कमी प्रमाणात घेऊनसुद्धा जास्त प्रमाणात ऊर्जा, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिज देणारे पदार्थ म्हणजे सुका मेवा. हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असल्याने व स्निग्ध पदार्थाची गरज असल्याने सुका मेवा घेण्यासाठीचा उत्तम काळ. शरीराला सुका मेव्यामुळे खूप सारे फायदे मिळतात.
बदाम – उत्तम प्रकारचे स्निग्ध पदार्थ यातून मिळतात. रक्ताल्पता, हृदयाच्या विविध व्याधी, काही प्रकारचे कर्करोग, केसांच्या व त्वचेच्या विविध तक्रारी, कृशता, मधुमेह, स्थौल्य इत्यादी अनेक व्याधींमध्ये बदामाचा खूप चांगला उपयोग होतो. बदाम आदल्या रात्री भिजवून ठेवल्यास सकाळी त्याच्या साली सहज निघू शकतात. त्या साली पचनास कठीण असल्याने सालीशिवाय खाणे योग्य.
मनुके – यात तंतुमय पदार्थ जास्त असतात. रक्ताल्पता, मलबद्धता, शरीरातील अतिरिक्त उष्णता, हाडांचे विकार, स्थौल्य, डोळ्यांचे आजार इत्यादी अनेक व्याधींमध्ये याचा उपयोग होतो.
काजू – प्रथिने, चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ यात असतात. हृदयविकार, बऱ्याच प्रकारचे कर्करोग, दातांचे, हाडांचे, विकार, रक्तवाहिन्यांचे विकार, स्थौल्य, मासिक पाळी बंद झाल्यानंतरच्या तक्रारी इत्यादी अनेक व्याधींमध्ये उपयोगी आहेत.
पिस्ता – यात चांगल्या प्रकारचे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, तंतुमय पदार्थ असतात. डोळ्यांचे विकार, मधुमेह, हृदयविकार, मलबद्धता, कोलेस्टेरॉलच्या तक्रारी अनेक व्याधींमध्ये उपयोगी आहे.
अक्रोड – याला बुद्धीचे खाद्य म्हणून ओखळले जाते. ओमेगा-३ नावाचे चांगले स्निग्ध पदार्थ यात असतात. अस्थमा, संधीवात, सोरायसिस, निद्रानाश, मलबद्धता, कर्करोग, अल्झमायर इत्यादी विकारांमध्ये उपयोगी.
खजूर – तंतुमय पदार्थ, भरपूर प्रथिनेही यात असतात. मलबद्धता, आतडय़ांचे विकार, कृशता, हृद्रोग, रक्ताल्पता इत्यादींमध्ये उपयोगी. सर्व सुका मेवा चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. म्हणजे ताणतणावामुळे शरीरात तयार होणाऱ्या विषारी द्रव्यांचा निचरा त्याच्यामुळे चांगला होतो. वैयक्तिक तक्रारी आणि पचनशक्ती यानुसार सेवनाचे प्रमाण ठरवावे.
डॉ. सारिका सातव
आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com