सणासुदीचे दिवस आणि खाण्याच्या पदार्थाचे वैविध्य म्हणजे सणाचा आनंद द्विगुणित करणारी गोष्ट आहे. सणांच्या काळात रोजच्या जेवणापेक्षा बरेच वेगळे पदार्थ खाण्यात येतात आणि शिवाय त्या पदार्थामध्ये वैविध्येही असते. ते आबालवृद्धांना आवडणारे असतात. खाण्याच्या पदार्थामध्ये जेवढे वैविध्य असेल तेवढी जास्त जीवनसत्त्वे आपणास मिळतात.
भाद्रपद, अश्विन या महिन्यांमध्ये उत्सवी वातावरण सगळीकडे पाहायला मिळते. अनेक पदार्थाची रेलचेल या दिवसांमध्ये घरोघरी असते. त्यात गोड पदार्थ नक्कीच जास्त असतात. पुरणपोळी, मोदक, नारळाच्या वडय़ा, फराळाचे विविध पदार्थ इत्यादी अनेक गोष्टी बनविल्या जातात आणि खाल्ल्या जातात. या दिवसांमध्ये हे सर्व पदार्थ बनवताना काही काळजी घेतली तर हा सणासुदीचा आनंद आरोग्यासाठीसुद्धा आनंद देऊन जाईल. मधुमेहाच्या व्यक्तींनी तर जरा जपूनच सर्व सणांचा खाण्याच्या बाबतीतील आनंद घ्यावा. खाण्याच्या वेळा पाळाव्यात. औषधांच्या मात्रा चुकवू नयेत.
सणासुदीचे पदार्थ बनविताना पुढील काही सूचना पाळल्या तर सण अधिकच ‘गोड’ बनतील यात काही शंका नाही.
मोदक शक्यतो उकडून करावे. (तळून नको)
तांदळाच्या पिठाऐवजी गव्हाचे पीठ वापरूनसुद्धा मोदक करू शकतो.
हरभऱ्याच्या डाळीचा वापर कमीत कमी करावा.
पुरणपोळी करतानासुद्धा मुगडाळीचा वापर करू शकतो.
थालीपीठ, मोडाची उसळ इत्यादी गोष्टीसुद्धा नैवेद्यासाठी वापराव्यात.
बाहेरून आणल्या जाणाऱ्या मिठाईचा वापर कमीत कमी करावा.
अशा अनेक छोटय़ा छोटय़ा गोष्टी आपण बदलू शकतो, पण याबरोबर जेवणाच्या वेळा पाळणे आणि व्यायामाची नियमितता पाळणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

Story img Loader