आपल्या देशात शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद आणि हेमंत हे सहा ऋतू आहेत. या ऋतूंमध्ये उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा यांची विभागणी होते. वातावरणात जसा ऋतूप्रमाणे बदल होतो, त्याचप्रमाणे आपल्या शरीरातही बदल होत जातो. शरीर आणि वातावरणातील बदलाला अनुसरून आपण आपल्या आहारविहारातही बदल केला पाहिजे. एकच प्रकारचा आहारविहार सर्व ऋतूंमध्ये लागू पडत नाही म्हणून बदल आवश्यकच असतो.
ऋतूनुसार आहार-विहारात बदल न केल्यास आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजेच कफ, वात आणि पित्त यांचा समतोल बिघडतो. त्यामुळे अनेक व्याधींना आपल्याला सामोरे जावे लागते. वाताचा प्रकोप वर्षां ऋतूत होतो, त्याचप्रमाणे पित्ताचा प्रकोप शरद ऋतूत तर कफाचा प्रकोप वसंत ऋतूत होत असतो. ऋतूनुसार योग्य आहार घेतल्याने आपण त्या-त्या ऋतूंमध्ये प्रकोप होणाऱ्या त्रिदोषांना आणि त्यामुळे होणाऱ्या व्याधींना तर दूर ठेवू शकतोच शिवाय योग्य आहार आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करत असतो. एकंदरच निरोगी आयुष्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी ऋतूनुसार आहारविहारात बदल करणे आवश्यक आहे.
आपण या सदरात प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या आहारात काय बदल केला पाहिजे हे समजावून घेणार आहोत. आहाराच्या वेळा, प्रत्येक ऋतूमधील सर्वसाधारण आहार, विशेष आहार, विशेष बदल या क्रमाने आपण आहारपद्धती समजावून घेऊ यात.
डॉ. सारिका सातव
dr.sarikasatav@rediffmail.com