‘‘चांगुणा’ नाटकात काम करत होते तेव्हा माझे लग्न झाले नव्हते. त्यातील मातृत्वाला आसुसलेली नायिका आपल्या गर्भवती मैत्रिणीला पोटातील गर्भाच्या हालचालींबद्दल कुतूहलाने विचारते तेव्हा मैत्रीण उत्तरते, ‘‘जित्त पाखरू वंजळीत दाबून धरल्यागत वाटतंय.’’ या वाक्याने माझे कुतूहल वाढले. वय तरुण, अंगात उत्साह भरपूर. घराजवळच्या एका कुटुंबात जिथे कोंबडय़ा पाळल्या होत्या तिथे जाऊन एक कोंबडीचे पिल्लू ओंजळीत धरून ती हालचाल मी स्वत: अनुभवली. पुढे लग्नानंतर मुलाच्या, असीमच्या वेळी सृजनाचा तो आनंद. त्या वाक्यातील अनुभव प्रत्यक्ष आयुष्यात असोशीने घेतला.’’ सांगताहेत विविधरंगी भूमिकांनी आयुष्य समृद्ध झाल्याचा अनुभव घेणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी.
लहानपणापासून मला घरातच अभिनयाचे बाळकडू मिळाल्यामुळे पुढे अभिनय करायचे निश्चितच होते. पदवीधर झाल्यावर उगीचच कुठे इकडे तिकडे नोकरी शोधायचा प्रयत्न केला, पण अंतर्मन मात्र बजावत होते की नोकरी वगैरे तुझ्याने जमणारी नाही. नाटक आणि अभिनय हेच तुझ्यासाठी योग्य क्षेत्र आहे. कारण नाटक हा माझा ध्यास होता. नेमकी त्याच वेळी केंद्र सरकारतर्फे भारतातून विविध कला प्रांतात रस असणाऱ्या होतकरू कलाकारांसाठी शिष्यवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध झाली. वडिलांनी सुचविल्यानुसार मी नाटक या क्षेत्रासाठी अर्ज भरला. अनेक चाचण्या घेऊन अखेर २५ जणांची निवड झाली. त्यात माझीही निवड झाली आणि माझ्या आयुष्याला निश्चित आणि योग्य दिशा मिळाली. अर्जात गुरू म्हणून बेधडकपणे एनएसडीच्या अल्काझींचे नाव लिहिले होते आणि नंतर खरोखरच तिथे प्रवेश केल्यावर त्यांची विद्यार्थिनी व्हायचे भाग्य मला लाभले.
अर्थात माझे पहिले गुरू म्हणजे माझे वडील अनंत ओक. पुण्यात बराच काळ ते नाटकाशीच निगडित होते. विजय तेंडुलकरांच्या ‘श्रीमंत’ नाटकात ते रावसाहेब ही व्यक्तिरेखा साकारीत. पुढे त्यांनी अभिनय सोडला आणि नाटय़ दिग्दर्शनाकडे वळले. राज्य नाटय़ स्पर्धेसाठी जेव्हा ते आराधना संस्थेसाठी ‘सुंदर मी होणार’ हे नाटक बसवीत होते तेव्हा बेबीराजेंच्या भूमिकेसाठी त्यांना कुणी अभिनेत्री मिळत नव्हती. खरेतर मला ती भूमिका करायची खूप इच्छा होती. त्यांनाही याची कल्पना होती. परंतु तसे केले तर ओक आपल्या मुलीची वर्णी लावतात असे कुणी म्हणायला नको म्हणून ते मला टाळीत होते. खरेतर इथे वशिल्याचा प्रश्नच नव्हता, कारण मी नृत्य शिकत होते. बालनाटय़ात काम केले होते. बक्षिसे मिळवीत होते. मला अभिनय चांगला जमतो असे सर्वाचे मत होते. अखेर भिडस्त स्वभावाच्या वडिलांकडे माझ्या आईने मध्यस्थी केली आणि मला बेबीराजेंचा रोल मिळाला. वडिलांच्या मते नाटक म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर त्याहीपलीकडे बरेचसे काही आहे. त्यांच्या बोलण्यातून, समजावण्यातून पुढे मला खरोखरच पटले की अभिनयातून फक्त समाधानच मिळते असे नाही तर माणूसही समजायला मदत होते. त्यांच्याकडूनच नाटकातील पात्रांबद्दल, नाटकाबद्दल सखोल विचार करायची दीक्षा मिळाली. म्हणूनच एखाद्या भूमिकेचा अभ्यास करताना तिच्या तळापर्यंत (अंतरंगात) बुडी मारणे महत्त्वाचे ठरते. ती व्यक्ती कुठे राहते? काय करते? ती कुठल्या वातावरणात वाढली? ती नक्की अशी का वागते? याचा शोध घेणे जरुरी आहे हे कळलं. एकदा हे समजून घेतल्यावर नित्याच्या आयुष्यातही तो नाद जडला.
