सोबुक्वेंच्या ‘पासमार्च’ला त्याच्या घरापासूनच सुरुवात झाली. तो आणि त्याचे अनुयायी आपले पास जाळून, गावातल्या रस्त्यांवर घोषणा देत पोलीस स्टेशनवर गेले. त्यांच्या या मोर्चानं पेटून लाखो कृष्णवर्णीय ठिकठिकाणी एकत्र यायला लागले. तेव्हा गोऱ्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. मला जालियनवालाबाग हत्याकांड आठवलं. सरकारनं सोबुक्वेला अटक केली. तेव्हाही तो म्हणाला, ‘देअर इज नथिंग कॉल्ड अ‍ॅज कॉम्प्रमाइज इन प्रिन्सिपल्स!’ साऊथ आफ्रिकेतल्या सैनिकाची ही कथा.
नुकतीच एका चित्रपट महोत्सवासाठी साऊथ आफ्रिकेला गेले होते. त्या महोत्सवात एक डॉक्युमेंट्री पाहिली. ती तिथल्या एका सैनिकावर होती. त्याचं नाव सोबुक्वे. आफ्रिकेला जाण्यापूर्वी मनात फक्त नेल्सन मंडेलांचं नाव होतं. त्यांच्या देशात जायला मिळणार म्हणून भरून येत होतं. सोबुक्वेविषयी काहीच माहीत नव्हतं. मी पाहिलेली ही डॉक्युमेंट्री तर डॉक्युड्रामा होता. म्हणजे काही गोष्टी खऱ्या होत्या, काही प्रसंग नटांनी साकार केले होते. त्यात सोबुक्वेचं काम करणारा नट अफाट होता. त्याच्या आत कुणीतरी सुरुंग ठेवला आहे आणि तो कधीही फुटू शकतो असं वाटत होतं. त्या चित्रपटातून जे कळलं त्यानुसार साऊथ आफ्रिका हा कृष्णवर्णीयांचा देश, पण तिथे सोन्याच्या, हिऱ्यांच्या खाणी सापडायला लागल्या तशी गोऱ्या लोकांचे डोळे त्यांच्याकडे वळले. आपल्याला लुटायला आले होते तसे गोरे त्यांनाही लुटायला त्यांच्या देशात दाखल झाले. तिथल्या गोऱ्यांच्या राजवटीला ‘अपार्थेड’ म्हणतात. त्या राजवटीत गोऱ्यांनी अनेक जागा ‘अश्वेत लोकांसाठी बंद’ अशा पाटय़ा लावून बंद केल्या. त्यांच्याच देशात त्यांनाच बंदी! तसंच सगळय़ा ‘अश्वेत’ किंवा कृष्णवर्णीय लोकांसाठी एक पास बनवण्यात आला. त्यांचं नाव असलेला! प्रत्येक कृष्णवर्णीय माणसानं स्वत:च्याच देशात हा ओळखपत्रवजा पास बाळगणं सक्तीचं केलं गेलं. सोबुक्वे नावाचा एक क्रांतिकारी तरुण मुलगा कॉलेजात असल्यापासूनच या सगळय़ाविरुद्ध फुटू पाहात होता. त्याचे फुटू पाहाणारे क्रांतिविचार त्यानं बदलावेत म्हणून कॉलेजात त्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवायची शिक्षा दिली जायची. फक्त एक कमोड असलेल्या बंद खोलीत तो तासन् तास कोंडला जायचा. सोबुक्वे आतमध्ये पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन त्या कमोडवर बसून अथक वाचत राहायचा. जेव्हा कोंडमारा असह्य़ होई तेव्हा त्या वितभर खोलीतल्या वितभर  झरोक्याकडे पाहात राहायचा. शेवटी तो बधत नाही म्हटल्यावर नाइलाजानं त्याला बाथरूममधून बाहेर काढलं जायचं. कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर काही वर्षांतच त्यानं ‘आमच्या देशात आम्ही पास बाळगणार नाही’ यासाठी एक मोर्चा काढायचा ठरवला. त्याचा तो ‘पासमार्च’ पाहून मला गांधीजी आठवले. त्यांच्या स्वातंत्र्यलढय़ाची सुरुवात आफ्रिकेतच झाली. पुढे त्यांनीही भारताच्या स्वातंत्र्यलढय़ात अगदी असाच ‘दांडीमार्ग’ काढला होता. सोबुक्वेंच्या या ‘पासमार्च’ला त्याच्या घरापासूनच सुरुवात झाली. तो आणि त्याचे अनुयायी आपले पास जाळून, गावातल्या रस्त्यांवर घोषण देत पोलीस स्टेशनवर गेले. तिथल्या मुख्य गोऱ्या अधिकाऱ्याला म्हणाले, ‘‘आमच्याकडे पास नाही, आम्हाला अटक करा!’’ तो गोरा घाबरून त्यांना म्हणाला, ‘‘मी कामात आहे, चालते व्हा!’’ त्यांच्या या मोर्चानं पेटून लाखो कृष्णवर्णीय ठिकठिकाणी एकत्र यायला लागले. तेव्हा मात्र गोऱ्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. मला जालियनवालाबाग हत्याकांड आठवलं. सरकारनं सोबुक्वेला अटक केली. त्यानं त्याचे विचार बदलावेत म्हणून त्याला कॉलेजसारखेच पुन्हा एकदा डांबण्यात आले. तेव्हाही तो म्हणाला, ‘‘देअर इज नथिंग कॉल्ड अ‍ॅज कॉम्प्रमाइज इन प्रिन्सीपल्स!’’ त्याला इतर कैद्यांबरोबरही न ठेवता एकांतवासाची शिक्षा झाली. तेव्हा तो म्हणाला, ‘‘या स्वातंत्र्यलढय़ाचा शेवट माझा मृत्यू असला तरी माझ्या नातवंडांसाठी ती एका सुंदर गोष्टीची सुरुवात असेल; ती गोष्ट म्हणजे-स्वातंत्र्य!’’ तुरुंगात जाण्याआधी त्यानं उच्चारलेल्या काही विचारवाक्यांपैकी सगळय़ात मनावर ठसलं ते वाक्य होतं, ‘व्हीजन इन द अ‍ॅबिलीटी टू सी फ्यूचर बीफोर इट हॅपन्स..’ सोबुक्वे एकांतवासात असल्यानं त्याच्या पहारेकऱ्यांनाही सक्त ताकीद होती, त्याच्याशी बोलणं तर सोडाच, त्याच्या डोळय़ाला डोळाही भिडवायचा नाही. ही किती भयंकर शिक्षा असू शकते हे मला हा महितीपट बघताना पहिल्यांदा कळलं. सोबुक्वे वाचत राहिला, पत्रातून तेवढे आपले विचार बोलत राहिला. पण वर्षांनुर्वष कुणीही माणूस समोर नसणं हे किती निर्घृण असू शकतं. तरीही सोबुक्वे मोडला नाही, मात्र त्याच्या मनावर हळूहळू परिणाम व्हायला लागला. तो स्वत:शीच बोलायला लागला. त्याला संगीताची फार आवड होती. एका प्रसंगात आवडतं संगीत ऐकू यायला लागतं. त्याच्या एकाकी खोलीत तो उठून उभा राहतो आणि त्या संगीतावर नाचायला लागतो. त्याला त्याच्यावर प्रेम करणारी त्याची गोड नर्स बायको आठवते, ‘पासमार्च’च्या आधी त्याला घट्ट मिठी मारून रडलेली.. कॅमेरासमोर त्याची विजनवास खोली. मध्ये एक भिंत. भिंतीच्या अलीकडे तो एकटाच नाचताना दिसतो आहे. नाचत नाचत तो त्या भिंतीपलीकडे येतो तेव्हा त्याच्या मिठीत त्याची बायकोही नाचते आहे. पुन्हा भिंती अलीकडे येतो तेव्हा तो एकटाच आहे, पूर्ण एकटा. सोबुक्वे अतिशय वाईट अवस्थेत कर्करोगानं गेला. तो शेवटपर्यंत त्याच्या बायकोला भेटू शकला नाही.
मी नेल्सन मंडेलांचे घर बघायला ‘सोवेतो’ गावी गेले होते, तिथे त्या घरात नेल्सन मंडेला त्यांच्या पत्नी विनी मंडेला त्यांच्या एका फोटोशेजारी लिहिलं होतं, ‘स्वातंत्र्य सैनिकाच्या बायकोचं जीणं हे एखाद्या विधवा बाईसारखंच असतं, तिचा नवरा जिवंत असतानासुद्धा!’ माहितीपटातल्या एका प्रसंगात सोबुक्वे एक पत्रं लिहितो, ते त्याच्या गोऱ्या पहारेकऱ्याच्या हातात देतो. त्याच्या डोळय़ात बघायचं नाही अशी सक्त ताकीद असलेला तो गोरा त्याच्याकडे ढुंकूनही न बघता ते पत्र हातात घेतो. सोबुक्वे अचानक त्याचा हात हातात घेऊन म्हणतो, ‘‘आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, तिला हे पत्र पोहोचेल असं बघशील?’’ गोऱ्यानं उत्तर देणं अपेक्षित नाही. पण तोही हेलावून, न राहावून होकाराची मान हलवतो. यावर सोबुक्वे शांत हसून त्याला म्हणतो, ‘‘यू आर अ व्हेरी काइंड मॅन.. थँक्यू.’’ सोबुक्वेनं त्या गोऱ्या माणसाला ‘काइंड’ म्हणणं यात मला मंडेला, गांधीजींच्या विचारांचं मूळ दिसतं. नेल्सन मंडेलांचं एक वाक्य आहे, ‘अ‍ॅज आय वॉक्ड आऊट द डोअर टुवर्ड द गेट दॅट वूड लीड टू माय फ्रीडम, आय न्यू इफ आय डीडन्ट लीव माय बीटरनेस अँड हेट्रेड बीहाईंड, आय वूड स्टील बी इन प्रीझन’ आफ्रिकेतले काही लोक गमतीने म्हणतात, ‘आमच्या देशात प्रत्येक रंगाची माणसं आहेत!’ ही गोष्टं तिथल्या सगळय़ाच लोकांना आवडते असं नाही. गांधीजींची मुस्लिमांबाबतची भूमिका न पटणारे कितीतरी लोक आहेत. मला सोबुक्वे, मंडेला, गांधीजी ही तुरुंगात असतानाही मुक्तच असलेली माणसं वाटली. फक्त हीच नाहीत, आणखीन कितीतरी..खरी स्वतंत्र मुक्त माणसं. मला त्या छोटय़ाशा खोलीत पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन बसलेला सोबुक्वे पाहून टिळक आठवले. तेही गीतारहस्य लिहीत असताना असेच गठ्ठेच्या गठ्ठे घेऊन बसले असतील. सोबुक्वे जेव्हा तरुंगातल्या विजनक्षणी संगीताची साथ घेऊन तगू पाहातो तेव्हा मला सावरकर आठवतात. त्यांना त्यांच्या तुरुंगात शब्दांनी साथ केली. त्यांना त्यांच्या कवितेनं सोबत केली. नुसती सोबतच नाही. तर बळही दिले! ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला..’ या शब्दांमध्ये केवढी फुटू पाहणारी ऊर्जा आहे! केवढी तळमळ आहे! मंडेला साधारण अठ्ठावीस र्वष तरुंगात होते. या वाक्याचा अर्थ आपल्या सारख्यांना नाही कळत. खरंच नाही. तगमगसुद्धा फारच छोटा शब्द!  मात्र, मला त्या विजनवासाच्या तडफडीपलीकडे जाऊन या नेत्यांनी तुरुंगात राहून जे केलं त्यानं स्तिमीत व्हायला होतं. त्या प्रत्येकानं तुरुंगातला काळ ही स्वत:च्या विचारावर चिंतन करण्याची संधी मानली. चिंतनासाठी आपण आपल्यापाशी राहायला हवं. या नेत्यांना सक्तीनं स्वत:पाशी राहावं लागलं, पण त्यांनी त्या संधीचा पुरेपूर वापर केला. पास्कल नावाचा एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ, विचारवंत, तत्त्ववेत्ता होता. त्यांचं एक वाक्य आहे, ‘ऑल ऑफ ह्य़ुमॅनिटीज् प्रॉब्लेम्स् स्टेम फ्रॉम मॅन्स इनॅबिलिटी टू सीट क्वायटली इन अ रूम अलोन.’ माझ्या आजच्या जगात मी धरून प्रत्येकजण स्वत:पासून पळायची एकही संधी सोडत नाही. ‘तडजोड करणं’ हा जगण्याचाच एक भाग म्हणून मी आणि इतरांनी कधीच स्वीकारला. प्रत्येकाची फूटपट्टी वेगळी असेल, पण जमवून घेणं सवयीचंच होतं आहे. या माझ्या जगातल्या या तडजोडीच्या डोळय़ांनी जेव्हा मी या सगळय़ा नेत्यांकडे पाहते तेव्हा मला अनेक प्रश्न पडत आहेत. ‘मी मला स्वत:ला खरोखर स्वत:पाशी असण्याची, स्वत:चा विचार, स्वत:चं ‘असणं’ शोधण्याची अशी संधी कधी देऊ धजले आहे का? माझे नातेसंबंध, माझ्या भावना, माझी कला, माझे पैसे यापलीकडच्या माझ्या असण्याकडे मी स्वत:ला न्यायचा कधी विचार केला आहे का? मला माझ्यापेक्षाही मोठं बनवणाऱ्या किती गोष्टी मी जोपासते आहे? आज माझ्या देशावर कुठल्याही परकीय सत्तेचं राज्य नाही तरीही मी खरंच स्वतंत्र आहे का? खऱ्या अर्थानं मुक्त होण्यासाठी मला एका खोलीत एकटीनं, शांतपणे बसावं लागेल. मला त्याची सवय नाही. त्यामुळे हे स्वत:पाशी येणं, थांबणं, थांबून राहाणं, शोधणं, मला तुरुंगवासासारखंही वाटू शकेल. पण हा तुरुंगच माझ्या खऱ्या मुक्तीचा मार्ग असेल. मी माझ्या आतल्या या स्वातंत्र्य लढय़ासाठी तयार आहे!  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा