तेल, तूप, साय, लोणी, शेंगदाणे, तीळ, खसखस, सुका मेवा इत्यादी अनेक पदार्थ चरबीयुक्त किंवा स्निग्ध पदार्थामध्ये येतात. स्निग्ध पदार्थ पचवण्यासाठी पचनशक्ती चांगली लागते. ती पचनशक्ती हिवाळ्यामध्ये चांगली असते. असे असले तरी स्निग्ध पदार्थामध्ये ऊर्जा जास्त प्रमाणात असते. १ ग्रॅम कबरेदके आणि प्रथिने पचनानंतर ४ कॅलरी ऊर्जा देतात. तर १ ग्रॅम फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थाच्या पचनानंतर ९ कॅलरी ऊर्जा मिळते. म्हणजेच कमी प्रमाणात स्निग्ध पदार्थाच्या सेवनानंतरही जास्त प्रमाणात ऊर्जा मिळते. म्हणून स्निग्ध पदार्थ जरा बेतानेच खाल्लेले बरे. कारण ही ऊर्जा खर्च न होता साठत गेली तर स्थुलता, हृदयरोग, मधुमेह इत्यादी अनेक व्याधींना निमंत्रण मिळते म्हणून फक्त हिवाळा आहे म्हणून जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ घेणे चांगले नाही. ते प्रमाणात घ्यावेत आणि त्याबरोबरच त्या प्रमाणात शारीरिक हालचाली, व्यायामही हवा.
भाज्यांमध्ये तेलाचे प्रमाण कमी ठेवावे. तूप, जेवणाबरोबर त्याचप्रमाणात नाश्त्याबरोबर घेण्यास हरकत नाही, परंतु प्रमाणात असावे. ताजे लोणीसुद्धा खाण्यास हरकत नाही. साय, डालडा हे पदार्थ शक्यतो वापरू नयेत.
बदाम, अक्रोड, पिस्ता आदी सुका मेवा रोज प्रमाणात खाऊ शकता. शेंगदाणे, तीळ आदी पदार्थामधूनसुद्धा चांगल्या प्रकारचे फॅट्स मिळतात. ते हिवाळ्यामध्ये अवश्य खावे.
मोहरीचे तेल इतर तेलांबरोबर हिवाळ्यात जरूर वापरावे. शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, ऑलिव्ह, राइसब्रान तेल बदलून बदलून वापरावीत. स्निग्ध पदार्थ शरीराला नक्कीच गरजेचे आहेत. हिवाळ्यात ते पचवण्यासाठी पचनशक्तीसुद्धा चांगली असते. पण आपण या गोष्टी किती प्रमाणात खात आहोत यावर त्याचे फायदे-तोटे अवलंबून असतात. व्यायाम चांगल्या प्रकारे केल्यास अतिरिक्त प्रमाणातील चरबी साठून राहण्याचा धोका नसतो.

 

Story img Loader