पूर्व आफ्रिकेतील मसाई ही भटकी जमात. आजही आपल्या आदिमत्वाचा अंश टिकवून ठेवणारी आजही एका भाल्याने सिंहाची शिकार करणारा मसाई कितीही लग्न करतो आणि कितीही मुलं जन्माला घालतो. स्त्रीला मात्र कसलेच हक्क, अधिकार नाहीत. सतत दु:ख आणि कष्टच वाटय़ाला आलेल्या मसाई स्त्रीविषयी…
पूर्व आफ्रिकेतील केनिया-टांझानियाच्या मैलोगणती पसरलेल्या गवताळ प्रदेशात मसाई ही भटकी जमात राहते. केनियाच्या मसाई मारा विभागात एक मसाई गाव बघायला गेलो होतो. तीन-चार तासांचा जीपचा खडतर प्रवास होता. असाच खडतर जीवनप्रवास मसाई स्त्रियांच्या वाटय़ाला आजही येतो. आजही दुय्यमत्व आहेच, संसाराची सारी जबाबदारी तिची आहेच, पण योनिविच्छेदासारख्या अघोरी प्रथेलाही तिला सामोरं जावं लागतंय.
या प्रवासात वाटेत मध्ये मध्ये शेकडो गायी-गुरांचे अनेक कळप दिसत होते. त्यांच्याबरोबर होते उंचनिंच, काटक, कणखर मसाई पुरुष. त्यांनी कमरेला अध्र्या लुंगीसारखे लाल-भगव्या रंगाचे वस्त्र गुंडाळले होते व मोठय़ा डिझाइनची निळी-पिवळी चादर दोन्ही खांद्यांवरून गुंडाळून घेतली होती. हातात काठी, भाला आणि कमरेला धारदार सुरा होता. काही तरुणांच्या चेहऱ्यावर पांढऱ्या मातीने रंगवले होते. ‘नुकतीच ‘सुंथा’ झालेले तरुण असे चेहरे रंगवितात’ अशी माहिती आमच्या ड्रायव्हरने दिली.
मसाई गावात पोचल्यावर तिथल्या एकाने इंग्लिशमधूनच बोलायला सुरुवात केली. त्याचं कारण विचारलं तर तो व तिथल्या गावप्रमुखांनी जवळच्या मोठय़ा गावात जाऊन शालेय शिक्षण घेतल्याचं कळलं. आधीच ठरविलेले डॉलर्स हातात पडल्यानंतर तिथल्या गावप्रमुखाने डोक्यावर सिंहाच्या आयाळीची टोपी आणि हातात रानटी म्हशीचे लांब, वेडेवाकडे शिंग तोंडाजवळ आडवे धरून आमचे स्वागत केले. आम्ही दिलेले डॉलर्स मुलांच्या शाळेसाठी वापरण्यात येतात, असेही त्याने सांगितले. साधारण तीनशे लोकवस्तीचे हे गाव. त्यांचा मूळ पुरुषही मध्येच डोकावून गेला. त्याला सतरा बायका व ८७ मुले असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे हे छोटं गाव एका पुरुषाच्या भल्यामोठय़ा कुटुंबाचा विस्तार होता!
गोलाकार मोठय़ा कुंपणाच्या कडेने छोटय़ा चौकोनी झोपडय़ा होत्या. माती, शेण, गवत यांनी बांधलेल्या त्या झोपडय़ांवर घट्ट विणलेल्या गवताचे उतरते छप्पर होते. गायी-गुरांसाठी गोठे होते. सर्वत्र शेण पडलेले होते. माशा घोंगावत होत्या. छोटय़ा-छोटय़ा मुली कडेवर भावंड घेऊन आमच्याकडे टुकूटुकू बघत होत्या. काही छोटी मुलं खाली झोपली होती. मुलांच्या सर्वागावर माशा घोंगावत होत्या. शेणाचा धूर करून या माशांना हाकलत का नाही? असं विचारल्यावर ‘या माशा प्रेमाचे प्रतीक आहेत. जितक्या जास्त माशा अंगावर तितके त्यांचे नशीब चांगले’, असे निरुत्तर करणारे उत्तर मिळाले. आमच्यातील एकजण म्हणाले की, बालपणापासून इन्फेक्शनला तोंड देण्याची सवय करणारा, इम्युनिटी (प्रतिबंधक शक्ती) वाढविण्याचा हा प्रकार असावा. त्या सर्वाना आता आमच्यासारख्या पाहुण्यांची सवय झाली असावी.
