सर्वसाधारणपणे हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खाव्यात असे आपण नेहमी ऐकतो. पण पावसाळ्यात मात्र हिरव्या भाज्यांचा वापर मर्यादित स्वरूपात करावा. कारण या भाज्यांची स्वच्छता राखणे खूप अवघड असते. माती, चिखल गेलेली भाजी जर नीट स्वच्छ केली गेली नाही तर जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. हिरव्या भाज्यांची स्वच्छता खूप नीट करावी लागते. हिरव्या भाज्या गरम पाणी, पोटॅशिअम परमँगनेटचा वापर करून धुवाव्यात. या दिवसांमध्ये फळभाज्यांमध्ये कोबी, फ्लॉवर या भाज्यांवर कीड जास्त प्रमाणात पडते त्यामुळे या कमी प्रमाणात वापराव्या. आद्र्रता जास्त असल्यामुळे कीड जास्त वाढते. दुधी भोपळा, दोडका, कारले, पडवळ, श्रावण घेवडा, घेवडा, चवळी इत्यादी इतर भाज्या जास्त खाव्यात. परंतु त्यात कीड आहे की नाही हे तपासण्यासाठी या भाज्या बारीक चिरून मगच बनवाव्यात.
भाज्या बनविताना तेल कमी वापरावे. मसाल्यांचा वापर मर्यादित असावा. जिरेपूड, धणेपूड जरूर वापरावी, त्यामुळे जेवणाचे पचन चांगले होते. भाज्या व्यवस्थित शिजवून खाव्यात. सॅलड बनविताना व्यवस्थित धुऊन मग कापावे किंवा सॅलड वाफवून घ्यावे किंवा सूप बनवावे. थोडी दालचिनी पूड त्यात वापरू शकतो. जिरे, दालचिनी इत्यादीमुळे पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्याचे प्रमाणही कमी राहते.
डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com