पाणी ही अत्यंत जीवनावश्यक गोष्टींपैकी एक आहे. शरीराच्या बऱ्याच महत्त्वाच्या प्रक्रियांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. दररोज आवश्यक असणाऱ्या प्रमाणापैकी जर कमी प्रमाण गेले तर शरीराच्या महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये बिघाड होऊ शकतो. या प्रमाणामध्ये आपण घेत असलेले पिण्याच्या पाण्याचे प्रमाण व त्याचबरोबर असलेले इतर द्रव पदार्थ या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव होतो.
एकूण द्रव पदार्थाचे प्रमाण जर कमी घेण्यात आले तर बद्धकोष्ठता, मूत्राश्मरी, आम्लपित्त, अशक्तपणा, त्वचा आणि केस यांच्या ठिकाणी रूक्षता आदी अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
हिवाळ्यामध्ये वातावरणातील थंडपणामुळे तहान लागल्याची जाणीव कमी प्रमाणात होते. त्यामुळे कदाचित पिण्याच्या पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यातून बद्धकोष्ठतेचा पर्यायाने गॅसेस, अपचन इत्यादी अनेक त्रास जाणवू शकतात, म्हणून आपण किती प्रमाणात द्रव पदार्थ घेतो आहे याची जाणीव जरूर असावी. हिवाळ्यात थंडपणामुळे कोमट पाणी, डाळींचे गरम पाणी, सूप (भाज्यांचे/नॉन व्हेज) वारंवार घ्यावे.
वातानुकूलित वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तींनासुद्धा या गोष्टीचा त्रास जाणवू शकतो. थर्मास फ्लास्कमध्ये पाणी, इतर द्रव पदार्थ बराच काळपर्यंत गरम राहू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे गरम पदार्थ घेऊन आपण द्रव पदार्थाचे प्रमाण वाढवू शकतो.
द्रव पदार्थाचे आवश्यक असलेले प्रमाण, मूत्राचे प्रमाण आणि रंग, मलप्रवृत्ती कशी आहे, त्वचेचा व केसांचा रूक्षपणा/स्निग्धता इत्यादी अनेक गोष्टींवरून ठरवू शकतो. तरीपण साधारणत अडीच ते ३ लिटपर्यंत द्रवपदार्थ घेणे आवश्यक आहे.
काही व्यक्ती याला जरूर अपवाद असतात. उदाहरणार्थ, किडनीची व्याधी असलेले रुग्ण. अशा तऱ्हेने आवश्यक असलेले द्रवपदार्थ पाणी आणि इतर द्रव पदार्थ असे दोन्ही मिळून घ्यावे. हिवाळा असल्याने गरम असावे व त्याचे प्रमाण एकावेळी जास्त नसावे तर दिवसभरातून विभागून घ्यावे.
आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com