाच/सात वर्षांनी खाली जाऊन एका रेघेवर थांबला आहे, असं पीटरनं नमूद केलं. हेच उत्तर सर्वेक्षणातल्या ७० टक्के लोकांनी दिलं. दुसरीकडे भारत, चीन, आफ्रिकी देश अशा ठिकाणचे कोटय़वधी लोक मूलभूत सुविधा देऊ शकणाऱ्या संपन्नतेपासूनही शेकडो योजनं लांब आहेत, हे वास्तव आहे. त्यांनी पैसा मिळवायचाच नाही का? या साऱ्याचा अर्थ कसा लावायचा? खरं तर आपल्या रोजच्या जगण्यातच त्याचं उत्तर लपलेलं आहे. ठरावीक वेळानंतर आपल्याला खरीखुरी भूक लागते, तेव्हा आपण जेवतो. त्या जेवणानं आपल्या मनाला, शरीराला तृप्तीची ढेकर येते आणि आपलं पोषणही होतं, पण ज्या क्षणी मेंदूतील ‘समाधान बिंदू’नं आता पुरे, थांबाचा सिग्नल दिला असतानाही आपण वेगवेगळ्या कारणांसाठी (क्रेझ, तलफ, छंद, आग्रह..) खाणं चालूच ठेवतो तेव्हा शरीरात जाणाऱ्या प्रत्येक घासागणिक अनारोग्य निमंत्रित करीत असतोच ना? आपल्या बागेतल्या रोपांना जगण्यासाठी पाणी लागतं. उन्हाळ्यात तरतरी टिकून राहण्यासाठी थोडं जास्तही लागतं; पण जास्तीचं पाणी निचरा होऊन गेलं नाही आणि वरून मात्र संततधार पडत राहिली तर पानं हळूहळू पिवळी पडून गळायला लागतात. बघता बघता मुळापासून रोप कुजून जातं!
गेल्या तीस-चाळीस वर्षांत मनोरुग्णांच्या संख्येत दहापट वाढ झाल्याचे निष्कर्ष अभ्यास सांगताहेत. ‘पैसा फेका आणि मजा करा’ पारंपरिक संस्कृतीमुळे कुटुंब, स्नेही मंडळी, श्रद्धा अशा पारंपरिक गोष्टींमधून जगण्याला आपसूक मिळणारा अर्थ आणि ‘कशासाठी जगायचं?’ हा हेतू पार बदलून टाकला आहे. अभ्यासकांना असं वाटतं की, बहुतेक माणसं काही तरी विकत घेणं’ (वस्तू/ सेवा/ व्यक्तींचा वेळ..) यातच आनंद शोधताहेत. समृद्धीच्या अतिरेकामुळे निर्माण झालेली मनातील अनामिक पोकळी भरून काढण्यासाठी ‘ये दिल माँगे मोर’चा धोशा आपण स्वत:ला लावून घेत आहोत का?
मॉलमध्ये एखादी वस्तू घ्यायला जा.. हजार तऱ्हा! डिझायनर कपडे शोधा.. नजर आणि पाय दमून जातील! कुठल्याही चॅनेलवर जा.. ऑनलाइन शॉपिंगची मयसभा चोवीस तास खुली!
श्वार्टझ् नावाच्या मानस शास्त्रज्ञानं एक सुंदर पुस्तक लिहिलंय यावर! पॅरॅडॉक्स ऑफ चॉइस- (Why more is less!) थोडक्यात पर्यायांच्या भाऊगर्दीतली विसंगती!