आमच्या स्वागतासाठी आठ-दहा मसाई स्त्रिया अर्धगोलाकार उभं राहून नाच करू लागल्या. त्यांचा नाच म्हणजे केवळ उंच उडय़ा व अधूनमधून किंचाळल्यासारखे ओरडणे होते. मग आमच्यातल्या काही जणींनी त्यांना फुगडय़ा घालून दाखविल्या. गरबा खेळून दाखविला. तेव्हा त्यांनीसुद्धा आमच्याबरोबर फुगडय़ा घातल्या. सर्व स्त्रियांनी एका खांद्यावरून पदर घेऊन अंगाभोवती वस्त्र गुंडाळले होते आणि पाठीवरून एक वस्त्र घेऊन त्याची पुढे गाठ बांधली होती. लाल, पिवळ्या, भगव्या, निळ्या रंगांची ती मोठय़ा डिझाइनची वस्त्रं होती. सर्वाच्या डोक्याचे गोटे केलेले होते. गळ्यात, हातात मण्यांच्या रंगीत आणि भरपूर माळा होत्या. कानामध्ये इतके जड मण्यांचे अलंकार होते की, त्यांचे फाटलेले कान मानेपर्यंत लोंबत होते.
‘मसाई’ हाच मसाई लोकांचा धर्म आहे. प्राचीन परंपरांची जोखडं आपल्या खांद्यावरून उतरवायला ते तयार नाहीत. एका पुरुषाला कितीही लग्ने करण्याचा अधिकार आहे. मसाई स्त्रीचे आयुष्य अत्यंत कष्टाचे आहे. स्त्री सतत बाळंतपणाच्या चक्रातून जात असते. त्यामुळे स्त्रिया कुपोषित, मुले कुपोषित व बालमृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. जितकी अधिक मुले तितकी अधिक श्रीमंती अशी समजूत आहे. पहाटे सुरू होणारा मसाई स्त्रीचा दिवस मध्यरात्र झाली तरी संपत नाही. एकेका स्त्रीला पंधरा-पंधरा गायींचे दूध काढावे लागते. दूध हे तिथलं मुख्य अन्न आहे. कुटुंबातील सर्वाचे दूध पिऊन झाले की, उरलेले दूध तिच्या वाटय़ाला येते. लांबवर जाऊन डोक्यावरून पिण्याचे पाणी आणावे लागते. जंगलात जाऊन चुलीसाठी लाकूडफाटा गोळा करणे हे तिचेच काम. त्यावेळी जंगलातील हत्ती, रानटी म्हशी, सिंह, साप यांची भीती असतेच. एकावेळी ३०-४० किलो सरपण तिला आणावे लागतेच, कारण घर ऊबदार ठेवणे आणि घरातला अग्नी सतत पेटता ठेवणे ही तिचीच जबाबदारी! राख, चिखल, गवत वापरून घर बांधण्याचे, गळके घर दुरुस्त करण्याचे कामही स्त्रियाच करतात. स्वयंपाक करणे, घर सारवणे, कपडे धुणे, गायी धुणे, गाभण गायींवर- आजारी गायींवर लक्ष ठेवणे, परंपरागत झाडपाल्याची औषधे गोळा करणे, कधी लांबच्या बाजारात जाऊन गाय देऊन मका, बीन्स, बटाटे खरेदी करणे अशी तिची खडतर दैनंदिनी असते. भरीला नवऱ्याची मारझोडही असते.
