पावसाळा आला की गरमागरम भजी खाण्याचे बेत रंगू लागतात. मात्र पावसाळातला आहारही पचनास हलकाच असावा. कारण याकाळात पचनशक्ती मंदावलेली असते. पावसाळ्यातल्या थंड हवेत गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा अधिक होत असते. त्यातूनच वडा, भजी, समोसा, चहा, कॉफी इत्यादी पदार्थाचे प्रमाण अधिक होऊ शकते. हे पदार्थ कधी तरी खाण्यास हरकत नाही, पण वरचेवर खाणे व उघडय़ावरील पदार्थ खाणे टाळावे. स्वच्छता असलेल्या ठिकाणीच खावे. अन्यथा घरी बनवलेले पदार्थच खावे. घरी भजी, वडे बनवताना हरभऱ्याच्या डाळीऐवजी मूगडाळीचे पीठ पूर्ण किंवा अध्र्या प्रमाणात वापरू शकतो.
समोसा, भजी इत्यादी पदार्थ बनविताना इतर भाज्या वापरू शकतो. हे पदार्थ बाहेर बनवताना तेल वारंवार तापवले जाते आणि ही गोष्ट आरोग्यासाठी अतिशय धोकादायक असते. त्यातून हृदयविकारांना आमंत्रण मिळते. त्यामुळे जास्तीत जास्त पदार्थ घरी चांगल्या पद्धतीने बनवावे. चव, आवड जरूर महत्त्वाची आहे, पण त्याहूनही महत्त्वाचे आपले आरोग्य आहे.
पावसाळ्यात चहा, कॉफीचे सेवन वारंवार करू नये. आधी पचनशक्ती मंदावलेली असते. ती अजून मंदावू शकते. योग्य प्रमाणात घ्यायला हरकत नाही. त्यात आले, गवती चहा, सुंठ, वेलची, दालचिनी, तुळस इत्यादींपैकी कोणतेही पदार्थ वापरू शकता. त्यामुळे पावसाळ्यात वारंवार होणाऱ्या सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.
पित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांनी तर चहा, कॉफी न घेतलेले उत्तम. गरम सूप घेण्यास मात्र हरकत नाही. भाज्यांचे सूप, डाळीचे सूप, मुगाचे कढण इत्यादी पदार्थ गरम असतानाच घ्यावे. त्यात लसूण, दालचिनी, हिंग, जिरेपूड, धणेपूड इत्यादी पदार्थ वापरावे. त्यामुळे पचनशक्तीपण चांगली राहते आणि सर्दी-खोकल्यापासूनही आपला बचाव होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com