विजयला नेहमी लेटेस्ट मोबाइल हवा असतो. पहिल्या मोबाइलला जेमतेम ३/४ महिने होत नाहीत तोवरच त्याला कंटाळा आलेला असतो आणि परवडतंय ना! हौसही आहे म्हणून तो घेतो. त्या वस्तूच्या वापरामुळे ‘समाधान’ वाटण्यापूर्वीच ती ‘जुनी’ झाल्याचं असमाधान त्याचं मन पोखरू लागतं. मग काय- वापरा आणि फेकून द्या! नवी घ्या! तीही फेका! असे लाखो विजय आणि असंख्य उत्पादनं आपल्या मनात गरागरा फिरत असतात- आणि आपलं ‘असमाधानाचं’ अग्निकुंड धगधगतं ठेवतात. नव्या नव्या वस्तूंची कामना जागी ठेवतात! हा ‘दिल माँगे मोर’ दृष्टिकोन खरं तर आपल्याला काय देतो माहीत आहे का? एक प्रकारची चिंता, रुखरुख, ताण आणि हो- द्वेषसुद्धा.
– मी उगाच अमुक तमुक घेतलं- त्यापेक्षा ते दुसरं जास्त छान होतं!
– मला मिळेल का माझ्या मनासारखी ही वस्तू?
– दहा हॉस्पिटल्स पालथी घातली. एका डॉक्टरला अक्कल नाही!
जितके निवडीचे पर्याय जास्त तितके निवडलेल्या गोष्टीबद्दलचं समाधान कमी! तरुण पिढीला वाटेल की हे, ‘स्मरण पुराण’ (nostalgia) आहे, पण मित्रांनो, तसं नाही. अनेक शास्त्रीय अभ्यासही हेच दर्शवताहेत, की किमान गरजांची, स्वास्थ्याची पूर्ती झाल्यावरही जर मिळवण्याची ‘वखवख’ कायम राहिली तर ती असमाधानाकडेच नेते. आपल्या पुराणात भस्मासुराची गोष्ट सांगितली आहे ना, तशी ही अवस्था आहे. दरवर्षी पगारवाढ होते म्हणून त्या प्रमाणात आपलं समाधान खरंच वाढतं का? तर पगारवाढ झाली/ उत्पन्न वाढलं म्हणून मग ‘हे करू या- ते घेऊ या- त्यासाठी अजून कर्ज घेऊ या- अजून चैन करू या- मग आता ते कमी पडतंय म्हणून वेगळं थ्रिल अनुभवूया.’ अशा चक्रात आपण गुरफटून जातो.
मी रोज ट्रेडमिलवर चालते. किमान ४ किलोमीटर तरी चालणं होतं. पण मी कुठेच ‘पोचत’ नाही त्या चालण्यातून. फक्त माझे पाय यांत्रिकपणे पुढे-मागे होत राहतात. सूर्यप्रकाशात गेल्यावर आपले डोळे जरा वेळाने सरावतात आणि मग त्या प्रकाशाची जाणीव वेगळी राहात नाही. रोज रोज एकच निसर्गरम्य दृश्य बघायला लागलं तर नंतर त्यातलं सौंदर्य फिकं झाल्यासारखं वाटतं. आईस्क्रीमचा पहिला कप मस्त लागतो पण पाचव्या कपानंतर घसा गारठून जातो.. तसंच आहे. आपलं मन कुठल्याही हव्याशा-नकोशा भावनेला चट्कन सरावतं आणि नंतर नंतर त्यांचा वेगळेपणा विसरून जातं! तो मग आनंदाच्या मूळ पातळीवर येऊन स्थिरावतो..
चिरागला मित्रांच्या आग्रहामुळे एक ‘कश’ घ्यावा लागला. मग तो इतका अधीन झाला की त्याशिवाय राहावेना. नुसतं इतकंच नाही तर पूर्वीइतकं ‘हाय’ पण वाटेना. मग अजून मोठा ‘कश’ अजून जास्त वेळा- तरीसुद्धा अस्वस्थता संपेना..! शरीराचं काय किंवा मनाचं काय- व्यसनाच्या पायऱ्या सगळीकडे सारख्याच! एका अभ्यासात लॉटरी लागलेल्या माणसांच्या समाधानाची तुलना न लागलेल्यांशी आणि अपघातातून वाचून अपंगत्व आलेल्या लोकांशी करण्याचा प्रयत्न झाला. लॉटरीचा आनंद होता. पण त्या गटाची छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधील आनंद अनुभवण्याची ओढ आणि उत्साह इतरांपेक्षा कमी झालेला आढळला. अपंग व्यक्तींना स्वत:च्या कमतरतेचं दु:ख होतं पण जेवढं वाटलं होता तेवढा प्रतिकूल परिणाम त्यांच्या एकूण आनंद अनुभवण्यावर झालेला दिसला नाही. उलट रोजच्या जगण्यातल्या छोटय़ा गोष्टींचा आनंद ते अधिक मनापासून घेताना दिसले!
