श्रावण संपत आला असला तरी चातुर्मास असल्याने उपवास सुरू असतातच. त्यामुळे उपवास करताना काय काय काळजी घ्यावी हेही पाहायला हवे. उपवासादरम्यान काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात तरच त्या उपवासादरम्यान किंवा त्यानंतरही आपण निरोगी राहू शकतो. अन्यथा रोजच्या जेवणापेक्षा वेगळे अन्न पदार्थ वापरले गेल्याने, जेवणाच्या वेळा बदलल्याने तसेच अन्नपदार्थाचे प्रमाण बदलल्याने त्रास होऊ शकतो. मधुमेही व्यक्तींनी उपवास न केलेला बरा. कारण अन्नपदार्थाचे बदललेले प्रमाण, वेळा, प्रकार व त्याबरोबर नियमितपणे घेतली जाणारी औषधे याची सांगड बसणे कठीण होते. त्यामुळे या दरम्यान मधुमेही व्यक्तींची रक्तातील साखर एकतर खूप वाढते किंवा खूप कमी पण होऊ शकते. रक्तातील जास्त प्रमाणात वाढलेली साखर जशी धोकादायक असते तशीच खूप कमी होणे पण तेवढेच धोकादायक आहे. उपवासादरम्यान सर्वसाधारणपणे खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते आणि हे जास्त प्रमाणातील पिष्टमय पदार्थ रक्तातील साखर वाढवतात. तसेच त्या दरम्यान तंतुमय पदार्थ व प्रथिने यांचे प्रमाण खूप कमी होते. त्यामुळे मलावष्टंभ, वजन वाढणे इत्यादी तक्रारी जाणवतात. ज्यांना पित्ताचा त्रास किंवा अपचनाचा त्रास आहे. त्यांच्या तक्रारीसुद्धा यादरम्यान वाढण्याची शक्यता असते. जेवणाच्या वेळा चुकल्याने, दोन जेवणांमधील अंतर वाढल्याने पित्त जास्त होते. पचायला जड असलेल्या गोष्टी वारंवार खाण्यात आल्याने पचनशक्तीवर ताण येतो, मलावष्टंभामुळे पित्ताच्या तक्रारी, अपचनाच्या तक्रारी अजूनच वाढतात.
डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com