उन्हाळ्यात काय खाल्ले पाहिजे किंवा आहार कसा असावा याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या, पण त्याबरोबरच कोणत्या गोष्टी घेतल्या नाही पाहिजेत किंवा कमी प्रमाणात घेतल्या पाहिजेत ते सुद्धा जाणून घेऊ.
- चहा, कॉफी- उन्हाळ्यात चहा, कॉफीचे प्रमाण एकदम अत्यल्प ठेवावे किंवा शक्यतो टाळावे. चहा, कॉफीमुळे शरीरातील उष्णता वाढते व आम्लपित्ताचा त्रासही होऊ शकतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण पण कमी होते.
- शीतपेये- शीतपेये खूप उष्णतेमध्ये पिण्यासाठी बरी वाटतात, कारण ती गार असतात. पण ती फक्त तात्पुरती तहान भागवतात. अतिरिक्त ऊर्जा खूप देतात पण त्यामध्ये कोणतीही शरीरावश्यक गोष्ट नसते. वजन जास्त असणाऱ्यांनी, मधुमेह, हृदयविकार आदी व्याधी असणाऱ्या व्यक्तींनी तर ती अजिबात घेऊ नये.
- मांसाहार- मांसाहार पचनासाठी अतिशय जड असतो. उन्हाळ्यात पचनशक्ती एवढी चांगली नसते. त्यामुळे मांसाहाराचे प्रमाण खूप कमी ठेवावे व शक्यतो रात्रीच्या वेळी मांसाहार करू नये. दुपारच्या जेवणातच घ्यावा.
- तेलकट, मसालेदार पदार्थ- पचनशक्ती मंद असल्याने तळलेले पदार्थ खूप कमी प्रमाणात घ्यावेत किंवा घेऊ नयेत. मसालेदार पदार्थामुळे पित्त होण्याची शक्यता असते व पचनशक्ती अधिकच कमकुवत होते. रोजच्या भाज्यांमध्ये तेल व मसाले कमी प्रमाणात वापरावे.
- शिळे अन्न- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जंतुसंसर्ग खूप पटकन होतो. खूप वेळ राहिलेल्या अन्नामध्ये जंतूंची वाढ लवकर होते. त्यामुळे अशा अन्नामुळे जुलाब, उलटय़ा किंवा इतर त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात शक्यतो ताजे अन्न खावे.– डॉ. सारिका सातव, आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com
आणखी वाचा