उन्हाळ्यात जसे द्रव आहाराला खूप महत्त्व आहे, तसेच आहाराच्या वेळा व प्रमाणालाही खूप महत्त्व आहे. आहार कोणत्या वेळेला घेत आहोत यावर त्या आहाराचे परिणाम अवलंबून असतात. म्हणजे जरी आहार चांगला असला तरी तो आहार आपण कोणत्या वेळेला घेतोय यावर त्यांच्या फायद्याचे प्रमाण अवलंबून असते. म्हणून आहाराच्या वेळेलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा व रात्र लहान असते. शिवाय अन्न पचविण्याची शक्ती हिवाळ्याइतपत चांगली नसते. त्यामुळे दिवसभरातून थोडे थोडे जेवण घ्यावे. एका वेळी जास्त खाऊ नये. रात्रीचे जेवण उशिरा घेऊ नये. रात्रीचे जेवण जेवढय़ा लवकर शक्य आहे तेवढय़ा लवकर घ्यावे.
आहार शक्यतो हलका असावा. खूप जड अन्न उन्हाळ्यामध्ये त्रासदायक होते. रात्रीच्या जेवणात शक्यतो ज्वारीची भाकरी घेतल्यास उत्तम. सकाळच्या न्याहरीला उशीर करू नये. २ जेवणामध्ये खूप कमी/ खूप जास्त अंतर असू नये. खूप कमी अंतर असल्यास अपचनाचा धोका असतो. कारण आधीचे अन्न पचत असताना दुसरे अन्न पचविणे शरीरास जड जाते. जेवणामध्ये खूप जास्त अंतर असल्यास आम्लपित्ताच्या तक्रारी जाणवू शकतात.
द्रवाहार महत्त्वाचा असला तरी द्रवाहार जेवणाबरोबर जास्त प्रमाणात घेऊ नये. तर २ जेवणांमधील काळात घ्यावा. उदाहरणार्थ ११ वाजता, ३ वाजता इत्यादी म्हणजेच न्याहरी व दुपारचे जेवण यांच्यामध्ये व दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये.
जेवणानंतर पोट गच्च भरल्याची जाणीव येईपर्यंत जेवणाचे प्रमाण नसावे. तर पोट भरल्याची जाणीव जरूर असावी, पण जडपणा नसावा. जेवण व द्रवाहार एकत्र घेतला गेल्यामुळे पोट एकदम गच्च होते व थोडय़ा वेळाने परत भूक लागल्याची जाणीव होते. त्यामुळे कमी अंतराने परत परत खाल्ले जाण्याची शक्यता असते.
– डॉ. सारिका सातव