करिअरच्या सुरुवातीलाच वडिलांकडून अभिनयाचा श्रीगणेशा शिकतानाची एक गोष्ट आठवली. ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या अखेरीस बेबीराजेंचे स्वगत झाल्यावर मी विंगेत आले पण त्याचा प्रभाव इतका प्रचंड होता, की काही केल्या मला रडू आवरेना. अखेर त्यांनी मला सांगितलं, ‘स्टेजवर तू बेबीराजेंची भूमिका १०० टक्के जगलीस, पण स्टेजवरून उतरल्यावर आत्ता इथे तू रोहिणी आहेस याची मनाशी कायमची खूणगाठ बांध अन्यथा यापुढे तू अभिनेत्री म्हणून विविध भूमिका कशा साकारशील?’ वडिलांनी बऱ्याच प्रकारे समजावल्यानंतर मी हळूहळू शांत झाले. पण त्यांचे शब्द मात्र स्मरणात राहिले.
दिल्लीला ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’त प्रवेश घेतल्यावर मला माझे महागुरू अल्काझी भेटले. रोहिणी हट्टंगडीला घडवण्यात माझ्या या गुरूंचा सिंहाचा वाटा आहे हे सांगताना मला अभिमान वाटतो. मला आठवतंय, ज्युनिअर म्हणून असेल कदाचित पण पहिल्या वर्षीच्या नाटकात मला गर्दीमध्ये उभे राहायचे होते. सरांनी आम्हाला आपापल्या भूमिकेवर एक परिच्छेद लिहिण्यास सांगितले. अर्थातच मला प्रश्न पडला की मला नाव नाही. संवाद नाही. मग माझी ‘भूमिका’ म्हणजे काय? हाच प्रश्न ‘गर्दी’तल्या इतर विद्यार्थ्यांनाही पडला. पण लिहायचे तर होतेच. मग आम्हीच आपसात तू अमुक, मी अमुक, आपण एकमेकांचे अमुक, आपण अमुक ठिकाणी राहतोय वगैरे कल्पना केल्या. त्या आधारे आम्ही स्वत:ची भूमिका तयार करून त्यावर लिहिले. मात्र यातूनच एखाद्या भूमिकेसाठी आपण आपली कल्पनाशक्ती किती विस्तारू शकतो याचे भान आले. नाटक या प्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन विस्तारत गेला. सरांच्या मते प्रत्येक माणसाला स्वत:चे असे व्यक्तिमत्त्व असते. मग तो अगदी रस्त्यावरील भिकारी का असेना. एकदा सरांनी मला काही उतरवून घ्यायला सांगितले आणि नेमकी माझी पेन्सिल बोथट होती त्यावर ते पटकन म्हणाले, Your mind is as blunt as your pencil , sharpen it. (मन तुझ्या पेन्सिलसारखे बोथट होऊ देऊ नको. टोकदार ठेव. तिला कायम सावध असायला हवे.) सरांचे हे वाक्य माझ्यासाठी फक्त पेन्सिल संदर्भात नाही तर आयुष्यातील अनेक प्रसंगांसाठी, अनुभवांसाठी दिशादर्शक ठरले. त्यांच्या त्या सूचनेला मी गुरूमंत्रच समजते. त्यातूनच आली ती अनुभवांची असोशी. ‘चांगुणा’ नाटकात काम करत होते तेव्हा माझे लग्न झाले नव्हते. त्यातील मातृत्वाला आसुसलेली नायिका आपल्या गर्भवती मैत्रिणीला पोटातील गर्भाच्या हालचालींबद्दल कुतूहलाने विचारते तेव्हा मैत्रीण उत्तरते, ‘‘जित्त पाखरूं वंजळीत दाबून धरल्यागत वाटतंय.’’ या वाक्याने माझे कुतूहल वाढले. वय तरुण, अंगात उत्साह भरपूर. आमच्या घराजवळच्या एका कुटुंबात जिथे कोंबडय़ा पाळल्या होत्या तिथे जाऊन एक कोंबडीचे पिल्लू ओंजळीत धरून ती हालचाल मी स्वत: अनुभवली. अर्थात ते वाक्यही मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी दडी मारून बसले होते. पुढे काही वर्षांनी लग्नानंतर असीमच्या, माझ्या मुलाच्या वेळेस गरोदर असताना अचानक ‘ते’ वाक्य आठवले आणि सृजनाचा तो आनंद. त्या वाक्यातील अनुभव मी माझ्या प्रत्यक्ष आयुष्यात असोशीने घेतला.
‘अर्थ’ चित्रपटातील कामवालीची भूमिका मला पुरस्कार देऊन गेली. तीसुद्धा माझ्या या निरीक्षणाचे फलित म्हणायला हवे. माझ्या लहानपणी आमच्याकडे शांताबाई नावाची बाई घरकामाला होती. तिलाही माझ्याच वयाच्या आगे-मागे दोन मुली होत्या. तिलाही आपल्या मुलींना खूप शिकवायचे होते. ‘अर्थ’मधील भूमिकेला हेच सर्व अपेक्षित होते. तिची देहबोली, तिचा रांगडेपणा सहज जमून गेले. पडद्यावर ‘ती’ साकारताना शांताबाई अक्षरश: माझ्यात पूर्णपणे भिनली. त्यामुळेच असेल कदाचित पुरस्कार माझ्याकडे चालत आला.
१९८० साली केलेल्या ‘मित्राची गोष्ट’ या नाटकामुळे, त्यातील भूमिकेमुळे माणसाला समजून घेण्यात मी एक पाऊल आणखी पुढे गेले. त्यात माझी ‘मित्राची’ भूमिका एका समलिंगी मुलीची होती. अशा व्यक्तींना समाजाकडून सहसा अवहेलनाच वाटय़ाला येते याची कल्पना होती. नाटकाच्या रिहर्सलसाठी मी दुपारच्या वेळी दादरहून खारला लोकलने जात असताना दरवाजातच उभी होते. माझ्यासमोर एक तृतीयपंथी उभा होता. गाडी स्टेशनात थांबली की आत चढणाऱ्या सर्व स्त्रिया त्याच्याकडे एका विशिष्ट नजरेने काहीशा तिटकाऱ्याने बघत. या स्त्रियांची ‘ती’ नजर पाहून मला जाणवले की, आपल्याही मित्राच्या रोलबद्दल नाटकातील इतर व्यक्तिरेखांच्या मनात किती पराकोटीची घृणा, तिरस्कार असेल. अशा व्यक्तींबद्दल असलेल्या समाजाच्या भावनांनी मला काहीसे अस्वस्थ केले. पण स्त्रियांच्या ‘त्या’ नजरेने मला नाटकातील माझी भूमिका अधिक सशक्तपणे वठवायला खूप मदत तर केलीच, पण सतत व्यक्तिमत्त्वांच्या अंतरंगात डोकावणाऱ्या मला वेगळाच अनुभव दिला. मी तृतीयपंथियांकडे घृणेच्या नजरेने पाहू शकत नाही.
माझ्या संपूर्ण कारकिर्दीत ‘गांधी’ चित्रपटातील कस्तुरबाची भूमिका ही मैलाचा दगड ठरली. करिअरच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या भूमिकेने रोहिणी हट्टंगडी या अभिनेत्रीला प्रचंड प्रसिद्धी, पुरस्कार तर मिळालेच पण वैयक्तिकरित्या अधिक काही मिळाले. एक समर्थ अभिनेत्री बनण्याच्या दृष्टीने खूप काही शिकायला, बघायला मिळाले. यासाठी मी स्वत:ला फारच भाग्यवान समजते. हॉलीवूडमध्ये काम करायचे याचे मला सुरुवातीला प्रचंड दडपण आले होते. पण तिथे सर्वासाठी असणारी शिस्त, तिथला कामाचा नेटकेपणा पाहून प्रभावित झाले आणि हळूहळू सरावत गेले. संपूर्ण चित्रपटात साऊथ आफ्रिकेत असल्यापासून त्यांच्या मृत्यूपर्यंतचा कस्तुरबांचा प्रवास दाखवला आहे. त्या भूमिकेचा अभ्यास माझा मीच करायचा होता. त्यासाठी मी त्यांच्यावरची पुस्तके शोधून काढली. मुळात त्यांच्या या प्रवासात त्यांच्या वयाचे चार टप्पे मी पाडले आणि तसा गेटअप घेऊन काम करायचे नक्की केले. वनमाला पारेख यांचे ‘हमारी बा’ पुस्तक वाचून त्यांना भेटले. त्यांच्याकडूनच बांचे दिसणे, त्यांचे कुंकू, त्यांचे हातवारे, स्वभावविशेष समजून घ्यायचा प्रयत्न केला. पुस्तक वाचताना एका प्रसंगाशी अडखळले. ‘गांधींनी माझ्या डोक्यावर हातही ठेवला नाही,’ अशा अर्थाचे काही कस्तुरबांनी एका पत्रात लिहिलेले मला आढळले.
मी त्यावरच विचार करत राहिले. ते वाक्य नंतर गांधींची भूमिका करणाऱ्या बेन (किंग्सले)ला सांगितले व हा संदर्भ कसा घेता येईल यावर आम्ही बोललो. साबरमती आश्रमात गांधींना अटकेचे चित्रीकरण चालू असताना पोलिसांबरोबर जाताना बेनने ‘बा ला सांभाळ’ असे मीराला सांगताना मुद्दाम बाच्या म्हणजे माझ्या डोक्यावर हात ठेवून माझा निरोप घेतला. म्हटले तर ही छोटीशी गोष्ट. पण भूमिकेच्या सूक्ष्म निरीक्षणात अभ्यासामुळे मला ती नेमकी सापडली. तिचा उपयोग करता आला. मात्र पूर्ण चित्रपटादरम्यान आणि त्यासाठी कस्तुरबा या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पदर उलगडत गेले आणि माझ्या लक्षात आले, की भले त्या एका महात्म्याची अर्धागी असोत पण त्या गांधींच्या मागे मुकाटय़ाने फरफटल्या नाहीत तर चालतच गेल्या. दक्षिण आफ्रिकेपासून भारतात ‘महात्मा’ पदाला पोचेपर्यंत पतीने केलेले असंख्य प्रयोग जेव्हा त्यांना पटले नाहीत, तेव्हा त्यांनी ते मुकाटय़ाने अनुसरले नाहीत. सुरुवातीला त्यांनी स्वत:चा निषेध स्पष्ट केलेला आहे. अर्थात चित्रपट गांधी या व्यक्तिरेखेवर असल्याकारणाने तिथे महात्म्याच्या पत्नीचे दुय्यमत्व स्वाभाविकच होते.
मात्र कस्तुरबांची खासगी आयुष्यात झालेली घुसमट, तिच्या मुलांचे भरकटणे, त्यामुळे तिचे व्याकुळणे हे बरेचदा मला आतल्या आत कुठेतरी अस्वस्थ करीत होते. दरम्यान, रामदास भटकळांनी लिहिलेले कस्तुरबांचे आत्मकथन करणारे दोन अंकी नाटक आमच्याकडे आले. जयदेवजींना ती कल्पना खूप आवडली होती. ते स्वत: हे नाटक बसवणार होते ज्यात मी जगदंबा (कस्तुरबा) साकारणार होते. दुर्दैवाने आधी त्यांच्या आजारपणामुळे आणि नंतर मृत्युमुळे ते साध्य झाले नाही. मात्र त्यांना श्रद्धांजली म्हणून त्याच्या पहिल्या पुण्यतिथीला ते सादर करायचे ठरवले. प्रतिमा कुळकर्णीने खूप मेहनत घेऊन मूळ संहितेवर योग्य ते संस्कार केले. प्रयोगाची आखीवरेखीव बांधणी केली. ‘आविष्कार’ संस्थेतर्फे मी आणि आमचा मुलगा असीमने हा प्रयोग सादर केला. ज्यात असीम गांधींच्या मुलांचे मनोगत सादर करतो आणि कस्तुरबाच्या आयुष्यातील प्रसंगांत, अनेक घटनांत तिच्या मनातील भावनांचे, आंदोलनांचे प्रकटीकरण मी करते. मंचावर ते सर्व सादर करताना माझ्यातील अस्वस्थतेला त्या भूमिकेने वाट मिळवून दिली.
‘गांधी’प्रमाणेच ‘सारांश’ चित्रपटातही माझे वय ३०च्या आत असूनही एका मध्यमवर्गीय वृद्धेची भूमिका मला मिळाली. तीही खूप गाजली. सुरुवातीला साधीसुधी काहीशी अंधश्रद्धाळू वाटणाऱ्या त्या वृद्धेच्या भूमिकेतील ताकद मला हळूहळू उमगत गेली. आयुष्यातील प्रचंड मोठय़ा आघातानंतर कोलमडलेल्या पतीला तिने दिलेली साथ, अचानक उद्भवलेल्या संघर्षांत तिचा ठामपणा, निग्रह मला मनोमन भावला. त्या वृद्ध जोडप्याचे सहजीवन, त्यातील उतार-चढाव, एकमेकांना सावरणे हे सर्व पडद्यावर जिवंत करणे म्हणजे विलक्षण अनुभव होता.
जोडीदाराकडून नाकारलेली, दुर्लक्षिलेली, आयुष्यातील निर्णय चुकल्याची भावना झालेली म्हणूनच खूप काही गमावलेय अशी मनोधारणा झालेली नायिका मला ‘पार्टी’ चित्रपटात करायची होती. इतर भूमिकांपेक्षा ही थोडी वेगळी आणि माझ्यासाठी आव्हानात्मक होती. परंतु तिच्या अंतरंगात शिरल्यावर सहजसोपे झाले आणि विशेष म्हणजे त्या भूमिकेने मला पुरस्कारही मिळवून दिला.
चित्रपट, नाटक आणि काही वर्षांपासून दूरचित्रवाणीवर मालिका करताना मी शक्यतो माझे म्हणणे कुणावर लादत नाही. पण अलीकडेच ‘बेटियाँ’ मालिकेत सून विधवा झाल्यावर मी म्हणजे तिची सासू तिच्या बांगडय़ा फोडते, कुंकू पुसते असे दिग्दर्शकाला अपेक्षित होते. परंतु एक स्त्री आणि तीही आजच्या जमान्यातील म्हणून मला ही कृती अत्यंत आक्षेपार्ह वाटली. मुळात पटलीच नाही. मी दिग्दर्शकाला स्पष्ट नकार दिला. पण असे प्रसंग माझ्या वाटय़ाला अपवाद म्हणूनच आले.आपल्या व्याधीला आणि उपचारांना अत्यंत संयमाने सामोरे जाणारे जयदेवजी त्यांच्या अखेरच्या काळात जेव्हा कोषात गेल्यासारखे झाले, तेव्हा मी हादरून गेले, सुन्न झाले. तेव्हापासून, बहुधा हळवेपणामुळे असेल कदाचित माझ्या स्वभावात एखाद्याबद्दलची क्षमाशीलता जास्त वाढत गेली. एकेकाळी स्वत: आणि इतरांनीही परिपूर्ण असावे हा अट्टहास बाळगणारी मी त्यानंतर एखाद्याला फक्त दुसरीच नाही तर तिसरीही संधी देते. माझ्यातील हा बदल मी निर्लेपपणे स्वीकारलाय! जयदेवजींच्या आजारपणात आम्हा तिघांच्या नात्याची वीण अधिक घट्ट झाली. असीमच्या समजूतदार आणि जबाबदार वागण्यामुळेच त्या हळव्या मन:स्थितीतही माझी मालिकेतील कामे मी चालू ठेवू शकले. शिवाय सेटवरील सर्वाचेच तसेच आप्त-मित्रांचेही सहकार्य मिळाले हे मान्य करायला हवे.
कुणाला आश्चर्य वाटेल पण आजही कुठलीही भूमिका करण्यापूर्वी क्षणभरासाठी का होईना मला प्रचंड अस्वस्थ वाटते आणि पुढच्याच क्षणी मला त्यामागचे कारणही उमगते. परिपूर्णतेच्या हट्टापायी ती अस्वस्थता आलेली असते. आजवरच्या अभिनय प्रवासात प्रसिद्धी, पुरस्कार पुष्कळ मिळाले. अनेक भूमिका केल्या. तरुणपणीच वृद्धेच्या भूमिका जिवंत केल्या. काही भूमिका सहजसाध्य, निखळ आनंद देणाऱ्या ठरल्या तर काही गुंतागुंतीच्या, आव्हानात्मक! मनाला अस्वस्थ करणाऱ्या. पण एक नक्की, प्रत्येक भूमिकेच्या अंतरंगाचा ठाव घ्यायच्या माझ्या प्रयत्नांमुळे या सर्वच भूमिकांनी मला खूप काही शिकवले. माणसाला समजून घ्यायला मदत केली. ज्यामुळे माझे आयुष्य माणूस म्हणून समृद्ध झाले असे मला नक्की वाटते.
शब्दांकन – अलकनंदा पाध्ये
alaknanda263@yahoo.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा