‘मिस्यू’, ‘मिसिंग यू’ हे काय असतं हो?’’
‘‘ती त्याला मिस् करत्येय म्हणजे त्याची आठवण काढत्येय.’’
‘कर्म माझं. दहा दहा मिनिटांनी तर फोन करतात एकमेकांना! एकेकदा वाटतं, म्हणावं, लग्नानंतर बोलायला काहीतरी शिल्लक ठेवा रे बाबांनो.. मिसिंग काय कपाळ?’’
‘‘आहे! एक गोष्ट नक्की मिसिंग आहे..
नातू घरात शिरला तो त्याच्या ब्लॅकबेरीवर बोलत बोलतच. तसाही घरात असताना तो फोनवरच असायचा. सुरुवातीला आजी-आजोबांना त्याचं कौतुक वाटायचं, (कानाजवळचा फोन मानेने रुबाबात किती छान दाबून धरतो नाही हा?.. जर्.. रा.. म्हणून पडू देत नाही फोन) नंतर कुतूहल वाटायला लागलं. (हा दिवसभर एवढं काय बोलत असतो म्हणते मी? किंवा हा जे काही फोनवर कुजबुजतो, पुटपुटतो, गुणगुणतो ते समोरच्याला ऐकू येत असेल का?) आणि पुढे पुढे तर रागच यायला लागला. (कबूल आहे. आम्ही मोबाइलवाले नाही. म्हणून आमच्याशी बोलूच नये?)
फोनवर बोलता बोलताच नातवाने हाताने खूण केली, ‘‘आजी, लवकर जेवायला वाढ. मला पटकन बाहेर जायचंय.’’ फोनवर बोलत असताना तो कोणताही जोडउद्योग करू शकायचा. जसं पेपर वाचणं, दाढी करणं, जेवणं, कपडे घालणं- काढणं, व्यायाम करणं किंवा आतासारखी सूचना करणं वगैरे. सुरुवातीला न राहवून आजी-आजोबांपैकी कोणीतरी दटावायचं, ‘अरे, तो फोन खाली पडेल ना!’ पुढे नातवाच्या सवयींची त्यांना सवय झाली. कधी नव्हे तो वर्षभर त्याचा सहवास घडत होता. तेसुद्धा त्याच्या कंपनीने त्याला ट्रेनिंगसाठी पाठवल्यामुळे. खरं तर कंपनीतर्फे त्याची बाहेर राहण्याची उत्तम सोयही होणार होती, पण आजी-आजोबांनीच घरी राहायची त्याला गळ घातली. नेमकं याच दरम्यान त्याचं गावातल्या मुलीशी लग्न ठरलं. मग काय, ऊतच आला. कौतुकालाही आणि फोनवर राहाण्यालाही. भावी नातसून नातवाच्याच वयाची होती. तेवढीच शिकलेली. तेवढीच जबाबदारीची नोकरी करणारी. फरक एवढाच, की तिची नोकरी गावाच्या अगदी विरुद्ध टोकाला होती. तरीही तो तिला नोकरीवर जाताना सोडायला आणि काम संपताना घ्यायला जायचा. एरवी कोपऱ्यावरून दूध किंवा औषध आणायचं असलं तरी टाळाटाळ करणारा तो तिच्यासाठी भर गर्दीतले पाच-दहा मैल तुडवायलाही तयार असायचा. तो तिला सोडायला जाणार, मग ती त्याला सोडायला अध्र्या वाटेवर येणार, तेवढय़ात काहीतरी तिच्याच दिशेचं अत्यंत अपरिहार्य काम आठवून तो पुन्हा त्या दिशेने कूच करणार, अशी सोडासोडी तर इतके वेळा चालायची की आजी-आजोबांनी तिचा हिशेब करणंच सोडलं होतं. कधी थोडं कौतुकानं, थोडं त्राग्यानं आजी म्हणायच्या, ‘‘एकेकदा यांच्यापैकी नक्की कोण कोणाला सोडायला गेलंय हेच कळेनासं होतं मला.‘नटसम्राट’ नाटक गाजल्यापासून आजोबा आजींना ‘अहो-जाहो’ करायचे. ‘‘सोडा हो. आपल्याला कळून काय करायचंय? त्यांचं त्यांना कळतंय ना, मग बास. नवंनवं लग्न ठरल्याचं नादावलेपण वेगळंच असतं माणसाचं. आता आपल्या वेळी नाही का, मी तुम्हाला रोज एक पत्र..’’
‘‘पुरे.’’
‘‘ते पुरे करावं लागलंच की लगेच. एक दिवशी आमच्या आजोबांनी पकडलं. ‘रोजचे दोन दोन – चार चार आणे टपालावर उधळायला तुझी जहागिरी वाया चाललीये का रे दिवटय़ा?’ असं म्हणाले. तरी बरं, चांगला सव्वादोनशे रुपये पगार होता मला.. स्टार्टिगला..’’
‘‘सव्वादोनशे नाही. उगाच वाढवून सांगू नका. दोनशे बावीस रुपये आठ आणे पडायचे हातात. केवळ मी होते म्हणून.. तेवढय़ा पैशात..’’
नातवाचा पगार आजी-आजोबांना माहीत नव्हता. असता तरी त्याच्यावरची शून्य त्यांना मोजता आली नसती. फोनवर राहाण्याचा त्याचा वेळ मात्र त्यांना स्पष्ट दिसायचा, त्रासदायक वाटायचा.
‘‘आता दहा मिनिटं तेवढा फोन दूर ठेवून नीट जेव बाबा.’’
‘‘एक मिनिट आजी, प्लीज,’’ नातवाने खूण केली. ते एक मिनिट पाच-सात मिनिटात संपलं. मग मात्र तो बाह्य़ा सरसावून जेवायला बसला.
‘‘आज लंचमध्ये काय खाल्लंस?’’
‘‘काहीच नाही.’’
‘‘का रे?’’
‘‘वेळ नाही झाला. हिला नवा स्मार्ट फोन घ्यायचाय. त्याचा सव्‍‌र्हे करायला दोघं मिळून मार्केटमध्ये गेलो. वाटेत पटकन एकेक रॅप आणि कॉफी पिकप केली तेवढीच.’’
‘‘अशी कामं सुट्टीच्या दिवशी का करत नाही?’’
‘‘सगळे वीकेण्ड्स बुक्ड असतात आजोबा. त्यात सोमवारी प्रेझेंटेशन असलं की वीकेंण्ड खल्लास होतो. हॅलो.. आय विल कॉल यू लेटर. ओके.’’
‘‘भाजी घे अजून.’’
‘‘नको. आता येतायेता मॅडमना पाणीपुरी हवीशी झाली. मग त्या स्टॉलवर जावंच लागलं. हॅलो.. काय सांगतोस? पार्टी पाहिजे हं पार्टी पाहिजे.. हिला विचारतो केव्हा फ्री आहे ते..’’
नातवाने बोलता बोलता खाणं किंवा खाता खाता बोलणं सुरू ठेवलं. मध्येच डाव्या हाताने मेसेज पाठवणंही सुरू होतंच. त्यातच निरोप देणंही!
‘‘मम्मी पप्पा येणारेत.’’
‘‘कधी? आमच्याशी नाही बोलला तो फोनवर.’’
‘‘माझे नाही. तिचे. त्यांना तुम्हाला काहीतरी विचारायचंय वाटतं.’’
‘‘जेवायलाच येऊ देत मग.’’
‘‘डायटिंग चालू आहे वाटतं. माहीत नाही किती जेवतील..’’
नातवाला भावी सासरची प्रत्येक गोष्ट इत्थंभूत माहिती होती. हळूहळू तो घराविषयी बोलताना  ‘तिच्या घराविषयी’, मम्मी पप्पांविषयी बोलताना ‘तिच्या मम्मी-पप्पांविषयी’ असंच बोलायचा. अनेकदा ‘त्यांच्या’ घरातली क्षुल्लकशी घटनाही त्याला पाच-दहा मिनिटांमध्ये कळलेली असायची. आजी-आजोबांना गंमत वाटायची. कुतूहलही वाटायचं. सगळं एवढं इत्थंभूत आताच समजलं तर ह्य़ाला पुढे लवकर कंटाळा नाही का येणार? पण एवढं विचारायला तरी नातू मोकळा मिळायला हवा ना? तोही फोनवर बोलत नसताना?
‘‘जाऊन येतो जरा,’’ तोंड धुताना नातू म्हणाला. आजीने ‘कुठे’, ‘का’ म्हणून विचारलं नाही. आता तो एकदम मध्यरात्रीच घरी येणार हे त्यांना गेल्या अडीच-तीन महिन्यांमध्ये चांगलंच माहीत होतं. अजून तो रात्रीचा स्वत:च्याच घरी तेवढा परत येत होता. येतानाच दुसऱ्या दिवशीची किती घटिकापळं तिच्याबरोबर घालवायची, हे पक्कं ठरवून येत होता एवढीच, म्हटलं तर तक्रारीची जागा!
नातवानं अंगावर हलकासा सेंट मारून घेतला. आरशासमोर उभं राहून केसांचे स्पाईक्स का काय म्हणतात ते आवरले. म्हणजे वास्तवात हवे तेवढे विस्फारले. बूट चढवले. एवढा सगळा जामानिमा करून तो दरवाजाबाहेर पडायला काही पाच-सात मिनिटं गेली असतील नसतील तेवढय़ात पुन्हा त्याचा मोबाइल ‘टुंगटुंग’ असा वाजला. त्याने तो पुढय़ात घेतला. बटणं दाबली. मेसेज पाहिला. खुदकन हसला. फोन कुरवाळून खिशात टाकताना म्हणाला,
‘‘वेडी आहे बाबा ही..’’
‘‘का? काय झालं?’’ आजोबांनी विचारलं.
‘‘सांगितल्यापेक्षा दहा मिनिटं उशीर झाला की लगेच ‘मिस यू’, ‘मिसिंग यू’ असे मेसेज पाठवते. वेडी! धिस गर्ल. आय टेल यू..’’ नातवाचा चेहरा आनंदाने निथळायला लागला. बघता बघता तो मोटार घेऊन फाटकाबाहेर पडलाही. तो नक्की गेल्याची खात्री झाल्यावर हळूच उठत आजी म्हणाल्या, ‘‘नाही. म्हणजे प्रेमळपणा मान्यच आहे मला. पण हे ‘मिस्यू’, ‘मिसिंग यू’ हे काय असतं हो?’’
‘‘ती त्याला मिस् करत्येय म्हणजे त्याची आठवण काढत्येय.’’
‘कर्म माझं. दहा दहा मिनिटांनी तर फोन करतात एकमेकांना! एकेकदा वाटतं, म्हणावं, लग्नानंतर बोलायला काहीतरी शिल्लक ठेवा रे बाबांनो.. मिसिंग काय कपाळ?’’
‘‘आहे! एक गोष्ट नक्की मिसिंग आहे. ओळखा कोणती?.. रोमान्स!’’
‘‘रोमान्स? मग रात्रंदिवस दुसरं काय करताहेत ?’’
‘‘ती घसट, लगट, चेंगराचेंगरी असं काहीतरी वाटतंय मला. रोमान्स नाही. नो! एखाद्या गोष्टीची आस लागणं, वाट बघणं, जिवाचा चटका, प्रतीक्षेमधली हुरहुर, अवचित मिळाल्याचा आनंद या अर्थाने ‘रोमान्स’म्हणतोय मी. थरार! रोमांचं? नाही बुवा. रोमान्स या शब्दासाठी १०० टक्के समानार्थी मराठी शब्द मला नाही सुचत. तुम्ही समजून घ्या. मला म्हणायचाय तसला ‘रोमान्स’ या पिढीच्या नशिबी नाही.’’
‘‘संदर्भासहित स्पष्ट करा,’’ आजी एकेकाळी शिक्षिका होत्या.
‘‘आपल्यावेळचं आठवा एकेक. आपण समारंभपूर्वक फोटो काढायला जायचो. तो फोटोग्राफर काळ्या बुरख्यातून काय काढतो, फोटो कसा येईल.. काही समजायचं नाही. ४-६ दिवसांनी एकदाचा फोटो हाती पडेपर्यंत नुसती धडधड, धडधड! आता इकडे क्लिक केलं की तिकडून फोटो बाहेर! कसला थरार उरणार? आता सगळं लेकाचं ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ छापाचं! परीक्षा देताच रिझल्ट कळणार. सिनेमा बघण्यापूर्वीच त्याच्याविषयी पानंच्या पानं वाचलेलं असणार. इकडे टाइप झालं पत्रं की तिकडे ‘लाइक’ करायची घाई. आपण चार-चारदा ऊठबस करून पत्रं लिहिणार, टाकणार, ते कधी पोचेल- घरात कोणाच्या हाती पडेल- उत्तर येईल की नाही, आल्यास उत्साहवर्धक असेल की नाही.. लाख हिंदोळे असायचे मनात. हलकेहलके एखाद्या अज्ञात प्रदेशात शिरण्याचा तो रोमान्स.. धडधडत्या अंत:करणाने टपालपेटी उघडण्याची व्याकूळता.. तुमच्या पत्रासाठी तर मी घरी येणाऱ्या पोस्टमनना लाच द्यायचो, माहितीये? पत्र फक्त माझ्याच हाती दिलंस तर तुला दोन रुपये बक्षीस.’’
‘‘पुरे.’’ आजींनी दटावलं. आजोबांना वाटलं त्या लाजल्या. पण खरं तर त्या नातवाच्या घरात शिरण्याने सावध झाल्या होत्या. काहीतरी घ्यायचं विसरलं म्हणून नातू धाडधाड जिना चढून परत घरात शिरत होता. त्याचं विसरलेलं, हरवलेलं सगळं त्याला मिळेल, पण तेवढा तो रोमान्स मिळणार नाही, याबद्दल आजोबांना शंका नव्हती!

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना
ajay devgan
“तो कारमध्ये एक हॉकी स्टिक…”, रोहित शेट्टीने अजय देवगणबाबत केला खुलासा; अभिनेता म्हणाला, “आता मी…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”