अजून एक मजेदार निरीक्षण अभ्यासकांनी याबाबतीत नोंदवलं आहे. या ‘समृद्धी-स्पर्धे’च्या चक्रात ‘पळापळा कोण पुढे पळे तो’ -असं जे अडकतात, त्यांना लक्षात येतं की जी समृद्धी येतीये ती हजार वाटांनी वाहून पण जात आहे! जास्त पैसा म्हणजे जास्त खर्चीक सवयी -म्हणजे वाढत्या अपेक्षा- म्हणजेच अधिकाधिक पळणे! पूर्वी एका टीव्ही स्क्रीनसमोर डोक्याला डोकी लावून बसलेली माणसं आज प्रत्येक खोलीत स्वत:चे तीन तीन स्क्रीन डोळ्यांना चिटकवून बसलेली असतात. (मोबाइल, कॉम्प्युटर आणि टीव्हीसुद्धा!)
व. पु. काळे यांची एक सुंदर कथा आठवते- ‘सुख विकणे आहे!’ या कथेतील नायक अनेक त्रस्त, निराश, एकाकी, भावनिक उन्मळलेल्या माणसांना त्याचं सुख मिळवून द्यायला ‘व्यावसायिक’ मदत करतो. सुरुवातीला उदात्त हेतूनं सुरू केलेली योजना ‘बिझिनेस’ बनते आणि तो व्यवसाय इतका भरभराटीला येतो की, त्या चक्रात पळतापळता त्या नायकाच्या लक्षातही येत नाही की, आपण पत्नीपासून दुरावतोय. इतरांना सुख विकताना आपल्या जिवाभावाच्या कुणाची तरी गरज आपल्याला दिसतच नाहीये. तेव्हा समृद्धीच्या पाठीमागे खेचलं जाताना आपण काय किंमत (न भरून येणारी) मोजतो आहोत?
तरी पुष्कळ गोष्टी वाचवता येतील!
ही संपन्नतेची ओढ फक्त ‘चैनी’साठीच असेल असं नाही. कधी ती स्वत:ला सिद्ध करण्यातील अपरिहार्य पायरी असेल, कधी कुणाशी तरी केलेली तुलना असेल, त्यांचा हेवा, द्वेष यातून आली असेल पण शेवटी ती एका टप्प्यानंतर आनंदापेक्षा दु:खाला अधिक पूरक ठरते हे ओळखता यायला हवं!
मुख्य म्हणजे ती ‘रेघ’ मारणं सगळ्यात महत्त्वाचं. कुणी ती पाच कपडय़ानंतर मारेल तर कुणी पन्नास! कुणी टू रूम किचनवर मारेल तर कुणी एखाद्या फार्म हाऊसनंतर. पण ज्या क्षणी आपली ‘समृद्धी’ आनंदाच्या पारडय़ापेक्षा दु:खाचं पारडं जड करते आहे असं ‘आतून’ जाणवेल तिथं निग्रहानं थांबायला हवं.
निदान त्यानंतर आपोआप येणारी समृद्धी ‘इदम् न मम्’ असं म्हणून उपभोगाच्या रस्त्यावर न नेता इतर मार्गावरून नेकीनं आणि निर्गवीपणे नेता यावी. असेही अनेक जण आपण आजूबाजूला पाहतो आणि त्यांचं संपन्न असणं किती आतून बाहेरून शोभून दिसतं तेही समजून येतं. नावं किती आणि कशाला घ्यायची? आपण ही त्या यादीत जाण्याची धडपड करावी हेच खरं!
डॉ. अनघा लवळेकर – anagha.lavalekar@jnanaprabodhini.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा