हिवाळा आणि संधिवात यांचा अगदी जवळचा संबंध आहे. सांधे जखडणे, सुजणे, वेदनापूर्वक हालचाली इत्यादी सांध्याबद्दलच्या अनेक तक्रारी सुरू होतात किंवा तक्रारींची तीव्रता वाढते. थंडीमुळे हालचाली कमी राहतात त्यामुळे सांधे अजून जखडल्यासारखे वाटतात. आहाराचा आणि व्यायामाचा संधिवाताच्या तक्रारींवर बराच परिणाम होतो.
सांधे दुखू नयेत म्हणून किंवा सूज कमी राहावी म्हणून आणि हालचाली वेदनारहित राहाव्यात म्हणून आहार खूप मदत करील. ओमेगा-३, कॅल्शिअम, ड-जीवनसत्त्व यांची यात खूप मोठी भूमिका आहे. कॅल्शिअम आणि ड जीवनसत्त्व यांच्यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो व वेदना कमी होण्यास मदत होते. दूध, दुधाचे पदार्थ, सोयाबीन, अंडी इत्यादी मधूनही जीवनसत्त्वे मिळतात. पण ‘ड’ जीवनसत्त्वासाठी सूर्यप्रकाश हाच उत्तम स्रोत आहे. (सकाळी सकाळी मिळणारा सूर्यप्रकाश) ओमेगा- ३ हे एक प्रकारचा स्निग्ध पदार्थच आहे, जो मासे, अक्रोड, सोयाबीन, जवस इत्यादी पदार्थामधून मिळतो. त्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. जवस चटणी, सोयाबीन, अक्रोड हे पदार्थ तर रोजच्या जेवणात वापरावे. लसूण, हळद, गुळवेल इत्यादी पदार्थाची पण मदत हा0ेते.
संधिवातामुळे वजन वाढणे आणि वजन वाढल्यामुळे संधिवाताच्या तक्रारी वाढणे हे विषचक्र आहे. वजन आटोक्यात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यामध्ये व्यायामाच्या आधी वार्मअप करणे खूप गरजेचे आहे. अन्यथा स्नायूंना इजा होण्याची शक्यता असते व परिणामी सांध्यांनाही त्रास होऊ शकतो.
dr.sarikasatav@rediffmail.com