एवढय़ा मालमत्तेची देखभाल केली तरी या मालमत्तेवर तिचा कोणताही हक्क नसतो. त्या समाजात घटस्फोट मान्य नाही. स्त्रीचे परत लग्न होत नाही. नवऱ्याच्या अनेक बायकांतील एक आणि मुलांना जन्म देणारी असे तिचे स्थान आहे. जेवणात गायी, शेळ्या, मेंढय़ा यांचे मांस वापरले जाते. मारलेल्या जनावरांचे मांस, हाडे, कातडी यांची नीट व्यवस्था तिला करावी लागते. या साऱ्यातून वेळ काढून ती स्वत:साठी, मुलांसाठी व नवऱ्यासाठी मण्यांच्या, खडय़ांच्या माळा बनविणे, ब्रेसलेट, बांगडय़ा, कानातले दागिने बनविणे हे उद्योगसुद्धा करते. एवढेच नव्हे तर दर दहा वर्षांनी स्थलांतर केले जाते. त्याचीही जबाबदारी तिच्याकडेच असते.
 आजही अनेक अघोरी प्रकार तिथे पाहायला मिळतात. आठवडय़ातून एकदा एका गायीच्या मानेजवळील शीर कापून तिचे रक्त दुधात घालून सर्वानी पिण्याची प्रथा आहे. त्या गायीच्या जखमेवर झाडपाल्याचे औषध लावून तिला नंतर रानात सोडून देतात. आणखी एक अघोरी प्रथा म्हणजे मुली ११ ते १३ वर्षांच्या असताना म्हणजे त्या वयात येताना त्यांचा ‘योनिविच्छेद’ (Female Circumcision) करण्यात येतो. म्हणजे स्त्रीच्या योनीतील लैंगिक अवयव थोडा अथवा पूर्णपणे काढून टाकण्यात येतो. हे काम इतर स्त्रिया धारदार शस्त्राने, कसलीही भूल वगैरे न देता करतात. त्यावेळी जी मुलगी ओरडेल ती भित्री समजली जाते. स्त्रीची कामेच्छा कमी व्हावी या हेतूने ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. यात जंतुसंसर्ग होऊन, अति रक्तस्राव होऊन किती स्त्रियांचा बळी जात असेल ते त्या मसाईनाच माहीत!
सरकारतर्फे मसाईंना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात येतात. त्यांच्या वसाहतीला जवळ पडेल अशी शाळा बांधण्यात येते. मुलींना शाळेत न पाठविल्यास तुरुंगवासाची शिक्षा आहे. प्रत्यक्षात आम्ही पाहिले तेव्हा मुली लहान भावंडांना सांभाळीत होत्या आणि शाळेतून नुकताच परत आलेला, युनिफॉर्ममधील समूहप्रमुखाचा मुलगा, छान, स्वच्छ, चुणचुणीत वागत, बोलत होता. त्यांच्यातील काही धडपडय़ा महिलांनी अनेक कष्ट, हालअपेष्टा, पुरुषांचा मार सोसून शिक्षण घेतले आहे. आपल्या व्यथा, आपल्यातील वाईट प्रथा उघडय़ा केल्या आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने काही काम सुरू केले आहे. मसाई स्त्रियांना भाजीपाला, फळे लावायला शिकविणे, शिवण शिकविणे, लिहा-वाचायला शिकविणे, प्राथमिक आरोग्याचे शिक्षण देणे अशी त्यांची अनेक उद्दिष्टे आहेत. अशा प्रकारच्या शिबिरांमध्ये रेडक्रॉसचे डॉक्टर कुटुंब नियोजनाच्या गोळ्या देतात. आपली बायको असे औषध वापरत आहे हे नवऱ्याच्या लक्षात आल्यास तिला अमानुष मार पडतो.
नुसत्या भाल्याने सिंहाची शिकार करणारे मसाई पुरुष अजून तरी या बाह्य़ जगाच्या दबावाला पुरेसा प्रतिसाद देत नाहीत. सरकारलाही थोडे त्यांच्या कलाने घ्यावे लागते. स्वत:चे आरामशीर, आळशी आयुष्य सोडायला ते सहजासहजी तयार होणार नाहीतच. त्यांच्या मुलांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाल्या तर कालांतराने मसाई स्त्रीचे जीवन सुसह्य़ होऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा